You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संतोष देशमुखांच्या अमानुष छळाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मस्साजोगमध्ये काय स्थिती? - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"3 महिन्यांपासून गावात आठवडी बाजार भरत नाही. अजून आमची न्यायाची लढाई संपलेली नाही. आता गाव ठरवेल तशी पुढची लढाई असेल."
गावातील आठवडी बाजार ज्या ठिकाणी भरतो, त्या ठिकाणाकडे बोट करुन मस्साजोगचा तरुण आकाश बनसोड हे सांगत होता. सोबतच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी गावासाठी केलेली कामंही दाखवत होता.
9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची निघृपणपणे हत्या झाली होती. त्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीबीसी मराठीने केज तालुक्यातील मस्साजोगला भेट दिली आणि तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला.
आकाश सांगतो, त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर पुढे जो रस्ता जातो, तिथं पूर्वी लोक शौचास जायचे. पण, संतोष देशमुख यांनी तिथं डांबरी रस्ता बांधून झाडांची लागवड केल्यानं आता लोकांचं शौचास जाण्याचं थांबलं आहे.
"संतोष देशमुख यांनी गावात रस्ते केले. पिण्याच्या पाण्याची सुविधा केली. अंडरग्राऊंड नाल्या केल्या. त्यांची हत्या म्हणजे आमच्यासाठी दु:खाचा डोंगर आहे. त्यांची हत्या झाल्यापासून, म्हणजेच 3 महिन्यांपासून आमच्या गावात आठवडी बाजार भरत नाही," असं आकाश सांगत होता.
"संतोष देशमुख 3 टर्म सरपंच होते, पण त्यांचं घर एकदम साधं आहे, यावरुन तुम्ही ते काय चीज होते, हे समजू शकता," आकाश पुढे म्हणाला.
तोवरच बाजूला असलेला दुसरा एक जण म्हणाला, "आमच्याकडे माणूस एक टर्म सरपंच झाला की बंगला बांधतो."
"आमच्या इथं असं नाही," असं म्हणत आकाश मंडपाकडे निघाला.
आकाशशी बोलून झाल्यावर आम्ही संतोष देशमुख यांच्या घराकडे गेलो. त्यांचं घर एकदम साधं आहे. आत आणि बाहेरुन काही ठिकाणी घराची पडझड झालेली आहे.
याच घरात संतोष देशमुख राहत होते.
घराशेजारीच मंडप टाकलेला आहे. तिथं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख बसलेले होते. त्यांचं सांत्वन करण्यासाठी गावातील काही लोक तिथं बसलेले होते. मागे 'आमच्या राजाला न्याय द्या' असे बॅनर्स लागलेले होते.
आरोपींना फाशीची शिक्षा दिल्यावर आम्हाला न्याय मिळेल, असं धनंजय देशमुख सांगत होते.
बीड आणि परिसरात काल (4 मार्च) दिवसभर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे जे फोटो व्हायरल झाले, त्याचीच चर्चा होती.
बीड जिल्ह्यात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. दुकानं, हॉटेल्स सगळं काही बंद होतं.
'लय बेक्कार मारलं', बीडकरांच्या तोंडातून असे शब्द वारंवार ऐकायला येत होते.
दुपारी 1 च्या सुमारास आम्ही मस्साजोगमध्ये पोहचलो, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करणारे बॅनर्स लागलेले होते.
गावातील चौकात काही तरुण मोबाईलवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बातम्या पाहत होते.
धनंजय देशमुख ज्या मंडपात बसले होते तिथं काही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आरोपींचे फोटो व्हायरल झाल्यामुळे अनेक जण धनंजय यांना भेटायला येत होते. त्यांचं सांत्वन करत होते.
'फोटो पाहून सहन होईना'
मस्साजोगहून जवळपास 10 किलोमीटरवर असणाऱ्या येवतीवरुन आलेले एक जण म्हणाले, "फोटो पाहिले की कुणालाच सहन होईना ते. एवढं कुठं असतं का हो?"
बीडच्याच अंबाजोगाईहून सचिन पाटील आले होते. सचिन पाटील यांनी मनोज जरांगेंसारखे यांच्यासारखेच दिसतात. त्यांनी जरांगे यांच्याप्रमाणेच दाढी-कटिंग केलेली आहे. पांढरे शुभ्र कपडे आणि भगवा पंचा हीच त्यांची आता ओळख झाली आहे.
ते म्हणाले, "सरपंचांना मारहाणीचे फोटो पाहून ज्याला हृदय आहे तो माणूस हेलावून गेला नसणार असं होणार नाही. मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा का असेना."
आम्हाला थोडा न्याय भेटलाय, अजून न्याय बाकी आहे, असं ते सहकाऱ्यांशी बोलत होते.
"एवढे भयंकर फोटो बाहेर आलेत म्हटल्यावर न्यायालयाला न्याय करावाच लागेल," असंही ते म्हणाले.
'पैशांसाठी लोक अमानुष वागायला लागलेत'
मंडपातील काही जण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंनी दिलेली प्रतिक्रिया फोनवर पाहत होते.
तितक्यात तुम्ही पत्रकार का? अशी विचारणा संतोष खडप यांनी माझ्याकडे केली. खडप हे धनंजय देशमुख यांना भेटण्यासाठी पुण्याहून आले होते.
"ते फोटो आम्हाला स्वस्थ बसू देईना म्हणून आम्ही इतक्या लांबून आलो धनंजय देशमुखांना भेटायला," असंं त्यांनी म्हटलं आणि ते धनंजय यांना भेटायला मंडपात गेले.
संध्याकाळी 5 च्या सुमारास मंडपात आमची भेट एका 75 वर्षांच्या आजोबांशी झाली. ते मस्साजोगचे असल्याचं त्यांनी सांगितलं. डोक्यावर पांढरी टोपी आणि पांढरा शुभ्र कुर्ता-पायजमा त्यांनी घातलेला होता.
"आमच्या वेळेस अर्धी भाकर मिळाली तरी आम्ही समाधानी राहत होतो. आता 2 टाईमचं व्यवस्थित मिळत असेल तर लोकांनी समाधानी नको का राहायला? पण राजकारणी लोकांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची भूक काही मिटत नाही," असं ते म्हणाले.
"संतोष देशमुख साधा माणूस होता. त्याला काही पैशांची हाव नव्हती. बरं, ज्यांनी संतोषला मारलं त्यांचा आणि संतोषचा काहीही संबंधही नव्हता. त्यांचा ना बांधाला बांध होता, ना काही हेवेदावे होते. पैशांसाठी लोक अमानुष वागायला लागलेत," असं ते आजोबा उद्विग्नपणे म्हणाले.
मस्साजोगमध्ये फिरताना स्वच्छ रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे, पाण्यासाठी बसवलेले शुद्धीकरण केंद्र, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकांचं बाधकाम आणि सुशोभीकरण, कचरा टाकण्यासाठीच्या गाड्या, सार्वजनिक शौचालय नजरेस पडत होतं. संतोष देशमुख यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात हे काम केल्यास आकाश बनसोड सांगत होता.
गावातील शिवाजी महाराज चौकाला लागून पिंपळाचं झाड आहे. या झाडाखाली लहू सोनवणे त्यांच्या मित्रांसोबत गप्पा करत होते.
संतोष देशमुख यांच्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, "लय अवघड झालं हो. संतोष चांगला माणूस होता. त्याला जोडच नव्हती. कुणाचं काही दुखत असेल आणि पैसे लागत असतील तर तो स्वत: दवाखान्याचं बिल भरत होता. पुन्हा ते पैसे मागत नव्हता."
पुढे हे प्रकरण खंडणीच्या वादापासून कसं सुरू झालं आणि त्यात संतोष यांची हत्या कशी झाली, हे ते सांगत होते.
"आमच्या गावानं एक महिना मोर्चे काढले, आंदोलनं केली. मोठमोठे नेते भेटी देऊन गेले. देशभरात हे प्रकरण गाजलं. न्याय नक्की होईल," असं ते पुढे म्हणाले.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं चौकशीचा अंतिम अहवाल बीड जिल्हा न्यायालयात सादर केला आहे.
याप्रकरणाची सुनावणी 12 मार्च रोजी पार पडणार आहे. देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थ न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)