You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संतोष देशमुख यांना अमानुष मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर केजमध्ये तणावपूर्ण शांतता
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाईकरता राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून मुक्त करण्यात आलं आहे."
धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक्स प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे म्हणाले, "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे."
"तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे," असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यानंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले, अशातच देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आले आहेत.
अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केल्याचं चित्र या फोटोंच्या माध्यमातून पुढे आलंय. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गुन्हे अन्वेषण विभाग (CID) या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात हे फोटो जोडण्यात आले आहेत.
या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. तर कोणी त्यांच्या शरीरावर पाय ठेवून फोटो काढला आहे. क्रूरतेची सीमा म्हणजे, या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना मारहाण करत हसताना दिसत आहेत.
फोटोमध्ये देशमुख यांचा चेहरा पूर्ण सुजलेला दिसत असून हे फोटो समोर आल्यानंतर विविध पातळीवर लोकांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला.
अनेकांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून आपला संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज (4 मार्च) देखमुख कुटुंबीयांची भेट घेतली, यावेळी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले.
धनंजय देशमुख यांनी हे फोटो सोशल मीडियावरुन डिलिट करुन टाकण्याची विनंती देखील केली आहे.
या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.
वाल्मिक कराड हा महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी मानला जातो. कराड याचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने चांगलाच जोर पकडला होता. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कोणी काय प्रतिक्रिया दिली?
धनंजय देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले, एकच फोटो बघून मी डोळे झाकले, मला सगळे फोटो बघवलेच गेले नाही.
मी तुटून गेलोय, काय करावं काही समजत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आरोपींना कसं वाचवलं जाईल याचं नियोजन केलं जातंय. पण मारेकऱ्यांना नियती माफ करणार नाही अशी भावना देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली, माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले,"हे भयंकर कृत्य आहे. आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत लढावं लागणार आहे." जरांगेंनी धनंजय मुंडेंवर आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, राजीनामा देऊन थांबणार नाही. खंडणी मुळे हे सगळं घडलय याची बैठक सातपुडा त्यांच्या बंगल्यावर झाली. सगळयांचा सीडीआर (CDR) चेक करावा. आमच्या पंकजा मुंडेंना विचारा, त्या म्हणतात पुण्याचा प्रश्न विचारा, बीडचा प्रश्न त्यांना विचारू नका.
संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख होते. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कोण काय म्हणतंय, मला काही घेणं देणं नाही, आता राजीनामा झाल्यावरच बोलतो मी, अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या, "ही माणुसकीला लाजवणारी घटना आहे. कोणाच्या जीवावर या आरोपींनी असे कृत्य केले. कुठली तरी मोठी ताकद असल्याशिवाय त्यांची हिम्मत होईल असं करायची?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, "फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून सरकारने तातडीनं आरोपींना शिक्षा केली पाहिजे. जेव्हा या सगळ्या घटना बीडमध्ये घडत असताना कोणाला पाठीशी घातलं जातं होतं? हे महाराष्ट्राला स्पष्टपणे सांगायला हवं", असंही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट करत, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शासनाकडे न्याय मागणाऱ्या देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंची दखल शासन घेत नाही असे दिसत आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर रोष व्यक्त केलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, "राजकारण गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी असतं एवढंच माहित होतं.
संतोषअण्णाच्या बाबतीतलं हे क्रौर्य बघितल्यानंतर माणसातल्या गिधाडांना बळ पुरवणारी सत्ता माझ्याकडे नाही याचा आनंद आहे.. ही माणसं नाहीत.. आणि यांचं क्रौर्य निमूटपणे सहन करणारे आम्ही तरी कुठे माणसं आहोत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यांनी फेसबुकवरुनही आणखी एक पोस्ट करत माझं माणूसपण या क्रूर राजकारणापेक्षा लाख मोलाचं असल्याचं म्हटलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर आपला संताप व्यक्त केलाय. एबीपी माझाशी बोलताना आव्हाड म्हणाले, "ही क्रौर्याची परिसीमा आहे. हे अमानवी कृत्य आहे. माणुसकीची हत्या होत असताना आपण डोळे उघडे ठेवून बघायचं आणि ह्रदयाचे सर्व दरवाजे बंद करून टाकायचे असं चित्र दिसून येत आहे."
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "काल जेव्हा फोटो आले ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. फोटो पाहताना पाहताना डोळ्यात पाणी आणि मस्तकात आग.. संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. अतिशय अमानुषपणे मारहाण करतानाचे हे फोटो काल आपल्याकडे आले. परंतु, हे फोटो दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले असतील, अजितदादा यांच्याकडेपण आले असतील. हे फोटो पाहुनही दोन महिने शांत कसे राहिले? तुमचं मन सगळ्या गोष्टी बघून एक निर्णय घ्यावा असं जर तुम्हाला वाटत नसेल, तर तुम्हाला मन आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे रोहित पवार म्हणाले, "फडणवीस यांना मला विनंती करायची आहे की, तुमची मैत्री किंवा जे काय असेल ते कचऱ्यात टाका आणि आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे."
रोहित पवार यांनी अजित पवार यांनाही कारवाई करण्याची विनंती केली. "दादांकडे बगत असताना प्रशासनावर कंट्रोल असणारे नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. आणि काही झाले तरी योग्य निर्णय घेण्याची धमक दादांमध्ये आहे. त्यांनी सभागृह सुरू होण्यापूर्वी राजीनामा घेतला पाहिजे. आज जर राजीनामा झाला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही", असं रोहित पवार म्हणाले.
बीड बंदची हाक
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बीडमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला आमदार संदिप क्षीरसाषगर यांनी पाठिंबा दर्शवलाय.
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांना पत्र लिहुन आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवा, अशीही मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीडमधील केज येथे तणावपूर्ण शांतता आहे.
नेमकं प्रकरण काय?
मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणातील आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणावरून टीकेची झोड उडवली आहे.
सध्या गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. अशातच, देखमुख यांना अमानुषपणे मारहाण करतानाचे फोटो पुढे आले असून संतापाची लाट उसळली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.