तेलंगणात बोगद्याचं छत कोसळून मोठी दुर्घटना, 8 मजूर अडकल्याची भीती

तेलंगणात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचं छत कोसळलं

फोटो स्रोत, UGC

    • Author, अमरेंद्र यारलागड्डा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तेलंगणातील अमराबादमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा एक भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेक मजूर जखमी झाले असून आठजण आत अडकून पडल्याची माहिती आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कार्यालयानं सोशल मीडियावर माहिती दिली आहे की बांधकाम सुरु असलेल्या एसएलबीसी बोगद्याच्या छताचा एक भाग कोसळला आहे.

त्यांनी लिहिलं आहे, "बोगद्याचं छत पडल्यामुळे अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेचच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी, एसपी, अग्निशमन विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत."

आदेश मिळाल्यानंतर जलसंपदा मंत्री, सिंचन सल्लागार आणि इतर अधिकारी विशेष हेलिकॉप्टरनं घटनास्थळी रवाना झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पीटीआयनं माहिती दिली आहे की, दुर्घटनेच्या गांभीर्याचा अंदाज लावण्यासाठी बांधकाम करणाऱ्या कंपनीची टीम बोगद्यात गेली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधून घटनेचा आढावा घेतला. तसेच बचाव कार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

शनिवारी (22 फेब्रुवारी) संध्याकाळी राज्याच्या पाटबंधारे मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, बोगद्यात अडकलेल्या आठ जणांना वाचवण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं.

हा बोगदा एसएलबीसी (श्रीशैलम लेफ्ट बॅंक कॅनाल) प्रकल्पाचा एक भाग आहे आणि तो नालगोंडा जिल्ह्यात बनवण्यात येतो आहे.

या बोगद्याद्वारे श्रीशैलम प्रकल्पातून कृष्णा नदीचं पाणी नालगोंडा जिल्ह्यात पोहोचवलं जाणार आहे.

तेलंगाणाचे जलसंपदा मंत्री उत्तम कुमार रेड्डी गेल्या वर्षी म्हणाले होते की 30 ट्रिलियन मेट्रिक टन क्षमतेच्या या बोगद्यातून दररोज चार हजार क्युसेक पाणी नालगोंडा जिल्ह्यात पोहोचू शकणार आहे.

काय घडलं?

शनिवारी (22 फेब्रुवारी) सकाळी बोगद्याचं काम करण्यासाठी कामगार आणि तांत्रिक कर्मचारी आत गेले होते. सुमारे 13 - 14 किलोमीटर आतील भागात काम सुरू होते.

दरम्यान, सकाळी अंदाजे 8:30 ते 9 च्या दरम्यान अचानक चिखल आणि पाणी बाहेर येऊ लागले अशी माहिती आहे.

प्रशासनानं बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांची नावं जारी केली आहेत. यातील दोन कामगार उत्तर प्रदेशातील असून चारजण झारखंड तर एकजण पंजाबचा रहिवासी आहे.

बोगद्यात काम सुरू असताना गळतीमुळे अचानक पाणी आत शिरल्याचे सांगितले जात आहे.

फोटो स्रोत, Uttam Kumar Reddy @FB

फोटो कॅप्शन, बोगद्यात काम सुरू असताना गळतीमुळे अचानक पाणी आत शिरल्याचे सांगितले जात आहे.

अमराबाद मंडलचे तहसीलदार मारुती यांनी बीबीसीसोबत बोलताना बोगद्यात आठ कामगार आणि तांत्रिक कर्मचारी अडकून पडल्याची माहिती दिली. बोगद्यात काम सुरू असताना गळतीमुळे अचानक पाणी आत शिरल्याचंही त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "आठ जण आत अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे."

आठ कामगार आत अडकून पडल्याची माहिती

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, आठ कामगार आत अडकून पडल्याची माहिती

बाहेर आलेल्या कर्मचाऱ्यांनी आठ कामगार आत अडकून पडल्याचं सांगितलं, अशी माहिती अमराबाद सीआय यांनी बीबीसीसोबत बोलताना दिली.

ते म्हणाले, "बोगद्याच्या आत सुमारे 13 ते 14 किलोमीटर अंतरावर काम सुरू आहे. सकाळी साडेआठ ते नऊ च्या सुमारास अचानक बोगद्यात चिखल आणि पाणी वाहू लागले असल्याची माहिती आम्हाला मिळाली. तसेच, बाहेर उपस्थित असलेल्या कामगारांनी आठ कामगार आत अडकून पडले असल्याचं सांगितंल."

हा अपघात कसा झाला आणि बोगद्याच्या आत नेमकं काय घडलं हे अद्याप स्पष्ट नसून त्याचा तपासही सुरु असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

दुर्घटनेवर मंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

तेलंगणा सरकारमधील मंत्री कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी यांनी बोगदा अपघातावर प्रतिक्रिया देताना अपघाताची कारणे स्पष्ट केली आहेत.

ते म्हणाले, "श्रीशैलम ते देवरकोंडा या बोगद्याच्या 14 किलोमीटर आतील कामादरम्यान प्रवेशद्वारावर (डोमलापेंटा जवळ) गळती झाकणारा काँक्रीटचा तुकडा घसरल्यानं हा अपघात झाला,"

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं की, अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तत्काळ पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रेड्डी, मंत्री जुपल्ली कृष्ण राव आणि इतर अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

घटनास्थळी जमलेले अधिकारी आणि नागरिक

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, घटनास्थळी जमलेले अधिकारी आणि नागरिक

"बोगद्याचे छत कोसळून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना सतर्क केले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अग्निशमन विभाग, हायड्रा आणि सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेण्याचे आदेश दिले," असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, मंत्री उत्तम कुमार रेड्डी, सिंचन सल्लागार आदित्यनाथ दास आणि अन्य अधिकारी विशेष हेलिकॉप्टरने अपघातस्थळी रवाना झाले.

घटनास्थळी जाण्यापूर्वी उत्तम कुमार रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधला. "बोगद्यात पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. आम्ही बचावकार्य सुरू केले आहे," अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

घटनेवरून विरोधकांनी साधला निशाणा

दरम्यान, विरोधी भारत राष्ट्र समितीचे खासदार केटी रामा राव यांनी सरकारवर ही घटना लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की , "चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या एसएलबीसी बोगद्याच्या कामादरम्यान झालेल्या अपघातावर पांघरूण घालण्याचा सरकारचा प्रयत्न असून यातून त्यांच्या मानसिकतेचं दर्शन होतं.

अपघात सकाळी साडेआठच्या दरम्यान झाला असेल तर सरकारने दुपारपर्यंत कोणतीही कारवाई का केली नाही? अधिकाऱ्यांची अशी अवस्था झाली आहे की त्यांना आत किती कामगार अडकले आहेत हे देखील कळू शकत नाही, हे किती दुर्दैवी आहे", अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे लिहितात, "पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार यांनी बोगद्यात गळती झाल्यानं ही दुर्घटना घडली असं सांगणं हास्यास्पद आहे." अशाप्रकारची गळती झाली असेल तर ती थांबवण्यासाठी वेळेवर पावलं का उचलली गेली नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

घटनास्थळी अधिकारी उपस्थित, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, घटनास्थळी अधिकारी उपस्थित, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

तेलंगणा भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी, या अपघातात काही लोक बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकले असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "राज्य सरकार आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारकडूनही पूर्ण सहकार्य मिळत आहे." आम्ही यामध्ये पूर्ण सहकार्य करू, असं त्यांनी सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.