पाकिस्तानात चार वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; बेड्यांसह पळाला आरोपी, नंतर मृतदेहच मिळाला

फोटो स्रोत, Zahra's Uncle Usman
- Author, आसिया अंसर
- Role, बीबीसी उर्दू
पाकिस्तानातील सराय आलमगीर भागात चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण अतिशय नाट्यमय वळणावर येऊन पोहोचलं आहे.
सूचना : या बातमीतील काही वर्णनं वाचकांना विचलित करू शकतात.
या गुन्ह्यातल्या मुख्य गुन्हेगाराची ओळख पटली आहे. गुन्हेगार संशयित म्हणून पोलिसांच्या ताब्यात होता. पण हा संशयित गूढरित्या पळाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यूही झाला.
"आरोपीला अज्ञातांनी डोक्यात गोळी घालून ठार मारले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे," असं पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरात जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक आमीर शिराजी म्हणाले.
गळं कसं घडलं?
सराय आलमगीरमधल्या खोहर गावात 5 जानेवारीला एका चार वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह एका पोत्यात घालून पडक्या घराच्या आवारात फेकून दिला होता.
वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाला असल्याचंही समोर आलं.
सुरुवातीला या मुलीच्या अपहरणाची तक्रार पालकांनी दिली होती. मात्र, मृतदेह मिळाल्यानंतर आणि वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मुलीची हत्या आणि तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा मूळ तक्रारीत यासंबंधीची कलमं जोडली गेली.

फोटो स्रोत, GE
तिचा मृतदेह सापडला त्या आसपासच्या परिसरात पोलिसांनी तपास करून काही संशयितांना ताब्यात घेतलं. पीडितेच्या शरीरात सापडलेल्या डीएनएशी जुळवण्यासाठी त्यांच्या डीएनएचे नमुने घेतले गेले.
त्याचा अहवाल हत्या 11 दिवसांनी म्हणजे गुरुवारी आला. डीएनए 34 वर्षांच्या एका संशयिताशी जुळल्यानं मध्य पंजाबच्या गुजरात जिल्ह्यातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. शुक्रवारी आरोपीला न्यायालयात नेलं जाणार होतं.


धुकं आणि अंधारातून काढला पळ
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यावेळी घातलेले कपडे कुठे ठेवले ते दाखवण्यासाठी आरोपी मोहम्मद नदीमला पोलीस खोहर गावात घेऊन जात होते. तेव्हाच आरोपी फरार झाला. त्यानंतर रात्री उशीरा आरोपीचा मृतदेह एका निर्जन ठिकाणी सापडला.
धुक्याचा आणि अंधाराचा फायदा उचलत 16 जानेवारी 2025 ला आरोपी पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळाला. हवालदाराला धक्का देऊन पोलिसांच्या गाडीतून त्याने उडी मारली आणि बेड्यांसह तो पळून गेला, असं पोलिसांनी जबाबात नोंदवलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला. एका ठिकाणी पोहोच्यल्यावर त्यांना दोन तीन लोकांची आरडाओरड, शिवीगाळ आणि नंतर गोळीबाराचा आवाज आला," असं घटनेच्या एफआयआरमध्ये लिहिलं आहे.
"पोलीस पोहोचताच अज्ञात लोक पळून गेले. त्या ठिकाणी पोलिसांना गंभीर जखमी झालेला एक व्यक्ती सापडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेलं गेलं. मात्र, तो वाचू शकला नाही. हाच बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याची ओळख पटली आहे," अलं एफआयआरमध्ये लिहिलं आहे.
आरोपीला कसं पकडलं?
गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला कसं पकडलं हे सांगितलं होतं.
"आरोपीची ओळख पटवण्यासाठी पंजाब फॉरेन्सिक सायन्स एजन्सीच्या विशेषज्ज्ञांना घटनास्थळी बोलवण्यात आलं होतं. त्यांनी घटनास्थळावरून आणि आसपासच्या परिसरातून डीएनएचे नमुने आणि अन्य पुरावे गोळा केले," असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या 73 जागांवरून डीएनएचे नमुने घेतले गेले. त्यापैकी 24 जागांवर मानवी डीएनए सापडले. त्यानंतर आसपासच्या घरांतून पाच संशयित व्यक्तींची चौकशी केली आणि त्यातील तिघांची पॉलिग्राफिक (खोटं बोललेलं समजण्यासाठी केली जाणारी) चाचणी केली.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर डीएनएचे नमुने पंजाब फॉरेन्सिक सायन्स एजन्सीकडे, लाहोरला पाठवले गेले. संशयिताचा डीएनए मृत मुलीच्या शरीरात सापडलेल्या डीएनएशी जुळला.
या प्रकरणात फक्त डीएनए नमुनेच नाही तर सीसीटीव्हीच्या 77 सेकंदांच्या फुटेजनंही आरोपीपर्यंत पोहोचण्यास महत्त्वाची मदत केली असं, शिराजी यांनी सांगितलं.
सीसीटीव्ही कॅमेरा आणि दरवाजा बंद झाल्याचा आवाज
पोलिसांनी बीबीसीला सांगितलं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 वाजून 7 मिनिटांनी पीडित मुलगी दिसत आहे. त्यानंतर 77 सेकंदांनी म्हणजे 3 वाजून 8 मिनिटांनंतर मुलीच्या ओरडण्याचा आवाज येतो आहे.
"काका… काका… मला तिथं जायचं नाही… मी जाणार नाही" असं ती ओरडत होती. त्यानंतर दाराच्या कडीचा आवाजही रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतो.
मुलीचं ओरडणं कधी बंद झालं हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवली. त्याच वयाच्या एका स्थानिक मुलीला कॅमेरातल्या त्याच जागेवरून 77 सेकंद पुन्हा चालायला लावलं.
"कडीचा आवाज ऐकून ज्या दारावर मुलगी थांबली ते आरोपीचंच घर होतं," असं आमीर शिराजी सांगतात.
मात्र, या घराला अगदी लागून आणखी एक घर आहे. त्यामुळं मुलगी नेमकी कोणत्या घरात गेली हे सांगणं अवघड झालं.
तेव्हा पोलिसांनी दोन्ही घरांच्या दरवाज्याच्या कड्या बंद होण्याचा आवाज रेकॉर्ड केला आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेल्या आवाजाशी त्याची तुलना केली.
"आरोपीच्या घराचा दरवाजा जड होता. त्या दरवाज्याचा आवाज सीसीटीव्हीच्या आवाजाशी जुळला. दुसरा दरवाजा हलका होता," असं पोलिसांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
घराची ओळख पटल्यानंतर आरोपी त्यावेळी घरात होता की नाही हे पोलिसांना शोधायचं होतं.
घटनेच्यावेळी तो एका दुकानात असल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, पोलिसांनी दुकानाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता त्यांना आरोपी दिसला नाही.
"आरोपी तेव्हा घरी एकटाच होता आणि त्याकाळात त्याने मोबाईलचा काहीही वापर केला नाही असं त्याच्या डिजिटल फुटप्रिंटवरून समजतं," असं शिराजी सांगतात.
ज्या पडीक घराजवळ मुलीचा मृतदेह मिळाला त्याची भिंत आरोपीच्या घराला लागून होती.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीसाठी मुलीचा मृतदेह बाहेर घेऊन जाणं अवघड झालं. तेव्हा संधी साधून त्याने मृतदेह पोत्यात भरला आणि पडीक घरातून खाली फेकून दिला.
ज्या पोत्यात मृतदेह भरला होता तसंच पोतं आरोपीच्या घरीही सापडलं, असंही शिराजी म्हणाले.
"पॉलिग्राफ चाचणीसाठी आरोपीला पंजाब फॉरेन्सिक सायन्स एजन्सीला पाठवलं तेव्हा त्याने गुन्हा कबुल केला. महिला अधिकाऱ्यांना त्याने सगळी हकिगत सांगितली," असं ते पुढे म्हणाले.
यासंबंधी आणखी माहिती मिळवण्यासाठी बीबीसीने पीडितेच्या आईशी बोलण्याचा प्रयत्नही केला.
पीडितेच्या भावाला मानसिक धक्का
5 जानेवारीच्या दुपारी ही चार वर्षांची चिमुकली जवळच राहणाऱ्या मावशीच्या घरी जायला निघाली होती. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जवळच्या एका पडक्या घरात पोत्यात सापडला.
"त्या दिवशी मी मुलीला सफरचंद खाऊ घातलं आणि बाटलीतून दूध पाजलं. त्यानंतर तिनं छोटंसं दप्तर उचललं आणि अभ्यास करायचा म्हणून हौसेनं भावाच्या मागं हसत हसत निघाली. तेव्हाच आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता आम्ही फक्त शरीराने जिवंत आहोत. आमचं मन केव्हाच मेलंय," असं पीडितेची आई म्हणाली.
आपल्या मुलीसोबत असं काही झालं याचा विचारही त्यांना सहन होत नाही.
"माझ्या बाळानं पोटभर खाल्लं म्हणून मी खरंतर त्या दिवशी खूप समाधानी होते. मग ती म्हणाली अम्मी, मलाही अभ्यासाला जायचंय. ती मला न विचारता कुठेही जात नसे."
"तेव्हाच माझा मोठा मुलगा माझ्या बहिणीच्या घरी जायला निघाला. ती जवळच राहते. त्या दोघांना आनंदी पाहून मलाही छान वाटत होतं. आमच्या हसत्या कुटुंबाला नजर लागली. माझी मुलगी बाहेर गेली ते जिवंत परत आलीच नाही," पीडितेची आई पुढे सांगत होती.

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेचा त्यांच्या सात वर्षांच्या मुलावर इतका जबदरस्त धक्का बसला आहे की, घरी येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांना पाहूनही तो घाबरतो. घरी कोणालाही येऊन देऊ नका असंच म्हणतो.
पीडितेचे वडील परदेशी राहतात. सध्या ते पाकिस्तानात आहेत. त्यांच्या चिमुकलीनंच हट्ट करून त्यांना बोलावून घेतलं होतं.
"लग्नानंतर 13 वर्षांनी माझी मुलगी जन्मली. त्याआधी रडत मी अल्लाहकडे मुलगी व्हावी यासाठी दुवा करत असे. ती आम्हाला सगळ्यांना फार प्रिय होती. तिचे अब्बा तिच्यावर खूप प्रेम करायचे. रडून रडून तिनं अब्बांना तिच्या जवळ बोलावलं होतं," असं वडील म्हणाले.
5 जानेवारीला नेमकं काय घडलं?
या घटनेबद्दल पीडितेच्या काकांनीही बीबीसीशी चर्चा केली.
"त्या दिवशी आम्ही सगळे एका लग्नाला गेलो होतो. वहिनी आणि माझी पत्नी दोघीच घरी होत्या. चिमुकलीला पाठवल्यानंतर वहिनींनी त्यांच्या बहिणीला फोन करून विचारलं तेव्हा दोघांपैकी फक्त मोठा मुलगाच तिथं पोहोचल्याचं कळालं. आमची मुलगी तिथं पोहोचलीच नाही," ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. "आमच्या गल्लीत मुलं अशी ये-जा करतात, खेळत असतात. खेळीमेळीचं वातावरण असतं. मुलांच्या सुट्ट्या चालु आहेत तर ती बाहेरच असतात. आमच्या शेजारीच असं कृत्य करणारं कुणी रहात असेल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं," असं पीडितेची आई सांगते.
त्याला जोड देत पुढे काका म्हणाले, "वहिनीच्या सांगण्यावरून आम्ही सीसीटीव्हीचं फुटेज तपासलं. आमची मुलगी घराबाहेर पडल्याचं त्यात दिसत होतं. पुढे गल्लीत ती वळाली.
आम्ही सगळीकडे पाहिलं. मी फोन लावला आणि पोलिस स्टेशनला गेलो. पोलिस आले. त्यांनी आजुबाजुला चौकशी केली. पण काहीच समजलं नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











