गोहत्येचा आरोप करत तरुणाची हत्या; ना मॉब लिंचिंगचा गुन्हा, ना अटक - ग्राऊंड रिपोर्ट

- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील नवीन मंडी परिसरात 29 आणि 30 डिसेंबरच्या मध्यरात्री शाहेदिन नावाच्या तरुणाची हत्या झाली. शाहेदिनवर गोवंशातील एका प्राण्याची हत्या केल्याचा आरोप होता.
बेदम मारहाणीत मृत्यू झालेल्या शाहेदिन प्रकरणात घटनेच्या चार दिवसानंतर अद्यापपर्यंत एकालाही अटक झालेली नाही.
मात्र, पोलिसांनी गोवंशातील एका प्राण्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली अदनान नावाच्या एका युवकाला अटक केली आहे.
पोलिसांनी शाहेदिनच्या हत्येप्रकरणी अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हे हत्येच्या गुन्ह्याचे कलम आहे.
मॉब लिंचिंगचा गुन्हा का नोंदवला नाही?
याप्रकरणी पोलिसांनी 'मॉब लिंचिंग' चे कलम 103 (2) नुसार गुन्हा दाखल केलेला नाही.
ज्या घटनेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा समूह धर्म, लिंग, वंश, जात किंवा समुदाय, जन्म स्थान, भाषा, वैयक्तिक श्रद्धा किंवा कोणत्याही कारणास्तव एखाद्या व्यक्तीची हत्या करतो, तेव्हा भारतीय न्याय संहिता (बीएनएस) नुसार असे गुन्हे हे मॉब लिंचिंगमध्ये मोडले जातात.
मॉब लिंचिंगमधील कलमानुसार गुन्ह्यात सहभागी झालेल्या सर्व लोकांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते.
परंतु, समूहाकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या या घटनेत मुरादाबाद पोलिसांनी 'मॉब लिंचिंग'चा गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
शाहेदिनच्या हत्येप्रकरणी कोणाला अटक झालेली नाही याविषयी मुरादाबादचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक सत्पाल अंतील यांनी बीबीसीला म्हटले की, "पोलिस पुराव्याच्या आधारे तपास करत आहेत. हत्या एक गंभीर गुन्हा आहे, केवळ संशयाच्या कारणावरुन कोणाला अटक केली जाणार नाही. जेव्हा पोलिसांकडे सबळ पुरावे असतील, तेव्हा निश्चितच अटक केली जाईल."
मॉब लिंचिंग कलमाअंतर्गत का गुन्हा दाखल केला नाही, असे विचारले असता सत्पाल अंतील म्हणाले की, "मृताच्या नातेवाईकांनी जी तक्रार दिली आहे, त्यानुसार हा मॉब लिंचिंगचा गुन्हा ठरत नाही."
गोवंशाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मृत शाहेदिन आणि या घटनेत सामील झालेल्या त्याच्या साथीदाराविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गोहत्या विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हो दोन्ही गुन्हे हे मुरादाबादमधील मझोला पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत.
पोलिसांनी गोहत्येच्या आरोपाखाली अदनानला 30 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता त्याच्या घरातून अटक केली होती.
गोहत्या आणि शाहेदिनची हत्या कधी झाली?
मुरादाबादमधील नवीन मंडी हा एक मोठा परिसर आहे. जिथे आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी फळे, भाजीपाला विक्रीसाठी आणतात. किरकोळ विक्रेते येथून फळे-भाजीपाल्याची खरेदी करतात.
हा संपूर्ण भाग चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त आहे. आत-बाहेर येण्यासाठी दोन रस्ते आहेत. यातील एका बाजूला एक पोलिस चौकी आहे. इथे मंडी समितीचे गार्ड तैनात असतात.
ही घटना 29 आणि 30 डिसेंबरच्या दरम्यान मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमाराची आहे. मंडीच्या मागे एक मोठे मोकळे पटांगण आहे. जिथे कचऱ्याचे ढीग जमा झालेले आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमी मोठ्या प्रमाणात भटक्या प्राण्यांचा वावर असतो.


पोलिस तपासात सहभागी असलेले एक अधिकारी मोहित चौधरी यांच्या मते, 'शाहेदिन आणि त्याचा साथीदार अदनान स्कूटरवर तिथे आले आणि त्यांनी एका वासराची हत्या केली. त्या वासराचे मांस विकण्याचा त्यांचा विचार होता.'
घटनास्थळावरून पोलिसांना मृत गोवंशातील एक प्राणी, दोरी, गंडासा आणि स्कूटर सापडली आहे.
गोहत्येमुळे तिथे मोठा गोंधळ झाला. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमा झाली आणि त्यांनी शाहेदिनला पकडले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी शाहेदिनला जमावातून बाहेर काढून त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले होते.

ज्या परिसरात ही घटना घडली, तो हिंदूबहुल भाग आहे. मंडीच्या चारही बाजूला हिंदू लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. इथे मुसलमानांची संख्या नसल्यात जमा आहे.
"गोहत्येची माहिती मिळाल्यावर इथे मोठी गर्दी जमा झाली होती", असे एका स्थानिक हिंदू युवकाने सांगितले.
परंतु, आपण त्यावेळी घटनास्थळी नव्हतो, असा दावाही या युवकाने पुढे केला आहे.
शाहेदिनचा मृत्यू कसा झाला?
या घटनेचे अनेक व्हीडिओ व्हायरल झालेले आहेत. शाहेदिन हा रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला असून त्याला जमावाने घेरल्याचे या व्हीडिओंमध्ये दिसते.
या व्हीडिओंमध्ये जमाव त्याच्यावर हल्ला करताना आणि त्याच्या धर्मावरुन बोलताना दिसतो.
काही लोकांची नावेही गर्दीत ऐकू येतात. या व्हीडिओबाबत पोलिसांना माहिती आहे. परंतु, पोलिसांच्या मते अजून याचा तपास सुरु आहे.
बीबीसीने घटनास्थळावरील हे व्हीडिओ पडताळून पाहिले आहेत.
या मारहाणीच्या वेळी घटनास्थळी पोहोचलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने बीबीसीला सांगितले की, "आम्ही जखमी तरुणाला लगेच पोलिस ठाण्यात घेऊन गेलो. तिथून त्याला हॉस्पिटलला नेले."

घटनास्थळी गेलेल्या आणखी एका पोलिसाच्या मते, 'शाहेदिनला पकडणाऱ्या लोकांनी पोलिस हेल्पलाइन नंबर 112 वर फोन केला होता.'
वरिष्ठ पोलिस अधिक्षक सत्पाल अंतील म्हणाले की, "जखमी युवकाला जिल्हा रुग्णालयातून साई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथून त्याला तीर्थंकर महावीर विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सांगण्यात आले होते."
दरम्यान, जखमी शाहेदिनचा सोमवारी मृत्यू झाला.
कोण होता शाहेदिन?
36 वर्षीय शाहेदिनचे कुटुंबीय मुरादाबाद येथील गलशहीद परिसरातील एका गल्लीत वास्तव्यास आहे. तिथे संपूर्ण कुटुंबीय एका छोट्या घरात भाड्याने राहतात.
त्याच्या कुटुंबात पत्नी रिजवाना आणि तीन मुले आहेत. यामध्ये सर्वात मोठा मुलगा 15 वर्षांचा आहे.
त्याची दोन अल्पवयीन मुले शंभर रुपयांपेक्षा कमी रोजंदारीवर कपड्याच्या दुकानात काम करतात. तर सर्वात छोटा 9 वर्षांचा मुलगा शाळेत जातो.
शाहेदिन बॉडी बिल्डर होता. परंतु, दोन-अडीच वर्षांपूर्वी त्याची तब्येत बिघडली होती. उपचारादरम्यान त्याची आर्थिक परिस्थितीही ढासळली. गेल्या काही महिन्यांपासून तो रोजंदारीवर काम करत होता.


शाहेदिनने काही दिवस मटणाच्या दुकानातही काम केले होते, असे त्याचे शेजारी सांगतात.
त्याचा भाऊ आलम बीबीसीशी बोलताना म्हणाला की, "तब्येत बिघडल्यापासून शाहेदिन संकटात आला होता. त्यामुळे तो पडेल तो काम करत होता."
शाहेदिन जेव्हा बॉडी बिल्डिंग करत होता. त्यावेळी त्याची तब्येत चांगली होती. परंतु, आजारी पडल्यानंतर त्याची प्रकृती ढासळली. शाहेदिन बॉडी बिल्डिंग करत होता. त्यावेळचा त्याचा एक जुना फोटो आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे त्याचा भाऊ त्याला आर्थिक मदत करत होता, असे शाहेदिनच्या शेजारच्यांनी सांगितले.
त्याच्या एका नातेवाईक महिलेने सांगितले की, "जर माझ्या भावाकडे पैसे असले असते तर त्याच्या लहान मुलांना मजुरी करावी लागली नसती, ही मुले शाळेला गेली असती."
ज्यादिवशी ही घटना घडली, त्यावेळी त्याने घरी कामाला जात असल्याचे सांगितले होते. त्याच्या भावाने म्हटले की, 'त्याने आपल्या मुलांना कामाला जात असून उद्या सकाळी परत येतो, असे सांगितले होते.'
शाहेदिनच्या नावावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
कोण आहे अदनान?
24 वर्षीय अदनानचे कुटुंबीय शाहेदिनच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर मातीच्या घरात राहतात.
चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ असलेल्या अदनानवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. गोहत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर त्याची विधवा आई आणि अविवाहित बहिणींवर संकट आले आहे. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
अदनानला यापूर्वीही गो तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अदनानबाबत बीबीसीशी बोलताना त्याची आई बेशुद्ध पडली होती. त्या रडत रडत म्हणाल्या, "माझा मुलगा दिवसा घरी झोपला होता, तेव्हा पोलिस आले आणि त्याला घेऊन गेले."

अदनान गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता. त्याने मांसाचा व्यवसाय सोडला होता, असा दावा त्याच्या एका बहिणीने केला आहे.
आसमा म्हणतात की, "माझ्या निर्दोष मुलाला फसवले जात आहे. तो तुरुंगात गेल्यानंतर आता आमच्या घरात कमावती व्यक्ती कोणीच नाही. माझ्या मुलींचे पोट कसे भरायचे हा प्रश्न आता मला पडला आहे.?"
तर पोलिस म्हणतात की, अदनान घटनेच्या वेळी शाहेदिनबरोबर होता आणि गोहत्येत त्याचाही सहभाग आहे.
"अदनाननेच शाहेदिनला मंडीमध्ये नेले होते," असा आरोप शाहेदिनच्या कुटुंबीयांकडून केला जात असल्याचे पोलिस अधिक्षक सत्पाल अंतील यांनी सांगितले.

शाहेदिनच्या कुटुंबींयाचे प्रश्न
शाहेदिनच्या घरी त्याचे नातेवाईक सातत्याने येत आहेत. या घटनेनंतर त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. इथले लोक बोलायला घाबरत आहेत.
त्याचे एक नातेवाईक हाजी शमशाद म्हणाले की, "शाहेदीनला किती क्रूरपणे मारहाण केली, हे व्हीडिओमध्ये दिसत आहे. परंतु, अद्याप कोणालाच अटक केलेली नाही. अटक तर लांबची गोष्ट झाली, अजून कोणाची चौकशीही केलेली नाही."
शमशाद पुढे म्हणतात, "मारहाण करणाऱ्या लोकांनीच व्हीडिओ बनवला आणि त्यांनीच तो व्हायरला केला. कोणी काय केले हे सर्व पोलिसांना माहीत आहे. पण अजून कोणाला अटक केलेली नाही. मुसलमानांचे मॉब लिंचिंग केले जात आहे. पोलिस काहीच कारवाई करताना दिसत नाहीत. माझा भाऊ मुसलमान होता, त्यामुळे कोणालाच पकडले नाही. एखाद्या हिंदूची हत्या झाली तर संपूर्ण परिसराला पोलिस घेरतात."

शाहेदीनचा मित्र वारिस जमाल कुरेशीला आता त्याच्या मुलांच्या संगोपनाची काळजी आहे.
वारिस म्हणतात की, "तो एकटा कमावता होता. जमावाने बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. त्याचे कुटुंबीय अनाथ झाले आहे. सरकारने त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहिजे."
शाहेदिनवर झालेल्या हल्ल्याचा व्हीडिओ दाखवत त्याची एक बहीण म्हणाली की, "माझ्या भावाची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. तो तडफडत होता, तरीही त्याला मारले जात होते. पोलिसांनी अद्याप या लोकांना पकडले नाही. आम्ही मुस्लिम आहोत, कदाचित त्यामुळेच आम्हाला न्याय मिळत नाही."
अज्ञात व्यक्तीवर गुन्हा का दाखल झाला?
याप्रकरणी अज्ञातांविरोधात शाहेदिनच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहेदिनचा मोठा भाऊ मोहम्मद आलम म्हणाला की, "व्हीडिओत हल्लेखोर दिसत नसल्यामुळे आम्ही अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवली. आमचा कोणावर संशय नाही, त्यामुळे आम्ही कोणाचे नाव तक्रारीत नोंदवलेले नाही."
आलम म्हणाला की, "माझ्या भावाची हत्या मंडीतील लोकांनी केली यात शंका नाही. आता त्यांची ओळख पटवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे."
"पोलिस पण त्यांचेच आहेत, मारणारेही त्यांचेच आहेत. जर आम्ही आमच्या भावाच्या हत्येबाबत जास्त बोलू लागलो तर आमच्यावरही हे लोक खोटा गुन्हा नोंदवू शकतात," अशा शब्दांत आलमने आपली हतबलता व्यक्त केली.
तरीही आलम म्हणतो, "एवढं सगळं करूनही आम्हाला आशा आहे की, एक दिवस आम्हाला न्याय मिळेल. जिथेपर्यंत कायदेशीर लढाई आहे, तोपर्यंत आम्ही लढू."

हिंदू संघटनांचा दावा
"माझ्या कार्यकर्त्यांकडून मला गोहत्येची माहिती मिळाली होती, त्यामुळे मी पोलिस ठाण्याला गेलो होतो," असा दावा हिंदू संघटना राष्ट्रीय बजरंग दलाचे मुरादाबादचे अध्यक्ष रोहन सक्सेना यांनी केला आहे.
या घटनेनंतर रोहन सक्सेना यांनी एक व्हीडिओ जारी केला होता. त्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मंडीमध्ये गोहत्येची माहिती मिळाली होती, असे म्हटले होते.
परंतु, बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटले की, ते किंवा त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी नव्हते. पोलिसांना याबाबत कळवले होते.
रोहन सक्सेना पुढे म्हणाले की, "मी साडेपाचच्या सुमारास पोलिस ठाण्यात पोहोचलो होतो. आमच्या कार्यकर्त्यांनी गोहत्येची माहिती दिली होती. घटनेच्या वेळी आमचा कोणताच कार्यकर्ता तिथे उपस्थित नव्हता."

तर दुसरीकडे मुरादाबाद विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजकमल गुप्ता म्हणतात की, "या घटनेमागे एखादा मोठा कट असू शकतो. एका हिंदूबहुल भागात ही मुले फक्त गोहत्या करण्यासाठी गेली होती का?"
शाहेदिनच्या मृत्यूवर राजकमल गुप्ता दुःख व्यक्त करतात. परंतु, हिंदू बहुल भागात गोहत्या करुन वातावरण बिघडवणे किंवा दंगल घडवण्याचा हा कट नव्हता का? अशी शंका उपस्थित करुन याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही ते करतात.
ते म्हणाले की, "कोणालाही बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली जाऊ नये. पण गायीची हत्या पाहून हिंदूंना राग येणे स्वाभाविक आहे."
पोलिसांनी दिली नाहीत प्रश्नांची उत्तरे
या हत्येप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणाचीही चौकशी केलेली नाही. बीबीसीशी बोलताना तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने फक्त इतकेच सांगितले की, तपास अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
बीबीसीने या घटनेनंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांसंबंधी वरिष्ठ पोलिस अधिक्षक सत्पाल अंतील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.

परंतु, बीबीसीशी चर्चेदरम्यान त्यांनी म्हटले की, 'मृताच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील काळात त्यांनी आणखी काही तथ्ये दिल्यास त्यांचा तपासात समावेश केला जाईल.'
"मृताच्या कुटुंबीयांनी दुसरा आरोपी अदनानचेच हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. आम्ही मृताच्या नातेवाईंकांचे जबाब घेणार आहोत. जेणेकरून उद्या कोणीही पोलिसांनी स्वतः कारवाई केली असे म्हणू नये," असे म्हणत सत्पाल अंतील यांनी पोलिसांची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेशी निगडीत अनेक व्हीडिओ समोर आले आहेत. यात घटनेवेळी उपस्थितीत असलेल्या लोकांची नावे ही ऐकायला येतात.
"आम्ही अत्यंत गांभीर्याने घटनेचा तपास करत आहोत. फक्त पुराव्याच्या आधारेच कारवाई केली जाईल. संशयाच्या आधारावर आम्ही कोणालाही अटक करणार नाही," असेही या घटनेच्या व्हीडिओबाबत सत्पाल अंतील म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











