मानवी उत्पत्तीचं आफ्रिकेतील मूळ शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोष्ट, आयुष्यभर हिणवल्यानंतर लोकांनी मान्य केलं संशोधन

फोटो स्रोत, Science Thlalak dahkhawmna hmun
- Author, बीबीसी न्यूज, मुंडो
साधारण शंभर वर्षांपूर्वी एक शोधनिबंध प्रकाशित झाला होता. 20 दशलक्ष वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका मुलाच्या अवशेषांवर (जीवाश्म) तो आधारित होता. त्या लेखानं मानवी उत्क्रांतीबद्दलची समज मुळापासून बदलायला सुरुवात केली.
पण, त्या बदलाची प्रक्रिया इतकी सोपी नव्हती.
त्या लेखाचे लेखक रेमंड डार्ट यांनी त्यांच्या घरी एका मित्राच्या लग्नाच्या दिवशी तो अवशेष शोधला. त्यांनी आतापर्यंत शोधलेल्या अवेशषांपैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा अवशेष किंवा जीवाश्म ठरला.
वऱ्हाडी येण्याची वेळ झाली होती. नवरदेव त्यांचा मित्र होता. त्याचवेळी, दोन मोठ्या पेट्या घेऊन पार्सल देणारा एक जण तिथे आला.
यात गिफ्ट्स नाहीत हे त्यांना पेट्या पाहताच समजलं. त्यांनी 1959 मध्ये प्रकाशित झालेल्या 'अॅडव्हेंचर्स ऑफ द मिसिंग लिंक' या त्यांच्या पुस्तकात याबद्दल उल्लेख केला आहे.
रेमंड डार्ट हे मानवाच्या उत्क्रांतीवर संशोधन करत होते.
रेमंड हे त्यांचा शरीरशास्त्राचा विद्यार्थ्यी जोसफिन सॅल्मोन्सची वाट पाहत होते. सॅल्मोन्सने एका अवशेषाबद्दल आधीच माहिती दिली होती, त्याचीच ते वाट पाहत होते.
'तांग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी चुनखडीच्या खाण कामगारांना काही अवशेष सापडले होते. 'तांग' म्हणजे 'सिंहाचं निवासस्थान' असा अर्थ होतो. हे ठिकाण दक्षिण आफ्रिकेतील रेमंड डार्ट हे शिकवत असलेल्या जोहान्सबर्गच्या उत्तर- पश्चिमेकडून 500 किमी अंतरावर स्थित आहे.

फोटो स्रोत, Science Photo Library
रेमंड हे एका नव्यानं स्थापन झालेल्या "विट्स" नावानं ओळखल्या जाणाऱ्या विट्सवॉटरसँड युनिव्हर्सिटीमध्ये शरीर शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत होते.
हे विद्यापीठ नवीन असल्यामुळं त्यांना उपकरणं, ग्रंथालय आणि संशोधनासाठीच्या नमुन्यांचीही कमतरता जाणवत असे. त्यामुळं रेमंड यांनी ते नमुने घरी पाठवण्यास सांगितले होते. जेव्हा ते नमुने आले तेव्हा लग्नाच्या तयारीत असलेले रेमंड हे अर्धवट कपडे घातलेल्या अवस्थेतच ते पाहण्यासाठी गेले.
रेमंड यांच्या पत्नीनं त्यांना लग्नसोहळा झाल्यावर घरी आलेल्या नमुन्यांचा अभ्यास करा अशी विनंती केली. परंतु, रेमंड यांना उत्सुकता आवरता आली नाही. त्यांनी पत्नीच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं.
दुसऱ्या पेटीतील एक कवटी बाहेरुन दिसत होती.


रेमंड यांनी पत्नी डोराच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन एका सुईच्या सहाय्याने त्यातला चुना आणि वाळू काढली. परंतु, मित्रानं फटकारल्यानंतर रेमंड यांनी संशोधनाचं काम थांबवलं आणि लग्न सोहळ्यात ते सहभागी झाले.
लग्न झाल्यानंतर लगेचच त्यांनी पुन्हा राहिलेलं संशोधन सुरू केलं. ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी सोडलंच नाही.
"त्यात त्यांना एका लहान मुलाचा चेहरा दिसला, जो दुधाच्या दातांनी भरलेला होता."
दोन पायांवर चालणाऱ्या माकडाचा मेंदू
डार्ट यांनी शोधलेला हा चेहरा ही एकमेव आश्चर्यकारक गोष्ट नव्हती.
"त्या कवटीच्या आतील भागातही आश्चर्यकारक गोष्टी होत्या."
न्यूरोसायन्स आणि शरीर शास्त्रातील तज्ज्ञ तसेच मेंदू विकासशास्त्रज्ञ असलेल्या डार्ट यांनी पाहता क्षणीच ओळखलं की, "आपल्या हातात असलेला मेंदू हा सामान्य मानवी मेंदू नाही."
"ते एक मोठ्या माकडाच्या (बबून) मेंदूपेक्षा तीन पट मोठे होते. इतकंच नव्हे, ते प्रौढ माकडाच्या मेंदूपेक्षाही मोठे होते," असं डार्ट यांनी नंतर नमूद केलं आहे.
"कवटीच्या खालच्या भागात, जिथं पाठीचा कणा प्रवेश करतो, तो भागही ते पाहू शकले. त्या भागाला 'फोरमेन मॅग्नम' म्हणतात," असं विट्स युनिव्हर्सिटीमध्ये मानद प्राध्यापक असलेले जीवाश्मशास्त्रज्ञ ली बर्गर यांनी बीबीसीला सांगितलं.
"त्याक्षणी आश्चर्यकारकपणे त्यांना तो जीवाश्म दोन पायांवर चालणाऱ्या माकडाचा मेंदू असल्याचं लक्षात आलं."
"याआधी अशी हाडांची संरचना असलेला जीवाश्म कधीही सापडला नव्हता," असं त्यांनी नमूद केलं आहे.

फोटो स्रोत, Science Photo Library
"ऐतिहासिकदृष्ट्या सांगायचं तर, मानवी वंशाच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी हे जवळजवळ तुटलेले कनेक्शन होतं," असं जीवाश्मशास्त्रज्ञ चार्ल्स लॉकवुड यांनी 2008 मध्ये बीबीसीला सांगितलं होतं.
"मानवी वैशिष्ट्यांसह माकडा सारख्या प्राण्याचा हा पहिला पुरावा होता."
"एक प्राणी जो मानवाशी स्पर्धा करण्याचं धाडस करतो," असं त्यांनी आश्चर्यानं नमूद केलं आहे.
त्याची वैशिष्ट्ये "आश्चर्यकारक" पण सारखी होती हे देखील ते नमूद करतात.
मानव जातीचा उगम कुठं झाला?
"या जीवाश्माचा शोध लागण्यापूर्वी, मानव जातीची उत्क्रांती आफ्रिकेतूनच झाली याची कल्पना नव्हती," असं बर्गर ठामपणे सांगतात.
"त्यानंतर आणखी सुमारे 25 ते 30 वर्षे ते स्वीकारलं गेलं नाही," असंही त्यांनी सांगितलं.
याच्या आधी 75 वर्षांपूर्वी चार्ल्स डार्विन यांनी हा खंड मानव जातीचे मूळ स्थान असल्याचं भाकीत केलं होतं. परंतु, त्यांचा तो दावा त्याकाळी मान्य झाला नव्हता.
पण 'जावा मॅन' (होमो इरेक्टस) आणि 'पेकिंग मॅन' च्या (होमो इरेक्टस पेकिनेन्सिस) शोधानंतर, उत्क्रांतीचा जनक असलेल्या डार्विनचा सिद्धांत नाकारुन आशिया हे मानव जातीचे मूळ स्थान किंवा पालकस्थान असल्याचं सुचवलं गेलं.
ब्रिटनमध्ये 1912 मध्ये आढळलेल्या इओअँथ्रोपस डॉसोनीच्या मेंदूचा आकार हा मानवासारखा आणि जबडा हा वानरासारखा असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मानव जातीचा उदय युरोपमध्ये झाल्याचे मानले गेले.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान डार्ट यांना त्या लहान मुलाच्या कवटीत आणि मानवी प्रजातींमधील फरक लक्षात आला.
जरी विविध मानवी प्रजाती आणि डार्ट यांनी शोधलेल्या जीवाश्म यांच्यात समानता असली तरी, इतर अवशेष आधीच मानवांमध्ये विकसित झाले होते.
डार्ट यांनी शोधलेला जीवाश्म हा माकडही नव्हता आणि तो पूर्णपणे मानवामध्येही विकसित झालेला नव्हता.
म्हणून त्यांनी असं गृहीत धरलं की, आपल्या आणि आपल्या वानर पूर्वजांमधील एक दुवा निखळला आहे आणि त्यांनी तेच केलं जे एखाद्या अँग्लो-सॅक्सन शास्त्रज्ञानं केलं असतं. त्यांनी ब्रिटिश जर्नल नेचरच्या संपादकांना पत्र लिहिलं.
त्याचा हा शोध इतका आश्चर्यकारक होता की, तो प्रकाशित व्हायला थोडा वेळ लागला.
त्यांनी त्यांच्या "ऑस्ट्रेलोपिथेकस आफ्रिकनस, द ऍप मॅन ऑफ साउथ आफ्रिका" या लेखात त्यांनी प्रभावशाली प्राचीन जीवाश्म शास्त्रज्ञांच्या मतांचा देखील समावेश केला होता.
परंतु, त्या सर्वांच्या प्रतिक्रिया नकारात्मक होत्या.
लोकांनी त्यांना हिणवलं, खिल्ली उडवली
आस्ट्रेलियातून आलेल्या डार्ट यांनी सिडनी विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेतले आणि नंतर लंडन विद्यापीठात प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञांसोबत काम केल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात जास्त ओळख नसलेल्या दक्षिण आफ्रिकेत ते गेले.
वयाच्या 32 व्या वर्षी त्यांनी एका नव्यानं सुरु झालेल्या विद्यापीठात शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून एक वर्षाहून अधिक काळ काम केलं होतं. परंतु ते स्वतः याचं वर्णन नशिबानं मिळालेली संधी असं करतात.
पुढच्या काही आठवड्यांत त्यांनी काहीतरी जीवन बदलणारा शोध लावला आहे, असं त्यांना वाटलं.
त्यांनी संबंधित शैक्षणिक संस्थांना, शास्त्रज्ञांना जीवाश्माविषयी माहिती दिली आणि त्यांचा आधार न घेता कोणत्याही तणावाशिवाय जगासमोर ते जाहीर केले.
परंतु, या सर्वांनी त्यांचा लेख ठामपणे नाकारला.

फोटो स्रोत, Getty Images
"आजच्या माकड आणि मानव यांच्यातील विलुप्त वानर प्रजातींची कवटी" असं त्या कवटीचं वर्णन डार्ट यांनी केलं आहे. तर युरोप आणि अमेरिकेतील आघाडीच्या शास्त्रज्ञांनी ही केवळ एका वानराची कवटी असं म्हटलं.
मानवी पूर्वज जास्त अन्नपदार्थ असलेल्या जंगलात नव्हे तर दक्षिण आफ्रिकेच्या समतल भागातच उत्क्रांत झाले आहेत, अशी कल्पना त्यांनी मांडली.
"त्यांच्या प्रगत मेंदूची क्षमताच त्या कठीण परिस्थितीत त्यांना जीवित राहण्यास शक्य करीत होती," असे म्हणत त्यांनी ही कल्पना मांडली.
ऑस्ट्रेलोपिथेकस (लुप्त झालेल्या मानव प्रजाती) यांनी खाणीत सापडलेल्या दगडांचा वापर हत्यार म्हणून केला होता, या त्यांच्या अंदाजाची सहकाऱ्यांनी खिल्ली उडवली आणि त्यांना "डार्ट आर्टिफॅक्ट्स" असं नाव देऊन हिणवलं गेलं.
शिक्षण क्षेत्राबाहेर डार्ट आणि त्यांनी शोधलेल्या जीवाश्माची चेष्टा केली गेली, तसेच या गोष्टी हास्यास्पद आणि गाण्यांद्वारे सादर करण्यात आले.
दरम्यान, ख्रिश्चन धर्माच्या सदस्यांनी पत्रे लिहून त्याच्यावर "देशद्रोही" आणि "सैतानाचा एजंट" असल्याचा आरोप केला आणि त्यांना "नरकाच्या आगीत जाळावं" असे वाईट उद्गार काढले.
अखेर संशोधन मान्य करावंच लागलं…
मानव उत्क्रांतीबद्दलच्या त्यांच्या वादग्रस्त विचारांना शास्त्रज्ञांनी स्वीकारायला अनेक दशके लावली.
आफ्रिकेत जास्त प्रमाणात ऑस्ट्रेलोपिथेकस यांच्या हाडांचे अवशेष सापडल्यामुळे या मतांमध्ये बदल करणं अपरिहार्य झालं.
1946 मध्ये, शरीरशास्त्रशास्त्रज्ञ विल्फ्रिड ले ग्रोस क्लर्क यांनी जीवाश्म तपासले आणि ते मानव असल्याची पुष्टी केली.
वर्ष 1974 मध्ये प्रसिद्ध ऑस्ट्रेलोपिथेकस अफरेन्सिस संबंधित लुसी या प्रसिद्ध मानवी सांगाड्याचा जीवाश्म सापडला आणि 1976 ते 1978 दरम्यान टांझानियामध्ये 3.5 दशलक्ष वर्षे जुन्या पायाचे ठसे सापडल्यानंतर, आफ्रिकेच्या बाहेर डार्ट यांचा सिद्धांत सामान्यतः स्वीकारला जाऊ लागला.
अखेर डांग चाइल्डचा पुतळा हा शतकातील शोध (डिस्कव्हरी ऑफ सेंच्युरी) ठरला. त्यानंतरच्या संशोधनांनी पुष्टी केली की, डार्ट यांचे बहुतेक निष्कर्ष बरोबर होते.
असं दिसून आलं की डार्ट यांच्या अंदाजानुसार मुलाचा मृत्यू वयाच्या सहाव्या किंवा सातव्या वर्षी झाला नाही. तर वयाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी झाला. तसेच, तो गरुडाच्या हल्ल्यात मरण पावला.

फोटो स्रोत, Science Photo Library
सुरुवातीला त्यांच्या कल्पना नाकारल्या गेल्या होत्या. सुदैवानं आपल्या विचारांना दुजोरा मिळाल्याचे आणि ते व्यापकपणे स्वीकारल्याचे रेमंड डार्ट यांना पाहता आलं.
वर्ष 1984 मध्ये अमेरिकन जर्नल सायन्सने 20 व्या शतकात मानवी जीवनाला आकार देणाऱ्या 20 वैज्ञानिक शोधांपैकी एक म्हणून डार्ट यांच्या शोधाला मान्यता दिली.
साधारण चार वर्षांनंतर डार्ट यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं.
ज्या ठिकाणी ती कवटी सापडली होती ती जागा 2005 पासून युनेस्कोच्या 'क्रॅडल ऑफ ह्युमनकाइंड' या जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे.
अशा प्रकारे, डार्ट यांच्या शोधाला सुरुवातीला विरोध झाला. नंतर त्यांचाच सिद्धांत सर्वमान्य झाला आणि ते शास्त्रज्ञांच्या इतिहासात एक महत्त्वाचा भाग बनले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











