'ऑपरेशन सिंदूर'नंतरचा भारताचा भव्य सराव, पाकिस्ताननं जारी केला शिपिंग अलर्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शकील अख्तर
- Role, बीबीसी उर्दू, नवी दिल्ली
गुजरात आणि राजस्थानच्या पश्चिम सीमेवर भारतानं 'त्रिशूल' या लष्करी सरावाची सुरुवात केली आहे.
पाकिस्तानला लागून असलेली पश्चिम सीमा, पाकिस्तानचा सिंध प्रांत आणि भारतातील गुजरात यांदरम्यान असलेल्या सर क्रीक भागापासून अरबी समुद्रापर्यंतच्या परिसराचा या सरावात सामावेश आहे.
'ऑपरेशन सिंदूर'नंतरचा हा सर्वात मोठा लष्करी सराव असल्याचं संरक्षण तज्ज्ञ सांगत आहेत.
दरम्यान, पाकिस्तानी नौदलानं रविवार (2 नोव्हेंबर) पासून उत्तर अरबी समुद्रात नौदल लष्करी सराव सुरू केला आहे आणि तो 5 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
एकाच वेळी एकाच भागात लष्करी सराव
लष्करी सराव आणि क्षेपणास्त्र चाचणीचा मागोवा घेणारे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डेमियन सायमन यांनी 'एक्स'वर म्हटलं आहे की, "ज्या भागात सुरू असलेल्या तिन्ही दलांच्या लष्करी सरावांसाठी भारतानं हवाई क्षेत्र राखीव ठेवलं आहे, त्याच भागात गोळीबार सरावासाठी पाकिस्ताननं आता नौदलानं शिपिंग अलर्ट जारी केला आहे."
हे तेच क्षेत्र आहे जिथं भारतानं आपल्या सैन्याच्या संयुक्त सरावासाठी दोन आठवड्यांसाठी हवाई क्षेत्र आरक्षित केलं आहे.
दोन्ही देशांकडून या लष्करी सरावाच्या भौगोलिक क्षेत्रावर केलेल्या ओव्हरलॅपिंगवर सायमन यांनी लिहिलंय की, "जरी सरावाचं भौगोलिक क्षेत्र हे एकमेकांच्या सराव क्षेत्रात येत असलं तरी, दोन्ही बाजूंच्या समन्वयामुळे हे सुनिश्चित होईल की कोणत्याही घटनेशिवाय गोष्टी व्यावसायिक पद्धतीनं केल्या जातील."
पाकिस्तानचे बीबीसी वार्ताहर रियाज सोहेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी नौदलानं अरबी समुद्रात लष्करी सराव सुरू केला आहे. हा सराव कराचीमध्ये सुरू झालेल्या पाकिस्तान इंटरनॅशनल मेरिटाइम एक्स्पो अँड कॉन्फरन्स (पीआयएम) चा भाग आहे.
या एक्स्पोमध्ये 44 देशांतील 133 प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, हा आंतरराष्ट्रीय कायदा आहे की आसपासच्या कोणत्याही सरावासाठी हवाई वाहतुकीचा इशारा दिला जातो आणि या सरावांसाठीही चेतावणी देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे नौदल प्रमुख अॅडमिरल नवीद अश्रफ यांनी खाडी भागातील फॉरवर्ड पोस्टला भेट दिली होती.
पाकिस्तानी नौदलाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, अॅडमिरल नवीद अशरफ यांनी ऑपरेशनल सज्जता आणि लढाऊ क्षमतेचा आढावा घेण्यासाठी हा दौरा केला होता.
या काळात तीन आधुनिक 2400 टीडी हॉवरक्राफ्ट (जमीन आणि पाण्यावर चालणारी वाहनं) देखील पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली, ज्यामुळे अनेक भागात पाकिस्तानी नौदलाची क्षमता आणि ऑपरेशनल पोहोच वाढली आहे.

प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, आपल्या भाषणात पाकिस्तानी नौदल प्रमुख म्हणाले की, सर क्रीक ते जिवानीपर्यंत त्यांना त्यांच्या सार्वभौमत्वाचं आणि सागरी सीमांच्या प्रत्येक इंचाचं संरक्षण कसं करावं हे माहित आहे आणि पाकिस्तानी नौदलाची क्षमता समुद्रापासून किनाऱ्यापर्यंत त्यांच्या अढळ मनोबलाइतकीच मजबूत आहे.
पाकिस्ताननं शनिवारी (1 नोव्हेंबर) रोजी 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या नौदल सरावासाठी अलर्ट जारी केला आणि म्हटलं की, "या सरावात युद्धनौका सुमारे 6,000 चौरस किलोमीटर क्षेत्रात हवेत आणि समुद्राखाली गोळीबार सराव करतील. या सरावादरम्यान या भागावर समन्वित देखरेख ठेवली जाईल. जहाजांना सरावाच्या क्षेत्रापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे."
त्याचबरोबर भारतदेखील आपल्या पश्चिम सीमेवर 'त्रिशूल' नावाचा लष्करी सराव करत असून त्यात भारताच्या गुजरातला पाकिस्तानच्या सिंध प्रांतापासून वेगळं करणाऱ्या सर क्रीक भागाचा देखील समावेश आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर क्रीक वाद
सर क्रीक हा पाकिस्तानचा सिंध प्रांत आणि भारतातील गुजरात राज्य यांच्यातील 96 किलोमीटर लांबीचा दलदलीचा भाग आहे, ज्यावर दोन्ही देशांचे स्वतःचे हक्क आहेत.
गेल्या महिन्यात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दावा केला होता की, पाकिस्तान सर क्रीकच्या परिसरात लष्करी पायाभूत सुविधा विकसित करत आहे.
राजनाथ सिंह म्हणाले होते की, "सर क्रीक भागात सीमा वादाला खतपाणी घातलं जात आहे. भारतानं हा वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत, परंतु पाकिस्तानचे हेतू सदोष आहेत, त्यांचे हेतू स्पष्ट नाहीत. पाकिस्तानी लष्करानं ज्या पद्धतीनं सर क्रीकच्या लगतच्या भागात आपल्या लष्करी इमारतींचा विस्तार केला आहे, त्यावरून त्याचा हेतू स्पष्ट होतोय."

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्ताननं या क्षेत्रात काही चुकीचं धाडस करण्याचा प्रयत्न केला तर इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलतील, असं निर्णायक उत्तर दिलं जाईल, असं राजनाथ सिंह यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
त्यांच्या या विधानाच्या संदर्भानं सर क्रीक आणि अरबी समुद्रातील भारतीय सैन्याच्या सध्याच्या लष्करी सरावांना अधिक महत्त्व दिलं जात आहे.
संरक्षण तज्ज्ञ राहुल बेदी यांनी बीबीसीला सांगितलं की, "सर क्रीक असलेल्या गुजरातच्या कच्छ भागातही हा सराव केला जात आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानची 96 किलोमीटर लांबीचा खाडीचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. या क्षेत्राच्या बाहेरील भागावरही या सरावात लक्ष केंद्रित केलं आहे."
भारतीय नौदल इथं हवाई दल आणि लष्करासोबत मोठ्या प्रमाणात संयुक्त सराव करणार आहे.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर तिन्ही दलांचा लष्करी सराव'
अनेक विश्लेषक आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांचे मते, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत पाकिस्तानला हे दाखवण्याचा प्रयत्न करतंय की, भारताचे सैन्य पूर्णपणे तैनात आणि सज्ज आहे. कोणत्याही झटापटीचा संकेत नसला तरी, या सरावातून एक स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न निश्चितच केला जात आहे.
भारतीय नौदलाच्या ऑपरेशन्सचे महासंचालक व्हाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी गेल्या शुक्रवारी सांगितलं होतं की, दक्षिणी लष्करी कमान, पश्चिमी नौदल कमान आणि दक्षिण-पश्चिम हवाई कमान या सरावात सहभागी आहेत.
त्यांनी सांगितले होतं की, या सरावात 20 ते 25 युद्धनौका, 40 लढाऊ विमानं आणि इतर अनेक विमानांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राहुल बेदी म्हणतात, "हा लष्करी सराव अतिशय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. यात सुमारे 20 हजार सैनिक सहभागी होत आहेत."
"या सरावात फक्त भूदल नव्हे, तर हवाईदल आणि नौदलातील अत्याधुनिक विमाने. जशी की राफेल, सुखोई-30, तसंच नौदलाच्या आधुनिक युद्धनौका आणि पाणबुड्याही सहभागी आहेत."
राहुल बेदी यांच्या मते, "या सरावाचे दोन प्रमुख उद्देश आहेत. पहिला म्हणजे भूदल, नौदल आणि हवाईदल यांच्या संयुक्तपणे काम करण्याच्या क्षमतेत वाढ करणे, आणि दुसरा म्हणजे सैन्याचा एक समन्वित नेटवर्क तयार करणे."
"या अंतर्गत भारताच्या हवाई आणि अवकाशीय संसाधनांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जरी हा सराव दरवर्षी केला जातो, तरी या वर्षी मे महिन्यात झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर हा एक अत्यंत प्रगत (अॅडव्हान्स) सराव मानला जात आहे."
'हा केवळ एक नियमित सराव'
संरक्षण विषयाला वाहिलेल्या 'फोर्स' मासिकाचे संपादक आणि विश्लेषक प्रवीण साहनी यांच्या मते, 'त्रिशूल' हा दरवर्षी होणारा एक नियमित लष्करी सराव आहे आणि भारतात त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात आहे.
साहनी म्हणतात, "या लष्करी सरावाचा सर खाडी वादाशी काहीही संबंध नाही. मोदी सरकार हे दाखवू इच्छिते की, भारत एक अत्यंत शक्तिशाली देश आहे. या सरावाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात आहे. खबरदारी म्हणून पाकिस्ताननेही असा सराव सुरू केला आहे."
साहनी पुढे म्हणतात, "पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रदेशात इराण देखील एक शक्तिशाली देश आहे, पाकिस्तानही शक्तिशाली आहे. चीन आपल्या ताकदीनिशी जिबूती (पूर्व आफ्रिकेतील एक देश) इथं उभा आहे. आता बातमी आलीय की, रशियानेही मादागास्कर (आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असलेला एक द्वीपीय देश) इथं आपला तळ उभारला आहे. या प्रदेशात काहीही हालचाल करणे म्हणजे युद्ध ओढवून घेण्यासारखं आहे."
साहनी म्हणतात, "मोदी सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत झालेल्या सर्व लढाया किंवा झटापटी (2016, 2019 आणि 'ऑपरेशन सिंदूर'च्या अंतर्गत झालेल्या) या सर्व काश्मीरकेंद्रित होत्या. पण जर आपण आंतरराष्ट्रीय समुद्रात काहीही कृती केली, तर त्याचा अर्थ चौफेर युद्ध असा होतो."
"भारत सध्या अशा परिस्थितीसाठी तयार नाही. त्यासाठी अजून बरीच तयारी करावी लागेल. पाकिस्तान या प्रदेशात एकटा नाही, इथे अनेक मोठ्या शक्ती सक्रिय आहेत."

साहनी यांचं म्हणणं आहे की, हा फक्त एक नियमित सराव आहे.
सरावाच्या सुरुवातीला पत्रकारांशी बोलताना दक्षिण-पश्चिम कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल मंजिंदर सिंग म्हणाले होते, "हा लष्करी सराव, जो तुम्ही पाहत आहात, 'न्यू नॉर्मल' या संकल्पनेखाली तयार करण्यात आला आहे. या 'न्यू नॉर्मल'मध्ये जर आपल्या देशावर कधी दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला युद्धाची कृती मानली जाईल."
मंजिंदर सिंग म्हणाले होते, "याचा अर्थ आपण नेहमी लढाईसाठी तयार राहिले पाहिजे आणि प्रभावी प्रत्युत्तर देण्याची क्षमता ठेवली पाहिजे. या अंतर्गत अनेक नवी तंत्रज्ञानं आणि उपकरणं आली आहेत. नव्या क्षमतांचे अनेक शस्त्रास्त्र आपण आपल्या सैन्यात समाविष्ट केले आहेत. तिन्ही दलांनी एकत्र येऊन शत्रूवर हल्ला करायचा आहे आणि त्याचे प्रात्यक्षिक तुम्ही या सरावात पाहणार आहात."
दरम्यान, भारताने देशाच्या ईशान्य भागात, जिथे चीन, म्यानमार, भूतान आणि बांगलादेश यांच्या सीमा लागतात, तिथे मोठ्या प्रमाणावर हवाई सरावासाठी शुक्रवारी 'नोटिस टू एअरमेन' (NOTAM) असा सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











