भारतीय लष्करप्रमुखांनी इतिहास-भुगोलावर असं काय वक्तव्य केलं की पाकिस्तानला प्रतिक्रिया द्यावी लागली?

फोटो स्रोत, Getty Images
भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत केलेल्या ताज्या विधानानंतर पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया दिली. 'शेजारच्या देशाची सुरक्षा व्यवस्था आक्रमकतेसाठी सबबी शोधत आहे', अशी प्रतिक्रया पाकिस्तानने दिलीय.
बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराच्या इंटरसर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने त्यांच्या निवेदनात भारताचे संरक्षणमंत्री, लष्करप्रमुख आणि वायूसेनाप्रमुखांच्या विधानांचा संदर्भ देत म्हटलं की, पाकिस्तानला "नकाशावरून पुसून टाकण्याचा हेतू" असेल, तर भारताने हेही लक्षात घ्यावं की, "जर अशी परिस्थिती उद्भवली तर दोन्ही बाजूंचं नुकसान होईल."
भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी (3 ऑक्टोबर) राजस्थानमध्ये म्हटलं होतं की, जर पाकिस्तानाला इतिहास आणि भूगोलात टिकून राहायचं असेल, तर त्याला 'राज्य-पुरस्कृत दहशतवाद' थांबवावा लागेल.
यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर क्रीक प्रकरणावर विधान केलं होतं. तर, वायूसेना प्रमुख अमरप्रीत सिंह यांनी भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षावर विधान केलं होतं.
बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, भारताचे संरक्षणमंत्री, लष्करप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांच्या विधानांनंतर पाकिस्तानी लष्कराच्या एका निवेदनात म्हटलं आहे की, भारतीय सुरक्षा संस्थांच्या वरिष्ठ नेत्यांकडून येणारी "अवास्तव, चिथावणीखोर आणि युद्धाला चालना देणाऱ्या विधानांमुळे" त्यांना खूप चिंता वाटत आहे.
एप्रिल 2025 मध्ये काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर 6–7 मेच्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानप्रशासित काश्मीरमधील कट्टरपंथी प्रशिक्षण शिबिरांना लक्ष्य केलं होतं. या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले होते.
यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सैनिकी संघर्ष झाला. 10 मे रोजी संघर्ष विरामावर सहमती जाहीर झाल्यानंतर संघर्ष थांबला.
भारताचे लष्करप्रमुख काय म्हणाले होते?
भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी शुक्रवारी (3 ऑक्टोबर) राजस्थानातील श्रीगंगानगरमधील अनूपगडच्या सीमेजवळच्या भागात (फॉरवर्ड एरिया) सैन्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गेले होते.
तिथे सैन्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते सैनिकांना म्हणाले की त्यांनी पूर्णपणे सज्ज राहावं.
ते म्हणाले, "ऑपरेशन सिंदूर 1.0 च्या वेळेस भारतानं संयम दाखवला होता. मात्र जर पुन्हा तशी वेळ आली तर आपण किती तयारीत आहोत हे पाहायचं आहे."
लष्करप्रमुख म्हणाले, "जर यावेळेस ऑपरेशन सिंदूरसारखी परिस्थिती निर्माण झाली, तर भारत पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. ऑपरेशन सिंदूर 1.0 च्या वेळेस जसा संयम ठेवण्यात आला तसा यावेळेस भारत ठेवणार नाही."

फोटो स्रोत, ANI
"यावेळेस आम्ही त्यापुढची कारवाई करू. पाकिस्तानला इतिहासात आणि भूगोलात राहायचं आहे की नाही याचा विचार करावा लागेल अशी कारवाई होऊ शकते," असं ते म्हणाले.
भारताचे लष्करप्रमुख म्हणाले, "जर पाकिस्तानला भूगोलातील स्थान टिकवायचं असेल तर त्यासाठी त्यांना सरकार-पुरस्कृत दहशतवाद थांबवावा लागेल."
जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, "तुम्ही पूर्ण तयारीत राहा. जर परवरदिगारची इच्छा असेल, देवाची इच्छा असेल, वाहे गुरुची इच्छा असेल तर लवकरच तुम्हाला त्याची संधी मिळेल."

ते पुढे म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यानं 9 'दहशतवादी तळ' निश्चित केले होते. त्याचबरोबर असंही ठरवलं होतं की या कारवाईत कोणताही निरपराध व्यक्ती मारला जाता कामा नये. कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता."
ते म्हणाले, "आम्हाला फक्त दहशतवादी तळ उदध्वस्त करायचे होते. विशेषकरून जे लोक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होते आणि त्यांचे बॉस होते, त्यांच्यावर हल्ला करायचा होता."
जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, "यावेळेस आम्ही प्रत्येक लक्ष्य उदध्वस्त करण्याचे पुरावेदेखील सगळ्या जगाला दाखवले. आधी पाकिस्तान ते लपवायचा."
ते म्हणाले, "या हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या खूप जास्त होती."
'इतिहास आणि भूगोल दोन्हीही बदलतील'
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 2 ऑक्टोबरला म्हणाले होते की पाकिस्तान सर क्रीकजवळच्या भागात लष्करी पायाभूत सुविधा विकसित करतो आहे.
गुजरातमधील कच्छमध्ये असणाऱ्या एका लष्करी तळावर शस्त्र पूजा आयोजित करण्यात आली होती. त्यात सहभागी होण्यासाठी राजनाथ सिंह गेले होते. राजनाथ सिंह म्हणाले होते की देश स्वतंत्र होऊन 78 वर्षे झाली आहेत. मात्र असं असूनही सर क्रीकच्या परिसरात सीमेचा वाद निर्माण केला जातो आहे.
ते म्हणाले होते, "पाकिस्तानच्या लष्करानं ज्याप्रकारे सर क्रीकला लागून असलेल्या भागातील त्यांच्या लष्करी तळ, पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे, त्यातून त्यांचा हेतू दिसून येतो."
"जर पाकिस्ताननं या भागात कोणत्याही प्रकारचं धाडस करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला असं निर्णायक उत्तर दिलं जाईल की 'इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलतील'."

फोटो स्रोत, ANI
भारत आणि पाकिस्तानमध्ये सर क्रीकच्या विभागणीवरून अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. सर क्रीक हा पाकिस्तानचा सिंध प्रांत आणि भारताच्या गुजरात राज्यामध्ये असणारा 96 किलोमीटर लांबीचा दलदलीचा प्रदेश आहे. यावर दोन्ही देश दावे करत आहेत.
सर क्रीक भारत आणि पाकिस्तानमध्ये असणारी एक चिंचोळी आणि दलदली खाडी आहे. ही खाडी अरबी समुद्राला जोडलेली आहे. आधी याचं नाव बन गंगा होतं.
मग ब्रिटिश राजवटीच्या काळात याचं नाव 'सर क्रीक' झालं. हा भाग तेव्हापासूनच म्हणजे ब्रिटिश राजवटीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. भारत आणि पाकिस्तान या सागरी सीमेकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात.
भारताचं म्हणणं आहे की खाडीच्या मध्ये सीमा निश्चित झाली पाहिजे. तर पाकिस्तानचं म्हणणं आहे की सीमा त्यांच्या किनाऱ्यापासून मानली पाहिजे. कारण 1914 मध्ये ब्रिटिश सरकारनं याला नॉन नॅव्हिगेबल (म्हणजे जिथे जहाज जाऊ शकत नाहीत) मानत सीमा ठरवली होती.
हवाई दल प्रमुखांचा पाकिस्तानची विमानं पाडल्याचा दावा
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह अलीकडेच भारतीय हवाई दलाच्या 93 व्या वर्धापनदिनी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषेदत म्हणाले होते की 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळेस करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये "पाकिस्तानची 4-5 लढाऊ विमानं जमिनीवरच नष्ट झाली होती. त्यातील बहुतांश एफ-16 विमानं होती."
ते म्हणाले होते की हवाई दलानं पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांवर हल्ला केला. त्यात रडार, कमांड सेंटर, धावपट्टी, हँगर आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र यंत्रणेचं नुकसान करण्यात आलं.
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांच्या मॉडेलच्या संदर्भातील ही पहिली पुष्टी, जे 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला.
याआधी 9 ऑगस्टला बंगळुरूमध्ये 16 वे एअर चीफ मार्शल एलएम कात्रे मेमोरियल लेक्चरमध्ये भाषण करताना एअर चीफ मार्शल म्हणाले होते की पाकिस्तानची किमान पाच लढाऊ विमानं आणि एक मोठं विमान नष्ट झालं होतं. मात्र त्यांनी ही कोणत्या मॉडेलची विमानं होती ते सांगितलं नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
अमर प्रीत सिंह म्हणाले, "पाकिस्तानच्या नुकसानीचा विचार करता, आम्ही अनेक ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये किमान चार ठिकाणी रडार, दोन ठिकाणी कमांड अँड कंट्रोल सेंटर, दोन धावपट्ट्या आणि तीन वेगवेगळ्या तळांवर तीन हँगरचं नुकसान झालं."
"आमच्याकडे एक सी-130 प्रकारचं विमान आणि किमान 4-5 लढाऊ विमानं, ज्यातील बहुतांश एफ-16 होती, नष्ट झाल्याचे पुरावे आहेत. त्यावेळेस तिथे एफ-16 विमानं होती. त्यांचा मेंटेनन्स सुरू होता."
एअर चीफ मार्शल म्हणाले की 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळेस भारतीय हवाई दलाच्या आधुनिक लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला त्यांच्या सीमेमध्ये देखील एका निश्चित अंतरापर्यंत कारवाई करण्यापासून रोखलं होतं.
भारताबरोबर झालेल्या लष्करी संघर्षाच्या वेळेस पाकिस्तान सातत्यानं दावा करत आला आहे की त्यांनी भारताची लढाऊ विमानं पाडली आहेत. अर्थात त्यांनी विमानं पाडल्याचे पुरावे दिले नव्हते.
पाकिस्तानच्या सैन्यानं काय प्रतिक्रिया दिली?
बीबीसीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर क्रीकवर केलेल्या दाव्यावर पाकिस्ताननं स्वतंत्रपणे कोणतीही वेगळी प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र भारताचे संरक्षण मंत्री, लष्करप्रमुख आणि हवाईदल प्रमुखांनी पाकिस्तानच्या सैन्याबाबत दिलेल्या वक्तव्यांबद्दल ते म्हणाले आहेत की "अशा वक्तव्यांनी दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो."
बीबीसीनुसार, आयएसपीरच्या वक्तव्यात म्हटलं आहे की मे महिन्यात "भारतानं केलेल्या हल्ल्यामुळे दोन अणुशक्ती युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्या होत्या. बहुधा भारत त्यांच्या नष्ट झालेल्या लढाऊ विमानांचे ढिगारे विसरला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानच्या सैन्यानं इशारा दिला आहे की भारताचे संरक्षण मंत्री, सैन्य आणि हवाई दलाच्या प्रमुखांच्या "चिथावणीखोर वक्तव्यांमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो" आणि "पाकिस्तान मागे हटणार नाही. आम्ही कोणत्याही संकोचाशिवाय प्रत्युत्तर देऊ."
आयएसपीआरनं म्हटलं आहे की "पाकिस्तानच्या सशस्त्र दलांमध्ये शत्रूच्या प्रदेशातील सर्व कोपऱ्यांपर्यंत युद्ध लढण्याची क्षमता आणि दृढनिश्चय आहे."
"पाकिस्तानला नकाशावरून संपवण्याचा जो मुद्दा आहे, त्याबाबतीत भारतानं हे स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवं की जर अशी परिस्थिती निर्माण झाली, तर त्यामुळे दोन्ही बाजूंचं नुकसान होईल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











