'छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नटबोल्ट गंजले असल्याचे नौदलाला कळवले होते', सामाजिक बांधकाम विभागाचा दावा

फोटो स्रोत, ANI
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असलेल्या राजकोटच्या किल्ल्यावरील पुतळा सोमवारी ( 26 ऑगस्ट ) कोसळल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
'या पुतळ्याचे नटबोल्ट गंजले असून उपाययोजना करण्यात यावी,' अशी सूचना आमच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी देण्यात आली होती असे सामाजिक बांधकाम विभागाने म्हटले आहे. 20 ऑगस्ट रोजीच पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सांगण्यात आले होते असे राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सामाजिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) दुपारी एक वाजताच्या सुमारास कोसळला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चौथरा 12 फुटांचा तर पुतळा 28 फूट उंच होता. तसंच पुतळ्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 44 लक्ष खर्च करण्यात आला होता अशी माहिती सामाजिक बांधकाम विभागाने दिली आहे.
राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं? पुतळा कोणी बांधला होता आणि पुतळ्याचा दर्जा कसा होता? पुतळा बांधण्याचे निकष काय? आणि अभ्यासकांचं यावर काय म्हणणं आहे? जाणून घेऊया,
राजकोट किल्ल्यावर ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?
4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या पुतळ्याचे काम नौदलामार्फत झाल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे.
26 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात छत्रपती शिवरायांचा हा पुतळा दुपारी 1 वाजताच्या सुमारास कोसळला. त्यावेळी तिथे कोणीही नव्हतं अशी माहिती स्थानिक नागरिकांनी बीबीसी मराठीला दिली.
ते म्हणाले, “तिथे काही मोजकी घरे आहेत. त्या घरात राहणाऱ्यांनी ही माहिती सांगण्यास सुरुवात केली ही महाराजांचा पुतळा पडला आहे.”

राजकोट येथे आपल्या कार्यालयात असताना भाई मांजरेकर यांना ही माहिती कळाली आणि ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी ही माहिती तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस अधीक्षक आणि मंत्रालयात कळवली असं ते सांगतात.
भाई मांजरेकर यांनी बीबीसी मराठी सांगितलं की, “मी त्यावेळी कार्यालयात होतो. त्या वेळी खूप पाऊस आणि वारा जोरात होता. तिथे काही घरं आहेत त्यातल्या लोकांनी सांगायला सुरुवात केली की पुतळा कोसळला आहे.
"मी तत्काळ त्याठिकाणी पोहचलो. माझं कार्यालय तिथेच बाजूला आहे. मी शब्दातही सांगू शकत नाही अशी अवस्था होती.
"मी लगेच पोलीस अधीक्षकांना मेसेजवर कळवलं, सार्वजनिक बांधकाम विभागात आणि मंत्रालयातही फोन केला. तोपर्यंत तिथे मोठ्या संख्येने लोक जमले होते,” असे भाई मांजरेकरांनी सांगितले.
भाई मांजरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता अजित पाटील यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला या प्रकरणी पुतळ्याचे काम केलेल्या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
'पुतळ्याचे जॉईंट, नटबोल्ट्स आधीच गंजले होते, त्याकडे दुर्लक्ष झाले?'
सामाजिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी भारतीय नौदल दिनानिमित्त नौदलाने केली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुतळा आणि चौथऱ्याचे काम दोन स्वतंत्र एजन्सीला देण्यात आले होते.
सदर पुतळा उभारण्यासाठी 'नेव्हल डॉकयार्ड' यांनी मागणी केल्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधी देण्यात आला होता.

फोटो स्रोत, ANI
4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. यानंतर, आतापर्यंत हजारो पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे.

20 ऑगस्ट 2024 ला ( पुतळा कोसळण्याच्या 6 दिवस आधी) पाहणी करुन अहवाल पाठवल्याचे सामाजिक बांधकाम उपविभाग, मालवणने आपल्या पत्रात म्हटले आहे.
एरिया कोस्टल अधिकाऱ्यांना सामाजिक बांधकाम विभागाने पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी म्हटले होते की 'सामाजिक बांधकाम विभागाने केलेल्या पाहणी दरम्यान पुतळ्याच्या जॉईंटसाठी वारण्यात आलेल्या नटबोल्टला गंज लागल्याचे दिसून आले आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करावी.'
यासंदर्भात संबंधित एजन्सीला 22 ऑगस्टपर्यंत कळवण्यात आले होते, असं सार्वजनिक बांधकाम विभागाचं म्हणणं आहे.
"पुतळ्याच्या शिल्पकाराला देखील आपण नटबोल्ट गंजले आहेत असे कळवले आहे. तसेच या गंजलेल्या नटबोल्टांमुळे पुतळा विद्रुप दिसत आहे असे कळवले होते," असे सामाजिक बांधकाम विभागाने आपल्या पत्रात म्हटले होते.
बीबीसी मराठीने संबंधित शिल्पकाराला फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी अद्याप प्रत्युत्तर दिले नाही.
‘घाईगडबडित पुतळा उभरला,’ पंतप्रधानांना डिसेंबरमध्येच पत्र
माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी याच पुतळ्याच्या कामाबद्दल अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 डिसेंबर 2023 रोजी एक पत्र लिहिले होते, असे सांगितले आहे.
तसंच या पुतळ्याची शासनाच्या एखाद्या तज्ज्ञ समितीने परिपूर्ण परीक्षण करून शिल्पकलेचा नमुना म्हणून गणले जाईल असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे साजेसे नवे शिल्प याठिकाणी प्रतिष्ठापित करावे ही विनंती या पत्राद्वारे केली होती, असे संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले होते.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात संभाजीराजे छत्रपती म्हणतात, "कित्येक आधुनिक साधने उपलब्ध असूनही या शिल्पाची घडण प्रभावी आणि रेखीव नाही. अत्यंत कमी वेळेत घाईगडबडित या शिल्पाचे काम केल्याचे दिसते," असंही ते आपल्या पत्रात सांगतात.
ते पुढे म्हणाले, "मूर्तीच्या अनेक भागात कमतरता दिसून येते. मूर्तीचे हात, पाय, चेहरा प्रमाणबद्ध नसल्याचे दिसते. हेच शिल्प कायमस्वरूपी आहे की केवळ आपल्या हस्ते अनावरण कार्यक्रम पार पाडण्यासाठी बसवलेले तात्पुरते शिल्प आहे आणि नंतर याठिकाणी चांगले शिल्प बसवले जाणार आहे, याचा उलगडा होत नाही."
‘पुतळा मजबूत नाही हे आधीच सांगितलं होतं’
इतिहासाचे अभ्यासक लेखक इंद्रजीत सावंत यांनीही हा पुतळा बसवला त्याचवेळी आपण पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल आणि याच्या मजबुतीबाबत आक्षेप घेतले होते असं म्हटलं आहे.
ते सांगतात, “हा पुतळा शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नाही. याबद्दल त्यावेळेला आम्ही पोस्ट लिहून लोकांसमोर आलेलो होतो. पण याकडे सबंधितानी दुर्लक्ष केले होते.
"त्यानंतर 3-4 फेब्रुवारी 2024 रोजी मी या पुतळ्याला भेट दिली होती. त्यावेळीही हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही. हे शिल्प बदलावे असे निरीक्षण नोंदवले होते,” असे सावंत सांगतात.
"भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील, ती आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल. तर त्याच्या मजबूती कडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे की नाही?” असाही प्रश्न इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

शिवछत्रपतींचे स्मारक हे घाईगडबडित तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता. पण हे करत असताना या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबुतीकरण याच्याकडे दुर्लक्ष झालं अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे सांगतात, “संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीचं शिवछत्रपतींचे स्मारक हे जमीनदोस्त झालेलं पाहून भारताची - भारतीय नौदलाची काय प्रतिमा झाली असेल! याचा आपण विचार करावा."
नौदलानं काय म्हटलं आहे?
सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भारतीय नौदलाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नौदलाने म्हटले की, "भारतीय नौदलाने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेची सखेद दखल घेतली आहे. 4 जून 2023 रोजी म्हणजे नौदल दिनी या पुतळ्याचं अनावरण करुन सिंधुदुर्गमधील रहिवाशांना तो समर्पित करण्यात आला होता."
"राज्य सरकार आणि संबंधित तज्ज्ञांच्या सहकार्याने नौदलाने तातडीने तैनात केलेले पथक पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेमागील संभाव्य कारणांचा शोध घेत आहे. त्याबरोबरच या पुतळ्याची दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि लवकरात लवकर पुतळ्याची स्थापना केली जाईल," असेही नौदलाने म्हटले आहे.
राज्य सरकारचं स्पष्टीकरण काय?
राज्य सरकारने मात्र शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो असे म्हटले आहे. त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती.
"मात्र 45 किलोमीटर पर अवर एवढ्या जोरात वारा वाहत असल्याने त्यात तो पडला आणि त्याचे हे नुकसान झाले. त्याठिकाणी पीडब्लूडी आणि नौदलाचे अधिकारी येणार आहेत. त्यानंतर या पुतळ्याला भेट देऊन या मागची करणे तपासणार आहेत,” असे शिंदे यांनी म्हटले.
या प्रकरणाची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा पुन्हा उभारला जाईल असं म्हटलं आहे.

‘राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा’
या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळतो, ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे.” असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलं.
त्यांनी या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत अशीही मागणी केली आहे.
नाना पटोले म्हणाले, “राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. पुतळा कोसळल्याप्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











