आश्चर्य वाटेल, पण हॉरर चित्रपट तुमची अस्वस्थता कमी करू शकतात; जाणून घ्या कसे

हॉरर चित्रपट बघून चिंता कमी होते, खरंच का?

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC

    • Author, डेव्हिड रॉबसन

अंगावर शहारे आणणारे भीतीदायक प्रसंग अन् रक्तरंजित दृश्यं मनाची शांतता भंग करणारेच ठरू शकतात, पण हॉरर सिनेमे म्हणजे भयपट पाहणे प्रत्यक्षात अस्वस्थतेवर एक रामबाण उपाय ठरू शकतो.

जेव्हा मी सुमारे 16 वर्षांचा होतो, तेव्हा मला मूव्ही नाईटचा आनंद घ्यायचा होता. पण माझा अंदाज चुकला. माझ्या एका मित्राने द एक्सॉर्सिस्ट या चित्रपटाची डीव्हीडी आणली. पुढची दोन तास मी डोळ्यांवर हात ठेवून बसलो. प्रत्येक वेळी मी खुर्चीत बसल्या बसल्या दचकून जात होतो, तेव्हा मला प्रश्न पडत होता हे असं भीतीदायक लोकांना मनोरंजक कसं वाटू शकतं?

तत्त्वज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनीही हाच प्रश्न पडला. तर्कशुद्ध विचार केला तर भीती ही भावना आपल्याला धोका टाळण्यासाठी विकसित झाली आहे. ती आपल्याला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना धोकादायक गोष्टींपासून दूर ठेवते. म्हणूनच भीतीमुळे एकतर लढा, किंवा नाहीतर पळाही प्रतिक्रिया निर्माण होते.

हॅलोवीन जवळ येत असताना, आपल्यापैकी अनेकजण स्वतःला घाबरवण्यासाठी खास तयार केलेले चित्रपट पाहतात जिथे भीतीनं हृदयाचा ठोका चुकतो. झोम्बींच्या हल्ल्यापासून ते रक्तरंजित खूनखराब्यापर्यंत, आपल्याला अंगावर शहारे आणणाऱ्या गोष्टी आवडतात आणि म्हणूनच भयपट हे हॉलिवूडमधील नफा मिळवून देणारे चित्रपट मानले जातात.

"भीतीमधील विरोधाभास हे एक जुनं कोडं आहे," असं ऑस्ट्रेलियातील मोनॅश विद्यापीठ आणि टोरांटो विद्यापीठातील संशोधक मार्क मिलर सांगतात. "अरिस्टॉटलनेही हे सांगितलं होतं की आपल्याला धोकादायक, घाणेरड्या, हानिकारक आणि भयानक गोष्टींपासून दूर राहण्यासाठी तयार केलं गेलं आहे. तरीही आपण अशा जागांकडे आकर्षित होतो जिथे अशा गोष्टींचा अनुभव घेता येतो."

गेल्या 10 वर्षांत मानसशास्त्रज्ञांनी या कोड्याचं उत्तर शोधायला सुरुवात केली आहे. काही पुरावे दाखवून देतात की भयकथा मेंदूतील अशा प्रक्रियांना चालना देतात ज्या आपल्याला अनिश्चित परिस्थितीशी सामना करण्यास मदत करतात.

नवीन संशोधनातून हेही दिसून आलं आहे की या काल्पनिक भयकथा मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात जसं की वास्तवातील घटनांबद्दल असलेली अस्वस्थता कमी करणे. त्या आपल्या चिंतेवर उपायकारक ठरतात.

विरोधाभासी आवडीनिवडी

अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्रज्ञ आणि Morbidly Curious: A Scientist Explains Why We Can't Look Away या पुस्तकाचे लेखक कॉल्टन स्क्रिव्हनर यांनी या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लहानपणी त्यांना भयकथांचा थरार आवडायचा. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी विचार केला की भयकथा सर्व मानवी संस्कृतींमध्ये इतक्या सार्वत्रिक का आहेत?

"आपल्याकडे मानवी इतिहासात लेखनाचे जे अगदी पहिले पुरावे आहेत त्यात भयानक राक्षस आणि विकृत प्राणी आहेत," स्क्रिव्हनर सांगतात. ते 4,000 वर्षांपूर्वीच्या बॅबिलोनियन शिलालेखांचा उल्लेख करतात, ज्यावर गिलगमेशचे महाकाव्य कोरलेले आहे. "माझं म्हणणं आहे की भयकथा भाषे इतक्याच जुन्या आहेत."

एक स्पष्टीकरण असं आहे की भयकथा ही एक प्रकारची नाट्यरचना आहे जी आपल्याला आजूबाजूच्या जगाचं आकलन करून संभाव्य धोक्यांसाठी तयार करते. "कोणत्याही प्राण्यासाठी, माणसांसह, आजूबाजूच्या धोक्यांची माहिती मिळवणं आणि शिकणं हे उपयुक्त ठरतं," असं ते सांगतात.

आपण याचे मूळ इतर प्रजातीत पाहू शकतो: उदाहरणार्थ, हरणं शिकाऱ्यांना दूरून पाहतात आणि मग पळून जातात. "माणसं सर्वात जास्त विकृत जिज्ञासू प्राणी का आहेत याचं कारण म्हणजे आपल्याकडे कथा तयार करण्याची, पसरवण्याची आणि अनुभवण्याची विलक्षण क्षमता आहे," स्क्रिव्हनर सांगतात.

काही लोकांना हॉरर चित्रपटांचं वेड असतं, तर काहींना त्यांचं नाव ऐकूनच भीती वाटते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काही लोकांना हॉरर चित्रपटांचं वेड असतं, तर काहींना त्यांचं नाव ऐकूनच भीती वाटते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आता त्यांनी या दाव्यासाठी भरपूर पुरावे जमा केले आहेत. एका अभ्यासात त्यांनी सुमारे 400 ऑनलाईन सहभागी झालेल्या व्यक्तींना एक प्रश्नावली भरायला सांगितली, ज्यात त्यांनी भयपट पाहण्याच्या सवयींबाबत काही विधानांशी किती सहमत आहेत हे सांगायचं होतं.

काही प्रश्न असे होते की -

  • मला भयपट पाहताना निर्माण होणारा थरार आणि रोमांच खूप आवडतो.
  • भयपट पाहताना मी इतका घाबरलो होतो की चित्रपटानंतर घरी जायला किंवा घरात जायला भीती वाटली.
  • मला "टॉर्चर फिल्म्स" पाहायला आवडतात कारण मला प्रत्यक्ष यातना कशा असतात याची उत्सुकता आहे.

या उत्तरांचे विश्लेषण करताना त्यांनी सहभागींना तीन मुख्य गटांमध्ये विभागलं आहे.

पाहिले आहेत अत्यंत साहसी थरारप्रेमी - हे असे लोक असतात ज्यांना थराराचे आकर्षण असते. त्यांना भीतीच्या भावनेनं अधिक जिवंतपणा जाणवतो.

दुसरे थराराने मूठ आवळणारे – अशा प्रकारातील लोकांना भयपटामुळे होणारा तणाव आवडत नाही. त्यांना भीतीची भावना आवडत नाही, पण त्या भावनेवर विजय मिळवण्याची प्रक्रिया आवडते.स्क्रिव्हनर यांना वाटतं की अशा लोकांनी स्वतःबद्दल काही महत्त्वाचं शिकलेलं आहे.

आणि तिसरे म्हणजे अंधाराला भिडणारे – हे लोक भयपट पाहून वास्तवाशी सामना करतात. उदाहरणार्थ, ते जग किती हिंसक आहे हे समजून घेण्यासाठी भयपट पाहतात आणि त्यातून त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची सुरक्षितता जाणवते. काहींना चित्रपटातील हिंसाचार अस्वस्थता किंवा नैराश्य हाताळण्यासाठी उपयोगी वाटतो. आपण किती शूर आहोत याची ते चाचणी करतात.

‘द शायनिंग’ हा हॉरर चित्रपटांच्या इतिहासातील एक आयकॉनिक चित्रपट मानला जातो.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, 'द शायनिंग' हा हॉरर चित्रपटांच्या इतिहासातील एक आयकॉनिक चित्रपट मानला जातो.

या प्रत्येक प्रेरणा आपल्याला भयावह गोष्टींबद्दल असलेल्या आकर्षणाचा विरोधाभास समजून घेण्यास मदत करतात. "विकृत जिज्ञासेच्या अनेक वाटा असू शकतात," असे स्क्रिव्हनर सांगतात.

हेच परिणाम वेगळ्या संदर्भातही लागू होतात का हे तपासण्यासाठी त्यांनी डॅनिश संशोधकांसोबत काम केलं. त्यांनी (डिस्टोपिया भुत बंगला) Dystopia Haunted House या डेन्मार्कमधील वेजले शहरातल्या एका प्रयोग शाळेतील लोकांना प्रश्न विचारले.

हे ठिकाण प्रशिक्षित कलाकारांच्या साहाय्याने लोकांना घाबरवण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. तिथेही अगदी हेच तीन प्रकार दिसून आले जे या सिद्धांताला पुष्टी देत होते. "हे तीन प्रकार वेगळ्या भाषेत, वेगळ्या संस्कृतीत आणि वेगळ्या वातावरणातही अगदी तंतोतंत दिसून आले," असे स्क्रिव्हनर सांगतात.

विकृत जिज्ञासेच्या उपयुक्ततेचा आणखी एक पुरावा म्हणजे कोविड-19 च्या जागतिक साथीमध्ये भयपटप्रेमींनी अधिक मानसिक स्थैर्य दाखवलं. उदाहरणार्थ त्यांनी "मी कोविडबद्दलच्या बातम्या सहजपणे घेतल्या" आणि "मला अशा कठीण काळातून बाहेर पडण्याच्या क्षमतेवर विश्वास आहे" अशा विधानांशी अधिक सहमती दर्शवली.

सुस्पष्ट अनुकरण

अशा परिणामांमागे मेंदूच्या कार्यपद्धतीतील एक मूलभूत तत्त्वही असू शकतं.

गेल्या काही दशकांपासून तत्त्वज्ञ, न्यूरोसायंटिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ यांचं एकमत होतंय की मेंदू सतत आपल्या आजूबाजूच्या जगाचं अनुकरण तयार करत असतो. "तो एक पूर्वानुमान करणारे यंत्र आहे," असं मिलर सांगतात.

माझ्या स्वतःच्या The Expectation Effect या पुस्तकात मी सांगितलं आहे की आपला मेंदू "पूर्वानुमान प्रक्रिया" वापरतो जी आपल्याला नवीन घटनांचे अर्थ लावायला आणि योग्य प्रतिसाद ठरवायला मदत करते. आणि हे जितकं अचूक करता येईल, तितकं चांगलं. हेच आपल्याला अनिश्चित जगाशी लवचिकपणे वागायला मदत करतं.

तीन प्रकारचे भयपटप्रेमी असतात, अत्यंत साहसी थरारप्रेमी, थराराने मूठ आवळणारे आणि अंधाराला भिडणारे

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, तीन प्रकारचे भयपटप्रेमी असतात, अत्यंत साहसी थरारप्रेमी, थराराने मूठ आवळणारे आणि अंधाराला भिडणारे

मिलर सांगतात की भयकथा मेंदूच्या या "पूर्वानुमान यंत्राला" सक्रिय ठेवण्यासाठी पुरेशी अनिश्चितता निर्माण करतात, ज्यामुळे मेंदू अधिक चांगल्या प्रकारे धोका ओळखू शकतो. "या मधल्या गोड जागेत राहणं म्हणजे तुम्ही सतत तुमच्या पूर्वानुमान क्षमतेत सुधारणा करत आहात, जेणेकरून दीर्घकालीन अनिश्चिततेशी सामना करण्यासाठी तुम्ही अधिक सक्षम होता," असं मिलर सांगतात.

स्क्रिव्हनरप्रमाणेच, मिलर यांना वाटतं की हे अस्वस्थता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं कारण हे तणावाच्या प्रतिक्रियेला नियंत्रित करतं.

"भयपट म्हणजे घाबरण्याचं, घृणा वाटण्याचं, तणावाखाली असण्याशी सामना करण्याची एक संधी आहे," असं मिलर सांगतात. आणि याचा फायदा म्हणजे आपण हे सगळं आपल्या घरच्या आरामदायक सोफ्यावर बसून शिकतो आणि आपल्याला किती घाबरायचं आहे हे आपण ठरवू शकतो. चित्रपट थांबवून खोलीतून बाहेर जाऊन किंवा पॉपकॉर्नच्या बकेटमागे लपून.

उपचारात्मक भीती

स्क्रिव्हनर सुचवतात की भयकथा मानसोपचारातही वापरता येतील. लोकांना कठीण परिस्थितींचा सामना कसा करायचा हे शिकवण्यासाठी. योग्य पुस्तक किंवा चित्रपट दिल्यास, आपण आपल्या भीतीला कमी करून एक सुखद थरारात रूपांतरित करू शकतो ही भावनिक नियंत्रणाची कौशल्ये आपल्याला रोजच्या तणावांशी सामना करण्यास मदत करतात.

ते सांगतात की नेदरलँड्समधील संशोधकांनी अस्वस्थतेने ग्रस्त मुलांवर अशाच तत्त्वाचा वापर केला आहे. MindLight नावाच्या व्हीडिओ गेमद्वारे. हा गेम एका भुताटकीच्या घरात सेट केलेला आहे, जिथे किंकाळ्या मारणारे राक्षस खेळाडूच्या 'अवतार'चा पाठलाग करतात. पण मुलं EEG हेडसेट घालतात जे त्यांच्या मेंदूतील क्रियाशीलता मोजतं आणि त्यांच्या 'अवतार'च्या डोक्यावर असलेल्या दिव्याला नियंत्रित करतं. मुलं जितकी शांत राहतात, तितका तो दिवा तेजस्वी होतो आणि त्यामुळे त्यांना शांत राहण्याची सवय लागते.

जर मुलं या हल्ल्याच्या वेळी शांत राहू शकली, तर राक्षस एक गोंडस मांजर बनतो आणि त्यांच्याभोवती फिरतो. पण जर मुलं खूप घाबरली, तर एक संदेश दिसतो जो त्यांना मन शांत करण्याचे उपाय सुचवतो.

हृदयाची धडधड वाढवणारे भयपटही आपल्या रोजच्या आयुष्यातील चिंतेवर उपाय ठरू शकतात.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, हृदयाची धडधड वाढवणारे भयपटही आपल्या रोजच्या आयुष्यातील चिंतेवर उपाय ठरू शकतात.

अनेक क्लिनिकल चाचण्यांमध्ये असं दिसून आलं की जे मुलं नियमितपणे हा गेम खेळतात त्यांची अस्वस्थता कमी होते आणि हे परिणाम पारंपरिक Cognitive Behavioural Therapy इतकेच प्रभावी ठरतात. "हे आश्चर्यकारक आहे, कारण CBT ही मुलांमध्ये अस्वस्थता कमी करण्यासाठीची सर्वोत्तम पद्धत मानली जाते," स्क्रिव्हनर सांगतात. आणि त्यांना ठाम विश्वास आहे की भयकथा पुस्तकांमधून किंवा चित्रपटांमधून याच उद्देशासाठी वापरता येतील.

या विषयावर लिहिलेल्या एका रिव्ह्यू पेपरमध्ये ते म्हणतात:

"भयकथांमधील मनोरंजन लोकांना सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात भीती अनुभवण्याची संधी देतं ज्यामुळे त्यांना भावनिक पुनर्मूल्यांकन, अस्वस्थ शारीरिक अनुभव सहन करणं आणि भावनिक विचारसरणीला आव्हान देणं शिकता येतं."

द एक्सॉर्सिस्टच्या त्या घरगुती स्क्रीनिंगनंतर मी भयकथांपासून दूर राहून एक महत्त्वाची गोष्ट गमावली आहे असं स्पष्टपणे दिसतंय. जर तुम्हीही अशाच स्थितीत असाल, तर स्क्रिव्हनर सुचवतात की तुमच्या सहनशक्तीच्या थोड्याशा बाहेर असलेली कथा निवडा.

"पुस्तकं हे सुरुवात करण्यासाठी चांगलं माध्यम आहे, कारण तुम्ही कल्पनाशक्तीवर थोडं नियंत्रण ठेवू शकता," असं ते सांगतात. आणि तुमच्या इतर आवडींशी जुळणाऱ्या कथा शोधा. "भयपट हा सर्वात व्यापक प्रकार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच काहीतरी आवडेल."

तुमची विकृत जिज्ञासा तुम्हाला कुठे घेऊन जाईल आणि ती तुमच्या आयुष्यात किती शांतता आणेल याचं आश्चर्य वाटेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)