महाकाय जहाजं, युद्धनौकांचा ताफा अन् समुद्रावर वाढती सत्ता; अमेरिकेच्या नौदलाला चीननं मागे कसं टाकलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लॉरा बिकर
- Role, चीन प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
"समाजवाद चांगला आहे" असं एक पेन्शनर पोर्टेबल कराओके माइकमध्ये कुजबुजते. तिचा आवाज तिच्या मैत्रिणींच्या गप्पांमध्ये दबून गेला आहे. मात्र, ते एकत्रपणे तिच्या सूरात सूर लावतात आणि म्हणतात, "कम्युनिस्ट पार्टी चीनला शक्तीच्या आणि समृद्धीच्या मार्गावर नेते आहे!"
हे काही सर्वात लक्षवेधी कराओके गाणं नाही. ते सर्वजण सर्व आकाराच्या जहाजांवरील उंच क्रेननं व्यापलेल्या क्षितिजाकडे पाहत असताना त्यांनी असं मोठ्यानं म्हणणं योग्यच आहे.
ईशान्य चीनमधून पिवळ्या समुद्रात डोकावणाऱ्या डालियानमधील सुओयुवान पार्कमधून चीनच्या सर्वात मोठ्या गोदीपैकी (शिपयार्ड) एकाचं अद्भूत दृश्य दिसतं. ते लोकांसाठी एकत्र जमण्याचं आणि आनंदात वेळ घालवण्याचं ठिकाण आहे.
मात्र, हजारो मैल अंतरावर असलेल्या वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमधील विश्लेषकांसाठी, त्याचा अर्थ काही वेगळाच आहे. त्यांच्यासाठी ही गोदी किंवा जहाजबांधणीचं केंद्र हा चीनकडून असलेल्या वाढत्या धोक्याचा एक भाग आहे.
गेल्या दोन दशकांच्या कालावधीत, चीन जहाज बांधणीच्या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली आहे. त्याचा चीनला फायदादेखील झाला आहे. या वर्षाचा विचार करायचा, तर जगातील जहाज बांधणीच्या 60 टक्क्यांहून अधिक ऑर्डर चीनमधील गोदींना मिळाल्या आहेत.
सोप्या भाषेत सांगायचं तर, जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा चीनमध्ये जास्त जहाजांची बांधणी होते आहे. कारण इतर कोणत्याही देशापेक्षा चीन अधिक वेगानं जहाजांची बांधणी करू शकतो.
"याची व्याप्ती प्रचंड आहे, ते अनेक अंगांनी डोळे विस्फारून टाकायला लावणारं आहे. चीनची जहाज बांधणी क्षमता महाकाय आहे. ती अमेरिकेच्या एकूण जहाज बांधणी क्षमतेच्या जवळपास 200 पट आहे," असं निक चाईल्ड्स म्हणतात. ते लंडनमधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये मॅरिटाइम एक्सपर्ट म्हणजे सागरी तज्ज्ञ आहेत.
जहाज बांधणीच्या क्षेत्रात चीननं घेतलेल्या मोठी आघाडीचा परिणाम त्याच्या नौदलाच्या विस्तारावर देखील झाला आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडे आता जगातील सर्वात मोठं नौदल ताफा आहे. चीनकडे 234 युद्धनौका आहेत, तर अमेरिकेच्या नौदलाकडे 219 युद्धनौका आहेत.
चीनची समुद्रावरील वाढती अधिसत्ता
चीनच्या अफाट वाढीला समुद्राचा हातभार लागला आहे. जगातील या दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत जगातील 10 सर्वात व्यग्र बंदरांपैकी 7 बंदरं आहेत.
जगाच्या व्यापारासाठी, पुरवठा साखळीसाठी ही बंदरं अत्यंत महत्त्वाची आहेत. यावरून समुद्रावरील चीनची अधिसत्ता दिसून येते. व्यापारातील या वाढीमुळे चीनची किनारपट्टीवरील शहरं भरभराटीला येत आहेत.
व्यापार आणि आर्थिक आघाडीवरील प्रगतीमुळे चीनच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या गेल्या आहेत. तसतसं त्यांच्या नौदलाची ताकद, युद्धनौकांचा ताफा वाढत गेला आहे.
त्यामुळे दक्षिण चीन समुद्र आणि त्याहीपलीकडच्या प्रदेशावर अधिक प्रबळपणे दावा करण्याबद्दलचा चीनचा आत्मविश्वासदेखील वाढला आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना नक्कीच सागरावर राज्य करायचं आहे आणि जगावर प्रभाव निर्माण करायचा आहे. ते तसं करतील की नाही हा प्रश्न आहे.
येत्या काही दिवसांतच चीनमध्ये होणाऱ्या भव्य लष्करी परेडमधून ते या उद्दिष्टाच्या किती जवळ पोहोचले आहेत, हे स्पष्ट होऊ शकतं.
या परेडसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना पाहुणे म्हणून उपस्थित असणार होते. त्यांना दूर ठेवणाऱ्या पाश्चात्य देशांना यातून एक आक्रमक संदेश दिला जाणार आहे.

अमेरिका आणि त्याची मित्रराष्ट्रं या परेडकडे आणि त्यातून केल्या जाणाऱ्या लष्करी सामर्थ्याच्या प्रदर्शनाकडे बारकाईनं पाहतील.
चीनमधील या भव्य लष्करी परेडमध्ये जहाज किंवा युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रं, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं आणि पाण्याखाली वापरले जाणारे ड्रोन यांचा समावेश होता.
असं निक चाईल्ड्स म्हणतात, "चीनच्या नौदलाच्या तुलनेत अमेरिकेच्या नौदलाला अजूनही लक्षणीय आघाडी असली तरी क्षमतांच्या बाबतीत चीनबरोबरचं त्यांचं अंतर कमी होत चाललं आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेची धडपड सुरू आहे."
"कारण गेल्या काही दशकांमध्ये अमेरिकेची जहाज बांधणीची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की ही समस्या त्यांना सोडवायची आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या जहाज बांधणी क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि सागरावरील अमेरिकेची अधिसत्ता पुन्हा मिळवण्यासाठीच्या एका आदेशावर सही केली आहे.
चाईल्ड्स म्हणतात की तो 'खूप मोठा आदेश' असेल.
चीनचं नौदल करणार 'कटू आठवणीं'वर मात
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (सीएसआयएस)च्या एका अभ्यासानुसार, 2019 ते 2023 दरम्यान डालियान, ग्वांगझाऊ, जिआंगनान आणि हुडॉंग-झोंगहुआ या चीनमधील चार सर्वात मोठ्या शिपयार्डमधून 39 युद्धनौका तयार करण्यात आल्या. या सर्व युद्धनौकांद्वारे एकत्रितपणे 550,000 टन पाण्याचं विस्थापन होतं.
इतक्या प्रचंड प्रमाणात या युद्धनौका पाणी विस्थापित करतात. म्हणजेच समुद्रात या युद्धनौका गेल्यावर त्यांच्या वजनानं इतक्या पाण्याचं विस्थापन होतं. युद्धनौकांचा ताफा किंवा जहाज यांचा आकार मोजण्याची ही सामान्य पद्धत आहे.
त्या तुलनेत युकेच्या रॉयल नेव्हीकडे असलेल्या सर्व युद्धनौकांद्वारे एकूण जवळपास 399,000 टन पाणी विस्थापित होतं.

युद्धनौकांच्या संख्येचा विचार करता आज चीन जगातील सर्वात मोठं नौदल आहे.
मात्र, असं असलं तरी, अमेरिकेच्या युद्धनौकांकडून विस्थापित होणारं एकूण वजन जास्त आहे आणि त्या अधिक शक्तीशाली आहेत. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका आकारानं खूप जास्त मोठ्या आहेत.
मात्र चीन झपाट्यानं प्रगती करत आणि शक्ती वाढवत अमेरिकेच्या नौदलाइतकं शक्तीशाली बनण्यासाठी प्रयत्न करतो आहे.
"याबाबतीत चीनचा वेग कमी होण्याचे कोणतीही चिन्हं दिसत नाहीत," असं सीएसआयएसचे अॅलेक्झांडर पाल्मर म्हणतात. ते 'अनपॅकिंग चायनाज नेव्हल बिल्डअप' या अहवालाचे लेखक देखील आहेत.
"जहाजांची संख्या हा नौदलाच्या प्रभावीपणाचं मोजमाप करण्याचा एकमेव निकष नाही. युद्धनौका सातत्यानं मोठ्या संख्येनं युद्धनौका तयार करण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यामुळे व्यूहरचनात्मक फरक पडू शकतो," असं अॅलेक्झांडर म्हणतात.
चीन वरचढ की अमेरिका?
तरीदेखील चीनच्या नौदलाच्या विस्ताराला अजूनही मर्यादा आहेत. चीनकडे कदाचित जास्त संख्येनं युद्धनौका असतील, मात्र त्यांच्याकडे फक्त दोनच कार्यरत असलेली विमानवाहू जहाजं आहेत. अमेरिकेच्या तुलनेत त्यांच्याकडे खूप कमी पाणबुड्या आहेत.
काही विश्लेषकांचा युक्तिवाद आहे की चीनच्या पाणबुड्या अमेरिकेच्या पाणबुड्यांइतक्या अत्याधुनिक नाहीत. अमेरिकेचं याबाबतीतील मोठं तांत्रिक कौशल्य शीतयुद्धाच्या काळापासूनचं आहे.
चीनच्या पाणबुड्यांची बांधणी मुख्यत: दक्षिण चीन समुद्रातील उथळ पाण्यासाठी करण्यात आली आहे. याच दक्षिण चीन समुद्रात चीनचा अमेरिकेबरोबर मांजर-उंदराचा खेळ आधीच सुरू आहे. सध्या तरी, स्वत:च्या किनारपट्टीपासून दूर जाण्याची चीनच्या नौदलाची क्षमता मर्यादित आहे.
मात्र हे चित्र बदलतं आहे आणि वेगानं बदलत चाललं आहे, अशी चिन्हं आहेत.
दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या हैनान या बेटावरून बीबीसी व्हेरिफायनं मिळवलेल्या उपग्रहीय फोटोंवरून असं दिसतं की चीन त्यांच्या नाविक तळांचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो आहे.
युलिन येथील तळावर गेल्या पाच वर्षांमध्ये जहाज बांधणीच्या पाच नवीन कारखाने किंवा व्यासपीठ बांधण्यात आले आहेत.
असं मानलं जातं की चीन त्यांच्या सर्वात मोठ्या सर्व पाणबुड्या, ज्या जिन-क्लास (किंवा टाईप 094)प्रकारातील आहे, त्या याच बंदरातील तळात ठेवण्याची योजना आखतो आहे. या नवीन पाणबुड्या प्रत्येकी 12 अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रं वाहून नेऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
चीनमधील सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या रिहर्सलच्या फोटो आणि फुटेजवरून असं दिसतं की चीनमधील लष्करी परेडमध्ये किमान दोन नवीन प्रकारचे पाण्याखालील मानवरहित ड्रोनचा समावेश असेल अशी अपेक्षा आहे. हे नवीन ड्रोन मोठ्या टॉर्पेडोसारखे दिसतात.
यामुळे चीनला खोल समुद्रात स्वत:च्या नौदलाला धोक्यात न घालता इतर पाणबुड्या किंवा अगदी समुद्राखालील केबल्सचा शोध घेणं, तसंच टेहळणी करणं शक्य होऊ शकतं.
यातील बहुतांश तंत्रज्ञानाची क्षमता अद्याप प्रत्यक्ष संघर्षाच्या परिस्थितीत "सिद्ध झालेली नाही आणि त्याच्या क्षमतांची टाइमलाइन देखील अद्याप अस्पष्ट आहे. हे तंत्रज्ञान परिपक्व होण्यासाठी किती वेळ लागेल हा मोठा प्रश्न आहे," असं मॅथ्यू फुनायोल म्हणतात. ते सीएसआयएसच्या चायना पॉवर प्रोजेक्टमध्ये काम करतात.
ते पुढे म्हणतात की म्हणूनच चीनकडून जहाज बांधणीच्या क्षेत्रात असणाऱ्या धोक्याकडे अमेरिका दुर्लक्ष करू शकत नाही.
जिनपिंग यांचा व्यावसायिक-लष्करी मिश्रण असलेली बंदरं उभारण्यावर भर
चीनच्या नौदलाच्या प्रचंड विस्ताराला अशा पक्षाकडून (कम्युनिष्ट पार्टी) चालना दिली जाते आहे, जो अजूनही भूतकाळातील वेदनांमुळे दुखावलेला आहे. तो पक्ष निष्ठा, शक्ती आणि देशभक्तीचा संदेश बळकट करण्यासाठी त्यांचा वापर करू इच्छितो.
जपानवर मिळवलेला विजय आणि त्याची चीनच्या भूप्रदेशावरील क्रूर ताबा संपवण्याच्या स्मरणार्थ भव्य लष्करी परेडचं आयोजन करणं, हे त्याचंच द्योतक आहे.
चीनच्या या वाढत्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याकडे जग चीनचा उदय म्हणून पाहतं. तर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग त्याच्याकडे चीनचं पुनरुत्थान म्हणून पाहतात.
त्यांनी "राष्ट्रीय सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी मजबूत नौदल असण्याचं" मूल्य सांगितलं आहे. यासाठी त्यांनी 1840 ते 1949 दरम्यान चीनवर झालेल्या 470 आक्रमणांचा उल्लेख केला आहे.
या आक्रमणांमुळे चीनच्या वाट्याला 'प्रचंड, मोजण्या पलीकडचं दु:ख' आलं. त्यामुळे एकेकाळचं शक्तिशाली किंग साम्राज्य कोसळलं. चीनमध्ये अशांतता निर्माण झाली, क्रांती झाली आणि यादवी युद्ध झालं.
त्यांनी शपथ घेतली आहे की त्यांचा देश पुन्हा कधीही अशाप्रकारे 'अपमानित' होणार नाही किंवा 'परदेशी आक्रमणांच्या कटू आठवणी' पुन्हा जगणार नाही.
जहाज बांधणीच्या क्षेत्रात चीनला ज्या गोष्टीचा निर्विवाद फायदा होतो आहे, तो म्हणजे गोदीचा दुहेरी वापर. चीनमधील बहुतांश गोदींमध्ये व्यावसायिक जहाजांची बांधणी होते त्याचप्रमाणे तिथे नौदलासाठी युद्धनौकादेखील तयार केल्या जाऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
काही ठिकाणी लष्करी आणि व्यावसायिक गोदी हातात हात घालून काम करतात. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमं याला 'लष्करी-नागरी मिश्रण' म्हणतात. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ही संकल्पना खूप पुढे नेली आहे.
डालियानला चीन 'फ्लॅगशीप शिपयार्ड' म्हणजे 'प्रमुख गोदी' म्हणतं. डालियानची गोदी चीनच्या या नागरी आणि लष्करी जहाज बांधणीत मोठी भूमिका बजावते.
कराओके माइक हलवत तिथे पिकनिक करणाऱ्या पेन्शनर्सच्या दृष्टीक्षेपात भली मोठी व्यावसायिक जहाजं आहेत. काही तर आकारानं तीन फुटबॉल मैदानांइतकी लांब आहेत.
मात्र तिथे एक कोपरा आहे, जिथे कोणीही फोटो काढू शकत नाही. तिथे लष्करी जहाजांचा एक ताफा उभा आहे. तिथे एक क्रेन जहाजाच्या भल्या मोठ्या डेकवर एक हेलिकॉप्टर उतरवते आहे. तर सुओयुवान पार्कमध्ये मार्चिंग बँडचा आवाज येतो आहे.
"व्यावसायिक आणि लष्करी संस्थांना एकत्र करण्याचा हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेला अजेंडा आहे. दोन्ही प्रकारची जहाजं एकाच ठिकाणी बांधण्यासाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डालियान हे त्यापैकीच एक आहे." असं फुनायओले म्हणतात.

त्यामुळेच नौदलात शक्तिशाली विमानवाहू जहाजं किंवा पाणबुड्या नसतानाही चीनचा व्यावसायिक ताफा आणि वेगानं जहाज बांधण्याचं त्याचं कौशल्य संकटाच्या काळात अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात, असं ते पुढे म्हणतात.
"दीर्घकाळ चालणाऱ्या कोणत्याही संघर्षात, जर तुमच्याकडे अशी शिपयार्ड असतील जी वेगानं नव्या जहाजांची बांधणी करू शकतात, तर व्यूहरचनात्मकदृष्ट्या ती खूप महत्त्वाची बाब आहे," असं फुनायओले म्हणतात.
"कोणत्याही संघर्षग्रस्त क्षेत्रात व्यावसायिक जहाजं अन्नधान्य इत्यादीची वाहतूक करू शकतात. त्याशिवाय, अमेरिकेची सद्यस्थिती अशी आहे की ते दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धात टिकाव धरू शकणार नाहीत," असं ते पुढे म्हणतात.
यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. ते म्हणतात, "समुद्रात वेगानं आणि सहजतेनं जहाजं, साधनं कोण उतरवू शकेल?"
तर सध्यापुरतं याचं उत्तर आहे, चीन.
'तुमची शक्ती लपवा, वाट पाहा'
मात्र, याबाबतीत जगानं चिंता करू नये, असं प्राध्यापक हू बो म्हणतात. ते पेकिंग विद्यापीठातील सेंटर फॉर मेरिटाईम स्ट्रॅटेजी स्टडीजचे संचालक आहेत.
"इतर देशांच्या कामकाजात ढवळाढवळ करण्यात, विशेषकरून लष्करी हस्तक्षेप करण्यात आम्हाला रस नाही," असं ते म्हणतात.
त्यांचा संदेश आहे की चीन जगावर वर्चस्व मिळवण्यासाठी किंवा राज्य करण्यासाठी भली मोठी जहाजं बांधत नाहिये. तर तशी ती बांधण्याची त्याची क्षमता आहे, तो तसं करू शकतो म्हणून करतो आहे.
एक बेट ज्याला चीन स्वतंत्र किंवा वेगळा देश मानत नाही. ते म्हणजे तैवान. तैवान हा चीनचाच अविभाज्य भाग असल्याची चीनची भूमिका आहे.
लोकशाही व्यवस्था असलेल्या तैवानचं चीनबरोबर 'पुन्हा एकत्रीकरण' करण्याचा चीनचा दीर्घकाळापासूनचा निर्धार आहे. यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यता चीननं नाकारलेली नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेतील उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे की 2027 पर्यंत चीन तैवानवर आक्रमण करेल. मात्र अशी कोणतीही मुदत असल्याची बाब चीननं फेटाळली आहे.
"तैवान परत घेण्याची क्षमता चीनकडे आताच आहे. मात्र चीन तसं करत नाहिये कारण आमच्याकडे संयम आहे. तैवानचं चीनमध्ये शांततेच्या मार्गानं एकीकरण करण्याची आशा चीननं कधीही सोडलेली नाही. आम्ही त्यासाठी वाट पाहू शकतो," असं प्राध्यापक हू बो म्हणतात.

तैवानच्या संदर्भातील सर्वात मोठी चिंतेची बाब अशी आहे की तैवानवरील कोणत्याही हल्ल्यामुळे मोठ्या युद्धाची सुरुवात होऊ शकते आणि अमेरिका त्यात सहभागी होऊ शकते. तैवानला आत्मरक्षणासाठी शस्त्रास्त्रं पुरवण्यास अमेरिका कायद्यानं बांधील आहे.
अमेरिकेचा तैवानला असलेला पाठिंबा आणि मदत चीनला मान्य नाही. चीनचं मानतो की तैवानला हा एक वेगळा झालेला प्रांत आहे, जो शेवटी चीनचा भाग होईल.
यावर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इशारा दिला होता की चीनचा तैवानला 'नजीकच्याच काळात' धोका आहे. त्यांनी आशियातील देशांना आवाहन केलं की त्यांनी संरक्षण खर्चात वाढ करावी आणि युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेबरोबर सहकार्य करावं.
प्राध्यापक हू बो यांनी आश्वासनं देऊनदेखील, चीनच्या युद्धनौका त्यांच्या समुद्र किनाऱ्यांपासून दूर प्रवास करू लागल्या आहेत, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणं कठीण आहे.
फेब्रुवारी महिन्यात, चीनच्या युद्धनौका ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीभोवतीच्या प्रदेशात तीन आठवड्यांहून अधिक काळ फिरताना दिसल्या. तिथे त्यांनी अभूतपूर्व लष्करी सराव केला.
अलीकडेच चीनच्या विमानवाहू युद्धनौकांनी जपानच्या जवळ नौदलाच्या कवायती केल्या. यामुळे चिंता निर्माण झाली. चीनच्या या कवायती आंतरराष्ट्रीय समुद्रात असल्या, तरी हे एक अभूतपूर्व पाऊल होतं.
पॅसिफिक महासागरात, शक्ती प्रदर्शन करण्याबाबत चीन अधिक धाडसी पावलं उचलत असताना, तैवानपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंतचे चीनचे शेजारी देश चिंताग्रस्त होत आहेत की 'तुमची शक्ती लपवा आणि वाट पाहा' हा चीनचा प्रसिद्ध मंत्र यशस्वी होतो आहे.
मात्र प्राध्यापक हू बो यांना वाटतं की जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया ही या प्रदेशात अमेरिकेची मित्रराष्ट्र आहेत. अमेरिका आणि या देशांचे चीनबरोबर अनेकदा मतभेद असतात. अमेरिकेबरोबर चीनचा संघर्ष होण्याची भीती अतिशयोक्तीपूर्ण आहे. कारण त्या सर्वांना माहित आहे की असं युद्ध विनाशकारी ठरू शकतं.
"मला वाटतं की गेल्या तीन वर्षांमध्ये, स्पष्ट संकेत मिळाला आहे की दोन्ही बाजूंना युद्ध करायचं नाही. आम्ही त्यासाठी तयार आहोत. मात्र आम्हाला एकमेकांशी लढायचं नाही," असं ते म्हणतात.
'महासागराबाबतच्या आमच्या स्वप्नांचं आम्ही रक्षण करतो'
पुन्हा डालियानचा विचार करूया. या गतीमान शहरापासून एक तास प्रवासाच्या अंतरावर असलेल्या लुशुनकोऊ या नौदल तळ असलेल्या शहरात बस भरून पर्यटकांचे गट येत आहे. लुशुनकोऊमध्ये विमानवाहू जहाजाच्या आकाराचं एक लष्करी थीम पार्कदेखील आहे.
माइकनं मोठ्या आवाजात सूचना देत गाईड या पर्यटकांना पार्कमध्ये घेऊन जातात. ते पर्यटकांचं लक्ष सूचना फलकांकडे वेधतात.
त्यावर पर्यटकांना इशारा देण्यात आला आहे की चंद्रकोरीच्या आकाराच्या बंदरात नांगर टाकून असलेल्या नौदलाच्या जहाजांचे फोटो काढू नयेत. त्यात पुढे इशारा दिला आहे की 'मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी' हेरगिरी वाटणारं कोणतंही कृत्य किंवा वर्तनाबद्दल माहिती द्यावी.
पूल आणि भितींवर आणखी सूचना लष्कराकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यावर म्हटलं आहे की, "आपण एकजुटीनं, महासागराच्या संदर्भातील आपल्या स्वप्नांचं रक्षण करतो."
चीननं जहाजबांधणीच्या कौशल्याच्या अभिमानाला आणखी प्रोत्साहन दिलं आहे. विशेषकरून डालियानमध्ये ते दिसतं.
शिपयार्डच्या अगदी समोर असलेल्या या थीम पार्कमध्ये, एक 50 वर्षांचे ब्लॉगर आहेत. त्यांनी स्थानिक फॅशनचे कपडे परिधान केले आहेत. त्यांनी फुलांचं डिझाईन असलेला शर्ट घातला आहे. ते त्यांच्या फॉलोअर्सना या बंदरात बांधल्या जाणाऱ्या नव्या जहाजांची झलक दाखवत आहेत.
"मला खूप अभिमान आहे. खरोखरंच, पाहा, हे शहर आपल्याला काय देतं," असं ते त्यांच्या फॉलोअर्सना म्हणतात.

शेजारच्या प्रांतातून एक आई आणि तिची सात वर्षांची मुलगी तिथे फिरायला आले आहेत. ती भलीमोठी जहाजं पाहून ते आश्चर्यचकित होतात.
ती आई म्हणते, "मी थक्क झाले. ती किती महाकाय जहाजं आहेत. ती समुद्रात कशी तरंगतात, प्रवास कसा करतात, याचं मला आश्चर्य वाटतं?"
चीनच्या या सामर्थ्याबद्दल अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांसमोर असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, चीनच्या युद्धनौका किती दूर जाऊ शकतात आणि चीनचं सरकार त्याच्या किनाऱ्यापासून किती दूरवर या युद्धनौका पाठवण्यासाठी तयार आहे.
थोडक्यात चीनची त्याच्या नौदलाच्या सामर्थ्याचा विस्तार किती दूरवर करण्याची इच्छा आहे, हा अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांसमोरील प्रश्न आहे.
"ते कोणत्या टप्प्यावर बाहेर पडतील आणि चीनच्या किनाऱ्यापासून दूरवर, उदाहरणार्थ हिंदी महासागर आणि त्याच्याही पलीकडे खरोखरंच त्यांचा प्रभाव दाखवू शकतील का, हा एक लक्ष देण्याचा महत्त्वाचा मुद्दा असेल," असं निक चाईल्ड्स म्हणतात.
ते पुढे म्हणतात, "त्यांना अजून बरीच मजल मारायची आहे. मात्र ते निश्चितच विस्तार करत आहेत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











