महाराष्ट्र दिनाची पहाट पारधी समाजाच्या पालावर कधी उगवणार?

    • Author, सुधारक ओलवे
    • Role, फोटोजर्नलिस्ट

महाराष्ट्रात पारधी समुदायाची लोकसंख्या दीड लाखांच्या आसपास आहे. महाराष्ट्र दिन साजरा करत असताना या राज्याने या भटक्या समुदायाला काय दिलं? हा प्रश्न, फोटोग्राफर सुधारक ओलवे विचारत आहेत.

सुधारक ओलवे हे ज्येष्ठ फोटोजर्नलिस्ट असून त्यांना 2016 साली भारत सरकारतर्फे दिला जाणारा पद्मश्री हा बहुमान मिळाला आहे. वंचित, शोषित समुदायाची वेदनादायी परिस्थिती संवेदनशीलपणे फोटोत कॅप्चर करणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.

शेकडो वर्षं समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर असलेल्या पारधी समुदायाचा अभ्यास करत त्यांचं जगणं सुधारक यांनी कॅमेराबद्ध केलंय. पारधी जमातीचं हालाखीचं जगणं त्यातून पुढे येतं.

पारधी, एकेकाळी जंगलाच्या आधाराने राहणारी माणसं आज गुन्हेगार समजली जातात. शतकानुशतकं पारधी जमातीने गुन्हे अन्याय, गुन्हेगारीकरण आणि भेदभावाचा सामना केला आहे.

कायमच गावकुसाच्या परिघाबाहेर राहून शोषणाला बळी पडणाऱ्या या समुदायावर पराकोटीची गरीबी, सततचं विस्थापन आणि त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली केली गेली.

चिंग्या भोसले यांचं वय जवळपास 70 वर्षं आहे. कोरड्या ओसाड प्रदेशात गायीवर स्वार होत ते मोहिमेवर निघतात. त्यांच्यामागे त्यांची मुलं आणि पुतणे आहेत.

पारधी समाज गायीला पवित्र मानतो. ‘चित्तर’ पक्षांची शिकार करण्याच्या मागावर ते आहेत. पक्षांना हाक वाटेल अशा शिट्ट्या ते वाजवून ते लक्ष वेधून घेतात.

शिट्टीचा आवाज ऐकून पक्षी जवळ येताच ते त्यांना अडकवण्यासाठी लाकडी पेटी वापरतात. ही पेटी म्हणजे त्यांनी तयार केलेला सापळा असतो.

पक्षी पकडून स्थानिक बाजारात विकण्यासाठी नेतात.

पारधी हा शब्द शिकारी संदर्भात वापरला जातो. मूळ मध्य भारतातील जंगलाशी संबंध असणाऱ्या या समुदायाला 1871 मध्ये ब्रिटीश राजवटीविरुद्ध बंड केल्यावर गुन्हेगार म्हणून घोषित केलं गेलं.

गुन्हेगारी जमाती कायद्यांतर्गत पारध्यांसह 150 जमातींना गुन्हेगारीच्या यादीत टाकलं गेलं होतं.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना 'डिनोटिफाईड' करण्यात आल्यावर त्यांना दिलासा मिळाला पण वर्षानुवर्ष लागलेला गुन्हेगारीचा कलंक त्यांचा पाठलाग करत राहिला.

भटक्या समुदायाला जंगलापासून दूर ओसाड ठिकाणी आपला मुक्काम करावा लागला.

पारधींना उपेक्षित म्हणून जगावं लागतं, आणि अनेकदा सामाजिक बहिष्कृतही केलं जातं. किरकोळ चोरीपासून पूर्वनियोजीत खुनापर्यंतच्या खोट्या आरोपांमध्ये गोवल्याची अनेक उदाहरणं समोर येतात. त्याचा सर्वाधिक फटका समुदायातील महिला आणि मुलांना बसतो.

बकऱ्या त्यांच्या कुटुंबाचाच भाग असतात. हक्काची जमीन नसते, घर नसतं त्यामुळे ही जनावरंच त्यांची संपत्ती असते.

लाकडी खांब आणि वर प्लास्टिकचं बारदान टाकून जेमतेम आसरा टाकून मुक्काम ठोकतात. गावाच्या वेशीबाहेर माळरानावर कोणतीही सुरक्षितता नसलेल्या या लोकांना हक्काची अशी घरं नाहीत.

पारधी समुदाय लहान गटांमध्ये फिरस्ती करतात. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये गुरं, बकऱ्या, कोंबड्या, घरं उभारण्यासाठी बांबूचे खांब आणि प्लास्टिकच्या शीट्स सोबत असतात.

पोट भरायला अन्नाचा पत्ता नाही, पाणी सहसासहजी नाहीच आणि आरोग्याची काळजी घेणं तर शक्यच नाही अशा परिस्थितीत ओसाड जागेवर राहू लागतात.

असाध्य आजार आणि कुपोषण जोडीला असतंच. साहजिकच आहे त्याचं जगणं जोखमीचं असतं.

नूर खास भोसले या पीडित महिलेने घर जाळणाऱ्या गावकऱ्यांविरुद्ध अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात 156 गावकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. गेली 5 वर्षं कोर्टात खटला सुरू आहे.

महाराष्ट्रातल्या बीडमधील आहेक वाहेगाव हे एक छोटसं गाव. या गावाजवळच्या पारधी समूहातून विद्रोहाची हाक दिली गेली. या विद्रोहाचा चेहरा नूर खास भोसले हे नाव आहे.

कापूस, बाजरी, ज्वारी आणि उसाच्या हिरव्यागार शेतांनी वेढलेलं आहेर वाहेगाव जवळ 14 पारधी कुटुंबांची घर होती.

पारधींना हुसकवून लावण्यासाठी गावकऱ्यांनी घरांना आगी लावल्या. पारधी कुटुंब शेतांच्या पलिकडे स्थलांतरित झाली. पाण्यासाठी 2 किलोमीटरची पायपीट करणं सुरू झालं.

पारधी समुदायाकडे क्वचितच पैसा असतो. 'देव देव' धार्मिक समारंभासाठी जवळ असेल तो पैसा खर्च करायला ते तयार असतात. कुटुंब प्रमुख ही धार्मिक पूजा करतो.

समुदायाला स्वतःच्या हक्कांची जाण नसल्यामुळे शिक्षण आणि सामाजिक विकासापासून ते कोसो मिल दूर आहेत. बहुतांश लोकांना मतदान करण्याचा अधिकार नाही कारण राहण्याचा अधिकृत पत्ता आणि ओळखपत्र नाही. जमिनीचा तुकडा तर सोडाच, हक्काची स्मशानभूमीही नाही. कोणाचा मृत्यू झाला तर दोन गावांच्या वेशीवर पोलिसांच्या परवानगीने अंत्यविधी उरकावे लागतात.

अशा या पारधी समुदायाचं नागरिक म्हणून त्यांचं अस्तित्व अधांतरी राहातं.