बिर्याणी मुकाबल्यात लखनौचा स्वाद सरस

फोटो स्रोत, ANI
काही दिवसांपूर्वी फूड अॅप कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात बिर्याणी हा सर्वाधिक ऑर्डर करण्यात आलेला पदार्थ होता. देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक अगदी चवीने बिर्याणीचा आस्वाद घेतात. प्रत्येक भागाच्या इतिहास भूगोलानुसार बिर्याणी तयार करण्याची पद्धत आणि चव बदलते. लखनौ आणि हैदराबाद ही बिर्याणीसाठी प्रसिद्ध शहरं. या दोन शहरांपैकी कुठली बिर्याणी भारी यावरुन खवैयांमध्ये पैजा लागतात, चर्चा रंगतात. शुक्रवारी लखनौत क्रिकेटच्या मैदानावर लखनौ सुपरजायंट्स संघाने सनरायझर्स हैदराबादवर सरळसोपा विजय मिळवत श्रेष्ठत्व सिद्ध केलं. बिर्याणी डर्बी असं या लढतीचं वर्णन केलं जात होतं. शुक्रवारच्या लढतीत तरी लखनौने हैदराबादवर बाजी मारली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
विजयानंतर लखनौ संघाने केलेलं ट्वीटही मजेशीर आहे. त्यांनी लिहिलं- टुडेज डिनर, हैद्राबादी बिर्याणी. पुढे दोन स्माईलीही टाकले. लखनौने हैदराबाद संघाची ताकद आणि कच्चे दुवे ओळखून खेळपट्टी तयार केली. त्यानुसार डावपेच आखले आणि मैदानावर या डावपेचांची यशस्वी अंमलबजावणी केली. तीन साडेतीन तास चाललेल्या लढतीत लखनौची ठाम पकड जाणवली. नवा कर्णधार आणि नवा सपोर्ट स्टाफसह रणांगणात उतरलेला हैदराबादचा संघ अजूनही चाचपडताना दिसतो आहे.
नेदरलँड्सविरुद्धची मालिका आटोपून परतलेल्या एडन मारक्रमने हैदराबादची सूत्रं स्वीकारली. नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागला पण त्याने प्रथम फलंदाजी करणार असल्याचं स्पष्ट केलं. बहुतांश कर्णधार नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारतात असं दिसतं पण मारक्रमने मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला पण तो फसला. हैदराबादने अभिषेक शर्माऐवजी अनमोलप्रीत सिंगला सलामीला धाडलं. अनमोलतप्रीत-मयांक अगरवाल जोडीने 21 धावांची सलामी दिली. तिसऱ्याच षटकात कर्णधार राहुलने चेंडू डावखुरा फिरकीपटू कृणाल पंड्याकडे सोपवला. पंड्याने अनुभवी मयांकला बाद करत हा निर्णय सार्थ ठरवला.
फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर राहुलने रवी बिश्नोईला पाचारण केलं. रवीने धावगतीला ब्रेक लावला. त्याचवेळी कृणालने एकाच षटकात अनमोलप्रीत आणि कर्णधार एडन मारक्रम यांना तंबूत धाडलं. अनमोलप्रीतने 31 धावांची खेळी केली. पहिल्याच चेंडूवर मारक्रमला कृणालची फिरकी उमगली नाही आणि तो त्रिफळाचीत केलं. रवी बिश्नोईने पुढच्या षटकात धोकादायक हॅरी ब्रूकला अक्षरक्ष: गंडवलं. बिश्नोईच्या गुगलींना प्रत्यु्त्तर देण्यासाठी ब्रूक क्रीझच्या पुढे सरसावला. बिश्नोईचा चेंडू वळून विकेटकीपर निकोलस पूरनच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला. त्याने क्षणार्धात स्टंपिंग करत ब्रूकला माघारी धाडलं. त्याला अवघ्या 3 धावा करता आल्या. हैदराबादची अवस्था 55/4 अशी झाली.

फोटो स्रोत, IPL/BCCI
कृणाल, रवी यांच्याबरोबरीने राहुलने अनुभवी अमित मिश्रा आणि कामचलाऊ फिरकीपटू दीपक हुड्डा यांनाही गोलंदाजी दिली. काळ्या मातीच्या या खेळपट्टीवर धावा करणं अवघड होतं आणि चारही फिरकीपटूंनी धावांना वेसण घातली. राहुल त्रिपाठीने थोडा प्रतिकार केला पण यश ठाकूरच्या गोलंदाजीवर अप्पर कट करण्याचा त्याचा प्रयत्न अमित मिश्राने संपुष्टात आणला. त्याने 34 धावा केल्या. चाळिशीतल्या मिश्राने जोरदार डाईव्ह लगावत सहकाऱ्यांची आणि चाहत्यांची वाहवा मिळवली. मिश्रानेच एकाच षटकात वॉशिंग्टन सुंदर आणि आदिल रशीद यांना बाद केलं. शेवटच्या षटकात दोन षटकारांसह वेग वाढवण्याचा हैदराबादने प्रयत्न केला पण त्यांना 121 धावांचीच मजल मारता आली.

फोटो स्रोत, BCCI/IPL
लखनौ संघाचा फिरकीचा प्रयोग यशस्वी झालेला असतानाही हैदराबादने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून राहुल त्रिपाठीऐवजी डावखुरा वेगवान गोलंदाज फझलक फरुकीला संघात समाविष्ट केलं. काईल मायर्स-राहुल जोडीने सावध सुरुवात केली. फरुकीने मायर्सला बाद करत ही जोडी फोडली. भुवनेश्वर कुमारने स्वत:च्याच गोलंदाजीवर दीपक हुड्डाचा उत्तम झेल टिपला. राहुल आणि कृणाल पंड्या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूत 55 धावांची भागीदारी करत विजय सुकर केला. राहुल आणि कृणाल पाठोपाठ बाद झाल्याने लखनौचा विजय लांबला. निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनस यांनी संयम राखत विजयावर शिक्कामोर्तब केलं. हैदराबादतर्फे आदिल रशीदने दोन विकेट्स पटकावल्या. धावा आणि विकेट्स अशा दोन्ही आघाड्या सांभाळणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
सलामीच्या लढतीत पाच विकेट्स पटकावणारा लखनौचा वेगवान गोलंदाज मार्क वूडला ताप आल्याने तो खेळू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झालेला क्विंटन डी कॉक या लढतीत खेळण्यासाठी तयार नसल्याचं कर्णधार राहुलने सांगितलं. प्रमुख गोलंदाज नसूनही लखनौने फिरकीच्या बळावर बाजी मारली.
बायकोचा पाठिंबा मोलाचा
"आजचा दिवस खूपच चांगला होता. धावा करु शकलो, विकेट्स पटकावू शकलो, संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो. हैदराबादच्या संघात खूप सारे उजव्या हाताने खेळणारे फलंदाज आहेत. मला पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करायची आहे हे माहिती होतं. मला काय करायचं आहे हे आधीपासूनच पक्कं असल्याने गोष्टी अनुरुप घडत गेल्या. गेले चार पाच महिने मी क्रिकेटपासून विश्रांती घेतली. मी माझ्या कौशल्यांवर काम केलं. गोलंदाजीत विशेषत: माझ्या अॅक्शनवर काम केलं. आर्म बॉल घोटीव केला. मला फलंदाजी करायला आवडतं. आयपीएलमध्ये सुरुवातीची काही वर्ष मी मुंबई इंडियन्सकरता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असे. कोणत्याही खेळपट्टीवर गोलंदाजी करायला मला आवडेल. माझ्या पत्नीचा पाठिंबा मोलाचा आहे. तिची भक्कम साथ असल्यामुळे मी यशस्वी पुनरागमन करु शकलो", असं सामनावीर कृणाल पंड्याने सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








