अनुराग कश्यप : तणाव, फ्रस्ट्रेशन, स्ट्रगल ते स्वतःची वेगळी ओळख बनवणारा दिग्दर्शक

    • Author, पराग छापेकर
    • Role, जेष्ठ पत्रकार, बीबीसीसाठी

भारतीय सिनेमासृष्टीत वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आढळतील. त्यातलेच एक अनुराग कश्यप आहेत, ज्यांना रक्त पाहून भोवळ येऊ शकते, कोणाच्या अंत्यसंस्काराला जायचं म्हटलं की त्यांचे हात-पाय थरथरायला लागतात.

पण जर तुम्ही अनुराग कश्यप यांच्या चित्रपटांचे फॅन असाल तर तुम्हाला या गोष्टी धादांत खोट्या वाटतील.

अनुराग सहसा सामाजिक विषयांवर चित्रपट बनवतात, यात ड्रग्स, स्मोकिंग, अॅडिक्शन, चाईल्ड अब्युज, डिप्रेशन आणि मानसिक तणाव अशा समस्यांवर भाष्य केलं जातं.

फार कमी लोकांना माहितेय की अनुराग स्वतः या अनुभवांमधून गेले आहेत त्यामुळे ते अशा विविध विषयांना हाताळतात.

शोबिझच्या दुनियेत काम करता करता अनुराग यांना 30 वर्षं झाली आहेत.

अनुराग बॉलिवूडमधल्या त्या दिग्दर्शकांच्या यादीत येतात ज्यांनी आपली एक स्वतंत्र ओळख बनवली आहे.

त्यांचे चित्रपट भले वादात सापडत असतील, पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही हेही तितकंच खरं.

एका वेगळ्या धाटणीचे चित्रपट काढण्यात आणि ते लोकप्रिय करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

नवाजुद्दीन, विकी कौशल सारख्या कलाकारांना दिली संधी

नवाजुद्दीन सिद्दीकी या अभिनेत्याला अनुरागनेच मोठा ब्रेक दिला. याखेरीज नव्या पिढीच्या गुणवंत अभिनेत्यांमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं त्या विकी कौशलाही अनुरागनेच पहिल्यांदा संधी दिली होती.

आपला चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मध्ये विकी कौशलला अनुरागने असिस्टंट म्हणून संधी दिली होती.

एक टीव्ही सीरियल लिहिल्यानंतर अनुराग यांना रामगोपाल वर्मांचा चित्रपट ‘सत्या’साठी (1998) सह-लेखक म्हणून प्रमुख ब्रेक मिळाला. त्यानंतर ‘पांच’ या चित्रपटापासून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात केली. पण सेन्सॉरशिपच्या कारणांमुळे हा चित्रपट कधी रिलीज झाला नाही.

यानंतर आला तो ‘ब्लॅक फ्रायडे’ (2004). हा चित्रपट 1993 च्या बॉम्बस्फोटांवर हुसैन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित होता.

पण त्यावेळी या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू होती त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दोन वर्षं बंदी घातली गेली.

अनुराग कश्यप यांचे चित्रपट

कश्यप यांचा पुढचा चित्रपट ‘नो स्मोकिंग’ 2007 साली आला. पण यावर समीक्षकांनी टीका केली आणि बॉक्स ऑफिसवरही आपटला.

2009 साली आलेल्या ‘देव डी’ या चित्रपटामुळे अनुराग यांना पहिल्यांदा व्यावसायिक यश मिळालं. हा चित्रपट म्हणजे देवदासच्या कथेचं आधुनिक रुपांतर होतं. याचवर्षी सामाजिक-राजकीय विषयावरचा चित्रपट आला ‘गुलाल’ आणि 2011 साली आला थ्रिलर चित्रपट ‘दॅट गर्ल इन येलो बुट्स’.

पण अनुराग कश्यप यांना लोकप्रियता मिळाली ते 2012 साली आलेल्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’मुळे.

2013 साली आलेल्या त्यांच्या ‘शाहिद’ आणि ‘द लंचबॉक्स’ या दोन्ही चित्रपटांचं समीक्षकांनी कौतुक केलं. पण 2013 आलेला त्यांचा 'बॉम्बे व्हेलवेट' दणकून आपटला. 2014 साली आलेला ड्रामा 'अग्ली'ही चालला नाही.

रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या भूमिका असलेला 'बॉम्बे व्हेलवेट' इतका दणकून आपटला की त्यावरून अनुराग कश्यप यांना चेष्टेला सामोरं जावं लागलं. त्यामुळे रागवून जाऊन त्यांनी चित्रपट संन्यास घेण्याची ‘धमकी’ दिली होती.

2016 त्यांनी रमन राघव 2.0 या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हा चित्रपट सीरियल किलर रमन राघववर आधारित होता. अनुराग यांचा पुढचा चित्रपट होता 2018 साली आलेला मुक्काबाज.

सतत वादाच्या भोवऱ्यात

2018 साली त्यांनी विक्रम चंद्रा यांच्या 'मनमर्जिया' या कांदबरीवर आधारित त्याच नावाने रोमॅन्टिक चित्रपट दिग्दर्शित केला. भारताची पहिली क्राईम थ्रिलर नेटफ्लिक्स सिरीज 'सेक्रेड गेम्स'चं सह-दिग्दर्शनही केलं. ते गुड बॅड फिल्म या चित्रपट बनवणाऱ्या कंपनीचे सहसंस्थापक आहेत.

कश्यप यांनी नेहमीच सेन्सॉर बोर्डावर टीका केली आणि अनेकदा वाद ओढावून घेतले. 2016 साली आलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटावरून अनुराग आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यात बराच वाद झाला होता.

अनुगार सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात मग ती त्यांची वादग्रस्त वक्तव्य असोत, सोशल मीडियावरच्या पोस्ट असोत, कौटुंबिक नातेसंबंध किंवा त्यांच्या चित्रपट कंपनीतल्या पार्टनरशी झालेले वाद.

लहानपणी लैंगिक शोषण

काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की लहानपणी त्यांचं लैंगिक शोषण झालं होतं.

त्यांनी म्हटलं होतं, “जवळपास 11 वर्षं माझं लैंगिक शोषण होत होतं. अर्थात मी त्या पुरुषाला नंतर माफ केलं. त्याने माझं शोषण केलं तेव्हा तो 22 वर्षांचा होता. यानंतर अनेक वर्षांनी तो मला भेटला तेव्हा त्यालाही या गोष्टीचा पश्चाताप झाला होता. पण ते विसरणं माझ्यासाठी सोपं नव्हतं.

मी मुंबई आलो ते तणाव, फ्रस्ट्रेशन, राग मनात घेऊनच. इथे आल्यावर मी सुरुवातीची काही वर्षं स्ट्रगल केला. पण डिप्रेशनमधून बाहेर यायला मला कल्कीने मदत केली.”

अनुरागचं वैयक्तिक आयुष्य

अनुरागचं पहिलं लग्न 1997 साली आरती बजाजशी झालं होतं, पण 2009 साली त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगी आहे जी 19 वर्षांची आहे.

यानंतर 2011 साली अनुरागने अभिनेत्री केल्की केकलाशी लग्न केलं. पण हेही लग्न फारकाळ टिकलं नाही. 2015 साली ते वेगळे झाले.

अनुरागसोबत काम करणारे अभिनेते काय म्हणतात?

मनोज वाजेपयी यांनी अनुरागसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते म्हणतात, “एक अत्यंत अव्यवस्थित माणूस ते शिस्तबद्ध माणूस, एक बैचेन व्यक्ती, रागीट व्यक्ती ते शांत व्यक्ती असा अनुराग यांचा गेल्या 22 वर्षांचा प्रवास मी पाहिला आहे. त्यांचा प्रवास कठीण नक्कीच कठीण होता, पण रंजक होता. ते कधी घाबरले नाहीत. नेहमी अडचणींना तोंड दिलं आणि समोर आलेल्या प्रश्नांची उत्तर शोधत गेले.”

वाजपेयी म्हणतात, “आज ते एका शिखरावर पोचले आहेत. त्यांनी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. नव्या चित्रपट निर्मात्यांसाठी ते प्रेरणा आहेत. आम्ही दोघांनी एकमेकांचा प्रवास पाहिला आहे. मी त्यांचा मनापासून आदर करतो.”

त्यांच्यासोबत ब्लॅक फ्रायडे चित्रपटात काम करणारे पवन मल्होत्रा म्हणतात, “त्याने आपली स्वतःची एक वेगळी जागा तयार केलीये. तो नेहमीच इतरांपेक्षा वेगळं काम करत होता. परदेशात भारतीय चित्रपटांना मार्केट मिळवून देणारा तो पहिला माणूस आहे. हे काम तर एनएफडीसीही करू शकलं नाही.”

तर अनुरागच्या गँग्स ऑफ वासेपुरमध्ये काम करून स्टार झालेला नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो की अनुरागने आपल्या चित्रपटांमध्ये आपलं गाव, ग्रामीण भाग, तिथली पात्रं यांना जशी जागा दिलीये तसं काम कोणीच केलेलं नाही. त्याची स्वतःची युनिक शैली आहे आणि ती आजही जिवंत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)