उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा, 'सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही'

फोटो स्रोत, Getty Images
"विनायक दामोदर सावरकर हे आमच्यासाठी दैवत आहेत, त्यांचा अपमान करू नका," असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
काल राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांना इशारावजा सल्ला दिला.
गद्दार, ढेकणांना चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही," असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात आयोजित सभेतील भाषणादरम्यान ते बोलत होते.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, "पंधरा दिवसांपूर्वी खेडला सभा घेतली होती. आजची सभा ही आणखी अथांग पसरलेली आहे.
"आपलं नाव चोरलेलं आहे, धनुष्यबाण चोरलेलं आहे. माझ्या हातात काहीही नाही, तरीही इतकी मोठी गर्दी माझ्यासमोर उभी आहे. ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे."
"मी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. मी तुमच्या प्रश्नांसाठी लढायला उभा आहे. आता जिंकेपर्यंत लढायचं, असं एकच ब्रिदवाक्य आमचं आहे. गद्दार, ढेकणांना चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही."
"कोरोना काळात धारावी आणि मालेगावात परिस्थिती गंभीर होती. त्यावेळी मी मुख्यमंत्री असताना मालेगावातील धर्मगुरूंशी बोललो. त्यावेळी तुम्ही सहकार्य केलं नसतं तर मालेगाव वाचलं नसतं. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो."
"मुख्यमंत्रिपद येतं आणि जातं. पण तुम्ही मला तुमच्या कुटुंबातील एक मानलात. असं प्रेम गद्दारांच्या नशिबात नाही. तुम्ही हे प्रेम चोरू शकणार नाही," असं त्यांनी म्हटलं.
शेतकऱ्यांसाठी योजना आखल्या पण सरकार पाडलं
ते म्हणाले, "मी येथे दोन शेतकऱ्यांची आवर्जून भेट घेतली. एक म्हणजे रतन काका भागवत आणि दुसरे कृष्णा डोंगरे. त्यामध्ये रतन भागवत हे एक प्रतिकात्मक उदाहरण आहे."
"अडीच वर्षे आपलं सरकार असताना आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं होतं. महात्मा फुले कर्जमुक्तीच्या योजनेचा फायदा मोठ्या बागायतदारांना मिळाला नव्हता. पण दोन लाखांपर्यंतचं पीक कर्ज असलेल्यांना त्याचा लाभ मिळाला होता."
"आपण एक-एक करून गोष्टी पूर्ण करत होतो. ते आमचं पहिलं पाऊल होतं. त्यानंतर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर आपण देणार होतो."
"पाच वर्षांपर्यंत आपण सर्व शेतकऱ्यांचा विचार केलेला होता. पण शेतकऱ्यांसाठी आपण योजना आखल्या आणि गद्दारी झाली."
"मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकरी पुत्र आहात. केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांच्याविरुद्ध आवाज उठवा. पण शेळीच्या तोंडून काय आवाज निघणार," अशी टीका ठाकरेंनी केली.
"खेडच्या सभेवेळी अवकाळी पाऊस झाला होता. सगळ्यांना वाटलं की मुख्यमंत्री, कृषीमंत्री पाहणी करतील. पण त्यांनी कुणालाही विचारलं नाही. चांगलं काम करणारं सरकार तुम्ही पाडलं आहे."
वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला पळवलं
"मालेगाव वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. पण वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला नेलं आहे. वस्त्रोद्योग महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये जास्त आहे, मग दिल्लीला आयुक्तांना नेण्याचं कारण काय? महाराष्ट्राची अवहेलना तुम्ही किती करणार आहात. सगळे उद्योग बाहेर नेऊन मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे."
"निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झालेले नसतील तर त्यांनी खेडची आणि आता मालेगावची सभा पाहावी. आम्हाला मागितलं ते आम्ही सगळं पूर्ण केलं. हजारोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र दिलेले आहेत. भर पावसात गठ्ठेच्या गठ्ठे आपण दिल्लीला घेऊन गेलो. घरी ठेवायला जागा नव्हती म्हणून ती पाठवली नाही."
"ज्यांना स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, माझ्या वडिलांचं तुम्ही नाव घेत आहात. ही माझ्या एकट्याची लढाई नाही. आपल्या देशातील लोकशाहीची ही लढाई आहे," असंही ठाकरे म्हणाले.
रामशास्त्री बाण्याचे न्यायाधीश बसलेले
"निवडणूक आयोगाचं गांडूळ केल्यानंतर केंद्र सरकार न्यायालयाही आपलं बटीक बनवण्याचा प्रयत्न करत होतं. पण अजूनही रामशास्त्री बाण्याचे न्यायाधीश त्याठिकाणी बसलेले आहेत, म्हणून न्यायव्यवस्था कोणत्याही दबावाखाली न येता काम करेल, असा मला विश्वास आहे."
"पण, ज्याक्षणी न्यायालयातील रामशास्त्री बाणा संपेल, केंद्राची पालखी वाहणारे न्यायाधीश तिथे बसतील, त्यादिवशी आपल्या लोकशाहीला श्रद्धांजली वाहणारी सभा आपल्याला घ्यावी लागेल."
चंद्रकांत पाटील म्हणाले होते, हृदयावर दगड ठेवून मुख्यमंत्रिपद दिलं. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, फक्त 48 जागा देणार. मिंध्यांना 48 जागांमध्ये आटोपणार आहात का. शिवाय भाजपने शिंदे यांना नेता मानून निवडणुका लढवणार आहात का, हे जाहीर करावं," असं ठाकरे यांनी म्हटलं.
"भाजपला वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. तर तुमची 52 काय 152 कुळे खाली उतरली तरी ती कुणी तोडू शकणार नाही. तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा, मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो, महाराष्ट्र कुणाला कौल देतो ते आपण पाहू," असंही ते म्हणाले.
"स्वतःकडे शून्य कर्तृत्व, गद्दारी करून मुख्यमंत्री झाले. पण तरीही माझ्या वडिलांचं नाव वापरत आहात. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला, त्या आईच्या कुशीवर वार करणारे धनुष्यबाण घेऊन फिरत आहेत," असं त्यांनी म्हटलं.
सावरकर आमचं दैवतच, त्यांचा अपमान करू नका
राहुल गांधींच्या कालच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करून उद्धव ठाकरेंनी त्यांनाही एक सल्ला दिला.
ते म्हणाले, "काल राहुल गांधींनी काल 20 हजार कोटींचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भाजपने उत्तर दिलेलं नाही.
आम्ही भाजपविरुद्ध सोबत लढू, पण सावरकर हे आमच्यासाठी दैवत आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान करू नये," असं ते म्हणाले.
"सावरकर काय आहेत, आम्हाला माहिती आहे. चाफेकरांना फाशी दिल्यानंतर 15 वर्षांचा पोर म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. सावरकरांनी जे काही केलं ते येरागबाळ्याचं काम नाही. त्यांनी रोज मरणयात्रा सहन केली. तेसुद्धा एका प्रकारे बलिदानच आहे. आपले क्रांतिकारक फाशी गेले, तसं 14 वर्षे मरणयात्रा सोसणं, हे येरागबाळ्याचं काम नाही."
"आपण देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्यामध्ये फाटे फुटू देऊ नका. तुम्हाला डिवचलं जात आहे. 2024 च्या निवडणुकीत जर त्यांनी विजय मिळवला, तर ते पुन्हा आपल्या देशात निवडणुका होऊ देणार नाहीत," अशी भीती उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








