ठाणे पालिकेचे अधिकारी महेश आहेर यांचा कार्यभार काढून घेण्याचे देवेंद्र फडणवीसांचे आदेश

आव्हाड

फोटो स्रोत, Getty Images

ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.

आयुक्तांनी पुढील 24 तासांत आहेर यांचा कार्यभार काढून घेतला नाही, तर त्यांच्यावर पुढील अधिवेशनात हक्कभंग आणू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

आमदार विलास पोतनीस यांनी महेश आहेर यांच्यासंदर्भात विधान परिषदेत एक लक्षवेधी सूचना मांडली होती. महेश आहेर यांची चौकशी सुरू असल्याने तोपर्यंत त्यांचा कार्यभार काढून घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती.

या मागणीनुसार, महेश आहेर यांचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

प्रकरण काय आहे?

ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावरील हल्ला प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बुधवारी (15 फेब्रुवारी) महानगरपालिकेच्या आवारात महेश आहेर यांच्यावर शिवीगाळ आणि हल्ला झाला होता. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

व्हीडिओमधील दृश्यांनुसार, काही कार्यकर्ते महानगरपालिकेच्या इमारतीबाहेर जोरजोरात ओरडताना आणि अधिकाऱ्याला आव्हान देताना दिसतात.

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याची कथित धमकी या अधिकाऱ्यानेच दिली याचा उल्लेखही या व्हीडिओमध्ये आहे.

बुधवारी संध्याकाळी महेश आहेर यांची कथित ऑडियो क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली.

या कथित ऑडियो क्लिपमध्ये एक इसम जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचे भाष्य करत असल्याचा आरोप आहे.

आव्हाड यांचे जावई स्पेनमध्ये असतात आणि त्यांना बोलवून मारण्याचे भाष्य या क्लिपमध्ये असल्याचाही दावा आहे.

आव्हाड यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार तुरुंगात असलेल्या गँगस्टर बाबाजी नावाच्या गुन्हेगाराला सांगून शूटर नियोजित केल्याची भाषा या ऑडियो क्लिपमधील संभाषणात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

या ऑडिओ क्लिपमधील आवाज आणि संभाषण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांचा आहे.

यासंदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी क्लिपमधील या संभाषण सांगितलं आहे.

दरम्यान, आहेर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

आव्हाड कुटुंबीयांची मागणी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत- आव्हाड यांनी बुधवारी रात्री उशीरा नौपाडा पोलिसांची भेट घेतली. कथित ऑडियो क्लिपची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अधिकारी महेश आहेर यांनाही चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या, "खूप खालच्या थराला हे सर्व गेलेलं आहे. तुम्हाला जनाची नाही मनाची थोडीतरी लाज असेल तर आता या क्लिपिंगवर कारवाई करा. पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करू द्या. चौकशी होईपर्यंत अधिकारी निलंबित झाले पाहिजेत."

ऑडियो क्लिपमध्ये आव्हाड कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिल्याचं कटकारस्थान आहे असाही दावा त्यांनी केला.

माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं, " तुम्हाला हा हल्ला दिसतो पण त्या क्लिपमध्ये आमच्या मुलीला, जावयाला मारण्याची, उडवण्याची धमकी दिली आहे. कोणी बाबाजी आहे ते कोण आहेत आम्हाला माहिती नाही. पोलिसांनी त्याची चौकशी करावी."

"मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की, हे आता थांबवा. बस्स झालं आता. त्यांचं नाव घेऊन हे लोक दहशत पसरवतात. धमकवतात. त्यांच्या मुलाचं नाव घेऊनही धमकवतात. त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी जे त्यांचं ऐकत नाहीत त्यांनाही असाच त्रास दिला जातो," असा आरोपही रूता आव्हाड यांनी केला आहे.

"कथित आॅडियो क्लिपमधील आवाज महेश आहे यांचाच आहे, याची मी 100 खात्री देते." असाही दावा त्यांनी केला आहे.

महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर मारहाण प्रकरण

ही ऑडियो क्लिप समोर येताच ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पोहचले आणि त्यांनी आहेर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजीत पवार, पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या सर्वांवर कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (बी), सह आर्म्स एक्ट 3/25, 4/25 अंतर्गत एफआयरची नोंद पोलिसांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.

ते म्हणतात, "राज्यातील सरकारी अधिकारी काय गुंडाच्या टोळ्या चालवत आहेत का ? आमचे बंधू जितेंद्र आव्हाड यांच्या परिवाराला संपवण्याच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप फिरत आहेत. अशा अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करून त्यावर कडक कारवाई करावी. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या संपूर्ण परिवाराला सुरक्षा देण्यात यावी."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

महेश आहेर यांचे आव्हाडांवर गंभीर आरोप

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्यावर आव्हाड कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत.

सध्या आहेर यांच्यावर उपचार सुरू असून हाॅस्पिटलमधून त्यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

या व्हीडिओमध्ये ते म्हणतात, "ती ऑडियो क्लिप मी ऐकलेली नाही. त्यामुळे त्यात कोणाचा आवाज आहे हे मी सांगू शकत नाही. 5 जानेवारी रोजी मी नौपाडा पोलिसांना एक पेन ड्राईव्ह दिला आहे. त्यात माझ्या हत्येची सुपारी घेतली असून तो इसम जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेत होता. माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याप्रकरणी मी गुन्हा दाखल केला होता."

"कळवा, मुंब्रा या ठिकाणी आमची अतिक्रमणाची कारवाई सुरू असते. मी अतिक्रमण विभागाचा चार्ज घेतल्यावर आव्हाडांनी मला सांगितलं होतं की मला विचारल्याशिवाय माझ्या मतदारसंघात कारवाई करायची नाही. माझ्या उपचारानंतर आयुक्तांच्या संमतीने मी सगळ्या गोष्टी जाहीर करेन. पण माझ्या कुटुंबियांना धोका आहे," असे गंभीर आरोप महेश आहेर यांनी केले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)