पांढरी अंडी की तपकिरी अंडी, कोणती अंडी आरोग्यासाठी चांगली असतात?

अंडी

फोटो स्रोत, Getty Images

बाजारात कोंबडीची अंडी दोन रंगांमध्ये उपलब्ध असतात. त्यातील एक असतं पांढऱ्या रंगाचं आणि दुसरं असतं तपकिरी रंगाचं. आता यातील नेमकं कोणतं अंडं आरोग्यासाठी अधिक चांगलं असतं? अंड्याच्या कोणत्या प्रकारात जास्त पोषकतत्वं असतात?

अनेकजणांना असं वाटतं की तपकिरी अंड्यात अधिक पोषकतत्वं असतात. कारण पांढऱ्या रंगाच्या अंड्यांच्या तुलनेत तपकिरी रंगांची अंडी अधिक महाग असतात.

पांढरी अंडी चांगली की तपकिरी रंगाची, हे जाणून घेण्याआधी कोंबडीच्या अंड्यांचे असे दोन रंग का असतात हे लक्षात घेऊया.

कोंबडीवर अवलंबून असतो अंड्यांचा रंग

अंड्यांचा रंग कोंबडीची प्रजाती आणि तिची जनुकीय संरचना यावर अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे पांढऱ्या रंगाच्या कोंबड्यांनी दिलेली अंडी पांढऱ्या रंगाची असतात, तर गडद रंगांच्या कोंबड्यांनी दिलेली अंडी तपकिरी रंगाची असतात.

पांढऱ्या लेगहॉर्न कोंबड्या जरी विविध रंगांमध्ये उपलब्ध असल्या तरी या कोंबड्यांकडून दिल्या जाणाऱ्या अंड्यांचा रंग पांढरा असतो.

ऱ्होड आयलॅंड, प्लायमाऊथ रॉक या प्रजातीच्या (अमेरिकन प्रजाती) कोंबड्या तपकिरी रंगांची अंडी देतात.

कोंबड्यांच्या काही प्रजाती पांढऱ्या रंगाच्या असल्या तरी तपकिरी रंगाची अंडी देतात.

अंड्यांच्या बाह्य कवचाचा रंग कोंबडीच्या गर्भाशयातील कवच पेशींवर अवलंबून असतो.

कोंबडी

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेतील मिशिगन स्टेट विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासानुसार, कोंबडीच्या गर्भाशयात अंडं तयार होण्यास जवळपास 26 तास लागतात. कोंबडीच्या गर्भात आधी अंड्याच्या आतील पिवळा बलक तयार होतो.

त्यानंतर या बलकाभोवती पांढरा बलक किंवा कवच तयार होण्यास तीन तास लागतात. त्यालाच अल्ब्युमिन म्हणतात. तर कवचाखाली पातळ थर तयार होण्यासाठी एक तास लागतो.

त्यानंतर अंडं कवच पेशीमध्ये शिरतं. इथेच अंड्यावरील बाह्य कवच तयार होतं. हे कवच तयार होण्यासाठी जवळपास 20 तास लागतात.

सर्व अंड्यांचं बाह्यकवच सुरूवातीला पांढऱ्या रंगाचं असतं. अंडी तयार होण्याच्या शेवटच्या मिनिटात याचा रंग बदलतो. अंड्याच्या बाह्यकवचाला येणारा रंग कोंबडीच्या शरीरात असणाऱ्या पिंगमेंटवर म्हणजे रंगपेशींवर अवलंबून असतो.

पांढऱ्या अंड्यांना रंग नसतो...

काही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, कोंबड्यांचं वय वाढत गेल्यावर किंवा कोंबड्या तणावात असल्यावर अंड्यांच्या रंगात बदल होतो.

सर्वसाधारणपणे तपकिरी रंगाची अंडी देणाऱ्या गडद रंगांच्या कोंबड्यांना अंडी आणि कोंबड्यांचं मांस या दोन्ही गोष्टीसाठी पाळलं जातं.

कोंबडी

फोटो स्रोत, Getty Images

या कोंबड्यांचा आकार मोठा असल्यामुळं त्यांना अधिक पोषण द्यावं लागतं. यामुळे कुकुटपालनाच्या खर्चात वाढ होते.

त्या तुलनेत पांढऱ्या रंगाच्या कोंबड्यांच्या पालनाचा खर्च कमी असतो. या कोंबड्यांचा आहार गडद रंगाच्या कोंबड्या पेक्षा कमी असतो. यामुळेच पांढऱ्या रंगाच्या अंड्यांची किंमत तपकिरी रंगाच्या अंड्यांच्या तुलनेत कमी असते.

अंड्याच्या रंगाचा पोषक तत्त्वांवर परिणाम होतो का?

इथं समोर येणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की, अंड्यांच्या रंगाचा त्या अंड्याच्या पोषकतत्वाशी संबंध असतो का?

सैद तसनीम हसिन चौधरी या न्युट्रिशनिस्ट आणि शकीला फारुख या पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांशी आम्ही या विषयावर बोललो. त्यांनी सांगितलं की, अंड्याच्या रंगाचा त्यातील पोषकतत्वावर कोणताही परिणाम होत नाही.

न्यूयॉर्कस्थित संशोधकांच्या टीमनुसार, तपकिरी अंड्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी असिड्सचं प्रमाण किंचित जास्त असतं. मात्र हा फरक खूपच छोटा असतो. त्यामुळे अंड्यांच्या पोषकतत्वामध्ये फारसा फरक पडत नाही.

कुक्कुटपालन

फोटो स्रोत, Getty Images

याच मुद्द्याच्या आधारावर असं म्हणता येऊ शकतं की पांढऱ्या आणि तपकिरी, दोन्ही रंगाच्या अंड्यांमध्ये पोषकतत्व आणि गुणवत्ता जवळपास सारखीच असते. त्यामुळं कोणत्याही रंगाचं अंड खाण्यास अजिबात हरकत नसावी.

अमेरिकेच्या कृषी विभागानुसार 50 ग्रॅम अंड्यामध्ये 72 कॅलरीज आणि 4.75 ग्रॅम फॅट असतं. पांढऱ्या आणि तपकिरी रंगांच्या अंड्यांमध्ये हे प्रमाण जवळपास सारखंच असतं.

ज्या अंड्यांमध्ये ओमेगा-3 चं प्रमाण अधिक असतं, जी अंडी ओरगॅनिक असतात, ओरगॅनिक आणि कृत्रिमरित्या तयार केलेली नसतात म्हणजे नॉन-जीएमओ (नॉन-जेनेटिकली मॉडिफाईड) असतात, फ्री रेंज असतात अशा अंड्यांना बाजारात प्रचंड मागणी असते

इथं अंडी कोणत्या रंगांची आहेत यापेक्षा कोंबड्या कोणत्या प्रकारचं अन्न खातात, कोणत्या वातावरणात वाढतात हे अधिक महत्त्वाचं आहे.

उदाहरणार्थ, ज्या कोंबड्यांना ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स किंवा व्हिटामिन-ए किंवा व्हिटामिन-ई असलेला आहार दिला जातो, त्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये अधिक पोषकतत्वं असतात.

या प्रकारच्या विशेष आहाराची किंमतदेखील जास्त असते.

अंड्यांमध्ये प्रथिने जास्त असतात...

न्युट्रिशनिस्ट सैद तसनीम हसिन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कोंबड्यांना आहार नैसर्गिक स्वरुपाचा असतो किंवा ज्यांना अधिक पोषण असलेला आहार दिला जातो, अशा कोंबड्यांकडून दिल्या जाणाऱ्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-ए, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, खनिज आणि चरबी अधिक प्रमाणात असते.

फ्री-रेंज श्रेणीतील अंड्यांमध्ये व्हिटामिन आणि खनिजांचं प्रमाण कमी असतं मात्र त्यामध्ये प्रोटिन अधिक प्रमाणात असतं. तर चरबीचं प्रमाण कमी असतं.

अंडं

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात देशी किंवा घरगुती कोंबड्यांना अधिक सूर्यप्रकाश मिळतो. पोल्ट्री तज्ज्ञ शकीला फारुख सांगतात की या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये व्हिटामिन-ए आणि व्हिटामिन-डी चं प्रमाण अधिक असतं.

घरगुती कोंबड्यांच्या तुलनेत चांगलं पोषण किंवा आहार दिलेल्या आणि व्यवस्थित काळजी घेतलेल्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांनी दिलेल्या अंड्यांमध्ये अधिक पोषकतत्वं असतात.

कारण या कोंबड्यांना नियमितपणं चांगल्या दर्जाचा आहार दिला जात असतो.

अंड्यामधील बलकाचा परिणाम

अंड्याच्या कवचाच्या रंगाचा अंड्यामधील पोषकतत्वांशी जरी काहीही संबंध नसला तरी अंड्यामधील बलकाच्या रंगाचा मात्र काही परिणाम होतो.

जर अंड्यामधील बलकाचा रंग गडद असे तर त्या अंड्यात व्हिटामिन-ए, कॅरोटिन आणि खनिज अधिक प्रमाणात असतात. शिवाय या प्रकारच्या अंड्यांची चवदेखील उत्तम असते.

अंड्यामधील बलकाचा रंग कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या आहारावर अवलंबून असतो. कॅरोटेनॉईडच्या केमिकल प्रभावामुळं अंड्याच्या बलकाचा रंग गडद होतो.

अनेक पोल्ट्री फार्ममध्ये अंड्यामधील बलकाचा रंग गडद करण्यासाठी कॅरोटेनॉईड इंजेक्शनचा वापर केला जातो. तर काही पोल्ट्री फार्ममध्ये यासाठी लाल शिमला किंवा ढोबळी मिर्चीचा वापर केला जातो.

कारण कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या आहारावरच अंड्यामधील पोषकतत्वं आणि अंड्यांची चव अवलंबून असते.

जर पांढरी अंडी देणाऱ्या कोंबड्या आणि लाल अंडी देणाऱ्या कोंबड्यांना एकाच प्रकारचा आहार दिला तर या दोन्ही प्रकारच्या कोंबड्यांकडून दिल्या जाणाऱ्या अंड्यांमधील पोषकतत्वात आणि त्यांच्या चवीत फारसा फरक असणार नाही.