शरीरासाठी काय चांगलं; साखर की गूळ?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गौतमी खान
- Role, बीबीसी प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिने माझ्यासाठी चहा करताना त्यात साखर टाकली नाही.
यावर मी तिला म्हणाले की, "साखरेशिवाय चहा कसा लागतो?"
"आम्ही साखर सोडून खूप दिवस झालेत. आम्ही फक्त सेंद्रिय गूळ वापरतो," असं ती अभिमानाने म्हणाली.
'पण तुम्ही अजून साखर वापरता का?' असं तिने मला विचारलं.
'साखरेपेक्षा गूळ चांगला' ही म्हण अलीकडच्या काळात अनेकदा ऐकायला मिळते. तुम्ही पण ऐकली असेल.
अलीकडच्या काळात आरोग्य आणि तंदुरुस्तीवर भर दिला जातोय. मधुमेहाचा धोका वाढत असताना अनेक लोक आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करत आहेत. काहीजण गोड पदार्थ, मिठाई कमी करत आहेत, तर काहीजण साखरेला पर्याय शोधत आहेत.
यावर साखरेऐवजी गूळ आणि मधाचा वापर केला जातोय. गुळाचा वापर रोजच्या चहापासून ते सणासुदीच्या मिठाईपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये केला जातो.
पण साखरेपेक्षा गूळ खरंच चांगला आहे का? यावर तज्ज्ञ काय म्हणतात ते पाहूया.
साखर आणि गूळ यात काय फरक आहे?
साखर आणि गूळ या दोन्ही गोष्टी उसापासून बनवल्या जातात. परंतु, त्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत वेगळी आहे. पांढरी साखर एक रिफाईंड स्वीटनर आहे.
सल्फर डायऑक्साइड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, फॉस्फोरिक अॅसिड यांसारखी रसायने वापरून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे उसातील जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे यांसारखी पोषक तत्वे नष्ट होतात. एकूण त्यात कॅलरीजशिवाय कोणताही पोषक घटक नसतो.

हेच गूळ बनवताना उसाचा रस उकळला जातो. उसाच्या रसातील पाण्याचं पूर्णपणे बाष्पीभवन होईपर्यंत उकळून घट्ट झालेलं मिश्रण ब्लॉक्समध्ये भरलं जातं. त्यात रिफाईंड असा काही प्रकार नसल्यामुळे गुळातील पोषक तत्वे अबाधित राहतात.
संपूर्ण साखर आणि गूळ यातील फरक म्हणजे पोषक घटक. गुळामध्ये पोषक तत्वं असतात तर साखरेत ते जवळपास नसल्यात जमा असतात.
कॅलरीजच्या बाबतीत दोन्ही पदार्थ समान आहेत.
साखर खाल्ल्यावर काय होतं?
साखर घालून तयार केलेले पदार्थ लगेच पचतात. साखरेमध्ये कोणतीही प्रथिने किंवा खनिजे नसल्यामुळे ती लवकर पचते आणि तेवढ्याच लवकर रक्तात शोषली जाते. यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी लगेच वाढते.
जसजसे ग्लुकोज वाढते तसतसे स्वादुपिंड इन्सुलिन सोडते. इन्सुलिन पेशींना रक्तातील वाढलेले ग्लुकोज शोषून घेण्यास सांगते.

फोटो स्रोत, GANESH
हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही चॉकलेट सारख्या गोष्टी खाता तेव्हा तुम्हाला उत्साही वाटते.
गूळ खाल्ल्यावर पण जवळपास असंच वाटतं.
तसं वाटत नसेल तर गुळामध्ये प्रथिनं आणि खनिजं असल्यामुळे तो साखरेपेक्षा थोडा हळू पचतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते.
जास्त गोड खाल्ल्यास काय होतं?
गूळ आणि साखरेतील कॅलरीजमध्ये फारसा फरक नसतो. साखर किंवा गूळ मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतात,
असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
मिठाईच्या अतिसेवनामुळे शरीर यकृत आणि स्नायूंच्या पेशींमध्ये अतिरिक्त ग्लुकोज साठवते. त्याचं हळूहळू चरबीमध्ये रूपांतर होतं.

फोटो स्रोत, AVERAGE PA
ज्येष्ठ आहारतज्ज्ञ जानकी श्रीनाथ सांगतात, "गोड पदार्थांचा मेंदू आणि शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो. तरुण वयात त्वचेवर सुरकुत्या पडण्याची आणि म्हातारपणाची छाया दिसण्याची शक्यता असते."
पोषणतज्ज्ञ सुजाता स्टीफन सांगतात, "गुळात काही पोषक घटक असतात. पण तुम्ही ते जितकं कमी प्रमाणात घ्याल तितकं चांगलं."
साखरेसाठी पर्याय शोधण्यापेक्षा गोड कमी करण्याचा सल्ला त्या देतात.
साखर सोडणं चांगलं आहे का?
सुजाता स्टीफन सांगतात, "साखरेचा शरीराला कोणत्याही स्वरूपात फायदा होत नाही. साखरेऐवजी गूळ आणि मध यांसारख्या गोष्टी घेतल्यास त्यांची सवय होण्याचा धोका असतो. तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवायची असेल, तर गोडाचं सेवन कमी करणं हाच उपाय आहे."
त्या पुढे म्हणाल्या की, आरोग्याच्या कारणास्तव किंवा फिटनेससाठी पर्याय शोधण्यापेक्षा गोड पदार्थ कमी करणं चांगलं आहे. दररोज साखरमुक्त पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यालाही हातभार लागतो.

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टर म्हणतात की, साखर पूर्णपणे बंद करणं गरजेचं नाही, परंतु त्याचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे.
मिठाई, थंड पेये, चॉकलेट्सच्या रूपाने साखर शरीरात घेतली जाते त्यामुळे हा सल्ला लक्षात ठेवावा असं त्या सांगतात.
मधुमेही रुग्ण साखरेऐवजी गूळ खाऊ शकतात का?
मधुमेहाच्या रुग्णांना साखरेइतकाच गुळाचाही धोका असतो.
साखर, गूळ, मध, यांपैकी कोणतेही पदार्थ शरीरात गेल्यावर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. सुजाता स्टीफन सांगतात की, "मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी गूळ, साखर, खजूर, गूळ यापासून दूर राहिलं पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
पण जे नेहमी साखर नियंत्रणात ठेवतात आणि आपल्या आहाराबाबत काळजी घेतात त्यांनी अधूनमधून गोड खाल्लं तर फार मोठा धोका नसल्याचं त्या सांगतात.
तुम्ही दररोज किती गूळ खाऊ शकता?
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, गूळ, साखर आणि मध यांपैकी कोणताही पदार्थ 20 ते 36 ग्रॅमपेक्षा जास्त खाऊ नये.
पुरुषांना 9 चमचे म्हणजे 36 ग्रॅम आणि महिलांना 6 चमचे म्हणजे 25 ग्रॅम गोड खाण्याचा सल्ला दिला जातो.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) शिफारस करते की, गोडाचे पदार्थ दैनंदिन कॅलरीजपैकी 5 टक्क्यांपेक्षा कमी असावे.











