दीड एकर ऊस शेतीच्या जोरावर सुरू केलं गुऱ्हाळघर आणि तिप्पट कमाई केली

फोटो स्रोत, SarfarajSanadi/BBC
- Author, सरफराज सनदी
- Role, बीबीसी मराठीसाठी
"साधारण पाच वर्षांपूर्वी मिळणाऱ्या सेंद्रिय उसाच्या उत्पन्नात तिप्पट वाढ झाली आहे. कारण मी माझ्याच शेतातल्या ऊसापासून रस बनवतो आणि त्यातून गूळ तयार करून त्याचे वेगवेगळे बाय-प्रॉडक्ट बनवतो. विक्रीही करतो. कारखान्यामधून जितका पैसा एक टन ऊसाला मिळतो, त्याच्या तुलनेत खूपच फायदा होतो."
सांगलीच्या औदुंबर इथल्या शेतकरी सुहास पाटील यांचा हा शेतकरी ते उद्योजक हा प्रवास थक्क करणारा आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून सुहास पाटील यांनी नॅनो पद्धतीच्या उसाचं गुऱ्हाळ सुरू केलं आणि अवघ्या 5 वर्षांमध्ये फायदा मिळवत स्वतःचा ब्रँड तयार केलाय.
केवळ तीन कामगारांच्या मदतीने पाटील यांचं गुऱ्हाळघर चालतं. तिथे सेंद्रिय गूळ आणि गुळाचे पदार्थ तयार केले जातात.
या यशाची कहाणी सुहास पाटील यांनी बीबीबी मराठीशी बोलताना सांगितली.
"मी कॉलेजला गेलो तेव्हाच ठरवलं की गाव सोडायचं नाही, नोकरी करायची नाही. पण वडिलांची शेती होती. गावातच राहायचं म्हणून फोटोग्राफीचा छंद व्यवसायात बदलला. बरेच वर्षं फोटोग्राफी केली. पण मी अस्वस्थ होतो. कारण मला शेतात काम करायचं होतं, असं जाणवायला लागलं. पण काहीतरी वेगळं करायची इच्छा होती."
'मालकाचाच गूळ निघायचा'
2005 मध्ये सुहास यांनी शेती करायला सुरुवात केली. घरात गायी आणल्या. ऊस मुख्य पीक असल्याने त्याचं गणित जमवणं त्यांना कठीण जायचं. साखर कारखान्यावर खूप कमी पैसे मिळायचे. म्हणून मग त्यांनी शेतात जे पिकतं ते बाय-प्रोडक्ट केल्याशिवाय विकायचं नाही असं ठरवंल आणि स्वतःच गूळ तयार करून आणायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, SarfarajSanadi/BBC
गूळ बनवण्यासाठीचं गुऱ्हाळघर जवळ नसल्याने त्यांना लांब जावं लागे. ते सांगतात, "लांबून गूळ बनवून आणायचा, त्याच्या ढेपा करायच्या. पण तो गूळ काळा पडून खराब व्हायचा. वातावरणाचा फटकाही बसत असे. त्या गुळाला चांगला भावही मिळत नसे. मग माझ्या डोक्यात विचार आला की आपणच स्वतः गुऱ्हाळघर का करू शकत नाही? पहिल्यांदा ऊसाचा रस काढून गूळ बनवण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील झाला."
वास्तविक गुऱ्हाळघर म्हणजे मोठ्या प्रमाणात भांडवल आणि जास्त मजूर असंच समीकरण लोकांना माहिती असतं. एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला गुऱ्हाळघर काढायचं म्हणजे ते अशक्य असल्याचा समजही आहे. मध्यम स्वरूपाचं गुऱ्हाळघर उभारण्यासाठी जवळपास 15 ते 20 लाखांच्या पुढे भांडवल लागतं आणि त्यानंतर किमान 15 ते 20 मजूर तिथे कामावर लागतात. त्यांचा पगार आणि इतर खर्चही पाहावा लागतो. शिवाय गुळव्याला सर्वाधिक पगार द्यावा लागतो.
ही आर्थिक जुळवाजुळव करेपर्यंत मालकाचा अक्षरशः गूळ निघतो, असं सुहास म्हणतात. याच कारणांमुळे गुऱ्हाळघरं बंद पडतात, असंही ते सांगतात.
फक्त दीड एकर शेतीच्या जोरावर स्वतःचा ब्रँड
सुहास पाटील यांची वडिलोपार्जित 12 एकर शेती आहे. त्यात ऊस आणि हळद ही पीकं ते घेतायत. पूर्वी साडेतीन एकर क्षेत्रावर ऊसाची शेती करत, पण त्यातून फारसं उत्पन्न नव्हतं. ऊसाची कमी एफआरपी (रास्त, किफायतशीर दर) आणि तेही तीन टप्प्यात पैसे मिळायचे. त्यामुळे मग त्यांनी पुढे फक्त दिड एकरवर ऊसाची लागवड केली. तितक्याच पिकाच्या जोरावर त्यांनी आपल्या धंद्यात नफा उभा केलाय.

फोटो स्रोत, SarfarajSanadi/BBC
"शेतीबरोबर गोपालन व्यवसाय देखील छोट्या प्रमाणात सुरू होता आणि त्यातून आम्ही तूप आणि खवा बनवण्याचं काम करायचो. त्यासाठी एक छोटी काहिली (कढई सारखं भाडं) होती. मग डोक्यात विचार आला की बाहेरून गूळ बनवून आणण्यापेक्षा छोट्या प्रमाणात का होईना गूळ तयार होऊ शकतो का, या दृष्टीने प्रयत्न सुरू केला. मग काही साहित्य गोळा करून आणि आपल्याकडे असणाऱ्या खव्याच्या छोट्या काहिलीमध्ये उसाचा रस काढून त्यातून गुळाची निर्मिती केली आणि तो प्रयोग यशस्वी ठरला."
2017 मध्ये सुहास यांनी नॅनो पद्धतीचं गुऱ्हाळघर उभारलं. अडीचशे लीटर इतकी क्षमता असणारी गूळ बनवण्याची काहिली आता त्यांच्याकडे आहे. 200 ते 250 किलो गूळ आणि त्यापासूनचे इतर पदार्थ ते तयार करतात.
गुऱ्हाळघरातील दोन महिला सक्षमपणे तिथलं काम सांभाळतात. गुळाचा रस ओतणं, अनावश्यक तवंग काढणं, रसावर प्रक्रिया करणे आणि बायप्रॉडक्ट बनवणं हे सगळं काम त्या करतात. महिलांची कार्यक्षमता जास्त असल्यानं गुऱ्हाळघरासाठी ही जमेची बाजू आहे, सुहास सांगतात.
गूळ पर्यटन सुरू केलं
सुहास पाटील दररोज सव्वाटन ऊस गाळप करतात. 1 टन ऊसापासून 120 किलो गूळ तयार होतो.

फोटो स्रोत, SarfarajSanadi/BBC
सरासरी 100 रुपये प्रति किलो त्याचा दर आहे. छोटी गुळाची ढेप, गूळ पावडर, काकवी, गूळ कॅण्डी अशी उत्पादनं बनवली जातात.
केवळ ही उत्पादनं बनवणं इथपर्यंतच ते थांबत नाहीत तर त्यांनी स्वतःच या मालाची विक्री सुरू केली आहे.
'गोपालनंदन' हा ब्रँड तयार करुन विक्रीसाठी दुकानही सुरू केलंय. गूळ पर्यटन सुरू करुन खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकाला गुऱ्हाळघरामध्ये काम कसं चालतं हे दाखवलं जातं.
उसाच्या शेतीचं आणि गुऱ्हाळघरातल्या त्यांच्या गुळाचं आर्थिक गणित ते मांडतात.
"1 टन ऊस जर साखर कारखान्याला पाठवला तर त्यातून 3000 रुपये मिळतात. मात्र गुऱ्हाळघरामध्ये एक टन ऊस गाळला तर त्यातून 100 ते 120 किलो गूळ तयार होतो. हा सेंद्रिय पद्धतीचा, कोणत्याही रसायनाशिवाय बनवलेला गूळ आणि त्याच्या उत्पादनांना 120 रुपये किलोपर्यंत दर मिळतो."

फोटो स्रोत, SarfarajSanadi/BBC
लोक सेंद्रिय उत्पादनाबद्दल जागरुक झाल्यामुळे या उत्पादनांना चांगला दर मिळतोय. त्यामुळे कारखान्यावरच्या ऊसाच्या तुलनेत फरक काढल्यास फायदाच होतो, असा दावा सुहास पाटील करतात.
एवढ्या छोट्या प्रमाणात गुऱ्हाळघर होऊ शकतं यावर कोणाचा विश्वास बसत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी या गुऱ्हाळघराला भेट देतायत.
अल्पभूधारक असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून स्वतःचं नॅनो पद्धतीचं गुऱ्हाळघर उभं केल्यास त्यांना अधिकचा नफा मिळू शकतो, असा सुहास पाटील शेतकऱ्यांना सल्ला देतात.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









