You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुषमा अंधारे : एकेकाळी शिक्षणासाठी घरातून पळालेली तरुणी ते शिवसेनेच्या 'फायरब्रँड' नेत्या
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांच्यात सध्या वाकयुद्ध रंगलेलं दिसतंय.
याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलंय की, "कालपासून समाज माध्यमांवर सर्व स्तरातील लोकांनी योग्यता दाखवल्यानंतरही वाघ बाईंचा थयथयाट काही थांबायचं नाव घेत नाही. उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरू आहे. बाई, पाठीशी असणाऱ्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा."
पुढे त्या म्हणतात की, "अत्यंत इमानी इतबारे माणूसपणाच्या मूल्यासाठी लढा देणाऱ्या चळवळीतून मी आले आहे. पायाच्या दोन बोटात दगड पकडून मागच्या मागे दगड भिरकाऊन जागीच शिकार करणाऱ्या आदिवासी पाड्यावरची आहे मी. माझ्याकडे वाचवायला लाचखोरीतून जमा केलेला पैसा नाही. मुंबईसारख्या शहरात वाममार्गाने जमा केलेली प्रॉपर्टी नाही. माझ्याकडे प्रचंड जपायला माझं ईमान, शील आणि सत्व आहे. त्याच्यावर बोलणेच काय या शब्दांचा अर्थ कळण्याची ही तुमची योग्यता नाही."
विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसमोर अस्तित्वाचं संकट उभं असताना शिवसेनेची ढाल बनलेल्या आणि आपल्या वक्तृत्व शैलीमुळे राज्यभरात पोहचलेल्या सुषमा अंधारे कोण आहेत?
फुले-आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेत प्रवेश का केला?
या आणि अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
कोण आहेत सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. 28 जुलै 2022 रोजी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
"आज शिवसेनेत माझ्या लढवय्या साथी आल्या आहेत," असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचं पक्षात स्वागत केलं.
तर आंबेडकरी चळवळीतून आलेल्या सुषमा अंधारे यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेत प्रवेश केल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. पण मी त्यापैकी नाहीय. उद्धव ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मला कोणतीही अपेक्षा नाही. देशाचं संविधान वाचवण्यासाठी मला भाजपाविरोधात लढायचं आहे." ही आपली भूमिका सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केली.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आतापर्यंत सुषमा अंधारे यांनी पक्षाशी संबंधित अनेक प्रकरणांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. किंबहुना पक्षाची बाजू स्पष्ट आणि निर्भीडपणे मांडणाऱ्या सुषमा अंधारे यांनी अल्पकाळातच माध्यमांचं लक्ष वेधून घेतल्याचं दिसतं.
शिवसेनेच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वात मोठं बंड झाल्यानंतर आणि खासदार संजय राऊत पक्षाची बाजू मांडण्यासाठी नसताना (तेव्हा ते जेलमध्ये होते) सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
'पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नाही,' अशी प्रतिक्रिया जरी त्यांनी दिली असली तरी प्रवेशानंतर लगेचच त्या उपनेत्या बनल्या आणि प्रवेशानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात भाषण देण्याची संधीही त्यांना मिळाली.
'शिक्षणासाठी 51 रुपये घेऊन पळून गेले होते'
सुषमा अंधारे या मुळच्या लातूर जिल्ह्यातील मुरूडच्या. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1984 रोजी झाला.
लातूर येथील 'रुरल एज्यूकेशन फाऊंडेशन'च्या शाळेत त्यांचं बारावीपर्यंतच शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी बसवेश्वर कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विषयातून एमएची पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांनी बीएड केलं.
सुषमा अंधारे भटक्या विमुक्त समाजातील आहेत. "संबंध राज्यातील आमच्या समाजाची लोकसंख्या एकत्र केली तरी आमची लोकसंख्या एक विधानसभेचा मतदारसंघाएवढीही होऊ शकत नाही इतक्या मायक्रॉ मायनॉरिटीतून आम्ही आलोय. आरक्षणासाठी आम्ही मोर्चा काढण्याइतपत संख्याबळही आम्ही दाखवू शकत नाही. माझ्या समाजातलं कोणी आमदार,खासदार तर सोडाच पण सरपंच सुद्धा नाही." असं सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
सुषमा अंधारे हे नाव आईकडील असल्याचं त्या सांगतात. त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनीच केला. आजोबा कबीरपंथी होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं नाव कबीरा असं ठेवलं आहे.
पहिल्याच प्रयत्नात दहावी पास झाल्यानंतर घरातल्यांनी त्यांना 51 रुपयांचं बक्षिस दिलं होतं. ही रक्कम घेऊन आपण लातूरला पुढील शिक्षणासाठी पळून गेलो असंही सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
तसंच उच्च शिक्षण घेत असताना राज्य पातळीवरील अनेक प्रतिष्ठित वक्तृत्व स्पर्धा त्यांनी जिंकल्या असून त्यातून मिळणाऱ्या बक्षिसांमधून शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत झाली असंही त्या सांगतात.
शिवसेनेत येण्यापूर्वी सुषमा अंधारे गणराज्य संघात काम करत होत्या. राज्यघटनेत नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची जाणीव खेड्यापाड्यातील लोकांना व्हावी यासाठी त्या काम करत होत्या.
वादग्रस्त भूमिका
अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका मांडणाऱ्या आणि आपल्या भाषणांमधून संविधानातील हक्कांची जनतेला आठवण करून देणाऱ्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या.
शिवसेनेचा हिंदुत्ववाद तुम्हाला कसा पटतो? असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात दिलं. त्या म्हणाल्या, "कठीण आहे. तुमचंच चित आणि तुमचंच पट. एकीकडे तुम्ही म्हणता शिवसेनेने हिंदुत्ववाद सोडला आणि दुसरीकडे म्हणता की सुषमा अंधारे हिंदुत्ववादी शिवसेनेत कशा? ज्याला नांदायचं नसतं त्याला बारा बुद्ध्या सुचतात. यातला हा प्रकार आहे."
उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या सांगताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "हिंदु धर्मातील कोणती ओवी, कोणता अभंग, कोणता स्त्रोत आहे जो सांगतो की हिंदू धर्मासाठी तुम्ही इतर धर्मांचा द्वेष केला पाहिजे. हे विश्वची माझे घर ही सर्वांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना तुम्हाला कळली असती."
सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणखी एक मुद्दा उपस्थित करण्यात आला तो म्हणजे शिवसेनेच्या भूमिकांविरोधातलं त्यांचं जुनं भाषण. या भाषणाची क्लिप काही माध्यमांवर व्हायरल झाली.
या व्हीडिओमध्ये सुषमा अंधारे एका राजकीय व्यासपीठावर भाषण देत आहेत. 2019 सालचा हा व्हीडिओ असून मुंब्रा येथील एका जनसभेला संबोधित करताना यात सुषमा अंधारे दिसतात. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित होते.
या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, "आदित्य ठाकरे यांच्या आजोबांनी बजाओ पुंगी, भगाव लुंगी असा नारा दिला होता पण त्यांचा नातू आता लुंगी डान्स करत आहेत आणि 'वन्नकम वरली' म्हणत आहेत. आदित्य ठाकरे वरळी येथून निवडणूक लढवत आहेत. पण त्यांच्याच विचारधारेत किती विरोधाभास आहे. "
तसंच या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या, "औरंगाबादला उद्धव ठाकरे यांची सभा झाली.ते म्हणाले, या हिरव्यांना बोकांडी घेऊ नका आम्ही तुम्हाला मराठीत सांगतो. उद्धव साहेबांना सांगावं लागेल जे हिरवे भगवे करत आहेत त्यांना धर्ननिरपेक्षता शिकवावी लागेल. राज्यघटनेनुसार देशाचं नाव भारत आहे हिंदुस्थान नव्हे."
आता त्याच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विरोधक सुषमा अंधारे यांना या भाषणाची आठवण करून देत आहेत.
परंतु माध्यमांशी बोलताना अनेकदा सुषमा अंधारे यांनी हे स्पष्ट केलं आहे की, "मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. हा माझा पहिला राजकीय प्रवेश आहे. मी यापूर्वी अनेक व्यासपीठांवर सभांमध्ये सहभाग घेतला आहे. मी भाजपाबद्दल काय बोलले हे सांगितलं जात नाही. मी अनेक पक्षांमध्ये जाऊन आले असं फिरवलं जातं पण तसं नाहीय."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)