You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
परळीत धनंजय मुंडेंविरोधात मराठा उमेदवार देण्याची पवारांची खेळी यशस्वी ठरेल का?
- Author, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधील सर्वाधिक चर्चा असलेल्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ. संपूर्ण राज्याचं या परळी मतदारसंघातील निवडणुकीवर लक्ष आहे.
आधी रेणापूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या परळी मतदारसंघातून भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी पाचवेळा विजय मिळवला. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोनदा परळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
यानंतर राज्यातील राजकारणाची समीकरणं मोठ्या स्वरुपात बदलली. एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता एकमेकांसोबत उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे.
असं असलं तरी यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक मुंडे भाऊ-बहिणीला आव्हानात्मक ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी धनजंय मुंडेंविरोधात दिलेला मराठा उमेदवार.
लोकसभा निवडणुकीतही मुंडे भाऊ-बहीण एकत्र लढले. पण तिथं पंकजा मुंडेंचा पराभव झाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्यामुळं आता 2024 ची विधानसभा निवडणूकही तुल्यबळ होईल, हे स्पष्ट आहे.
या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात मुख्य लढत कोणात आहे, ही लढत इतकी चुरशीची का झाली, परळीतील राजकीय समीकरणं काय आहेत आणि कोणते मुद्दे या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात, याचा आढावा.
प्रमुख दावेदार कोण?
परळी मतदारसंघ गेल्या 40 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 40 वर्षांनी पहिल्यांदाच इथं निवडणुकीत कमळ चिन्ह नसणार आहे.
राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर महायुतीत हा मतदारसंघ भाजपऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं आला आहे. अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आला आहे. त्यांच्याकडे अनेक उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली.
अखेर शरद पवार यांनी या मतदारसंघामध्ये राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली. राजेसाहेब देशमुख काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष होते. नुकताच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
कोणाची किती शक्ती?
धनंजय मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं संघटन केलं आहे. लोकांना सहज उपलब्ध होणारा नेता, अशी त्यांची परळीमध्ये प्रतिमा आहे.
याच जोरावर त्यांनी 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव केला. या निवडणुकीत तर हे दोन्ही विरोधकच एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढली आहे.
राज्यातील मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी सांभाळलेली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांच्याही मंत्रिमंडळात धनंजय मुंडे मंत्री होते.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. तसंच त्याआधी विद्यार्थी दशेपासून राजकारणात असल्यानं त्यांची मतदारसंघावर चांगली पकड बसली होती.
राजेसाहेब देशमुख यांनीही आपल्या राजकारणाचा प्रवास ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सभापती असा केला. त्यांनी बाजार समितीचे संचालक म्हणूनही काम केलं. याशिवाय काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.
राजेसाहेब देशमुख मागील काही काळापासून मतदारसंघ बांधणीसाठी प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातूनही ते बीडमध्ये गावोगावी गेले आहेत.
विशेष म्हणजे देशमुख यांच्या उमेदवारीसाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रयत्न केल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत मुंडे भाऊ-बहिणीला मात देणारे बजरंग सोनवणे हेही राजेसाहेब देशमुख यांची मोठी ताकद असणार आहेत.
या बातम्याही वाचा:
मराठा उमेदवाराचे समीकरण काय?
2024 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही मुंडे भाऊ-बहिण एकत्र येऊन लढत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरणं बदलली आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला.
त्यामुळं आता विधानसभेत काय होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर परळीतील राजकीय समीकरणं पाहणंही महत्त्वाचं आहे.
अजित पवार गटाने वंजारी समाजातील नेत्याला उमेदवारी दिलीय, तर शरद पवारांनी मराठा समाजातील नेत्याला उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकही ओबीसी विरुद्ध मराठा अशी होऊ शकते, असं राजकीय जाणकार सांगतात.
बीडमधील ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कांकरिया यांच्या मते, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला शरद पवार हे अजित पवारांनंतर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना जबाबदार धरतात. त्यामुळे शरद पवारांकडून धनंजय मुंडेंना घेरण्याचे सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत.”
“पवारांनी ऐनवेळी 'मराठा कार्ड' वापरलं आहे. या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठी आहे. बीड जिल्ह्यावर 'जरांगे फॅक्टर' सर्वाधिक परिणाम करणारा ठरला आहे. त्यामुळे पवारांकडून जरांगे फॅक्टरचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न असू शकतो,” असंही नरेंद्र कांकरिया सांगतात.
पंकजा-धनंजय मुंडे समर्थकांचे मनोमिलन होणार?
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी धनंजय मुंडेंकडून अपेक्षित काम झालं नसल्याचा आरोप केला.
त्यामुळं राज्य स्तरावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आलेले असले तरी स्थानिक पातळीवर अनेक वर्षे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम असल्याचंही दिसलं.
एकूणच या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते धनंजय मुंडेंचे काम करणार का? किती प्रभावीपणे करणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावर बोलताना बीडमधील ज्येष्ठ पत्रकार दत्ता देशमुख म्हणाले, “परळीत 40 वर्षांनंतर भाजपचं कमळ चिन्ह नसणार आहे. याबाबत भाजप कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता आहे. मुंडे भावंडं एकत्र आले आहेत, पण मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये यंदा कमळ चिन्ह नसल्यामुळे अस्वस्थता आहे.”
“मागील सत्तेच्या काळात भाजप कार्यकर्त्यांना अनेक कामांसाठी पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंसमोर हात पसरावे लागले आहेत. त्यामुळे दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन किती होईल?” असा प्रश्न दत्ता देशमुख उपस्थित करतात.
“धनंजय मुंडेंनी मोठ्या स्वरुपात सरकारी कार्यक्रम घेतले. राज्याचा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम परळीत घेण्याला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही हा कार्यक्रम परळीत झाला.
त्यामुळे आष्टीच्या लाभार्थ्यांना 200 किलोमीटर दूर परळीत यावं लागलं,” असंही देशमुख नमूद करतात.
विशेष म्हणजे 40 वर्षांनंतर पहिल्यांदाच कमळ चिन्ह नसणार असल्याने एकीकडे भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आहे, तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, रमेश अडसकर, लक्ष्मण पवार आणि इतर नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.
रमेश आडसकरांना माजलगावमधून तिकीट हवं होतं. मात्र ते न मिळाल्याने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.
धनंजय मुंडेंनी शक्तीप्रदर्शन टाळलं
मोठ्या कार्यक्रमांसाठी आणि शक्ती प्रदर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या धनंजय मुंडेंनी यावेळी अगदी साध्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन न करता, अर्ज भरल्याने हा बदल चर्चेचा विषय ठरला आहे.
आक्रमक बोलणाऱ्या धनंजय मुंडेंनी आपलं राजकीय करियर संपवण्याचं चक्रव्युव्ह रचलं जात असल्याचंही वक्तव्य केलं. यामुळेही राजकीय चर्चा सुरू आहेत.
राजेसाहेब देशमुख यांच्यासमोरील आव्हानं
अनेक उमेदवारांची चर्चा असताना राजेसाहेब देशमुख यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर झाल्याने शरद पवार गटातही नाराजी आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी राजाभाऊ फड, सुनील गुट्टे या नावांची चर्चा होती. त्यांचे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाले, पण ऐनवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या राजेसाहेब देशमुख यांना शरद पवार गटात घेऊन उमेदवारी देण्यात आली.
त्यामुळे उमेदवारीच्या चर्चेतील नेते नाराज दिसत आहेत. या सर्वांची नाराजी संपवणं हे राजेसाहेब देशमुख यांच्यासमोरील आव्हान असणार आहे.
यावर बोलताना दत्ता देशमुख म्हणतात, “राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजाभाऊ फड यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यालयातील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो असलेल्या बॅनरवर शाई फेकली. तसेच बॅनर फाडले.”
“नाराजीचे हे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे ही नाराजी रोखणं, नाराज निवडणूक रिंगणात उतरले तर त्यांना मागे घ्यायला लावून सोबत घेणं, याचं मोठं आव्हान राजेसाहेब देशमुख यांच्यासमोर असेल. या गोष्टींवरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल,” असं पत्रकार देशमुख यांनी नमूद केलं.
परळीतील कोणते प्रश्न निर्णायक ठरणार?
धनंजय मुंडे यांच्याकडं राज्याचे कृषीमंत्रिपद असूनही त्यांनी शेतमालाला न मिळणाऱ्या भावाचा प्रश्न सोडवलेला नाही, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करताना दिसतात.
याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्नही न सुटल्याने मराठा समूहातही नाराजी दिसत आहे. याशिवाय काही स्थानिक प्रश्नही आहेत.
यावर बोलताना दत्ता देशमुख म्हणाले, “परळी तालुक्यातील शिरसाळ एमआयडीसीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मागील 10 वर्षात शिरसाळ एमआयडीसीच्या विषयावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये श्रेयाची लढाई झाली. मात्र या एमआयडीसीला मूर्त स्वरुप आलं नाही.”
“2-3 वेळी भूमीपूजन झालेलं परळीतील बसस्थानकही अद्याप उभं राहिलेलं नाही. एक वीटही रचली गेली नाही. याशिवाय परळीतील रोजगाराचा प्रश्न, सातत्याने होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे गुन्हेगारीचा प्रश्न आणि दहशतीच्या राजकारणाचा प्रश्नही महत्त्वाचा ठरेल,” असं देशमुख सांगतात.
“राजकारणात 'एक अधिक एक म्हणजे दोन' कधीच होत नाही. एकमेकांविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर होणार का, हे कार्यकर्ते किती जुळवून घेणार, एकमेकांना मतांचं हस्तांतरण होणार का या मुद्द्यावरच ही बेरीज अवलंबून आहे,” असंही देशमुख नमूद करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)