You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आशिया चषकात भारतानं कशी केली विजयी कामगिरी? जाणून घ्या 5 कारणं
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी
दुबईच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट राखून पराभव करत भारतानं आशिया चषकामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.
भारतानं नवव्या वेळी आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली. पण हा विजय ऐतिहासिक म्हटला जात आहे, त्यामागचं कारणही तसंच आहे. ते म्हणजे आशिया चषकाच्या इतिहासात 40 वर्षांत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना रंगला होता.
भारतानं या आशिया चषकात एकही सामना गमावला नाही. फायनलसह सर्व 7 सामन्यांत विजय मिळवत सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतानं T20 क्रिकेटमधलं वर्चस्व कायम ठेवलं.
या संपूर्ण मालिकेत भारतानं चॅम्पियन असल्यासारखी कामगिरी केली. अगदी पहिल्या सामन्यापासून ते रिंकूच्या शेवटच्या चौकारापर्यंत भारतानं मालिकेत मागे वळून पाहिलं नाही.
अंतिम सामन्यात काही वेळ भारताची पीछेघाट जाणवत होतं. पण टीम इंडियानं अत्यंत सकारात्मकपणे परिस्थितीचा सामना करत तसाच सकारात्मक निकाल भारताला मिळवून दिला.
भारतानं पाकिस्तानला या मालिकेत सलग तिसऱ्यांदा पराभूत केलं. फायनलमध्ये पाकिस्तान पुनरागमन करणार असं वाटत होतं. पण तिलक वर्मानं त्यांच्या इराद्यांवर पाणी फेरलं.
या सामन्यासह मालिकेत विजय मिळवताना भारातानं अत्यंत नियोजनबद्धरीत्या कामगिरी केल्याचं दाखवून दिलं. संघाच्या या खास कामगिरीची पाच महत्त्वाची कारणं कोणती ते जाणून घेऊयात.
भारतीय संघानं मालिका सुरू झाल्यापासून प्रत्येक सामन्यात आणि प्रत्येक विरोधी संघासमोर प्रचंड आत्मविश्वासानं खेळून दाखवल्याचं पाहायला मिळालं.
विराट, रोहित सारख्या मोठ्या नावांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या या स्पर्धेच्या संघ निवडीपासून चर्चा होती. कारण फलंदाज आणि गोलंदाजीच्या वेगळ्या प्लानसह भारतीय संघ या स्पर्धेत उतरला होता.
कोणत्याही सामन्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतानं विजयाची आशा आणि त्यासाठीचे प्रयत्न सोडले नाही.
पाकिस्तान विरोधातील याच स्पर्धेतला सुपर फोर फेरीतला सामना असेल किंवा मग श्रीलंकेविरोधात सुपर ओव्हरमध्ये मिळवलेला विजय असेल. भारतीय संघानं कायम विजयासाठी प्रयत्न केलं.
फायनलचा विचार करता आधी गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीमध्येही भारताचा आत्मविश्वास किती कामी आला ते पाहायला मिळालं.
गोलंदाजी करत असताना पाकिस्तानच्या दोन सलामीवीरांनी पाकिस्तानला 1 बाद 113 अशा चांगल्या स्थितीपर्यंत पोहोचवलं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही.
त्यानंतर पाकिस्तानची एक विकेट गेली आणि संधी मिळताच भारतानं बाजी पलटवली. नंतर पाकिस्तानला 146 धावांमध्ये गारद केलं.
फलंदाजीतही भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. पण तिलक, संजू आणि शिवम यांनी जणू विजय सहज शक्य वाटावा अशी जबाबदारी पार पाडली.
या सर्वातून संघाच्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःवर आणि सहकाऱ्यांवर असलेला आत्मविश्वास पाहायला मिळाला.
भारताची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत चर्चेचा विषय ठरली. विशेषतः कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या भारतीय फिरकीच्या त्रिकुटानं मालिकेत विशेष कामगिरी केली.
कुलदीप यादव तर स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. कुलदीपनं स्पर्धेतील 7 सामन्यांमध्ये 17 विकेट घेत स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज बनला.
पण त्याच्याबरोबर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी केलेल्या गोलंदाजीचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. या दोघांच्या विकेटचे आकडे एवढे मोठे नसले तरीही त्यांनी ज्या पद्धतीनं मधल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत फलंदाजांवर दबाव आणला, त्याला कुलदीपला फायदा झाल्याचं दिसून आलं.
अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजीच्या या त्रिकुटानं केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय फलंदाजांना दबाव न घेता फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
आशिया खंडातल्या एकाही देशाच्या संघातील फलंदाजांना या त्रिकुटानं डोकं वर काढू दिलं नाही.
पाकिस्तानच्या फलंदाजांनीही एक वेळ बुमराच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं. पण भारतीय फिरकीसमोर त्यांना नांगी टाकावी लागल्याचं अगदी स्पष्टपणे जाणवलं.
फायनलमध्ये पाकिस्तानच्या 10 पैकी 8 फलंदाजांना भारतीय फिरकीपटूंनी त्यांच्या जाळ्यात अडकवलं.
भारतानं या संपूर्ण स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अर्शदीप सिंग सारख्या उत्तम गोलंदाजाला बसवून ठेवलं. म्हणजे त्याचा संघात समावेश नव्हता. त्याची बरीच चर्चाही झाली.
पण आठ फलंदाजांसह खेळण्यासाठी भारतानं अगदी जाणीवपूर्वक घेतलेला हा निर्णय होता. सामना जिंकण्यासाठी फलंदाजीतील खोली गरजेची असल्यानं त्यासाठी हा निर्णय होता.
भारतीय संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय या संपूर्ण स्पर्धेत कामी आल्याचंही पाहायला मिळालं. अभिषेक शर्मानं अनेक सामन्यात पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करत फलंदाजांवरचं दडपण कमी केलं.
पण त्याचं कारण म्हणजे आठव्या क्रमांकापर्यंत असलेल्या फलंदाजीनं त्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे होतं, हेही स्पष्ट आहे.
फलंदाजीतली ही खोली आधीच्या काही सामन्यांतही कामी आली. पण प्रामुख्यानं फायनलमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला भारतानं विकेट गमावल्या, त्यावेळी हा निर्णय किती फायद्याचा होता याचा अंदाज आला.
भारताच्या पहिल्या तीन विकेट अगदी लवकर गेल्या. त्यानंतर संजू सॅमसनच्या रुपात चौथी विकेट गेल्यानंतरही शिवम आणि तिलक मैदानावर होते आणि त्यानंतर रिंकू, अक्षर हे यायचे होते.
याचा फायदा म्हणजे फटकेबाजी करण्याची गरज पडली तर विकेटचा फार विचार न करता फलंदाज खेळू शकतात आणि त्यामुळं निर्माण होणारा निश्चिंतपणा भारतीय संघाला कामी आला.
फलंदाजीतल्या या खोलीमुळंच रोहित ज्या पद्धतीनं समोरच्या संघाचं कंबरडं मोडत होता. तेच अभिषेकच्या माध्यमातून होताना दिसलं आणि हेच भारतीय संघाच्या भविष्यातील यशाचं गमकही ठरू शकतं.
रविवारी झालेल्या फायनलसह या संपूर्ण मालिकेत अनेक फलंदाज आणि गोलंदाजांनी भारतासाठी महत्त्वाची अशी कामगिरी केली.
पण शिवम दुबेनं केलेल्या कामगिरीनं अनेकांच्या नजरा नक्कीच उंचावलेल्या असणार यात शंका नाही. विशेषतः फायनलमध्ये ज्या पद्धतीनं शिवमनं त्याला मिळालेली जबाबदारी पार पाडली, त्यानं तो सूर्यकुमारसाठी खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड ठरला.
ऐन फायनलला हार्दिक पांड्या दुखापतीमुळं संघाबाहेर गेल्यानं भारतासमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. कारण हार्दिक पांड्या हा अष्टपैलू म्हणून संघात असला तरी बुमराहशिवाय दुसरा एकमेव फास्ट बॉलर अशी त्याची संघात जबाबदारी होती.
नव्या चेंडूनं गोलंदाजी करत त्यानं अत्यंत उत्तमपणे ती जबाबदारी पार पाडली. पण तो जखमी झाल्यानं फायनलसाठी भारतासमोर प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी अर्शदीपला संधी मिळेल आणि भारत सात फलंदाजांसह खेळेल अशा चर्चा होत्या.
पण भारतीय संघ व्यवस्थापनानं आठ फलंदाज राहावे म्हणून शिवम दुबेला फायनलमध्ये संघात संधी दिली. शिवमनंही गोलंदाजी आणि फलंदाजीतही जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
सुरुवातीच्या दोन ओव्हर त्यानं केल्या. त्यात फक्त 12 धावा दिल्या. तसंच फलंदाजी करताना त्यानं 22 चेंडूत अगदी मोलाच्या 33 धावा करत भारतासाठी विजय खेचून आणण्यात मदत केली.
पाकिस्तान विरोधात झालेल्या 21 सप्टेंबरच्या सामन्यातही त्यानं ऐनवेळी दोन विकेट घेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं शिवमच्या रुपानं आणखी एक चांगला ऑलराऊंडर भारतीय संघाकडं उपलब्ध झाला आहे.
आशिया चषक जिंकण्यासाठी भारतीय संघात खेळणाऱ्या प्रत्येकाचं बरोबरीचं योगदान होतं यात शंका नाही. पण फायनलमध्ये तिलकची 69 धावांची खेळी नसती तर भारताचा विजय शक्य होता का? हा प्रश्न आपसूकच उपस्थित होतो.
भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 20 धावांवर बाद झालेले असताना तिलक फलंदाजीसाठी मैदानावर आला. संजू सॅमसनच्या साथीनं त्यानं आधी अर्धशतकी भागिदारी करत डाव सावरला.
त्यानंतर तिलकनं शिवम दुबेच्या साथीनं विजयी कामगिरी पूर्ण केली. अत्यंत संयमीपणे फलंदाजी करत विकेट सांभाळून तिलक वर्मानं शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि भारताची विजयी पताका फडकावली. त्यानं 53 चेंडूंमध्ये नाबाद 69 धावा केल्या.
हे तर झालं फायनलचं. पण या संपूर्ण मालिकेतही तिलक वर्मानं अत्यंत चांगली फलंदाजी केली आहे. अभिषेक शर्मान केलेल्या तडाखेबाज फलंदाजीनं सगळीकडं त्याचीच चर्चा आहे. त्यानं केलेली कामगिरी सर्वोत्तम आहेच. पण तिलक वर्मानं भारतीय संघासाठी स्पर्धेत दुसरी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
तिलकनं स्पर्धेत 213 धावा केल्या आहे. सर्वाधिक धावांच्या बाबतीत तो भारतीय संघात दुसरा आणि संपूर्ण स्पर्धेत चौथा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे त्यानं 71 च्या सरासरीनं भारतासाठी धावा केल्या आहेत.
त्यामुळं तिलक वर्मा हा आशिया चषक 2025 मध्ये भारतीय संघाच्या विजयाचं एक महत्त्वाचं कारण ठरला. खर्या अर्थानं भारताला हा नवा मॅचविनर मिळाला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.