You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आशिया कप जिंकूनही भारतानं स्वीकारली नाही ट्रॉफी, मोदींकडून सामन्याची तुलना ऑपरेशन सिंदूरशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (29 सप्टेंबर) भारत-पाकिस्तान आशिया कप फायनलची तुलना 'ऑपरेशन सिंदूर'शी केली आणि म्हटलं, "निकाल एकसारखाच होता, भारत जिंकला."
मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "क्रीडा क्षेत्रात ऑपरेशन सिंदूर. निकाल एकसारखाच होता, भारत जिंकला. भारतीय खेळाडूंचे अभिनंदन."
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंस्टाग्रामवर म्हटलं, "एक शानदार विजय. आमच्या खेळाडूंच्या प्रचंड ऊर्जेने पुन्हा एकदा विरोधकांना पराभूत केले आहे."
ते म्हणाले, "मैदान कोणतंही असो भारताचा विजय निश्चित आहे."
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले होते.
पंतप्रधान मोदींच्या या ट्विटला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी प्रत्युत्तर दिलंय.
भारताचा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा याने अंतिम सामन्यात शानदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे भारताला नववे आशिया कप जेतेपद जिंकता आले.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 147 धावांचे लक्ष्य भारताने 19.4 षटकांत साध्य केले.
मोदींच्या ट्विटवर आली पाकिस्तानची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींच्या या ट्विटला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी प्रत्युत्तर दिलंय.
त्यांनी म्हटलंय की, "जर युद्ध हेच तुमच्या अभिमानाचं मोजमाप असेल, तर याआधीच पाकिस्तानकडून झालेल्या अपमानास्पद पराभवांची नोंद इतिहासात आहे. कोणताही क्रिकेटचा सामना हे सत्य नव्याने लिहू शकत नाही. खेळात युद्धाला आणल्यानं केवळ निराशाच उघड होते. यातून खेळाचा आत्मा कलंकित होतो."
भारताने मालिका जिंकली पण ट्रॉफी स्वीकारली नाही
आशिया चषक जिंकला, पण ट्रॉफी मात्र घेतली नाही. रविवारी दुबईत फायनलमध्ये भारताच्या विजयानंतर हे वेगळं नाट्य पाहायला मिळालं.
स्थानिक वेळेनुसार रात्री साडेदहाला सामना संपला, पण पावणेबारापर्यंत सगळे ट्रॉफी प्रेझेंटेशनसाठी वाट पाहात होते.
आधी पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानात येण्यास उशीर केला आणि मग भारतानं मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला, अशी माहिती नंतर मिळाली.
मोहसीन नक्वी हे एशियन क्रिकेट कौंसिलचे चेअरमन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांच्याकडून उपविजेतेपदाची पदकं स्वीकारली, तेव्हा उपस्थित भारतीय चाहत्यांनी खेळाडूंची हुर्यो उडवली.
मग समालोचक सायमन डूल यांनी तिलक वर्मा सामनावीर आणि अभिषेक शर्मा मालिकावीर ठरल्याची घोषणा केली आणि दोघांच्या मुलाखतीही घेतल्या. पण मग सायमन म्हणाले की, 'भारतीय संघ त्यांचे पुरस्कार आज स्वीकारणार नाही असं आशियाई क्रिकेट कौंसिलनं मला कळवलं आहे. त्यामुळे प्रेझेंटेशन इथेच संपते आहे.'
यावेळी आशिया चषकात सलग तिसऱ्या रविवारी भारतानं पाकिस्तानला हरवलं, पण तिन्ही सामन्यांत खेळाडूंनी हँडशेकला नकार दिला. या अख्ख्या स्पर्धेवरच दोन्ही देशांमधल्या अलीकडच्या काळातल्या संघर्षाचं सावट दिसलं आहे.
फायनलनंतरच्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सूर्यकांत यादव म्हणाला, "मला वाटतं, मी क्रिकेट खेळायला लागलो, क्रिकेट पाहायला लागलो, तेव्हापासून मी असं झालेलं कधी पाहिलेलं नाही की, एका टीमनं कष्टानं जिंकलेली ट्रॉफी त्यांना देण्यात आली नाही. मला वाटतं आम्ही या ट्रॉफीसाठी पात्र होतो. मी आणखी काही सांगू शकत नाही. तुम्ही ट्रॉफीविषयी म्हणाल, तर माझ्या ट्रॉफीज ड्रेसिंग रूमध्ये आहेत. माझे 14 सहकारी, सपोर्ट स्टाफ हे या आशिया चषकातल्या खऱ्या ट्रॉफीज आहेत."
पाच विकेट राखून भारताचा विजय
आशिया चषक 2025 च्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच विकेट राखून पराभव केला.
तिलक वर्माच्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळीच्या जोरावर भारतानं हा ऐतिहासिक विजय मिळवला.
भारतानं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत चांगली सुरुवात झाल्यानंतरही पाकिस्तानचा संघ भारतीय फिरकीसमोर ढेपाळल्याचं पाहायला मिळालं.
पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं. त पूर्ण करण्यासाठी भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.
पण तिलक वर्मा आणि संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतानं विजयी कामगिरी पूर्ण केली.
यासह या आशिया चषकातील तिन्ही सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला.
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान चार दशकांनंतर फायनलमध्ये समोरासमोर आले होते. त्यामुळं भारतासाठी हा विजय खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरला.
या सामन्यात भारताकडून हार्दिक दुखापतीमुळं संघाबाहेर गेला होता. तर रिंकू आणि शिवम दुबेचा संघात समावेश करण्यात आला.
संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये होत असलेल्या या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत, पाकिस्तानसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, युएई, हाँगकाँग आणि ओमानचे संघ सहभागी झाले होते.
त्यापैकी भारत आणि पाकिस्ताननं फायनलमध्ये मजल मारली आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत.
भारताची फलंदाजी
पाकिस्ताननं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारताची सुरुवात मात्र चांगली झाली नाही.
संपूर्ण मालिकेत गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या अभिषेकला या सामन्यात यश मिळालं नाही. तो अवघ्या 5 धावा करून स्वस्तात बाद झाला.
त्यानंतर फलंदाजीला आलेला भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवही फक्त 1 रन करून बाद झाला. त्यानंतर शुभमनकडं नजरा लागलेल्या होत्या.
पण फहीमनं त्यालाही बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. त्यामुळं भारताची अवस्था 3 बाद 20 धावा अशी झाली.
त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी केली. पण अबरारनं संजूला बाद करत भारताला चौथा धक्का दिला.
तिलक वर्मानं मात्र त्याची कामगिरी चोखपणे बजावली. त्यानं 41 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अत्यंत महत्त्वाच्या क्षणी त्यानं भारतासाठी चांगली कामगिरी केली.
भारत विजयाच्या जवळ पोहोचला असं वाटताना शिवम दुबे षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी भारताला 10 धावांची गरज होती.
तिलक वर्मानं एक षटकार मारत भारताचं काम सोपं केलं. त्यानंतर मालिकेत एकच चेंडू खेळलेल्या रिंकू सिंहनं चौकार खेचत विजयी कामगिरी पूर्ण केली.
पाकिस्तानची फलंदाजी
साहीबजादा फरहान आणि फखर झमान यांनी पाकिस्तानच्या डावाला सुरुवात केली.
तर भारतानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हार्दिकच्या अनुपस्थितीत शिवम दुबेनं पहिली ओव्हर टाकत भारतासाठी गोलंदाजीला सुरुवात केली.
पण पहिल्या ओव्हरमध्ये अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत शिवमनं कोट्यवधी भारतीयांची धाकधूक कमी केली.
पण पाकिस्तानच्या साहीबजादा फरहाननं काही चांगले फटकेही लगावले.
पण पॉवरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये पाकिस्तानला फक्त 45 धावा करता आल्या. पण त्यांनी विकेट गमावली नाही. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली.
तर भारताच्या दृष्टीकोनातून हार्दिकच्या अनुपस्थितीत शिवम दुबेच्या सुरुवातीच्या दोन ओव्हरचांगल्या जाणं ही सकारात्मक बाब ठरली.
त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी फटकेबाजी सुरू केली. साहीबजादा फरहाननं 35 चेंडूमध्ये अर्धशतकी खेळी केली. त्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
पण त्यानंतर 10 व्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीनं भारताला पहिली विकेट मिळवून दिली. फरहान 57 धावा करून बाद झाला.
पाकिस्तानला 84 धावांवर पहिला धक्का बसला. 12 व्या ओव्हरमध्ये पाकिस्ताननं 100 धावांचा टप्पा ओलांडला.
त्यानंतर 13 व्या ओव्हरमध्ये कुलदीपच्या गोलंदाजीवर बुमरानं सायम अयूबचा उत्तम झेल ङेत भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. त्यानं 11 चेंडूत 14 धावा केल्या.
पुढ्याच ओव्हरमध्ये अक्षरनं मोहम्मद हारिसला बाद केलं. तो शून्यावरच परतला.
त्यानंतर वरुणनं 15 व्या ओव्हरमध्ये सेट झालेला फलंदाज फखर झमानला बाद केलं. त्यानं 35 चेंडूंमध्ये 46 धावा केल्या.
त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये अक्षरनं मैदानावर नुकत्याच आलेल्या तलत हसनला संजू सॅमसनकरवी झेलबाद केलं.
त्यानंतर 17 व्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसननं आणखी एक झेल घेत पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाला परत पाठवलं. कुलदीपनं ही विकेट घेतली.
त्याच ओव्हरमध्ये कुलदीपनं शाहीन शाह आफ्रिदीलाही पायचित करत भारताला सातवी विकेट मिळवून दिली. त्यामुळं पाकिस्तानची स्थिती 7 बाद 134 अशी झाली.
तर त्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरही कुलदीपनं आणखी एक विकेट घेतली. कुलदीपनं फहीमला शून्यावर बाद करत भारतासाठीस आठवी आणि त्याची चौथी विकेट घेतली.
18 व्या ओव्हरमध्ये बुमरानं हारीस राऊफला बोल्ड करत पाकिस्तानला नववा धक्का दिला.
तर 20 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर नवाजला बाद करत पाकिस्तानचा डाव 146 धावांवर गुंडाळला. त्यामुळं भारताला विजयासाठी 147 धावांचं आव्हान मिळालं.
पाकिस्तानला दोनदा केलं पराभूत
या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तानला दोनवेळा पराभूत केलं आहे. साखळी फेरीत झालेल्या सामन्यात अभिषेकच्या फलंदाजीसह कुलदीप यादवने 18 धावा देऊन 3 गडी बाद केले होते.
त्यानंतर सुपर 4 फेरीतील सामन्यात अभिषेक शर्मानं भारतीय संघासाठी दिमाखदार कामगिरी करुन दाखवली होती.
खरं तर टीम इंडियानं या स्पर्धेत पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, यावरून गेले काही दिवस भारतात चर्चा सुरू होती.
दोन्ही देशांमधल्या तणावाच्या सावटाखाली हे दोन्ही सामने झाले. मात्र, त्यात भारतानं एकतर्फी वर्चस्व गाजवलेलं दिसलं.
हस्तांदोलन करणंही टाळलं
पाकिस्तानविरोधातला पहिला सामना जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं हा विजय भारतीय सैनिकांना समर्पित केला होता.
या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं 15 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर विजयी षटकार खेचला.
त्यानंतर तो लगेचच क्रिजवर असलेल्या शिवम दुबेसह थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला होता.
साधारणपणे सामना जिंकल्यानंतर विरोधी संघाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याची परंपरा असते. पण 14 सप्टेंबर रोजी दुबईत झालेल्या सामन्यात ते चित्र पाहायला मिळालं नव्हतं.
पाकिस्तानचा एकही क्रिकेटपटू भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढं आलेला नव्हता.
तसंच भारतीय संघातील इतर क्रिकेटपटूही ड्रेसिंग रूममध्येच थांबले होते. सामना संपल्यानंतर ते मैदानात आले नव्हते.
शिवाय, दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करणंही टाळलं होतं. त्याचीही बरीचशी चर्चा झाली होती.
आशिया चषकात उतरलेले भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही संघ प्रथमच दिग्गजांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरले होते.
पण भारतीय संघानं त्यांची कमतरता जाणवू दिली नाही. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ अधिक आत्मविश्वासानं मैदानात उतरल्याचंही दिसून आलं.
सेलिब्रेशनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित
आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहज पराभव केला होता.
या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हान 6 विकेट राखून अगदी लीलया पूर्ण केलं होतं.
दरम्यान, पहिल्या सामन्यात हात मिळवण्यावरून झालेल्या वादामुळं या सामन्याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. पण या सामन्यातही 'हँडशेक' झालं नसल्याचं पहायला मिळालं.
मात्र, या सामन्यात अर्धशतक ठोकल्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं, त्यावरुन टीकेची झोड उठल्याचं पहायला मिळालं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)