मृतदेहाच्या शेजारी बसून 4 तास विमानप्रवास; विमानात एखाद्याचा मृत्यू झाल्यास काय करायचं असतं?

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही एखाद्या विमानातून प्रवास करत असाल आणि तुमच्या शेजारी मृतदेह असेल तर? असाच काहीसा प्रकार कतार एअरवेजच्या विमानात घडला आहे.
कतार एअरवेजच्या विमानात प्रवास करणाऱ्या एका ऑस्ट्रेलियन जोडप्याला दुसऱ्या प्रवाशाच्या मृतदेहाशेजारी बसून प्रवास करावा लागला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या चॅनल 9 या वाहिनीशी बोलताना त्यांनी हा भयानक अनुभव सांगितला आहे. मिशेल रिंग आणि जेनिफर कॉलिन्स हे दाम्पत्य व्हेनिसला जाण्यासाठी निघालं होतं.
त्यांच्यासाठी हा एक 'ड्रीम हॉलिडे' होता. याच प्रवासादरम्यान मेलबर्नवरून दोहा इथे जात असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला.
या जोडप्याचं असं म्हणणं आहे की, विमानातल्या कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह तिथून बाहेर काढला नाही. त्याऐवजी, त्यावर एक चादर टाकली.
त्यानंतर मिशेल आणि जेनिफर यांना पुढील चार तास मृतदेहासोबत हवाई प्रवास करावा लागला. विमानात दुसऱ्या अनेक सीट रिकाम्या असतानाही विमानातल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बसू दिलं नाही.
कतार एअरवेजने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली असून. त्यांनी या दोन्ही प्रवाशांसोबत आम्ही संपर्क साधत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, मिशेल आणि जेनिफर यांनी कतार एअरवेजने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ज्या पोर्टलवरून ही तिकिटं काढली होती त्या क्वांटास या पोर्टलने देखील त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला नसल्याचं म्हटलं आहे.
मिशेल यांनी चॅनल 9च्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, ती महिला अचानक जागेवर पडली आणि पडल्यानंतर विमानाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना लगेच मदत करण्याचा प्रयत्न केला. पण, दुर्दैवाने त्यांना वाचवता आलं नाही. हे स्वतःच्या डोळ्यांनी बघणं अतिशय विदारक होतं.
मिशेल यांनी सांगितलं की, विमानातील कर्मचारी त्या महिलेचा मृतदेह बिजनेस क्लासकडे नेण्याचा प्रयत्न करत होते. पण ते तसं करू शकले नाहीत. मिशेल रिंग म्हणाले की, त्याचवेळी कर्मचाऱ्यांना दिसलं की मिशेल यांच्या बाजूच्या काही सीट रिकाम्या आहेत.


मिशेल म्हणाले, "तुम्ही थोडं पुढे सरकू शकता का? असं त्यांनी आम्हाला विचारलं. यावर मी एवढंच म्हणाले की, ठीक आहे आमची काही हरकत नाही. त्यानंतर त्यांनी त्या महिलेचा मृतदेह आमच्या सीटवर ठेवला."
दरम्यान, त्यांच्या पत्नी जेनिफर त्यांच्या शेजारील एका सीटवर बसल्या पण मिशेल यांना दुसरी जागा दिली गेली नाही.
मिशेल म्हणाले की, विमानातल्या कर्मचाऱ्यांनी मला तसा कोणताही पर्याय दिला नाही. विमानात आणखीन काही सीट्स रिकाम्या असूनसुद्धा त्यांनी तसं केलं नाही.
चार तासांनी विमान उतरल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला विमानातच बसून राहायला सांगितलं. मग वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिस विमानात आले.
ड्युटी ऑफ केअर
मिशेल आणि जेनिफर म्हणाले की अशा परिस्थितीत विमानात प्रवास करणारे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी 'ड्युटी ऑफ केअर'(मार्गदर्शक तत्वांची सुविधा) असायला हवी.
ते म्हणाले, "विमान कंपनीने आमच्याशी संपर्क करून विचारलं पाहिजे की, आम्हाला कसल्या मदतीची गरज आहे का? तुम्हाला समुपदेशन हवं आहे का?"
आमच्यासाठी हा अनुभव अतिशय दुःखद असल्याचं कोलीन्स म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, "आम्हाला हे समजतं की त्या बिचाऱ्या महिलेच्या मृत्यूसाठी एअरलाइन्सना जबाबदार धरता येणार नाही. परंतु अशा घटनांनंतर, विमानात प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांची काळजी घेण्यासाठी एक प्रोटोकॉल असायला हवा."

फोटो स्रोत, Getty Images
कतार एअरवेजने एअरलाइनमधील महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारे निवेदन जारी केलं आहे. "या घटनेमुळे प्रवाशांना झालेली गैरसोय आणि त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत, आमच्या धोरणांनुसार आणि प्रक्रियेनुसार आम्ही प्रवाशांशी संपर्क साधण्याच्या प्रक्रियेत आहोत," असं कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे.
क्वांटासच्या प्रवक्त्याने सांगितलं, "विमानात अशा प्रकारच्या घटनांचे व्यवस्थापन करण्याचं काम विमानसेवा पुरवणाऱ्या संस्थेचंच असतं. या प्रकरणात, ती कतार एअरवेजची जबाबदारी होती."
विमानप्रवासात होणाऱ्या मृत्यूंबाबत नियम काय सांगतात?
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (IATA) उड्डाणांदरम्यान होणाऱ्या मृत्यूंबाबत एक प्रोटोकॉल तयार केला आहे.
आयएटीएचे नियम :
- एखाद्या व्यक्तीचा विमानात मृत्यू होताच, ताबडतोब कॅप्टनला कळवावं. कारण कंपनीच्या प्रोटोकॉलनुसार त्यांना विमान ज्याठिकाणी उतरणार आहे त्या विमानतळाला त्याची माहिती द्यावी लागते.
- मृत व्यक्तीला कमी प्रवासी असलेल्या सीटवर हलवायला हवं. जर विमान भरलेलं असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या सीटवर परत घेऊन जा. किंवा कर्मचारी त्यांच्या विवेकबुद्धीनुसार, त्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतात मात्र हे करताना बाहेर पडण्याचा दरवाज्याला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
- मृत व्यक्तीला पुढे-मागे हलवताना काळजी घ्या.
- जर तुमच्या विमानामध्ये बॉडी बॅग्ज उपलब्ध असतील तर त्यामध्ये बॉडी ठेवा. बॉडी बॅग फक्त मानेपर्यंत झिप करा.
- व्यक्तीला सीट बेल्ट किंवा इतर उपकरणाने बांधा. जर बॉडी बॅग उपलब्ध नसेल तर डोळे बंद करा आणि शरीर मानेपर्यंत ब्लँकेटने झाका.
- प्रवास कंपनीशी संपर्क साधा आणि प्रवाशाबद्दल माहिती गोळा करा.
- उतरल्यानंतर, प्रथम इतर प्रवाशांना उतरवा आणि कुटुंबातील सदस्य मृतदेहासोबत राहतील याची खात्री करा. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारेपर्यंत आणि ग्राउंड क्रू उपलब्ध होईपर्यंत मृतदेह खाली उतरवू नका.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











