मनाचे श्लोक: वाद आणि विरोधानंतर चित्रपटाचं नाव बदललं, 'या' नावानं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मनाचे श्लोक

मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा मराठी चित्रपट 'मनाचे श्लोक' हा चित्रपट आता 'तू बोल ना' नव्या नावाने प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाला आधीच्या नावावरून बराच विरोध आणि वादाचा सामना करावा लागला होता.

या चित्रपटाचं नाव रामदास स्वामी यांच्या 'मनाचे श्लोक'शी साधर्म्य साधणारं असून चित्रपटाचं नाव बदलून मगच तो प्रदर्शित करा, अशी मागणी करत काही ठिकाणी चित्रपटाचं प्रदर्शन बंद पाडण्यात आलं होतं.

त्यानंतर, चित्रपटाचं नाव बदलून तो पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. आणि आता हा चित्रपट नवीन 'तू बोल ना' या नावाने प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी 'कान चित्रपट महोत्सवा'मध्ये कौतुक झालेला मराठी चित्रपट 'खालिद का शिवाजी'लाही अशाच विरोधाला सामोरं जावं लागलं आहे.

तोदेखील अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाहीये.

एका बाजूला, मराठी चित्रपटसृष्टीला उर्जितावस्था मिळण्याची गरज असताना अशाप्रकारे विरोध होणं कितपत योग्य आहे?

सेन्सॉरकडून संमत झालेले सिनेमे झुंडशाहीने बंद का पाडले जात आहेत? अशी समांतर सत्ताकेंद्रं उभी राहणं कलेसाठी किती धोकादायक आहेत, याचा घेतलेला हा धांडोळा.

नेमकं काय घडलं?

'मनाचे श्लोक' हा मराठी सिनेमा 10 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला.

मात्र, या चित्रपटाच्या शीर्षकाचे समर्थ रामदास स्वामी यांच्या 'मनाचे श्लोक' या ग्रंथाशी साधर्म्य असल्याने आमच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हणत काहींनी या चित्रपटाला विरोध केला.

त्यात प्रामुख्याने श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड तसेच समस्त हिंदू आघाडी यांचा समावेश आहे.

मनाचे श्लोक चित्रपटाच्या टीमनं जाहीर केलेलं निवेदन आणि नवीन नावासह चित्रपटानं नवीन पोस्टर

फोटो स्रोत, Instagram/mrunmayeedeshpande

फोटो कॅप्शन, मनाचे श्लोक चित्रपटाच्या टीमनं जाहीर केलेलं निवेदन आणि नवीन नावासह चित्रपटानं नवीन पोस्टर

श्रीसमर्थ सेवा मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं, "चित्रपटात जर या नावाचा उपयोग मनोरंजनाच्या अथवा काही काल्पनिक कथानकासाठी होत असेल आणि त्या कथेत संतपरंपरेशी विसंगत, अश्लील अथवा विकृत काही दृश्ये, संवाद किंवा सादरीकरण असेल, तर तो सरळ सरळ राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्याचा आणि संत परंपरेचा अवमान ठरेल."

पुढे त्यांनी म्हटलं, "'मनाचे श्लोक' हे नाव त्वरित चित्रपटाच्या शिर्षकातून वगळण्यात यावे. त्याला सुसंगत असे योग्य नाव देण्यात यावे. जेणेकरून कोणाच्याच भावना दुखावणार नाहीत."

सचिन गोस्वामी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खासकरून पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही थिएटर्समध्ये तो प्रदर्शित होऊ दिला नाही.

पुणे भाजपच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीस उज्वला गौड यांच्या नेतृत्वाखाली समस्त हिंदू आघाडीने कोथरूडमधील 'सिटी प्राईड थिएटर'मधील शो आरडाओरडा आणि गदारोळ घालत बंद पाडला. यावेळी सिनेमा थिएटरच्या बाहेर लावण्यात आलेलं पोस्टरही फाडण्यात आलं.

त्यानंतर, चित्रपटाच्या नावाला होत असलेला विरोध पाहता दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे आणि निर्मात्यांनी या चित्रपटाचं नाव बदलून तो 16 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय शनिवारी (11 ऑक्टोबर) घेतला.

आपल्या निवेदनात त्यांनी म्हटलं, "या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून 2 दिवस पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुःखद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत."

आता उज्वला गौड यांच्याविरोधात रविवारी (12 ऑक्टोबर) सरकारी कामात अडथळा आणणं तसेच गोंधळ घालणं या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'कलेसाठी निकोप वातावरण उरलेलं नाही'

यासंदर्भात आम्ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सुप्रसिद्ध कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्याशी चर्चा केली.

अशा घटना घडणं अतिशय दु:खद असून एकूणच सामाजिक स्थिती आपल्याकडे फार काही निकोप राहिलेली नाही, असं ते सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "प्रत्येकवेळी जर असं वेगवेगळ्या वर्गांचं, गटांचं मत लक्षात घेऊन कला सादर करायचं ठरवलं, तर फारच अवघड होईल. त्यासाठी, शासनाने सेन्सॉर बोर्ड ठेवलेला आहे. त्यातल्या 4-5 जणांच्या कमिटीत वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असतात, असं अपेक्षित आहे."

"सेन्सॉर बोर्ड एकूण समाजाच्या सद्यस्थितीचा, सभ्यतेचा सगळा एकूण विचार करून सेन्सॉर सर्टिफिकेट देतात. ज्यावेळी अशी सरकारी मान्यता मिळते, याचा अर्थ त्याचा सगळाच विचार झालेला असतो. अधिकृतपणे तो प्रदर्शित करण्याची परवानगी नकळत शासनाचीही असते. अशावेळी जर असं वेगवेगळ्या गटांचा विचार लादला गेला, तर कलाकृती कशी सादर करायची," असा उद्विग्न प्रश्न सचिन गोस्वामी यांनी विचारला.

सिनेमा थिएटरच्या बाहेर लावण्यात आलेलं पोस्टरही फाडण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Ujwala Sharma Goud

फोटो कॅप्शन, सिनेमा थिएटरच्या बाहेर लावण्यात आलेलं पोस्टरही फाडण्यात आलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे निर्माते आणि राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्यदेखील असाच प्रश्न उपस्थित करतात.

चित्रपट सुरक्षित वातावरणात प्रदर्शित होऊ देण्याची जबाबदारी शासनाची असल्याचं मत ते मांडतात.

बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले, "तुम्ही सेन्सॉरसंमत केल्यानंतरही झुंडगिरी करणार असाल, तर हे कायद्याचं राज्य आहे का? त्याचं पालन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यांनी अशा गोष्टींवर कारवाई केली पाहिजे."

न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर या सगळ्यात लक्ष घालण्याची जबाबदारी शासनाची होती, असं मत सचिन गोस्वामीही व्यक्त करतात.

"प्रत्येक वर्ग आता आपापली मते कलेवर लादू लागला, तर कलावंत आपली कला मोकळेपणाने कशी सादर करणार," असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

नितीन वैद्य म्हणतात, "झुंडशाहीविरोधात कारवाई होत नाही, हा दुर्दैवाचा भाग आहे. दुसऱ्या बाजूला, 'काश्मीर फाईल्स' वा 'केरळ स्टोरी'सारखे द्वेष पसरवणारे सिनेमे आहेत, असे सिनेमेदेखील सेन्सॉरसंमत कसे होतात, हादेखील त्यातला एक भाग आहे. अशा कात्रीमध्ये सध्या भारत अडकलेला आहे."

'नाव न बदलता ठाम भूमिका घ्यायला हवी होती'

या चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेणं हेदेखील चूक असून निर्मात्यांनी ठाम भूमिका घ्यायला हवी होती, असं मत नितीन वैद्य व्यक्त करतात.

ते म्हणतात, "मी स्वत: निर्माता म्हणून आर्थिक नुकसान होण्याचा मुद्दा नक्कीच समजू शकतो. पण, एकदा सेन्सॉरने संमत केल्यानंतर अशी समांतर सत्ताकेंद्रं उभी राहू देणं फारच चुकीचं आहे."

"जे घाबरत आहेत किंवा जे त्या कृतीला पाठिंबा देत आहेत, त्यांना हे लक्षात येत नाहीये की, केव्हातरी हे आपल्याही दारापर्यंत येईल. त्यामुळे, ही भूमिका घेऊन उभं राहण्याची गरज आहे. बंद पाडणं हेही चुकीचं आहे आणि नाव बदलणं हेदेखील चूक आहे."

आता उज्वला गौड यांच्याविरोधात रविवारी (12 ऑक्टोबर) सरकारी कामात अडथळा आणणं तसेच गोंधळ घालणं या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Ujwala Sharma Goud

फोटो कॅप्शन, आता उज्वला गौड यांच्याविरोधात रविवारी (12 ऑक्टोबर) सरकारी कामात अडथळा आणणं तसेच गोंधळ घालणं या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी 'खालिद का शिवाजी' या चित्रपटालाही अशाच घटनाक्रमांना सामोरं जावं लागलं आहे.

त्या चित्रपटावेळी जेव्हा असा विरोध झाला, तेव्हा त्या चित्रपटाच्या बाजूने फारसं कुणी उभं राहिलं नाही, असा टीकात्मक सूरही यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

अभिनेत्री रसिका आगाशे यांनी या मुद्द्यावर फेसबुक पोस्ट करत म्हटलं, "'खालिद का शिवाजी'साठी उभं राहीलं नाही, तर कधीना कधी मनाचे श्लोक बंद होणारच! आपला नंबर येणार नाही, असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्या सगळ्याचा नंबर येणारच आहे. मनाचे श्लोक टीमच्या बरोबर आहोत. पण मित्रांनो नाव बदलून हार मानू नका."

गणेश मतकरी

'खालिद का शिवाजी'लाही झाला होता विरोध

'खालिद का शिवाजी' हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाहीये.

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'मार्शे दु फिल्म' (Marché du Film) या विभागासाठी 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाची निवड झाली होती.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अगदी नावापासूनच काही हिंदुत्ववादी संघटनांनी सिनेमाला विरोध केला आहे.

हिंदू महासंघाने या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू असून त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

आम्ही या चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांच्याशी चर्चा केली.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "खालिद सिनेमाबाबत जे घडलं, तेव्हा कुणी प्रतिक्रिया दिली वा कुणी उभं राहिलं नाही, या सगळ्यात मला पडायचं नाहीये. आता पुन्हा 'मनाचे श्लोक'बाबत तेच घडतंय. खरं तर प्रत्येकवेळी भूमिका घेणं फार गरजेचं आहे. जर नाही घेतली, तर हे असंच घडत राहिल."

"कोणत्याही कलाकृतीबाबतचा निर्णय हा प्रेक्षकांनी घेतला पाहिजे. ती सेन्सॉर झालेली फिल्म आहे. मी त्या सिनेमाला पाठिंबा देतो," असं ते सांगतात.

'खालिद का शिवाजी' हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाहीये.

फोटो स्रोत, RajMore

फोटो कॅप्शन, 'खालिद का शिवाजी' हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाहीये.

सध्या हा सिनेमा सेन्सॉर बोर्डसोबत चर्चा करत असून तो लवकरच प्रदर्शित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

'मनाचे श्लोक' या चित्रपटाचं नाव आता बदलण्यात येणार आहे. काही जण या सिनेमाचं नाव बदलून एकप्रकारे झुंडशाहीला मूक समर्थन देऊ नका, अशीही मागणी करत आहेत.

मात्र, शीर्षक बदलण्याबद्दल सिने समीक्षक गणेश मतकरी म्हणतात, "नाव बदललं जाऊ नये, ही भूमिका तात्त्विकदृष्ट्या बरोबर आहे. पण, शेवटी हा व्यावसायिक सिनेमा आहे. त्यात पैसे गुंतलेले आहेत."

"असा सिनेमा लावत राहून, रोज त्यावर भांडणं-निषेध सहन करून प्रेक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे का? त्यामुळे नाईलाजाने असा निर्णय घेतला जातो. ते टाळायचं तर राजकीय पक्ष, कायदा, सेन्सॅार, चित्रपटसृष्टी या सर्वांच्या मदतीने संघटित विरोध आवश्यक होता. एकटादुकटा निर्माता काय करणार?"

नितीन वैद्य

पुढे ते म्हणतात, "चित्रपटाचं शीर्षक हे त्यातल्या नायक-नायिका यांची श्लोक आणि मनवा ही नावं आणि श्लोकचा आपल्या मनाशी चाललेला आंतरिक संवाद यांची सांगड घालून तयार केलंय. 'मनाचे श्लोक' हे परिचित शीर्षक त्यासाठी वापरलंय. पण त्यात कुठेही रामदास स्वामी, वा त्यांचे मनाचे श्लोक याबद्दल अवमानकारक शब्द नाही."

"आपले संत वा संस्कृती याबद्दल टीका नाही. चित्रपट पाहिला, तरीही हे लक्षात येईल. तसं खरोखर असतं, तर त्याला सेन्सॅारनेही संमती दिली नसती. एकदा सेन्सॅारसंमत झाल्यावर प्रदर्शन थांबवण्यासाठी बाह्यबळाचा वापर करणं गैर आहे. व्यक्तीगतरित्या चित्रपट पटला नाही, तर त्याबद्दल मत व्यक्त करावं, लेख लिहावेत, सोशल मीडियात बोलावं. पण त्यापलीकडे नाही."

जे झुंडशाहीसमोर ताठ मानेनं उभं राहतात तेच इतिहासात टिकून राहतात, असं मत नितीन वैद्य व्यक्त करतात. यासाठी ते चार्ली चॅप्लीन आणि त्याच्या 'द ग्रेट डिक्टेटर' या सिनेमाचंही उदाहरण देतात.

ते म्हणतात, "आपण क्रिएटीव्हीटीच्या क्षेत्रामध्ये आहोत, याचा अर्थ आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणूनच आपण या क्षेत्रात आहोत. झुंडशाहीची कुठलीही सत्ता असो, त्यासमोर उभं राहण्याचीच गरज आहे आणि जे असं उभं राहतात, तेच इतिहासात टिकून राहिलेले आहेत."

'असं घडणं अतिशय दुर्दैवी'

आम्ही 'मनाचे श्लोक' या सिनेमाचे निर्माते संजय दावरा यांच्याशीही चर्चा केली.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "ज्या काही घटना घडल्या त्याचं आम्हाला अत्यंत दु:ख आहे आणि असं घडणं अतिशय दुर्दैवी आहे."

"आम्ही अतिशय कष्टानं, प्रेमानं एक कलाकृती म्हणून तो चित्रपट मेहनतीनं साकार केलाय. तो लोकांपर्यंत पोहोचावा, त्याचं चीज व्हावं, लोकांनी त्याचं परिक्षण करावं, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी जे जे करता येईल, ते आम्ही करतो आहोत. सध्या सिनेमाचं नाव बदलण्याची तांत्रिक प्रक्रिया आम्ही करतो आहोत," अशी माहिती संजय दावरा यांनी दिली.

सिनेमाच्या नावावरून असा विरोध होईल, असं तुम्हाला वाटलं होतं का, या प्रश्नावर ते म्हणाले, "असं स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. त्याचा काही संदर्भच नव्हता आणि त्याची काही शक्यताही नव्हती. अगदी स्वप्नात देखील तसं वाटलं नव्हतं. एक चांगला रॉमकॉम पारिवारिक सिनेमा जो निखळ करमणूक करतो, तो लोकांपर्यंत पोहोचावा, अशी आमची इच्छा होती. हे अगदी रिलीजच्या 2-3 दिवस आधी सुरू झालं."

हिंदू महासंघाने 'खालिद का शिवाजी' या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू असून त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

फोटो स्रोत, Raj More

फोटो कॅप्शन, हिंदू महासंघाने 'खालिद का शिवाजी' या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू असून त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सचिन गोस्वामी म्हणतात, "गेले 4-5 महिने या चित्रपटाचं प्रमोशन सुरू आहे. एखाद्याला एखाद्या गोष्टीवर आक्षेप असायला काहीच हरकत नाही. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देण्याची वा प्रतिवाद करण्याची जी संवैधानिक पद्धत आहे, त्या पद्धतीने तुम्ही करूच शकता."

"गेल्या 4-5 महिन्यांपासून प्रोसेस सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे की, तुमचा आक्षेप असलेलं नाव या चित्रपटाला देण्यात आलंय, तर त्या संबंधित संस्थांनी त्या निर्मात्यांशी आधी बोलायला हवं होतं. अगदी निर्मात्यांनी जुमानलं नाही, तर न्यायालयंही आहेत. न्यायालयात एक संस्था गेलीही होती आणि न्यायालयाने परवानगीही दिली होती. म्हणजे आपण संविधान आणि न्यायालयाला मानणार आहोत की नाही, असा प्रश्न निर्माण होतो," असा मुद्दा सचिन गोस्वामी उपस्थित करतात.

सध्याच्या मराठी सिनेमाच्या परिस्थितीबद्दल गणेश मतकरी म्हणतात, "मराठी सिनेमाची परिस्थिती आज फार उत्साहवर्धक नाहीये. प्रेक्षक मोजके आहेत, थिएटरमध्ये हवे तितके स्क्रीन मिळत नाहीत. त्यात पुन्हा मेहनतीने केलेला सिनेमा बंद पडणं म्हणजे कलाकारांना नाउमेद करण्यासारखं आहे. हे अत्यंत क्लेषकारक आहे. याला दडपशाहीच म्हणावी लागेल."

नितीन वैद्यही मराठी सिनेमाच्या अवस्थेबाबत चिंता व्यक्त करतात. "सध्या मराठी सिनेमाला रेव्हेन्यूही येत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. अक्षरश: तो बंदच झालेला आहे. अशात अशा गोष्टी घडण्यामुळे मराठी सिनेमा आणि संस्कृती दोन्हीही धोक्यात जाणार आहे, हे या झुंडींच्या लक्षात येत नाहीये," असं मत ते व्यक्त करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)