सुनीता विल्यम्ससह चारही अंतराळवीर परतले पृथ्वीवर; कसा होता परतीच्या प्रवासाचा थरार?

फोटो स्रोत, NASA
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत.
हे दोघेही तब्बल 9 महिने अंतराळात अडकून पडले होते.
'ड्रॅगन' या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून आणखी चार अंतराळवीर त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते.
खरंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती.
तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले होते.
सरतेशेवटी, आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले आहेत.
कसा झाला परतीचा प्रवास?
खरं तर कोणतीही अंतराळ मोहिम ही जोखमीची असते. त्यात अंतराळात अडकून पडल्यानंतर या दोन अंतराळवीरांबद्दल काळजी वाटणं अगदीच स्वाभाविक होतं. संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलेलं होतं.
सर्व प्रकारचे अडथळे दूर करत तब्बल नऊ महिन्यांनंतर त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स 'ड्रॅगन फ्रीडम'च्या लँडिंगसाठी समुद्रातल्या 8 लँडिग साईट्स ठरवण्यात आल्या होत्या.
फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅश डाऊन होता. 6 वर्षं फ्लोरिडाच्या समुद्रात स्प्लॅश डाऊन - रिकव्हरी केल्यानंतर पुढच्या मोहीम अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या समुद्रात स्प्लॅश होतील. टॅलाहासी हा निवडलेला लँडिंग झोन होता, कारण इथलं हवामान रिकव्हरीसाठी योग्य होतं.
पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूल भोवतीचं बाहेरचं तापमान वाढत असताना PICA 3.0 हीटशील्डने ड्रॅगन फ्रीडमला संरक्षण दिलं.
दरम्यानच्या काळात अंतराळवीरांनी घातलेल्या स्पेससूट्समधून थंड हवा खेळवली गेली, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान कमी राहायला मदत होते. ड्रॅगन फ्रीडमला सोसावं लागणारं सर्वोच्च तापमान 1926.667 सेल्शियस म्हणजे 3500 फॅरनहाईट् इतकं होतं.


फ्रीडम कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूलसोबतचा संपर्क काही मिनिटांसाठी तुटला. हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो. काही काळाने हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला.
वातावरणात शिरण्यापूर्वी क्रू ने खिडकीच्या झडपा बंद केल्या, त्यांच्या हातातले टॅब्लेट्स आणि इतर गोष्टी ठेवून दिल्या आणि हार्नेस घट्ट केली.
ड्रॅगन हे ऑटॉमॅटिक मोडवर प्रवास करत होतं. म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं. क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होता.
WB57 हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्यं दिसत होती.
ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली. याने कॅप्सूलचा वेग कमी झाला. पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल 18000 फुटांवर आल्यावर उघडलं. तर दुसरी मुख्य जोडी 6500 फुटांवर उघडली. यानंतर चार पॅराशूट्सच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आलं.
भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला.
'क्रू नाईन बॅक ऑन अर्थ... वेलकम होम'
अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास हा सुमारे 17 तासांचा होता.
"क्रू नाईन बॅक ऑन अर्थ... वेलकम होम" अशी घोषणा ग्राऊंड कंट्रोलने करत अंतराळवीरांचं स्वागत केलं.
ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली. असं केल्याने पॅराशूट्सोबत कॅप्सूल प्रवाहात ओढली जात नाही.
रिकव्हरी क्रू ड्रॅगन फ्रीडम पर्यंत पोहोचे पर्यंत ग्राऊंड कंट्रोल आणि कॅप्सूलमधल्या अंतराळवीरांमध्ये संवाद सुरू होता. मुख्य रिकव्हरी टीम्सना इथे पोहोचेपर्यंत 30 मिनिटांचा काळ लागला.
त्याआधी फास्ट बोट्स इथे पोहोचल्या त्यांनी समुद्रात पडलेली पॅराशूट्स गोळा केली. शिवाय समुद्रात तरंगणाऱ्या कॅप्सूलचे काही सेफ्टी चेक्सही करण्यात आले. पुढच्या रिकव्हरी टीमला स्पेसक्राफ्टपर्यंत येणं सोपं आहे का, हे तपासण्यात आलं.
त्यानंतर स्पेसएक्सच्या फ्लाईट सर्जननी कॅप्सूलमधल्या अंतराळवीरांशी संवाद साधला. अंतराळवीरांच्या तब्येतीबद्दल जाणून घेण्यात आलं.

फोटो स्रोत, NASA
मुख्य रिकव्हरी टीम येईपर्यंत आधी पोहोचलेल्या टीमने समुद्रातल्या तरंगणाऱ्या कॅप्सूलला उघडण्यासाठीची आणि ही कॅप्सूल उचलण्यासाठीची तयारी केली.
या तरंगणाऱ्या कॅप्सूलच्या आजूबाजूला डॉल्फिन्सही दरम्यानच्या काळात पहायला मिळाले.
मेगन नावाच्या रिकव्हरी जहाजाला ही कॅप्सूल जोडण्यात आली. नासाच्या अंतराळवीर मेगन आर्थर यांच्यावरून या जहाजाला हे नाव देण्यात आलंय. जवळ ओढल्यानंतर ही कॅप्सूल उचलून जहाजाच्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आली.
स्पेसक्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्याने या पत्र्याची झीज होते. म्हणूनच कॅप्सूलवर गोडं पाणी मारून समुद्राचं पाणी काढलं जातं.
यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा 'साईड हॅच' उघडण्यात आला. पृथ्वीवरून उड्डाण करताना आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा वापर केला जातो.

फोटो स्रोत, NASA
हॅच उघडल्यानंतर वैदयकीय टीमपैकी एकजण कॅप्सूलमध्ये गेला. तर रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूलमधून बाहेर येणारा रॅम्प बसवला.
ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये मधल्या दोन सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आलं. सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर निक हेग यांना बाहेर काढलं गेलं. त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बोनॉव्ह, नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कॅप्सूल बाहेर काढण्यात आलं.
क्रूला कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांना स्ट्रेचरवर ठेवलं गेलं. हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग आहे. रिकव्हरी टीम्समध्ये डॉक्टर्सचाही समावेश असतो. हे डॉक्टर्स पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीराच्या तब्येतीची प्राथमिक तपासणी करतात. दीर्घकाळ अंतराळात घालवून पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठीची आणि त्यानंतरची प्रक्रिया ठरलेली असते.
ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उचलून क्रूला बाहेर करण्यासाठी साधारण तासाभराचा काळ लागला. मेडिकल चेकअप नंतर चार तासांत क्रू जमिनीवर परतेल. आणि अधिकची वैद्यकीय मदत लागली नाही तर क्रू नासाच्या विमानाने ह्यूस्टनला जाईल आणि हे अंतराळवीर कुटुंबीयांना - मित्रमंडळींना भेटतील.
'परतलेले अंतराळवीर सुखरूप'
"परतलेले अंतराळवीर सुखरूप आहेत," अशी माहिती नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टीच यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, परतलेले सर्व अंतराळवीर ह्यूस्टनला परतण्याआधी रिकव्हरी शीपमध्ये थोडा वेळ विश्रांतीमध्ये घालवतील.
पुढे त्यांनी या चारही अंतराळवीरांच्या टीमनं 'अष्टपैलुपत्व' दाखवल्याचं अधोरेखित करत त्यांचं कौतुकही केलं. त्यासोबतच, नासाच्या सर्व गरजांना ओळखून त्याबरहुकूम जुळवून घेतल्याबद्दल त्यांनी 'स्पेसएक्स'चे आभारही मानले.
"अंतराळवीरांचं वैद्यकीय परिक्षण केलं जाईल. त्यानंतर म्हणजेच साधारण आणखी एका दिवसानंतर ते आपल्या कुटुबीयांना भेटू शकतील. अंतराळात त्यांनी घालवलेल्या काळाबद्दलचा ते तपशील देतील, तसेच त्यांना काही वेळ विश्रांतीसाठी मिळेल", असंही त्यांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











