अंतराळ प्रवासाचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो?

अंतराळवीर

फोटो स्रोत, NASA

अंतराळातून परतल्यानंतर अंतराळवीर अॅनिमिक का होतात? म्हणजेच त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता का निर्माण होते? याबाबत शास्त्रज्ञांना माहिती मिळाली आहे.

कॅनडाच्या संशोधकांच्या मते, अंतराळात शरीरातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त तांबड्या पेशी नष्ट होतात आणि मिशन सुरू राहीपर्यंत तसं होत राहतं.

यामुळं, चंद्र मंगळ किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावरील अंतराळ यात्रा करणं हे एक मोठं आव्हान असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात.

पण, त्यांच्या या संशोधनामुळं पृथ्वीवर अशाप्रकारच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा फायदा होऊ शकतो.

अंतराळात गेल्याने रक्ताची कमतरता म्हणजेच 'स्पेस अॅनिमिया' होण्याबाबत शास्त्रज्ञ अंतराळातून पृथ्वीवर परतल्याच्या पहिल्या अभियानापासून माहिती आहे. मात्र, त्यामागचं कारण हे आतापर्यंत गूढ होतं.

संपूर्ण मिशनदरम्यान नष्ट झाल्या पेशी

14 अंतराळवीरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात युनिव्हर्सिटी ऑफ ओटावाच्या संशोधकांना याबाबत माहिती मिळाली आहे.

ज्या अंतराळवीरांचा अभ्यासात समावेश करण्यात आला होता, त्या ब्रिटनच्या टिम पेक यांचाही समावेश होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर सहा महिने घालवले आहेत, तसंच अंतराळात विविध विषयांवर संशोधनही केलं आहे.

लाल रक्तपेशी

फोटो स्रोत, Jonathan Kitchen

या मोहीमेदरम्यान, अंतराळवीरांच्या रक्त आणि श्वासोच्छवास याचे नमुने घेण्यात आले. शरीरात कमी झालेल्या तांबड्या पेशींची संख्या मोजण्यासाठी असं करण्यात आलं.

या पेशी फुफ्फुसांपासून संपूर्ण शरिरापर्यंत ऑक्सिजन पुरवतात आणि जीवनासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे.

या अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि हॉस्पिटल फिजिशियन डॉक्टर गाय ट्रूडल यांनी सांगितलं की, अंतराळात पोहोचल्यानंतर लाल रक्तपेशी नष्ट होत आहेत, हे आमच्या लक्षात आलं. संपूर्ण मिशन दरम्यान ते सुरुच होतं."

मात्र, अंतराळात वजन जाणवत नाही त्यामुळं ही फार मोठी समस्या नाही. पण पृथ्वीवर परत आल्यानंतर, यामुळं या अंतराळवीरांना अशक्तपणा आणि थकवा याची जाणीव होते. त्यामुळं त्यांच्या स्नायूंची शक्तीही कमी होते.

अंतराळात दर सेकंदाला शरीरातून 30 लाख तांबड्या पेशी नष्ट होतात. तर जमिनीवर केवळ 2 लाख पेशीच नष्ट होतात. मात्र, शरीर पुन्हा त्याची भरपाई करतं. तसं झालं नाही तर अंतराळ प्रवासी अंतराळात गंभीर आजारी पडतात.

पण, शरीर सलग कितीकाळ या पेशींची कमतरता भरून काढण्यात सक्षम असतं, याबाबत संशोधक ठाम नाहीत. विशेषतः अंतराळवीर जर दीर्घकाळ मोठ्या मिशनवर असतील तर ही बाब चिंतेची ठरते.

महिला आणि पुरुषांवर सारखाच परिणाम

अभ्यासानुसार अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतरही ही समस्या दूर झाली नाही. एका वर्षाच्या नंतरही त्यांच्या शरीरातील तांबड्या पेशी वेगानं नष्ट होत होत्या.

पण तसं असलं तरी त्यांचं शरीर व्यवस्थित काम करत आहे. महिला आणि पुरुष दोघांवरही अंतराळात याचा सारखाच परिणाम झाला.

अंतराळवीर

फोटो स्रोत, Alamy

"अॅनिमिया म्हणजे खरंच काय असतो हे आपण शोधू शकलो तर तो ठिक करण्याचा किंवा थांबवण्याचा उपाय शोधता येऊ शकतो. त्यामुळं अंतराळवीरांना आणि पृथ्वीवरील रुग्णांनाही याचा फायदा होऊ शकतो," असं डॉक्टर ट्रूडल म्हणाले.

डॉक्टर ट्रूडल यांच्या मते, अंतराळ प्रवासात झालेला अॅनिमिया हा कोव्हीडच्या आजारामुळं आयसीयूमध्ये अनेक महिने राहिलेल्या रुग्णाच्या अनुभवासारखा असतो. या दरम्यान त्यांचं शरिर निष्क्रीय होतं.

अॅनिमिया त्यांच्या व्यायाम करण्यापासून आणि ठिक होण्यापासूनही रोखतो. हे तंत्र भविष्यातील अभ्यासात कसं काम करतं, यावर आता अभ्यासकांची टीम संशोधन करणार आहे.

हे संशोधन नेचर मेडिसीनमध्ये प्रकाशित झालं आहे. त्यांच्या परिणामांच्या नुसार जास्त अंतरावरील अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्यांनी डाएटमध्ये जास्त प्रमाणात आयर्न सेवन करावं, तसंच उर्जेसाठी जास्त कॅलरीज घ्याव्यात.

संशोधकांच्या मते, अंतराळ प्रवासापूर्वी अंतराळ प्रवाशांच्या रक्त आणि आरोग्यावरील अॅनिमियाच्या परिणामांची चौकशी करणंही गरजेचं ठरू शकतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)