कोणाचा पाय, कोणाची पाठ, कोणाचा खांदा- इंज्युअरी लीगची गोष्ट

आयपीएलच्या 16व्या हंगामाला प्रत्येक संघाला दुखापतींनी सतवलं आहे. बहुतांशी संघांना आपापल्या डावपेचांमध्ये बदलही करावे लागले आहेत. दोन महिने चालणाऱ्या स्पर्धेमुळे खेळाडूंना फिट ठेवणं हे सपोर्ट स्टाफपुढचं आव्हानच आहे. दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेलेल्या खेळाडूंची संख्या वाढते आहे. दुखापतीमुळे अनेक खेळाडू निम्मा हंगाम खेळू शकणार नाहीयेत. काही खेळाडू किरकोळ दुखापती घेऊनच खेळत आहेत. दुखापतींचं ग्रहण लागल्यामुळे 'इंज्युअर्ड लीग' होताना दिसते आहे.

लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार के.एल.राहुल आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत दुखापतग्रस्त झाले आहेत. बंगळुरूविरुद्ध फलंदाजी सुरु असताना दुसऱ्याच षटकात डू प्लेसिसने स्टॉइनसचा चेंडू तटवून काढला. चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने जात होता.

धावता धावता लखनौचा कर्णधार राहुलच्या पायाला दुखापत झाली. तातडीने फिजिओ मैदानात आले. राहुल वेदनेने कळवळत होता. राहुलला फिजिओ आणि सहकाऱ्यांच्या साथीने बाहेर नेण्यात आलं. त्याच्यावर उपचार करण्यात आले. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ अडचणीत सापडल्याने राहुल अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. राहुलला चालताना वेदना होत असल्याचं दिसत होतं.

राहुल लखनौचा पराभव टाळू शकला नाही. त्याच्या दुखापतीचं स्वरुप कसं आहे याबाबत लखनौने अद्याप पत्रक जारी केलेलं नाही.

आयपीएल स्पर्धेनंतर इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. राहुलची भारतीय संघात निवड झाली आहे.

लखनौचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला. सरावाच्या वेळी जाळीचा काही भाग बाहेर आला होता.

डावखुरा जयदेव रनअपमध्ये असताना त्याचा पाय जाळीत अडकला आणि तो कोसळला. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारांसाठी त्याला मुंबईला पाठवण्यात आलं आहे.

केन विल्यमसन- गुजरात टायटन्स

न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यसमनने शुक्रवारी गुजरात टायटन्ससाठी पदार्पण केलं. याआधी केन सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार होता. हैदराबाद संघाचा आधारस्तंभ असलेल्या केनला रिलीज करण्याचा संघव्यवस्थापनाने निर्णय घेतला.

टायटन्स संघाने केनसारख्या मोठ्या खेळाडूचं महत्त्व ओळखून लिलावात त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. तंत्रशुद्ध फलंदाज, अफलातून क्षेत्ररक्षक, नेतृत्वाचा अनुभव यामुळे केन संघात असणं टायटन्स संघासाठी मोलाचं होतं. त्यानुसार पहिल्या लढतीत टायटन्स संघाने केनला पदार्पणाची संधी दिली. मात्र क्षेत्ररक्षण करताना केनला दुखापत झाली.

13व्या षटकात चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने मारलेला फटका सीमारेषेच्या दिशेने गेला. केनने जवळपास झेल टिपला होता. पण शरीर सीमारेषेच्या बाहेर जात असल्याचं लक्षात आल्यावर केनने चेंडू आत टाकला. यामुळे दोन धावा वाचल्या. पण याप्रयत्नात केनच्या शरीराचा भार विचित्र पद्धतीने पायावर आला. पडतानाच केनने वेदनने गुडघ्याला हात लावल्याचं दिसलं. केनला चालणंही अवघड झालं होतं.

सीमारेषेनजीक त्याच्यावर उपचार झाले. फिजिओ आणि सहकाऱ्यांच्या साथीने केन पॅव्हेलियनमध्ये परतला. रिप्लेमधूनच केनच्या दुखापतीचं गंभीर स्वरुप स्पष्ट झालं. रविवारी गुजरात टायटन्स संघाने केन स्पर्धेबाहेर गेल्याचं जाहीर केलं.

केनसारखा मोठा खेळाडू सलामीच्या लढतीत दुखापतग्रस्त होणं दुर्देवी असल्याचं टायटन्सचे संचालक विक्रम सोळंकी यांनी सांगितलं. दरम्यान केनच्या ऐवजी बदली खेळाडूची घोषणा टायटन्स संघाने केलेली नाही.

जसप्रीत बुमराह- मुंबई इंडियन्स

भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह पाठीच्या गंभीर दुखण्यामुळे प्रदीर्घ काळ मैदानापासून लांब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही तो खेळू शकला नाही. जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही तो खेळण्याची शक्यता कमी आहे. लिलावात मुंबईने जसप्रीत बुमराहाला साथ द्यायला म्हणून जोफ्रा आर्चरला घेतलं होतं. गेल्या हंगामात दुखापतीमुळे आर्चर खेळू शकला नव्हता तर यंदा बुमराह खेळणार नाहीये. बुमराह नसल्यामुळे मुंबईचं आक्रमण कमकुवत झालं आहे. कर्णधार रोहित शर्मासाठी डोकेदुखी वाढली आहे. बुमराहऐवजी मुंबई इंडियन्सने संदीप वॉरियला संघात समाविष्ट केलं आहे.

कायले जेमिसन- चेन्नई सुपर किंग्स

उंचपुरा बॉलिंग ऑलराऊंडर संघात असणं संघासाठी जमेची बाजू. या विचारातूनच चेन्नईने कायले जेमिसनला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. पण कायले प्रदीर्घ काळापासून बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरने त्रस्त होता. या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे त्याने माघार घेतली आहे. जेमिसनच्या ऐवजी चेन्नई दक्षिण आफ्रिकेच्या सिसांदा मगालाला संघात समाविष्ट केलं आहे.

मुकेश चौधरी-चेन्नई सुपर किंग्स

गेल्या हंगामात मुख्य गोलंदाज दीपक चहर दुखापतग्रस्त झालेला असताना डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने समर्थपणे धुरा सांभाळली होती. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्रसाठी खेळणाऱ्या मुकेशने पॉवरप्ले आणि हाणामारीच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. पाठीच्या दुखण्यामुळे मुकेश यंदाच्या हंगामात काही सामने खेळू शकणार नाही अशी चर्चा होती पण दुखापत गंभीर असल्याने मुकेश संपूर्ण स्पर्धेतच खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. चेन्नईने त्याच्याऐवजी आकाश सिंगला संघात घेतलं आहे.

ऋषभ पंत- दिल्ली कॅपिटल्स

गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी दिल्ली-डेहराडून हायवेवर ऋषभ पंतच्या गाडीचा अपघात झाला होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध झालेली अपघाताची दृश्यं थरकाप उडवणारी होती. गाडीतील सुरक्षात्मक यंत्रणा तसंच वेळेवर मिळालेली मदत यामुळे ऋषभवर योग्यवेळी उपचार झाले. सुदैवाने ऋषभला मोठी दुखापत झाली नाही पण त्याच्या डोक्याला, पायाला लागलं होतं. कपाळालाही जखमा झाल्या होत्या. मनगटालाही फटका बसला होता.

सुरुवातीला डेहराडून इथे झालेल्या उपचारानंतर ऋषभला मुंबईला नेण्यात आलं. तिथे उपचार झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं. भीषण अशा अपघातातून ऋषभ वाचला हे खरोखरंच सुदैव पण यातून सावरत मैदानावर उतरण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात तो खेळू शकणार नाही.

ऋषभ कॅपिटल्स संघाचा कर्णधार, मुख्य फलंदाजांपैकी एक आणि विकेटकीपर असल्यामुळे त्यांचं तिहेरी नुकसान झालं. ऋषभच्या अनुपस्थितीत दिल्लीने डेव्हिड वॉर्नरकडे नेतृत्व सोपवलं आहे. पंतऐवजी सर्फराझ खान विकेटकीपिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. राखीव विकेटकीपर म्हणून दिल्लीने अभिषेक पोरेलला संघात समाविष्ट केलं आहे.

श्रेयस अय्यर- कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्स संघाला लिलावात कर्णधाराची आवश्यकता होता. कारण आयोन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक आता त्यांच्याकडे नव्हते. यामुळेच त्यांनी श्रेयस अय्यरसाठी खजिना रिता केला. श्रेयसने दिल्ली कॅपिटल्ससाठी संघाची मोट बांधली होती. कोलकातासाठीही तशीच अपेक्षा होती. मात्र पाठीच्या दुखण्यामुळे श्रेयस पहिले काही सामने तरी खेळू शकणार नाही असं सांगितलं जात आहे. हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात श्रेयस परतेल असा विश्वास संघव्यवस्थापनाला आहे. दरम्यान श्रेयसऐवजी कोलकाताने नितीश राणाकडे कर्णधारपद सोपवलं आहे.

मोहसीन खान- लखनौ सुपर जायंट्स

लखनौ सुपरजायंट्स संघाने पहिल्याच हंगामात दिमाखदार कामगिरी केली होती. यामध्ये एक नाव अग्रणी होतं. ते म्हणजे डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान. मोहसीनने आपल्या खेळाने सगळ्यांना दखल घ्यायला भाग पाडलं होतं. यंदा मात्र मोहसीन किती खेळेल याविषयी साशंकता आहे. तो खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे.

झाय रिचर्डसन- मुंबई इंडियन्स

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनही यंदा मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे अख्ख्या हंगामातच खेळू शकणार नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजीसाठी रिचर्डसन प्रसिद्ध आहे. बुमराह-रिचर्डसन-आर्चर हे त्रिकुट फिट असतं तर मुंबई इंडियन्सला प्रचंड फायदा झाला असता. पण बुमराह-रिचर्डसन नसल्याने मुंबई इंडियन्स संघाला गोलंदाजीचे डावपेच बदलावे लागणार आहेत.

जॉनी बेअरस्टो- पंजाब किंग्ज

गोल्फ खेळताना झालेल्या दुखापतीमुळे बेअरस्टो प्रदीर्घ काळ मैदानापासून लांबच आहे. पंजाब संघासाठी बेअरस्टो अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. धडाकेबाज फलंदाजी ही बेअरस्टोची ओळख आहे. याबरोबरीने बेअरस्टो विकेटकीपिंगही करतो. मात्र पायाच्या दुखापतीतून न सावरल्यामुळे बेअरस्टो हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. पंजाब संघाने बेअरस्टोऐवजी मॅथ्यू शॉर्टला संघात समाविष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत यंदाच्या हंगामात शॉर्टने सर्वाधिक धावा केल्या आहेत.

प्रसिध कृष्णा- राजस्थान रॉयल्स

उंचपुरा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा राजस्थान रॉयल्स संघाच्या योजनांचा प्रमुख भाग आहे. पण लंबार स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे कृष्णा अख्खा हंगामाच खेळू शकणार नाहीये. कृष्णाऐवजी रॉयल्सने संदीप शर्माचा संघात समावेश केला आहे. आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आणि विकेट्स पटकावण्यात वाकबगार संदीपसाठी ही उत्तम संधी आहे.

विल जॅक्स- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

3.2 कोटी रुपये खर्चून बेंगळुरूने इंग्लंडच्या विल जॅक्सला संघात समाविष्ट केलं होतं. मात्र बांगलादेश दौऱ्यात जॅक्सला दुखापत झाली. मसल इंज्युरीवर उपचारही झाले. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जॅक्सने हंगामातून माघार घेतली आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने इथे खेळण्याचा अनुभव जॅक्ससाठी उपयुक्त ठरला असता पण दुखापतीने ती संधी हिरावून घेतली आहे. जॅक्सऐवजी बेंगळुरूने न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलला संधी दिली आहे. ब्रेसवेलची आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. जोरदार फटकेबाजी, उपयुक्त फिरकीपटू आणि अफलातून क्षेत्ररक्षक असलेला ब्रेसवेल जॅक्सची उणीव भरुन काढू शकतो.

रजत पाटीदार- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

टाचेला झालेल्या दुखापतीमुळे रजत पाटीदार यंदाच्या हंगामात पहिले काही सामने खेळू शकणार नाहीये. पाटीदार सध्या बेंगळुरू इथल्याच नॅशनल क्रिकेट अकादमीत आहे. गेल्या वर्षी रजतने प्लेऑफमध्ये बेंगळुरूसाठी खेळताना शतकी खेळी साकारली होती.

जोश हेझलवूड- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हेझलवूड दुखापतीमुळे निम्मा हंगाम खेळू शकणार नाही. तूर्तास हेझलवूड ऑस्ट्रेलियातच आहे. हेझलवूड नसल्यामुळे बेंगळुरूचं आक्रमण कमकुवत झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)