आरोग्य : लहान बाळांना जीवदान देणारा हा रक्तगट कोणता?

    • Author, कॅथरीन स्नोडॉन
    • Role, बीबीसी न्यूज

रक्तदान केल्याचा मला नेहमीच अभिमान वाटत आलाय. माझा रक्तगट (B-) तुलनेने दुर्मिळ आहे आणि अलीकडेच मला असं लक्षात आलंय की माझं रक्त ‘एनएचएस’ साठी अधिक मौल्यवान आहे, कारण ते नवजात बालकांना दिलं जाऊ शकतं.

माझ्या शेवटच्या रक्तदानाच्या वेळी, रक्तदात्यांची सुश्रूशा करणाऱ्या व्यक्तीने माझ्या हाताला लावलेली सुई काढताना मला विचारलं की: "नियो असल्याबद्दल छान वाटत असेल ना?"

माझा गोंधळलेला चेहरा पाहून तिने मला बाउलमध्ये ठेवलेली चमकदार निळा टॅग असलेली रक्ताची पिशवी दाखवली. त्यावर मोठ्या अक्षरात निओ लिहिलं होतं, "तुमचं रक्त विशेष आहे, सर्वांत लहान वयाच्या रूग्णासाठी ते उपयुक्त ठरेल,” असं तिने स्पष्ट केलं.

निओ म्हणजे नवजात शिशू, ही संज्ञा जन्मानंतर पहिल्या 28 दिवसांच्या आतल्या बाळांचं वर्णन करण्यासाठी वापरली जाते.

माझं रक्त जमा केल्यानंतर रक्तदानानंतर ताबडतोब रक्ताची चाचणी कशी केली जाते हे मला समजलं. काही रुग्णांना आणि बाळांना विशिष्ट रक्ताची गरज असते हे माझ्या लक्षात आलं.

याविषयी मला अधिक माहिती जाणून घ्यायची होती म्हणून मी एनएचएस ( नॅशनल हेल्थ सर्व्हिस) ब्लड अँड ट्रान्सप्लांटमधील हेमॅटोलॉजी आणि रक्तसंक्रमण औषधाचे सल्लागार डॉ. अँडी चार्लटन यांच्याशी बोलले.

दान करण्यात आलेल्या सर्व रक्तांची एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, सी आणि ई तसेच सिफिलीससाठी तपासणी केली जाते, हे त्यांनी स्पष्ट केलं.

एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही नमुने विशिष्ट गरज असलेल्या रुग्णांसाठी योग्य आहेत का याची खात्री करण्यासाठी पुढील चाचण्या आणि प्रक्रिया केल्या जातात.

उदाहरणार्थ, काही लोकांना पूर्वी रक्त चढवताना झालेल्या ॲलर्जीमुळे तयार झालेली प्रथिनं काढून टाकण्यासाठी शुद्ध केलेल्या रक्ताची आवश्यकता असते.

सामान्य व्हायरस

नवजात मुलं, रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेले रुग्ण, गरोदर स्त्रिया किंवा गर्भाशयातील गर्भाला रक्त चढवायचं असेल तर सायटोमेगॅलोव्हायरस किंवा सीएमव्ही नावाच्या विषाणूची तपासणी करणं आवश्यक आहे.

नागीण विषाणू कुटुंबाचा एक भाग असलेला तो एक अतिशय सामान्य आणि सामान्यतः निरुपद्रवी विषाणू आहे, ज्यामुळे फ्लूसारखी सौम्य लक्षणं पाहायला मिळतात किंवा काहीही होत नाही. परंतु काही लोकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

लहान मुलांना यामुळे आकडी येणं, दृष्टी आणि ऐकण्याच्या समस्या तसेच यकृत आणि प्लीहाचं नुकसान होऊ शकतं. क्वचित प्रसंगी ते प्राणघातकसुद्धा ठरू शकतं.

काही अंदाज वेगळे ठरू शकतात परंतु असं मानलं जातं की इंग्लंडमधील 50 ते 80% प्रौढांना सीएमव्ही आहे. इंग्लंडमधील पात्र लोकसंख्येपैकी फक्त 2% लोकं सध्या रक्तदान करतात, व्हायरसच्या संपर्कात न आलेल्या पुरेशा रक्तदात्यांचा शोध घेणं हे रक्त पुरवठादारांसाठी आव्हानात्मक ठरतंय.

मी मागच्या वेळी दान केलेल्या रक्ताची चाचणी करण्यात आलेली आणि ‘सीएमव्ही’साठी अँटीबॉडीज असल्यामुळे ते परत आलं होतं, याचा अर्थ मला कोणत्याही विषाणूची लागण झालेली नव्हती आणि त्यामुळे मला विशेष टॅग मिळाला. मला विषाणूची लागण झालेली नाही याची खात्री करण्यासाठी मी रक्तदान केल्यानंतर प्रत्येक वेळी माझ्या रक्ताची विषाणूसाठी चाचणी केली जाईल.

विषाणूंची प्रतिकारशक्ती पांढऱ्या रक्तपेशींमध्ये कायम राहते, त्यामुळे जर मला कधी त्याची लागण झाली तर अशा विशिष्ट रूग्णांना माझं रक्त कधीही देता येणार नाही.

इंग्लंडमधील फक्त 10,916 सक्रिय रक्तदात्यांपैकी मी एक आहे ज्यांच्याकडे सीएमव्ही-मुक्त, B- रक्त आहे. गेल्या वर्षभरात रुग्णालयांकडून 153,801 युनिट्स सीएमव्ही निगेटिव्ह रक्त दात्यांची गरज असल्याची मागणी करण्यात आली होती.

डॉ. शार्लटन म्हणतात की, "विशेष रक्त घटकांची" मागणी वाढत आहे आणि लोकांना रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं जातंय.

"आम्ही रक्तदान करणाऱ्यांचे पुरेसे आभार मानू शकत नाही," असं ते म्हणतात. "प्रत्येक रक्तदान हे जीवनदान आहे आणि त्यामुळे एकापेक्षा जास्त लोकांचा जीव वाचू शकतो.”

जीवनरक्षक

रक्तदानाचं महत्त्व काय आहे हे हेली बीनपेक्षा चांगलं इतर कुणालाही कळू शकत नाही. जन्मानंतर लगेचच सीएमव्ही मुक्त रक्त चढवल्याने तिची मुलगी विलोचा जीव वाचला.

गर्भधारणेदरम्यान हेलीला 'वासा प्रिव्हिया'चं निदान झालं, ही एक धोकादायक स्थिती आहे ज्यामध्ये प्लेसेंटा किंवा नाभीसंबधीच्या रक्तवाहिन्या जन्माच्या वाटेमध्ये अडथळा निर्माण करतात.

रक्तवाहिन्या कधीही फुटण्याचा धोका असतो आणि त्यामुळे बाळाला गर्भाशयातून बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे नैसर्गिक डिलिव्हरी शक्य नसते.

निरीक्षणासाठी हेलीला 32 व्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि 35 व्या आठवड्यात तिचं सिझेरियन सेक्शन करायचं ठरलं.

ऑपरेशन दरम्यान विलोच्या रक्तवाहिन्या फुटल्या, ज्यामुळे जीवघेणा रक्तस्त्राव झाला.

"सर्व अलार्म वाजत होते आणि लोकं इकडे तिकडे धावत होते," हेली त्या दिवसाची आठवण सांगतात.

"त्यांनी विलोला बाहेर काढलं आणि ते पहिलं रडणं ऐकण्यासाठी मी श्वास रोखून धरला. तो माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट क्षण होता. ती श्वास घेत नव्हती आणि मी मला त्याचा धक्का बसला होता. नवजात बालकांच्या टीमला तिला पुनरूर्जीवित करावं लागलं. मला आठवतंय, जवळपास 10 मिनिटांनंतर मला रडण्याचा एक छोटा आवाज आला."

हेलीला दाखवण्यासाठी एका परिचारिकाने पटकन फोटो काढल्यानंतर विलोला अतिदक्षता विभागात नेण्यात आलं.

ती म्हणाली, “मला आठवतंय की ती अतिशय फिकट गुलाबी आणि सुजलेली दिसत होती."

विलोच्या जन्मानंतर 12 तासांनी हेलीने तिला पहिल्यांदा हातात घेतलं.

विलो आता चार वर्षांची आहे आणि हेली तिच्या मुलीला मिळालेल्या उपचारांसाठी कायमची कृतज्ञ आहे.

हेली सांगते, "ती पाच दिवस अतिदक्षता विभागात होती परंतु तिला कोणतंही कायमस्वरूपी नुकसान झालं नाही, तिला रक्त चढवल्याबद्दल धन्यवाद.”

“एका अनोळखी व्यक्तीने दाखवलेल्या दयाळूपणामुळे ती आज जिवंत आहे. कुणीतरी, कुठेतरी रक्तदान केलं आणि त्यांच्यामुळेच विलो आज हयात आहे, त्यांचे आभार.”

माझ्या पहिल्या निओ देणगीनंतर काही दिवसांनी, मी ज्या संदेशाची वाट पाहत होते तो आला. माझं रक्त कोणत्या हॉस्पिटलला दिलं गेलंय ते मला सांगण्यात आलं. मी हसले आणि चिमुकल्याच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.