गालगुंड किंवा गालफुगी म्हणजे काय? त्याची साथ कशी पसरते?

    • Author, जयदीप वसंत
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

गालगुंड (गालफुगी)ची साथ सध्या अनेक राज्यांत पसरली आहे आणि अनेक लहान मुलांना त्याचा संसर्ग होत आहे.

ही गालगुंडाची साथ असू शकते असंही काही डॉक्टरांना वाटत आहे.

गालगुंडाची लक्षण मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतात पण काही ठराविक केसेसमध्ये ही लक्षणं मुलांचे कान, स्वादुपिंड तसंच जननेंद्रियावरही परिणाम करू शकतात.

काळजी घेतली तर मुलांमध्ये या आजाराचा प्रसार थांबवता येतो.

गालगुंड का होतात?

गालगुंड किंवा गालफुगी या आजाराचा पहिला उल्लेख ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात एका भारतीय उपचारतज्ज्ञाने केलेला आढळतो. या पुस्तकात या आजाराच्या सगळ्या लक्षणांचं वर्णन आहे, पण अर्थातच या आजाराचं नाव वेगळं आहे.

हा आजार लहान मुलांमध्ये सामान्य आहे. साधारण पाच ते पंधरा वयोगटातली मुलं या आजाराने ग्रासली जातात. कधीकधी हा आजार प्रौढांमध्येही आढळून येतो.

बालरोगतज्ज्ञ मनीष सनारिया यांच्या मते, “गालगुंड एक विषाणूजन्य आजार आहे ज्याचा प्रादुर्भाव हिवाळ्यात वाढतो. हा विषाणू खोकणे, शिंकणे किंवा बोलण्याव्दारे मुलांच्या शरीरात प्रवेश करतो.”

ते पुढे म्हणतात, “या आजारात मुलांच्या लाळग्रंथी सुजतात, त्यामुळे त्यांच्या गालांचा काही भाग सुजतो. कधी कधी दोन्ही दोन्ही गाल सुजतात. हा आजार झालेल्या मुलांना अन्न गिळता येत नाही आणि पाणीही पिता येत नाही. यामुळे त्यांच्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो.”

ते म्हणतात, “याशिवाय ताप, घशात संसर्ग अशी लक्षणं दिसून येतात. मुलींना ओटीपोटात दुखू शकतं. या आजाराची लक्षणं हळूहळू दिसायला लागतात आणि साधारण दोन आठवड्यात लक्षणं दिसेनाशी होतात आणि रुग्णाला बरं वाटतं. पण क्वचित हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो.”

डॉ सनारिया पुढे माहिती देताना म्हणतात, “जर याचा संसर्ग मेंदू, स्वादुपिंड, कान, मुलांच्या बाबतीत वृषण किंवा मुलींच्या बाबतीत अंडाशयापर्यंत पोचला तर मग गंभीर परिस्थिती निर्माण होते. कानात संसर्ग झाला तर बहिरेपणाचा धोका असतो, तसंच जननेंद्रियांना संसर्ग झाला तर नपुंसकत्व येऊ शकतं, मुलींच्या अंडाशयाला संसर्ग झाला तर मोठेपणी त्यांना आई होण्यात अडचणी येऊ शकतात.”

संसर्ग झालेल्या मुलांना शाळेत पाठवू नका आणि घरीच विलगीकरणात ठेवा अअसा सल्ला तज्ज्ञ देतात. अशी साथ आलेली असताना आपल्या मुलांना मास्क घातल्याशिवाय बाहेर पाठवू नका असंही ते म्हणतात.

गालगुंड झालेल्या मुलांना घरचं ताजं आणि गिळायला सोपं असं मऊ अन्न देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसंच त्यांना पाणी, ज्यूस, सरबतही देत राहावं.

कधी कधी प्रौढांनाही लहान मुलांचे आजार जसं की कांजिण्या, गोवर, गालगुंड यांचा त्रास होऊ शकतो. जर प्रौढांना संसर्ग झाला तर त्यांनी काही काळ सेक्स करू नये असा सल्ला डॉक्टर देतात. प्रौढांना लहान मुलांच्या तुलनेत या आजाराचा त्रास जास्त होतो.

यावर उपचार काय?

अनेक विषाणुजन्य आजारांप्रमाणे या आजारावरही काही ठराविक औषध नाहीये. रुग्णाला जी लक्षणं दिसतात त्यानुसार त्यांना औषधं दिली जातात.

याखेरीज मल्टी-व्हीटॅमिन आणि मल्टी-मिनरल्सच्या गोळ्याही दिल्या जातात. पण सगळेच डॉक्टर एकमुखाने लशीकरणाचं महत्त्व समजावून सांगतात.

वडोदरातले बालरोगतज्ज्ञ भाविक कानाबार यांच्यामते, “अनेकदा हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात या आजाराची साथ येते.”

ते पुढे म्हणतात, “तसा हा आजार जीवघेणा नाहीये पण जर संसर्ग मेंदूपर्यंत पोचला तर याचं रुपांतर इन्सेफलायटिसमध्ये होऊन बालकाचा मृत्यू ओढावू शकतो. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया अशा आजारांमध्येही असं होऊ शकतं. जर उपचार घेतले नाहीत तर टायफॉईडही जीवघेणा ठरू शकतो.”

त्यामुळे कानाबार म्हणतात की एमएमआर लशीचे दोन डोस तसंच तिसरा बुस्टर डोस मुलांना देणं गरजेचं आहे. समजा हा आजार मुलांना लहानपणी झाला तर मग या रोगाविरोधात नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती तयार होते आणि मग हा आजार पुन्हा होण्याची शक्यता फारच कमी असते.

“लहान मुलांमध्ये या आजाराची लक्षण दिसली तर घरगुती उपचार करण्यापेक्षा तातडीने डॉक्टरांना भेटायला हवं,” डॉ कानाबार म्हणतात.

एमएमआर लस मुलांचं गोवर-कांजिण्या (मिझल्स), गालगुंड (मंप्स) आणि रुबेला या आजारांपासून संरक्षण करते. ही लस दिल्यानंतर एक दोन दिवस मुलांना ताप येऊ शकतो किंवा अंगदुखी होऊ शकते, पण हे सामान्य आहे.

सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये लशी द्यायच्या पद्धतीत फरक आहे, आणि या फरकामुळेच गालगुंडाची साथ पसरते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सरकारी विरुद्ध खाजगी लस

भारतात गेल्या 45 वर्षांपासून लहान मुलांच्या सार्वजनिक लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. यात नऊ रोगप्रतिकारक लशी लहान मुलांना दिल्या जातात. हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे.

यात पोलिओ, रोटाव्हायरस, गोवर-कांजिण्या, नोरोव्हायरस, न्यूमोनिया, धनुर्वात, टीबी, हेपीटाईटीस बी आणि घटसर्प विरोधातल्या लस दिल्या जातात.

या रोगांव्यतिरिक्त आणखी तीन रोगांच्या लशी दिल्या जातात. कोणत्या राज्यात कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव आहे यावर ते ठरतं.

जगातल्या 60 टक्क्यांहून अधिक लसी भारतात 6 भारतीय उत्पादकांकडून बनवल्या जातात. तज्ज्ञांना वाटतं की याच क्षमतेमुळे भारत कोरोना व्हायरसच्या विरोधात लस बनवू शकला आणि जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम यशस्वी करून दाखवली.

लहान मुलांना खाजगी दवाखान्यात दोन एमएमआर लशी आण तिसरा बुस्टर डोस दिला जातो. सरकारी दवाखान्यात फक्त एमआर लसी दिल्या जातात. या लसी गालगुंडापासून बचाव करत नाहीत.

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार 2016 पासून गुजरात राज्यात फक्त एमआर (मिसल्स आणि रूबेला) प्रतिरोधक लसी दिल्या जातात. इतर राज्यांमध्येही लसीकरणाचा कार्यक्रम रोगांचा धोका आणि मृत्यूदर पाहून बदलला जातो.

त्यामुळेच मुंबई असो, वा गुजरात इथे गालगुंडाची जी साथ आलीये तिचं कारण योग्य लसीकरण नसणं म्हटलं जातंय.

खाजगी हॉस्पिटल्समध्ये जे लसीकरण केलं जातं त्याचं प्रमाण सरकारी हॉस्पिटल्सपेक्षा फारच कमी आहे. सरकारी दवाखान्यात गालगुंडाची लस अनेकदा दिली जात नाही, त्यामुळे साथ येण्याचा धोका वाढतो.

इंटेग्रेटेड डिसीज सर्व्हेलेन्स प्रोग्रामचा 38 व्या आठवड्याचा अहवाल आलेला आहे. त्यानुसार देशातल्या इतर भागात, जसं की जम्मू काश्मीरचं शोपीयन आणि ओडिसातलं कंधमाल इथेही साथ आलेली आहे.

साथ पसरण्याचं आणखी एक कारण म्हणजे गालगुंड एक सामान्य आजार समजला जातो आणि लोक अनेकदा यावर घरगुती उपचार करतात. त्यामुळे साथ किती पसरली आहे याचा नक्की आकडा उपलब्ध नाही. लोक अनेकदा आपल्या मुलांना घेऊन डॉक्टरकडे जाण्याऐवजी बाबाबुवा किंवा वैदूकडेही घेऊन जातात.

जोवर मुलांमध्ये तीव्र ताप, अंगावर पुरळ, खाज अशी काही लक्षणं दिसत नाहीत तोवर लोक डॉक्टरांकडे जात नाहीत.

गुजरातमधल्या बालरोगतज्ज्ञांच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शाह म्हणतात, “ सरकारने गोवर-कांजिण्याविरोधात यशस्वी मोहीम राबवली. लसीकरण शिबिरं व्हायची जागोजागी. पण गालगुंडाचा प्रसार थांबवण्यासाठी म्हणावी तशी पावलं उचलली गेलेली नाहीत. सरकारने एमआर लशी देण्याऐवजी एमएमआर लशी द्याव्यात. याचा खर्चात फारसा फरक पडणार नाही आणि वेगळे कष्टही घ्यावे लागणार नाहीत.”

ते पुढे म्हणतात की आमची संस्था याबाबतीत सरकारला पत्र लिहिणार आहे. “तसंच आम्ही सरकारला हेही सांगणार आहोत की प्रौढांसाठीही लसी सुरू करा.”

गालगुंडाचा इतिहास

गालगुंडाचा पहिला उल्लेख सुश्रुत संहितेत येतो. सुश्रुत संहिता आरोग्य आणि उपचारच्या बाबतीत भारतातलं प्राचीन पुस्तक समजलं जातं. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात सुश्रुताने अनेक रोगांची माहिती, त्यांची लक्षणं आणि त्यावरचे उपचार लिहून ठेवले होते.

गालगुंडाचा उल्लेख ‘कर्णफेरा’ या नावाने सुश्रुत संहितेत येतो. यात गाल सुजणं आणि ताप येणं या लक्षणांचा उल्लेख आहे.

त्यानंतर शंभर वर्षांनी म्हणजे ख्रिस्तपूर्व 500 च्या सुमारास ग्रीक वैद्य हिपोक्रेटिसने गालगुंडाविषयी लिहून ठेवलं.

हिपोक्रेटिस आपल्या नोंदीत लिहितो, “काही वेळेला एका किंवा दोन्ही कानांच्या बाजूला सूज दिसते.” ही गालगुंडाचं सर्वात जास्त आढळणारं लक्षण आहे.

इंग्लिशमध्ये या रोगाला ‘मंप्स’ असं म्हणतात. पण हा शब्द आला कुठून?

जुन्या इंग्लिशमध्ये ‘मंप’ या शब्दाचा अर्थ होतो घाणेरडं तोंड किंवा खराब होत जाणारं तोंड. ‘मंपा’ या शब्दाचा अर्थ होतो तोबरा भरलेलं तोंड. ज्याला गालगुंड होतं त्याला बोलायला त्रास होतो आणि त्याचं तोंड फुगलेलं असतं, त्यामुळे कदाचित हा शब्द आला असावा असं वाटतं.

या रोगाला डच शब्द आहे ‘मंबल’.

उंदरासारखा दिसणारा हॅमस्टर नावाचा एक प्राणी पाश्चात्य देशांमध्ये सापडतो. गालगुंड झाला की सुजलेला चेहरा हॅमस्टरसारखा दिसतो असंही काहींना वाटतं आणि त्यामुळे ‘मंप्स’ हे नाव पडलं असावं.

लशीबद्दल काही रंजक गोष्टी

1796 मध्ये इंग्लिश डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधून काढली. त्यानंतर अनेक संसर्गजन्य रोगांसाठी लसी शोधण्याची धडपड सुरू झाली. लुई पाश्चर यांनी 1885 साली रेबीजची लस शोधून काढली. या लसीने आरोग्य क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले.

1937 साली पिवळ्या तापावर लस आली, 1945 साली इन्फ्लुएन्झावर लस आली, 1952-55 या काळात पोलिओवर लस आली. 1969 साली हेपिटायटीस-बी वर लस आली.

गालगुंडावर लस 1967 साली आली. त्याआधी 1963 साली गोवर-कांजिण्यांवर लस आली आणि 1969 साली रुबेलावर लस आली. 1971 साली एमएमआर लस आली जी तिन्ही रोगांवर एकत्रित लस होती.

त्यानंतरच्या काही वर्षांत अनेक रोगांवर लसी आल्या आणि बालकांच्या लसीकरणाचे सार्वजनिक कार्यक्रम अनेक देशांनी सुरू केले.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.