You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाविकास आघाडी मोर्चा : राज्यपालांची हकालपट्टी त्वरीत करा, शरद पवारांची मागणी
“छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त विधानं यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज (17 डिसेंबर) मुंबईत महामोर्चा काढला.
या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या,” असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं, त्यानुसार मोर्चाला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं.
महाविकास आघाडीच्या या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ तसंच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनील परब, आदित्य ठाकरे असे नेते उपस्थित होते.
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
तसंच भाजपनेही आज संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात माफी मांगो आंदोलन केलं.
या सर्व घडामोडींचे अपडेट्स तुम्हाला या बातमीत वाचण्यास मिळतील.
अंधारेंच्या निषेधार्थ मोर्चा
अपडेटेड @ 3.50 PM
सुषमा अंधारे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या निषेधार्थ ठाण्यात भाजपच्या वतीनं लॉंग मार्च काढण्यात आला.
अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज ठाणे बंदची हाक देण्यात आलीय.
राज्यपालांची हकालपट्टी त्वरीत करा, शरद पवारांची मागणी
अपडेटेड @ 2.10 PM
राज्यपालांची हकालपट्टी त्वरीत करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
महाविकास आघाडीमार्फत मुंबई येथे आयोजित महामोर्चात ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.
महापुरुषांबाबत गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना थडा शिकवावा लागेल, असंही पवार म्हणाले.
महाराष्ट्रात मी अनेक राज्यपाल पाहिले, मात्र असे राज्यपाल आतापर्यंत कधीच पाहिले नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं.
फक्त महाराष्ट्रद्रोही या मोर्चात नाहीत – उद्धव ठाकरे
अपडेटेड @ 01.50 PM
महाराष्ट्रद्रोही या मोर्चात नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे तोतया समर्थक म्हणवणारे. दिल्ली समोर झुकणे हे बाळासाहेबांचे विचार नाहीत, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
ते म्हणाले, "राज्यपाल पद मोठं आहे. पण केंद्रामध्ये जो बसतो त्याच्या घरी काम करणार पाठवून द्यायचा.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलतात. मंत्रिमंडळातले ह्यांचे मंत्री सुप्रियाताईंना काहीही म्हणणारे. असे मंत्री आहे. आणि छत्रपतींचं नाव घेतात.
मुंबईचे पालकमंत्री ह्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तुलना खोकेवाल्यांशी केली. लबाडी करून ह्यांनी स्वत:च्या आईच्या पाठीत वार केला.
बेताल वक्तव्ये करणाऱ्या राज्यपालांना हटवा - अजित पवार
अपडेटेड @ 01.40 PM
"युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, त्यांच्याबाबत बेताल वक्तव्ये करण्याचं काम सुरू आहे. ही वक्तव्ये करणाऱ्या राज्यपालांना हटवण्यात यावं," अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
महाविकास आघाडीच्या महामोर्चामध्ये ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, “चूक झाल्यानंतर माणूस माफी मागतो. पण चूक एकदाच होत असते.
राज्यपाल बोलल्यानंतर दुसरे मंत्री बोलतात. त्यांना जनाची नव्हे तर मनाची वाटायला पाहिजे. संविधान काय सांगतो याचा विसर त्यांना पडलेला आहे.”
“गेल्या 6 महिन्यांपासून हे सरकार अस्तित्वात आहे. महाराष्ट्राच्या मातीला भाऊबंदकीचा शाप असला तरी अस्मितेवर घाव घातल्यास महाराष्ट्र पेटून उठतो. ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाहीत, याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे,” असंही अजित पवार यांनी म्हटलं.
अपडेटेड @ 01.15 PM
महाविकास आघाडीच्या आजच्या मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना डिसमिस केलं आहे. आता त्यांना या पदावर एक मिनिटही राहण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य शिवसेना खाकसदार संजय राऊत यांनी केलं आहे.
आज आयोजित महाविकास आघाडीच्या महामोर्चानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, "शिवरायांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
सरकार उलथवून टाकण्यासाठी हे पहिलं पाऊल आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा रंग एक झाला आहे. काँग्रेस, रा. काँ, शिवसेना, कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी सगळे एकत्र आलेत. हा रावण गाठण्यासाठी आपण आलोय, असंही राऊत यांनी म्हटलं.
मोर्चाला सुरुवात, उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरेही सहभागी
अपडेटेड @ 12.30 PM
महाविकास आघाडीच्या मुंबई येथील मोर्चाला दुपारी 12 च्या सुमारास सुरुवात झाली. या मोर्चात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरल्याचं दिसून येत आहे.
रश्मी ठाकरे या आजपर्यंत अशा राजकीय मोर्चांमध्ये कधीच सहभागी झाल्या नव्हत्या. 2019 साली उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला त्यावेळी त्या पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर दिसल्या होत्या.
त्यानंतर, पुढील अडीच वर्षांत त्यांची विविध राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दिसून आली. मात्र अशा राजकीय मोर्चामध्ये सहभागी होण्याची त्यांची पहिलीच वेळ आहे.
तीन पक्षांचे नेते-कार्यकर्ते कसे एकत्र आले?
अपडेटेड @ 12.00 AM
महाविकास आघाडीच्या मुंबई येथील मोर्चाला दुपारी 12 च्या सुमारास सुरुवात झाली. माजी मंत्री सुभाष देसाई, नेते आदेश बांदेकर यांच्यासह इतर प्रमुख नेते मोर्चात चालत आहेत.
तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते हे सुरुवातीला एका ठिकाणी जमून नंतर मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अपडेटेड @ 11.30 AM
रिचर्डसन क्रुडोस मैदानात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने जमले आहेत.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत, अनील परब, रा. काँ. रोहीत पवार, अमोल मिटकरी, काँग्रेसचे सचिन सावंत पोहचलेले आहेत.
मैदानात तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी असले तरी सर्व कार्यकर्ते वेगवेगळे उभे आहेत.
म्हणजेच तीन पक्षाचे कार्यकर्ते एकाच मैदानात तीन वेगवेगळ्या ठिकाणी समुहात एकत्र जमलेत.
कार्यकर्त्यांचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक पक्षाने नेत्यांची टीम बनवली आहे. शिवाय, या मैदानात वातानुकूलित वॅनीटी व्हॅन सुद्धा आहे.
भाजपच्या माफी मांगो आंदोलनात काय घडतंय?
एकीकडे महाविकास आघाडीचा महामोर्चा सुरू असतानाच दुसरीकडे भाजपनेही माफी मांगो आंदोलन पुकारलं आहे.
या आंदोलनात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांंसोबतच राज्यात इतर भागातही महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येत आहे.
दरम्यान, भाजपचे बडे नेते यासाठी रस्त्यावर उतरले असून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, पुण्याचे महापौर मुरलीधऱ मोहोळ आदी नेत्यांचा त्यात समोवेश आहे.
मोर्चाला काही वेळात सुरुवात
अपडेटेड @ 11.00 AM
महाविकास आघाडीच्या मुंबई येथील मोर्चाला काही वेळात सुरूवात होणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त विधानं आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईत भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यानापासून ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’ इमारतीपर्यंत हा मोर्चा असेल.
या मोर्चासाठी नेते-कार्यकर्ते राज्यभरातून दाखल होण्यास आज सकाळपासूनच सुरुवात झाली होती.
उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह तीन पक्षांचे नेते आधी एके ठिकाणी जमतील. त्यानंतर ते मोर्चाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.
महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी 2 हजारहून अधिक पोलीस तैनात आहेत.
भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीच्या मैदानापासून ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनसमोरील टाईम्स आॅफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल. इथेच व्यासपीठ असेल. साधारण 11.30 वाजता मोर्चा सुरु होईल, अशी माहिती बीबीसी प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी दिली.
महाराष्ट्रातील सरकार पाडलं, त्याचा हा बदला - संजय राऊत
महाराष्ट्रातील परिवर्तनाची ही सुरुवात आहे. सर्वप्रथम तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील सरकार पाडलं, त्याचा हा बदला आहे, असं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
मोर्चाला सुरुवात होण्याच्या पार्श्वभूमीवर काही वेळ आधी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, "तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करता येणार नाही. सर्वप्रथम तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील सरकार पाडलं, त्याचा हा बदला आहे. उद्योग इतर राज्यांमध्ये नेले जात आहेत, त्याविरोधातील हा आक्रोश आहे. हा सुरू राहील."
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यापासून तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार गमावलेला आहे. अपमान करणाऱ्यांचं तुम्ही समर्थन करता, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचं नाव घेणं सोडून द्या," असं राऊत यांनी म्हटलं.
झोपलेल्या सरकारला उठवण्याचा आमचा प्रयत्न – रोहित पवार
अपडेटेड @ 10.30 AM
महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला उठवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
आपलं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे, त्यामुळे थोर व्यक्तींविरोधात बोललं तरी चालतं, असा अहंकार त्यांच्या मनात आहे. हाच अहंकार आम्हाला मोडून काढायचा आहे.
गुजरातच्या निवडणुकीसाठी इथले प्रोजेक्ट नेण्यात आले. आता कर्नाटकची निवडणूक होणार आहे, त्यासाठीही काही केलं जात आहे.
भाजपचं माफी मांगो आंदोलन हे केवळ राजकारण आहे. त्यांना आंदोलन करायचं असेल तर त्यांनी आधीच केलं असतं. त्यांना वरून परवानगी घ्यावी लागते.
आम्हाला परवानगी दिली नसती तर तेच अडचणीत आले असते. लोकांच्या भावनांच्या ताकदीसमोर त्यांनी माघार घेतली, ते झुकले आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
शिंदे-फडणवीस सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी - सुप्रिया सुळे
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.
केवळ सीमावादच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही त्यांनी अवमान केला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसंच, या मोर्चामध्ये शरद पवारही सहभागी होणार असल्याची माहिती सुळे यांनी दिली.
मुंबईतील सद्यस्थिती जाणून घ्या बीबीसी प्रतिनिधी दीपाली जगताप यांच्याकडून
अपडेटेड @ 10.00 AM
काँग्रेस नेते अशोक चव्हाण मोर्चात नसतील
अपडेटेड @ 9.30 AM
एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोर्चाची जय्यत तयारी सुरू असताना काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोर्चात सहभागी होण्याविषयी असमर्थता दर्शवली आहे.
चव्हाण यांनी ट्विट करून याविषयी माहिती दिली.
ते म्हणाले, "महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी."
कार्यकर्ते जमण्यास सुरुवात
अपडेटेड @ 9.00 AM
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त विधानं आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शनिवारी (17 डिसेंबर) मुंबईत महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे.
या मोर्चासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईत सुरू असलेल्या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स तुम्हाला बीबीसी मराठीच्या या पानावर वाचायला मिळतील.
महाविकास आघाडीचा मोर्चाबद्दल थोडक्यात -
- मोर्चा कशासाठी? - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ
- कोणते पक्ष सहभागी? - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतर पक्ष
- कोणते नेते येणार? - शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनील परब, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण.
- कार्यकर्ते कुठून येतील? - मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुणे आणि नाशिकमधील कार्यकर्त्यांना जमण्याचे आदेश
- वेळ काय? - सकाळी 11 वाजता
- मोर्चाचा मार्ग काय? - दक्षिण मुंबईत भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यानापासून ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’ इमारतीपर्यंत (CSMT रेल्वे स्टेशन समोर)
- भाषणे कुठे होतील? - CSMT रेल्वे स्टेशन समोर एका ट्रकमध्ये नेत्यांची भाषणे होतील.
महाविकास आघाडीचा मोर्चा कसा असेल?
“छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त विधानं याबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष असून त्यासाठीच महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे.
या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या,” असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.“हीच वेळ आहे जागं होण्याची आणि महामोर्चात सहभागी होण्याची,” असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्या या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ तसंच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनील परब, आदित्य ठाकरे असे नेते उपस्थित राहणार आहेत.
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असे पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीने आपल्या बैठकीत तिन्ही पक्षांना मोठ्या संख्यने कार्यकर्त्यांना जमवण्याचा आदेश दिले आहेत.मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यातूनही कार्यकर्त्यांना जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षिण मुंबईत भायखळा पासून ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’ इमारतीपर्यंत (सीएसएमटी रेल्वे स्टेशन समोर) महाविकास आघाडीचा मोर्चा आहे.
महाराष्ट-कर्नाटक प्रश्नी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्त्वात एक बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सीमाभागासंदर्भात केलेली वक्तव्य आपली नसून ते ट्वीट त्यांनी केलं नाही असं स्पष्ट केलं. परंतु यावरून महाविकास आघाडीने भाजप सरकारवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “बसवराज बोम्मई यांच्या नावाने ज्या ट्वीटर खात्यावरून चिथावणीखोर ट्वीट करण्यात आले ते खातं बनावट होतं. हा खुलासा करण्यास एवढे दिवस का लागले? आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि हे केवळ ऐकून आले आले.”
शनिवारी (17 डिसेंबर) होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चात प्रामुख्याने या मुद्यांवर घोषणाबाजी केली जाईल. तसंच प्रमुख नेते या मुद्यांवरूनच सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील.
भाजपचं माफी मांगो आंदोलन
- महाविकास आघाडीच्या पाठोपाठ आता भाजपनेही शनिवारी (17 डिसेंबर) आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
- “गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारे यांची वक्तव्ये समाजमाध्यमांवर येत आहेत. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि वारकरी यांचा अपमान केला जात आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान समोर आल्यानंतरही उद्धव ठाकरे मौन सोडायला तयार नाहीत.”
- शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे अनुयायी असलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानावरचा वाद निर्माण केला जात आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे का करत आहे?” असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.
- मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्ते संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांचा निषेध नोंदवतील, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
मुंबई भाजप कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकामार्फत आपल्या कार्यक्रमांची माहिती दिली.
त्यानुसार, हिंदू-देवदेवतां व महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने UNSCमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय संघाच्या विरोधात अकलेचे तारे तोडले आहेत.
त्याच्या निषेधार्थ आज (17 डिसेंबर) संपूर्ण मुंबईमध्ये 'माफी मांगो' आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील सहा विभागातील भाजपा खासदार, आमदार आणि पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत.
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची वक्तव्ये सध्या समाजमाध्यमांवर येत आहेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली, संतश्रेष्ठ एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान केला आहे. त्या विरोधात प्रचंड जनप्रक्षोभ निर्माण झाला आहे.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरुन वाद निर्माण करण्याचे प्रयत्न जाणीवपुर्वक खासदार संजय राऊत यांच्याकडून सुरु आहेत. भारतातील संबंध आंबेडकरप्रेमींच्या मनात यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. या विरोधात मुंबई भाजपा सहा ठिकाणी माफी मागो आंदोलन करणार आहे.
माफी मांगो आंदोलनातील सभांचे ठिकाण आणि वेळ
- उत्तर मुंबई - कांदिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर, कांदिवली पूर्व, वेळ: सकाळी 10.30 वाजता
- उत्तर पश्चिम- आगरकर चौक, अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला, अंधेरी, वेळ: दुपारी 3.30 वाजता
- उत्तर पूर्व- निलयोग मॉल, जवाहर रोड, घाटकोपर पूर्व, वेळ: दुपारी 12.30 वाजता,
- दक्षिण मध्य - कैलास मंदिर (लस्सी) समोर, दादर पूर्व, वेळ: सकाळी 10.30 वाजता,
- दक्षिण मुंबई- गांधी उद्यान, महाराष्ट्र भाजपा कार्यालयाच्या बाजूला, नरीमन पॉइंट, वेळ: सकाळी 11.30 वाजता
- उत्तर मध्य - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुतळा पश्चिम द्रुतगती मार्ग, एव्हियान हॉटेलच्या बाजूला, विलेपार्ले पूर्व मुंबई, वेळ: सकाळी 11.30 वाजता
मुंबईकरांसाठी सूचना
- मुंबई पोलिसांनी काही अटी-शर्थींसह महाविकास आघाडी आणि भाजपच्या आंदोलनाला परवानगी दिली आहे.
- विरोधकांनी आपला मोर्चा शांततेत काढावा आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवावी, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
- महाविकास आघाडीचा मोर्चा सकाळी 11 वाजता भायखळा येथून सुरू होईल. त्यानंतर जिजामाता उद्यान मोहम्मद अली रोड ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघेल.
- महाविकास आघाडीच्या मोर्चात प्रमुख नेत्यांसाठी एक ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोर या ट्रकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे.
- या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत सकाळच्या सत्रात काही मार्गावरील वाहतूक दुसरीकडे वळवण्याची शक्यता आहे.
- तसंच ठाणे, रायगड, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातून कार्यकर्ते येणार असल्याने शनिवारी सकाळी इस्टर्न एक्सप्रेस हायवे, पनवेल आणि ठाण्यातील प्रमुख मार्गांवर वाहतूक कोडींची शक्यता नाकारता येत नाही.
- त्यामुळे मुंबईकरांनी प्रवासाचं नियोजन त्यानुसार करावं असंही आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)