सुंता करण्याची प्रथा कधी व कशी सुरू झाली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फेलेपे याम्बयास
- Role, बीबीसी न्यूज मुंडो
जन्माच्या आठव्याच दिवशी हजरत इसा म्हणजेच येशू ख्रिस्त यांचा सुंताविधी पार पडला होता. पण त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी मात्र ही प्रथा मागे सोडली.
आजही बघायला गेलं तर ज्यू धर्मीय आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये काही प्रथांमध्ये साम्य आढळून येतं. जसं की, महत्वाच्या दिवशी सामूहिक पुजेचं आयोजन केलं जातं.
मात्र ख्रिस्ती धर्मीयांनी काही प्रथा मागे सोडल्या, यात सुंता प्रथा सुद्धा आहे. ख्रिस्ती लोक त्यांच्या नवजात मुलांची सुंता का करत नाहीत याचं उत्तर आपल्याला बायबलमध्ये सापडतं.
बायबलच्या 'न्यू टेस्टामेंट' नुसार, ज्यू आणि ख्रिश्चन धर्मीयांमध्ये सुंता करण्याविरोधी दृष्टिकोन इसवी सन 50 मध्ये पुढं आला. या विषयावर सेंट पॉल आणि सेंट पीटर यांच्यात मोठी खडाजंगी झाली.
कॅथोलिक युनिव्हर्सिटी ऑफ उरुग्वे येथील धार्मिक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक मॅगेल पास्टोरिनो यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं की, "चर्चमध्ये सुरू झालेला हा पहिला संस्थात्मक वाद होता."
सेंट पॉल यांना तेव्हा संत पदाचा दर्जा मिळालेला नव्हता. ते पॉल ऑफ टार्सस या नावाने ओळखले जात होते.
पॉल हे सुरुवातीच्या काळात हजरत मुसा (मोसेस) यांच्या शरियतची (कायदा) अंमलबजावणी करणारे एक परुशी होते.आणि ते या माध्यमातून येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना त्रास द्यायचे.
पण नंतर त्यांच्यामध्ये बदल झाल्याचं बायबलमध्ये सांगण्यात आलंय. त्यांनी येशू ख्रिस्ताचा संदेश जगभर प्रसारित केला. गलील, अल-जलील शहरातून येणारे पीटर नाझरेथ असतील किंवा मग अल नासिरा शहरातील येशू ख्रिस्त असतील, पॉल पण यांच्यासारख्याच ज्यू धर्मातून आले होते. आणि त्यामुळेच त्यांची सुंता झाली होती.
तोपर्यंत, ज्यू हा एकमेव धर्म असा होता, ज्याने एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. नाहीतर तेव्हाचे ग्रीक, रोमन आणि इजिप्शियन लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करायचे.
ज्यूंच्या मते देवाने अब्राहमला सांगितलं होतं की, "तुझ्यात आणि माझ्यात जो करार झालाय त्याचं पालन तुझ्या येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा करावं लागेल. तुम्हाला प्रत्येक पुरुषाची सुंता करावी लागेल."
त्यामुळे ज्यू धर्मीयांसोबतच मुस्लिम धर्मीयांमध्येही सुंता प्रथेचं पालन केलं जातं.
सुंता करण्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी
पुरुषाच्या शिश्नमण्याभोवताली चिकटलेली त्वचा काढून टाकण्याच्या क्रियेला सुंता म्हणतात. धर्म ही संकल्पना येण्याआधी पासून ही प्रथा अस्तित्वात होती.
ही जगातील सर्वांत प्राचीन शस्त्रक्रिया आहे. याविषयी सविस्तर पुरावे उपलब्ध नसले तरी बालरोगतज्ञ अहमद अल सलीम यांच्या 'अॅन इलस्ट्रेटेड गाइड टू पेडियाट्रिक युरोलॉजी' या पुस्तकानुसार इजिप्तमध्ये 15 हजार वर्षांपूर्वी याची सुरुवात झाल्याची मान्यता आहे.
अल सलीम सांगतात की, "शुद्धीकरण असो वा वयात येण्याचा मुद्दा, अशा अनेक कारणांमुळे कित्येक धर्मांनी सुंतेची प्रथा स्वीकारली आहे. सुंता करण्यामागे प्रत्येक धर्माचा काहीतरी वेगळा उद्देश दिसून आलाय. जसं की, देवाला संतुष्ट करणं असो किंवा त्यांची सांस्कृतिक ओळख टिकवणं असो."

फोटो स्रोत, Getty Images
मॅगेल पास्टोरिनो सांगतात की, "धर्माने आजवर प्रत्येक एका गोष्टीवर राज्य केलंय. यात स्वच्छतेपासून अन्न, लैंगिक संबंध आणि राजकारण अशा प्रत्येक गोष्टीत धर्माचा हस्तक्षेप आहे. एखाद्या सभ्यतेमध्ये जन्मलेल्या प्रत्येक गोष्टीप्रमाणेच धार्मिक व्यवस्थाही त्यांच्यासोबत जन्माला येते आणि प्राचीन काळात धर्म आणि सभ्यता वेगळं करणं कठीण होतं.
"जेव्हा स्वच्छतेच्या मुद्द्यावर नियम तयार करण्याची वेळ आली तेव्हा धर्माचा वापर करण्यात आला. कारण हे नियम दैवी नियम होते आणि त्यापेक्षा मोठा कायदा अस्तित्वात नव्हता."
ज्यू धर्मात या संकल्पनेला पूर्णपणे नाकारलेलं नाही. अर्थात काही फरकांसह या संकल्पना अस्तित्वात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
रब्बी डॅनियल डोलेन्स्की सांगतात की, "काही लोकांना असं वाटतं की, धार्मिक दृष्टिकोन सोडला तर स्वच्छतेच्या मुद्द्यामुळे या प्रथा आजही तग धरून आहेत. अर्थात यामागे धार्मिक कारणं होती. सुंता, आरोग्य आणि स्वच्छता यांमध्ये एक सहसंबंध आहे."
प्राचीन काळी सुमेरियन आणि सेमिटिक संस्कृतीमध्ये सुंता करण्याची प्रथा होती. पण 2007 साली प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या एड्स कार्यक्रमाच्या अहवालानुसार, या संस्कृतींपासून भिन्न असलेल्या माया आणि एस्टीक संस्कृतीमध्ये देखील या प्रथा अस्तित्वात होत्या.
थोडक्यात मोठ्या प्रमाणावर प्रचलित असूनही, ही प्रथा सर्वच संस्कृतीमध्ये स्वीकारलेली नव्हती. प्राचीन ग्रीसमध्ये व्यायामाला खूप महत्त्व होतं. त्याचप्रमाणे पुरुषांच्या नग्नतेला अधिक प्राधान्य दिलं जायचं. त्या संस्कृतीमध्ये जननेंद्रियाच्या त्वचेला सौंदर्याचं प्रतीक मानलं जायचं, त्यामुळे सुंता प्रथेकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा तिरकसच होता.
अमेरिकन असोसिएशन फॉर द हिस्ट्री ऑफ मेडिसिन आणि जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूट फॉर द हिस्ट्री ऑफ मेडिसिन या जर्नलच्या 'बुलेटिन ऑफ हिस्ट्री ऑफ मेडिसिन'च्या 2001 च्या लेखात फ्रेडरिक एम. हॉजेस लिहितात की, "शिश्नावरील लांब आणि हळूहळू निमुळती होणारी त्वचा वास्तवात सांस्कृतिक ओळख, नैतिकता, स्वीकार्य वृत्ती, सद्गुण, सौंदर्य आणि आरोग्याचं प्रतीक होतं."
त्यामुळे सुंता झाली नसेल आणि तरीही शिश्नाची त्वचा लहान असेल तर तो दोष मानला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
कॅनडातील मॅकमास्टर डिव्हिनिटी कॉलेजमधील न्यू टेस्टामेंटच्या प्राध्यापिका सिंथिया लाँग वेस्टफॉल त्यांच्या 'पॉल अँड जेंडर' या पुस्तकात लिहितात, "ग्रीसमध्ये ज्यू धर्मीयांसाठी सुंता प्रथा एक समस्या बनली होती. कारण ज्यू धर्मियांना प्रचलित संस्कृतीशी जुळवून घ्यायचं होतं.
"शिवाय एक काळ असा होता की तेव्हा सुंता प्रथा बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आली होती."
सेंट पॉल आणि सेंट पीटर यांच्यातील मतभेद
ज्यू धर्मीय त्यांच्या धर्माचा जरी प्रचार करत असले तरीही त्यातून ते इतरांना ज्यू धर्माची दिक्षा देत नव्हते. पण येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना शिकवणीचा शक्य तितका प्रसार करण्यास सांगितलं होतं.
पॉल हे आपल्या तरुणपणी जेरुसलेमला आले होते. त्यांनी आपला बराचसा काळ ग्रीक लोकांबरोबर व्यतीत केला होता. पुढे ते येशू ख्रिस्ताच्या पहिल्या फळीतले प्रचारक बनले होते.
त्यांनी इस्रायल, लेबनॉन, सीरिया, तुर्की, ग्रीस आणि इजिप्त या प्रदेशांना भेटी दिल्या. हा प्रदेश एकेकाळी अलेक्झांडर द ग्रेटच्या साम्राज्याचा भाग होता. त्यांनी येशू ख्रिस्ताचा संदेश ज्यू नसलेल्या लोकांपर्यंत पोहोचवला.
त्यांनी कुरन्थियंसला लिहिलेल्या आपल्या पहिल्या पत्रात असं म्हटलंय की, "मी सर्व चर्चना या प्रथेविषयी विचारतोय. ज्यांनी कोणी सुंता केली असेल त्यांनी हे लपवण्याचं कारण नाहीये.
"ज्यांची सुंता झालेली नाहीये त्यांनी सुंता करून घेऊ नये. सुंता केल्याने किंवा न केल्याने काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त देवाच्या आज्ञेचं पालन करायला हवं."
मॅगेल पास्टोरिनो सांगतात की, "टार्ससचे पॉल एक ज्यू धर्मीय होते. शिवाय ते रोमचे नागरिक होते. जरी ते संस्कृतीने ग्रीक असले तरी ते स्वतः उच्च शिक्षित होते. आणि त्यांनी रोमन, ग्रीक, ज्यू तिन्ही संस्कृतींवर समान अधिकार प्रस्थापित केला होता."
पॉलने आपल्या चुकांविषयी लिहिलेल्या पत्रात मुसाच्या शरियतचा उल्लेख केलाय. यात सुंता करण्याचा आदेश दिला होता आणि लिहिलं होतं की, "येशूने आम्हाला कायद्याच्या कचाट्यातून मुक्त केलंय."
पण इतर अनुयायांना पॉलचं मत मान्य नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
ख्रिश्चन बायबलमध्ये लिहिलेल्या पत्रात, पॉल म्हणतात, "बरेचसे असे बंडखोर, निंदक, देशद्रोही आहेत जे सुंता करण्याचं समर्थन करतात. त्यांचं तोंड बंद करायला हवं."
पॉल यांच्या म्हणण्यानुसार, पीटर ज्यू सोडून इतर लोकांसोबत जेवण करायचा. पण जेव्हा याकूबचं प्रतिनिधी मंडळ शहरात आलं तेव्हा पीटर लांब पळू लागला. कारण त्याला सुंता समर्थकांची भीती होती.
"मी सर्वांसमोर पीटरला म्हणालो, एकतर तू ज्यू नाहीयेस, पण ज्यू लोकांसारखं वागतोयस आणि तरीही तू बिगर ज्यू लोकांनी ज्यू धर्म पाळावा अशी बळजबरी तू का करतोयस?"
आणि या विषयावर एकमत झालं

फोटो स्रोत, Getty Images
'न्यू टेस्टामेंट'नुसार, ज्यू परंपरा आणि येशूच्या नियमाचं पालन करणारे काही ज्यूईश ख्रिश्चन अँटिओक या शहरात गेले. इथं काही असे लोक होते जे ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाले होते. पण जर त्यांनी सुंता केली नाही तर ते येशूच्या धर्माचं पालन करू शकत नाहीत असा इशारा या ज्यूईश ख्रिश्चन लोकांनी दिला.
त्यामुळे पॉल परत जेरुसलेमला आले आणि हा गुंता सोडवण्यासाठी अनुयायांची एक बैठक भरवली. या परिषदेला कौन्सिल ऑफ जेरुसलेम असंही म्हटलं गेलंय.
तिथं पॉलने ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांच्या मताला प्राधान्य दिलं.
याला जेम्सने विरोध केला पण नंतर तो पॉलचा समर्थक बनला आणि म्हणाला, "गैर ज्यू धर्मियांना देवाचा मार्ग स्वीकारण्यापासून रोखू नये."
सरतेशेवटी पीटरनेही पॉलच मत मान्य केलं आणि हा वाद मिटला.
पास्टोरिनो सांगतात की, पॉल मूर्तिपूजकांमध्ये धर्माचा प्रचार करत राहिले आणि दुसऱ्या बाजूला पीटर आणि जेम्स ज्यूंना धर्माची शिकवण देत राहिले.
बायबलनुसार, या ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी अँटिओक, इजिप्त, सीरिया आणि सिलिसिया (सध्याचे तुर्की) इथं राहणाऱ्या गैर ज्यूंना एक पत्र लिहिलं. त्यात म्हटलं होतं की,"मूर्तीसमोर बळी देणं, जनावरांचा बळी देणं, रक्त चढवणं, लैंगिक गैरवर्तन आदी गोष्टी सोडल्या तर कोणत्याही गोष्टींवर निर्बंध लादले जाणार नाहीत."
हे पत्र अँटिओकला पोहोचल्यावर तिथल्या लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण यापुढं त्यांना सुंता करावी लागणार नव्हती.
प्रोफेसर सिंथिया वेस्टफॉल सांगतात की, पॉल गैर ज्यू लोकांमध्ये हिरो बनले होते. त्यांनी इंजील (ज्यू धार्मिक पुस्तक) शिकवणीतला एक मोठा अडथळा दूर केला होता.
सुंता केलेले ख्रिश्चन
चर्चने सुंता कायद्याचे निर्बंध उठवले असले तरीही, आफ्रिकेतील काही भागांमध्ये आजही सुंता करण्याची प्रथा अस्तित्वात आहे. इजिप्तमधील किबाती ख्रिश्चन, इथिओपियातील ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन आणि केनियातील नोमिया चर्च यांची उदाहरणं आपल्याला देता येतील.
तसेच असे पाच देश आहेत जिथं ख्रिश्चन संस्कृती असूनही बहुतेक मुलांची सुंता केली जाते.
अशाच देशांपैकी एक म्हणजे अमेरिका. साधारण 1870 मध्ये, अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे संस्थापक सदस्य डॉ. लुईस सॉयर यांनी काही रोगांच्या प्रतिबंधांसाठी आणि उपचारांसाठी सुंता करण्यास सुरुवात केली.
अहमद अल-सलीम म्हणतात की, त्यांच्या या सायंटिफिक प्रयोगामुळे आणि सुंतेसाठी त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे, जवळजवळ सर्व नवजात बालकांची सुंता होऊ लागली. अमेरिकेतून ही परंपरा कॅनडा आणि ब्रिटनमध्ये पोहोचली आणि त्यानंतर ती न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातही गेली.
नंतर अनेक देशांमध्ये सुंतेच्या फायद्याबद्दल आणि नुकसान यांच्याबद्दल चर्चा झाली. सोबतच यातून काही वैज्ञानिक मतभेद निर्माण झाले आणि नवजात बालकांची सुंता बंद करण्यात आली.
पण आजही अमेरिकेत बहुतेक पुरुषांची सुंता केली जाते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








