महिला आरोग्य : 'खतना हे मी पास झाल्याचं माझं बक्षीस होतं'

आई

फोटो स्रोत, Jilla Dastmalchi

"त्यांनी मला खाली दाबून धरलं आणि माझ्या शरीराचा 'हा' भाग कापला- ते असं का करतायंत, याचा मला काहीच अंदाज नव्हता. हा माझ्या आयुष्यातला पहिला आघात होता: मी या वृद्ध माणसांचं मी काय वाकडं केलं होतं, तेही मला कळलं नाही. हे सगळे माझे जवळचे लोक होते- तेच माझे पाय फाकवून मला दुखापत करण्यासाठी अंगावर येत होते. मी मनाने कोलमडून पडले."

लायला (नाव बदललं आहे) केवळ 11-12 वर्षांची असताना तिला खतनाला (स्त्रीच्या जननेंद्रियांचं विच्छेदन करण्याची प्रथा: Female Genital Mutilation) सामोरं जावं लागलं.

इजिप्तमधील रूढीवादी मुस्लीम समुदायांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये स्त्रियांचा खतना होत नाही तोवर त्यांना 'अस्वच्छ' व 'लग्नासाठी तयार नसलेली' मानलं जातं. इजिप्तमध्ये 2008 सालापासून या प्रथेवर बंदी आहे- अशा पद्धतीची कृती केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास डॉक्टरांना सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अशा प्रक्रियेसाठी विचारणा करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

तरीही, जगातील सर्वाधिक खतनाच्या घटना इजिप्तमध्ये घडतात. अनेकदा 'प्लास्टिक सर्जरी'च्या नावाखाली खतना केला जातो, असं मानवाधिकारासंबंधीचे खटले लढवणारे वकील रेदा एल्दान्बौकी सांगतात. स्त्रियांच्या वतीने विनाशुल्क खटले लढवणाऱ्या एका केंद्राचे ते प्रमुख आहेत.

कैरोस्थित 'महिला मार्गदर्शन व कायदा जागृती केंद्रा'ने (Women's Centre for Guidance and Legal Awareness: WCGLA) आत्तापर्यंत स्त्रियांच्या वतीने सुमारे 3 हजार खटले दाखल केले आहेत आणि त्यातील सुमारे 1800 खटल्यांमध्ये केंद्राला यश मिळालं आहे- यात किमान सहा खटले खतनाशी संबंधित होते.

महिला

फोटो स्रोत, Jilla Dastmalchi

कायदा स्त्रियांच्या बाजूचा असल्यासारखं वाटत असेल, तरी न्याय मिळणं ही पूर्णतः निराळी गोष्ट आहे. अपराध्यांना पकडण्यात आलं, तरी न्यायालयं व पोलीस त्यांच्याबाबतीत अतिशय सौम्य भूमिका घेतात, असं एल्दान्बौकी सांगतात.

या प्रथेविरोधात डब्ल्यूसीजीएलए मोहीम कशी चालवतं, हे त्यांनी बीबीसीला सांगितलं. शिवाय, त्यांनी तीन महिलांशीही गाठ घालून दिली. या महिलांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले आणि त्यांना पुढील पिढीचं यापासून संरक्षण करावंसं का वाटतं, तेही सांगितलं.

लायलाची कहाणी: 'त्यांनी मला खाली दाबलं आणि... '

जवळपास तीन दशकं उलटून गेली असली, तरी तो दुर्दैवी दिवस अजूनही लायलाच्या मनात ताजा आहे. त्यावेळी लायला शालेय परीक्षा नुकतीच पास झाली होती.

"मला चांगले गुण मिळाल्याबद्दल मला शाबासकी देण्याऐवजी माझ्या घरातल्यांनी एका सुईणीला बोलावलं, तिने पूर्ण काळा पोषाख घातला होता, मग त्यांनी मला एका खोलीत डांबलं आणि सगळे माझ्या भोवती जमा झाले," लायला सांगते.

खतनाविषयी बोलणं इतकं निषिद्ध मानलं जातं की, चार मुलांची आई असलेल्या 44 वर्षीय लायला इजिप्तमध्ये ती कुठे राहते हेदेखील उघड करायची इच्छा नाही.

रुग्णालय

फोटो स्रोत, Jilla Dastmalchi

तिची आजी व दोन शेजारच्या बायका त्या दिवशी तिच्या भोवती गोळा झाल्या (एकाच दिवशी आपल्या घरांमधल्या मुलींचाही हा विधी पार पाडण्यासाठी अनेकदा शेजारीबाजारी एकत्र येऊन सुईणीची व्यवस्था करतात).

"गावात राहताना आम्ही इतरांप्रमाणेच कोंबड्या पाळायचो. ही महिला माझ्या शरीराचा 'हा' भाग कापण्यासाठी आली, तेव्हा तिने तो कापून कोंबड्यांच्या दिशेने भिरकावला. कोंबड्या ते खाण्यासाठी गोळा झाल्या," लायला सांगते.

त्या दिवसापासून लायलाला चिकन खाणं शक्य झालेलं नाही, ती स्वतःच्या अंगणातही कोंबड्या पाळत नाही.

"मी लहान होते आणि सुट्टीचे दिवस होते- मला खेळायचं होतं, मुक्तपणे वावरायचं होतं, पण मला तर चालणंही शक्य होत नव्हतं, चालायचं तर पाय फाकवावे लागायचे," लायला सांगते.

आपल्याबाबतीत काय घडलंय हे समजून घ्यायला लायलाला खूप वेळ लागला. ती मोठी झाली आणि तिचं लग्न झालं, तेव्हा खतना केल्याचे परिणाम तिच्या लक्षात आले.

"गावकऱ्यांच्या दृष्टीने खतना न केलेली बाई पापी असते आणि खतना झालेली बाई चांगली असते. याला काही अर्थ आहे का? चांगलं वागण्याशी याचा काय संबंध? त्यांना कळतही नसलेली परंपरा ते पाळत असतात," ती म्हणाली.

लायलाने तिच्या पहिल्या मुलीला जन्म दिला तेव्हा आपल्या मुलीला अशाच वेदनादायक प्रसंगातून जायला लागू नये अशी तिची इच्छा होती, पण नवऱ्याने मुलीचा खतना विधी घडवून आणला तेव्हा लायलाला ते थांबवता आलं नाही. नवऱ्याला स्वतःच्या कुटुंबियांचं समाधान करायचं होतं.

पण लायलाच्या इतर मुली खतना करण्याच्या वयात आल्या, तेव्हा देशात या प्रथेवर कायद्याने बंदी आली होती आणि लायलाने ऑनलाइन व्याख्यानं ऐकली होती, डब्ल्यूसीजीएलए केंद्राच्या जाहिराती टीव्हीवर पाहिल्या होत्या.

महिला

फोटो स्रोत, Jilla Dastmalchi

एल्दन्बौकी यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानांना लायला उपस्थित राहू लागली आणि यातून तिला दुसऱ्या मुलीचा बचाव करण्यासाठी आवश्यक धाडस गोळा करता आलं.

कित्येक शतकं सुरू असलेल्या या प्रथेपायी आपल्या समुदायातील काही मुली मरण पावल्याचंही तिला माहीत होतं.

"मी माझ्या मुलींना अशा धोकादायक परिस्थितीमधे का टाकू? एका अडाणी परंपरेमुळे त्यांनी हे का सहन करावं? हे चुकीचं असल्याचं मला आधीपासूनच माहीत होतं, पण इतरांना हे पटवून देण्यासाठी माझ्याकडे काही युक्तिवाद करण्यासारखं नव्हतं. मला केवळ माझ्या नवऱ्याचं मन वळवायचं नव्हतं, तर माझे सासूसासरे व माझ्या कुटुंबातले लोक यांचंही मन वळवायचं होतं. त्या सगळ्यांनी ही प्रथा पाळलेली आहे, सर्वांना हे योग्य वाटतं आणि 'जग बदलण्याएवढी तू कोण मोठी लागून गेलीस' अशीच त्यांची माझ्याबाबतची वृत्ती असते."

लायलाने तिच्या नवऱ्याला निर्वाणीचा इशारा दिला- उर्वरित मुलींचा खतना करायची योजना सोडून द्यावी किंवा घटस्फोट घ्यावा.

"आम्हाला चार मुली आहेत, त्यामुळे त्याला घर सोडून जायचं नव्हतं," ती सांगते.

"पण अजूनही मला माझ्या सर्वांत मोठ्या मुलीबद्दल वाईट वाटतं. तिला खूप रक्तस्राव झाला आणि मला तिचं संरक्षण करता आलं नाही. हे सगळं होत असताना मी तिच्यासोबतही राहू शकले नाही."

शरिफाची कहाणी: 'खतना झाल्यावर खूप रक्तस्राव झाला'

शरिफा (नाव बदललं आहे) सुमारे दहा वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिचा खतना करण्याचं ठरवलं.

"माझा खतना करण्याला माझ्या आईचा विरोध होता, पण माझ्या वडिलांना त्यांच्या आईला व बहिणांना खूश करायचं होतं आणि घरात आपलंच राज्य चालतं हे दाखवायचं होतं, म्हणून त्यांनी माझ्या आईला न सांगताच मला डॉक्टराकडे नेलं."

डॉक्टरने भूल देण्यासाठी काही स्थानिक औषध वापरलं असावं, असं शरिफाचं म्हणणं आहे. बीबीसीने ऐकलेल्या दाखल्यांनुसार सर्वसाधारणतः भूल देण्याची पद्धत वापरली जात नाही.

"मी रडत होते आणि माझ्या वडिलांना माझ्याबाबतीत हे असं का करायचंय हे मला कळत नव्हतं. काय चाललंय तेही मला कळत नव्हतं, पण माझ्या शरीराचा हा भाग डॉक्टरसमोर असा उघडा करायला लागल्याने मी उदास झाले होते- यात काहीतरी चुकतंय एवढं मला वाटत होतं.

"त्याने पिनेसारखं काहीतरी वापरलं आणि मला थोडासा ठणका बसला. खूप रक्त आलं आणि मला रुग्णालयात घेऊन जावं लागलं," असं शरिफा सांगते. "माझे वडील घाबरेघुबरे झाले, त्यांना माझ्या आईलाही हे सांगावंच लागलं- माझं काही बरंवाईट झालं असतं, या विचाराने ते अपराधी झाले."

"माझ्या आईला हृदयविकाराचा त्रास आहे आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास आहे, तर ही बातमी ऐकल्यावर ती तत्काळ बेशुद्ध पडली," असं शरिफा सांगते. "मी जिथे होते त्याच रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं आणि ती तिथेच मरण पावली. आता मी माझ्या आईच्या आईसोबत राहते." शरिफाच्या आईचं निधन झाल्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं.

"ते माझ्याकडे पैसे पाठवतात. माझे व माझ्या आईचे अनुभव पाहून मी कायदा शिकायचा आग्रह धरला."

एल्दन्बौकी व त्यांच्या चमूने आयोजित केलेल्या खतनासंदर्भातील जागृतीच्या कार्यशाळांना व व्याख्यानांना शरिफा तिच्या मैत्रिणींसोबत उपस्थित राहिली.

"खतनाविरोधी जागृती करण्यासाठी त्यात मी विशेष अभ्यास करणार आहे," असं शरिफा सांगते.

बरंच काही करण्यासारखं आहे, असं एल्दन्बौकी सांगतात.

एका 13 वर्षीय मुलीवर खतनाची शस्त्रक्रिया केल्याबद्दल एका डॉक्टरला 2013 साली तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. एल्दन्बौकी त्या मुलीच्या आईला व शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला एल्दन्बौकी भेटले आहेत. "लोकांचा त्या डॉक्टरवर विश्वास आहे. तो दोन डॉलरांमध्ये शस्त्रक्रिया करतो. ईश्वराला आनंदी करण्यासाठी आपण हे करत असल्याचं तो म्हणतो," असं एल्दन्बौकी सांगतात.

"यात काही गुन्हा नाही, असं तो डॉक्टर म्हणतो. त्या मुलीच्या पायांमध्ये काही वाढ झाली होती आणि त्याने प्लास्टिक सर्जरी केली, खतना केलेला नाही, असं तो म्हणतो."

खतना केल्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला, तरी आपण काही चुकीचं केलेलं नाही, असं तिची आई म्हणते, असंही ते सांगतात.

"आम्ही त्या आईला भेटलो आणि विचारलं: 'तुमची मुलगी आता जिवंत असती तरी तुम्ही खतना केला असतात का?' त्यावर ती आई म्हणाली, 'होय, खतना केल्यावर तिचं लग्न करून देता येतं.'"

जमिलाची कहाणी: 'माझी खतना झाल्यानंतर मला सुईणीची भीती वाटायची'

एकोणचाळीस वर्षांच्या जमिलाची (नाव बदललं आहे) खतना झाला तेव्हा ती नऊ वर्षांची होती.

"उन्हाळ्याची सुट्टी सुरू होती, आणि माझी आई एका वृद्ध सुईणीला घेऊन आली आणि आमच्या शेजारच्या दोन बायकाही आल्या. आईने सगळी तयारी केली आणि मला त्या बायकांसोबत खोलीत एकटं सोडून गेली," असं जमिला सांगते.

"मी आत गेले, त्यांनी माझी चड्डी काढली आणि दोघींनी माझा एकेक पाय धरला. सुईणीकडे एक छोटं ब्लेड होतं, ते वापरून तिने माझा 'हा' भाग कापून टाकलं, झालं," ती सांगते. "काय होतंय ते बघायची माझ्या आईला भीती वाटत होती, म्हणून ती तिथे थांबली नाही."

अतोनात वेदना आणि त्या कृतीमुळे मनावर उमटलेला ओरखडा, यामुळे आपण बदलून गेल्याचं जमिला सांगते.

आधी ती शाळेत स्पष्टवक्ती, धाडसी व चुणचुणीत मुलगी म्हणून वावरत होती, पण त्या शस्त्रक्रियेनंतर सगळंच बदलून गेलं, असं ती सांगते. आता ती प्रौढ स्त्रियांना टाळायला लागली.

"दुर्दैवाने मी प्राथमिक शाळेत होते तेव्हा वाटेतच ही सुईण मला भेटायची. त्यानंतर मी तिला टाळण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागले. ती पुन्हा माझ्याबाबतीत तसंच काहीतरी करेल, असं मला वाटायचं."

नवऱ्यासोबत शरीरसंबंध येतो तेव्हा अजूनही जमिलाला वेदना जाणवतात.

"आधीच आयुष्यात खूप ताण झालेला आहे आणि सेक्स हे आणखी एक ओझं वाटतं. कदाचित मला ते सुखकारक वाटलं असतं, त्यातून किमान मला मोकळं व्हायला मदत झाली असती. आता त्यात केवळ कटकट होते."

आपल्या मुलीला या अनुभवातून जाऊ द्यायचं नाही, असा निर्धार जमिलाने केला आहे. डब्ल्यूसीजीएलएच्या अनेक कार्यशाळांना उपस्थित राहिल्यानंतर तिने स्वतःच्या घरीही एल्दन्बौकी यांच्या व्याख्यानांचं आयोजन केलं.

"माझ्या मुलीला अशा प्रसंगापासून दूर ठेवणं मला शक्य झालं, याचं मुख्य कारण एल्दन्बौकी आहेत असं मला वाटतं. माझा नवराही आमच्या सोबत व्याख्यानांना हजर असायचा, आणि त्याच्या कुटुंबियांनी तरुण मुलींना या प्रथेपासून दूर ठेवलं होतं."

दरम्यान, या परंपरेविरोधातील या मोहिमेमुळे आपल्याला बराच छळ व अडथळे सहन करावे लागतात, असं एल्दन्बौकी सांगतात.

"खतनासंदर्भात जागृती करण्यासाठी आम्ही एक कार्यशाळा घेत होतो, तेव्हा एका माणूस माझ्यापाशी आला नि माझ्यावर थुंकत म्हणाला, 'तू आमच्या मुलींनी अमेरिकेतल्यासारखं वेश्या करतोयंस.'"

पण बदलही घडायला सुरुवात झाली आहे, असं जमिला म्हणतात.

"आपल्या मुलींना अशा विधीमधून जायला लावणाऱ्या लोकांची संख्या कमी होते आहे. नववीत असणाऱ्या माझ्या मुलीला मी याबद्दल सगळं सांगते. तिने शाळेत खतनाविषयी निबंधही लिहावा, असं मी तिला प्रोत्साहन देते."

आपली आई बीबीसीशी बोलत असताना शेजारी बसलेली जमिलाची मुलगी हे ऐकत होती.

संयुक्त राष्ट्रांच्या बालविषयक उपक्रमांचं नियोजन करणाऱ्या युनिसेफ या संस्थेच्या म्हणण्यानुसार, इजिप्तमधील 87 टक्के मुली आणि 15 ते 49 वर्षांच्या महिला खतनाला सामोरं गेल्या आहेत. 'ही एक धार्मिक गरज आहे,' असं 50 टक्के इजिप्तिशयनांना वाटतं.

(बीबीसी अरेबिकच्या रीम फॅटलबॅब यांच्या सहकार्याने हा लेख लिहिण्यात आला आहे.)

(रेखाटनं- जिला दस्तमल्ची)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)