You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्सवेड्या आरोपीने भरथंडीत तासभर अंघोळ केली आणि....
- Author, भार्गव पारिख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
थंडीचे दिवस होते. अहमदाबादच्या कनभा गावात वॉचमनचं काम करणारा एक व्यक्ती त्या दिवशी भर थंडीत तासभर आंघोळ करत होती.
एरव्ही हा चौकीदार पाच मिनिटांत त्याची आंघोळ आटपायचा. पण असं त्या दिवशी असं काय घडलं की तो थंडीतही तासभर आंघोळ करत होता?
कनभामध्ये काही दिवसांपूर्वी दोन महिलांच्या हत्येची घटना समोर आली होती.
आठवडाभर तपास करूनसुद्धा कोणतेच धागेदोरे हाती लागत नव्हते.
अखेर, पोलिसांना एक टीप मिळाली की एक चौकीदार लाकूड तोडण्यासाठी आलेल्या बहिणींसोबत कपडे धुत असे, पण आज त्याने स्वतःचे कपडे धुतले.
पाच मिनिटांत आंघोळ करणाऱ्या या माणसाला त्या दिवशी तासाभराचा कालावधी लागला. पोलिसांना हाच प्रकार संशयास्पद वाटला.
संशयावरुन पोलिसांनी संबंधित चौकीदाराची चौकशी केली असता त्यानेच सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.
महिला शरीरसंबंध ठेवण्यासाठी तयार नव्हत्या, त्यासाठीच आपण त्यांची हत्या केली, हे चौकिदाराने अखेर मान्य केलं आहे.
अहमदाबादच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक के.एस. सिसोदिया यांनी याविषयी माहिती दिली आहे.
कनभा गावात लाकूड विकणाऱ्या दोन महिलांची धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला होता. त्यांचे मृतदेह नदीच्या पात्रातच सापडले. जवळपासच्या आजूबाजूच्या झाडाझुडपांमध्ये पायांचे ठसे नव्हते.
सापडलेल्या इतर गोष्टींचा माग काढला असता ते आसपासच्या गुराख्यांचे असल्याचं समोर आलं.
पीएस सिसोदिया पुढे म्हणतात, “श्वानपथक सुद्धा आरोपीचा माग काढण्यात अयशस्वी ठरले. अशा स्थितीत कुणावर पाळत ठेवणंही शक्य नव्हतं.”
या प्रकरणात पोलिसांनी मृत गीताबेन ठाकोर आणि मंगीबेन ठाकोर यांच्या खूनाबाबत अहमदाबातमधील दाभोडा तसंच घुमा गावातही तपास केला. पण तिथूनही त्यांना कोणताच सुगावा मिळाला नाही.
अखेर, पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांशी, नदीच्या खोऱ्यात लाकूड गोळा करणाऱ्या लोकांशी, तसंच गुराख्यांशी संवाद साधला.
सिसोदिया यांनी सांगितलं, “दोन आठवड्यांनंतर आम्हाला लोकांकडून माहिती मिळाली की भुलवडी गावातील कुरणात या दोन महिला पहाटे लाकूड गोळा करत होत्या. त्यावेळी येथील शेतात काम करणाऱ्या रोहित चुनारा (48) याने गीताबेनसोबत गैरवर्तणूक केली.
लाकूड तोडण्याच्या बदल्यात लैंगिक संबंधांची मागणी त्याने त्यांच्याकडे केली.
गीताबेन यांनी त्यास नकार देऊन गावकऱ्यांना सांगितलं.
यासंदर्भात पोलिसांनी अधिक तपास केला असता, या प्रकारानंतर गावकऱ्यांनी रोहितला गावातून हाकलून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर रोहित हा येथून काही अंतरावर असलेल्या लांबा गावात काम करू लागला होता. तिथेही महिलांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपांवरून गावकऱ्यांनी त्याला गावातून बाहेर काढलं होतं.
पोलिसांनी पुढे सांगितलं, “रोहितच्या एका नातेवाईकाने आम्हाला सांगितलं की रोहितने आपल्या भावाच्या पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याचे वडील चतुरभाई यांनी त्याच्या चांगलंच फटकावलं. यानंतर झालेल्या झटापटीत रोहितने वडिलांचा कान कापून टाकला होता.”
पाच मिनिटांच्या आंघोळीला एक तास
स्थानिक शेतमजूरांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा व्यसनाधीन झाला होता. तो लोकांकडून पैसेही उकळण्याचा प्रयत्न करायचा. पैसे न दिल्यास मारहाण करायचा.
त्याची पत्नीसोबतही भांडणे व्हायची.
मजुरांनी पुढे सांगितलं की रोहित हा शेतातील बोअरिंग मशीनवर दररोज दोन ते पाच मिनिटे आंघोळ करायचा.
पण, खूनाच्या दिवशी त्याची वागणूक विचित्र होती. त्याने भर थंडीतही सुमारे तासभर आंघोळ करण्यात घालवला.
त्या दिवशी तो बराच वेळ कपडेही धुत होता. त्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसल्याची माहिती शेतमजूरांनी पोलिसांना दिली.
याबाबत चौकशी करताना त्याने पोलिसांना सशांची शिकार केल्याचा बहाणाही केला होता. पण तपासात सशाचा मागमूसही न आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.
पोलिसांनी रोहितची चौकशी सुरू केल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण अखेर, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
‘मी वडिलांचा कान कापला’
अहमदाबाद क्राइम ब्रँचचे रोहित चुनारा कबुलीजबाबात म्हणाला, “मी अनेक महिलांना धमकावून त्यांच्याशी धमकावून शारीरिक संबंध ठेवले आहेत. एखाद्या महिलेने माझं म्हणणं ऐकलं नाही तर तिला लाकूडतोडी करू देणार नाही, असं मी म्हणायचो. तुझी हत्या करेन, अशी धमकीही मी देत होतो.
रोहित पुढे म्हणाला, “मी माझ्या भावाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिने नकार दिल्यावर मी तिला मार दिला. नंतर त्याबाबत पंचायतीमध्ये तक्रार करण्यात आली. मला दंडही ठोठावण्यात आला. त्या दिवशी माझ्या वडिलांशी माझं भांडण झालं, त्यादरम्यान मी त्यांचा कान कापला.
रोहितने आपल्या हत्येच्या घटनाक्रमाबाबत सांगताना म्हटलं, “गीताने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. शिवाय, गावकऱ्यांकडे तक्रारही केली. त्यामुळे मी तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मला सुरुवातीला वाटलं की ती घाबरून पळून जाईल. पण तिने माझा प्रतिकार केला. त्यामुळे मी तिला मारून टाकलं. तो पुढे म्हणाला, “मी गीताला मारत असताना मांगीबेनने ते पाहिलं. त्यामुळे मी तिचाही खून केला.”
"कपड्यांवरील रक्ताच्या डागांसाठी मी सशाच्या शिकारीची कहाणी रचली. दोन आठवडे मी पकडलो गेलो नाही. पोलीस गावात लोकांना मारहाण करत होते. त्यामुळे मी सौराष्ट्रात पळून जाण्याचा विचार करत होतो.
पण माझे शेठ लग्नाला बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ते आल्यानंतर माझा पंधरा दिवसांचा पगार घेऊन मी पळून जायच्या विचारात होतो. मात्र, त्याआधीच पकडलो गेलो.
दोन महिलांच्या खूनाच्या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत सर्वत्र चर्चाही होताना दिसत आहे.
यासंदर्भात बीबीसीशी बोलताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योतिक भाचेक म्हणाले, “अशा लोकांची मानसिकता अशी असते की त्यांची लैंगिक इच्छा कोणत्याही किंमतीत पूर्ण झालीच पाहिजे. इच्छा पूर्ण न झाल्यास ते हिंसक बनतात. कमकुवत व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. असं केल्यास त्यांना आसुरी आनंद मिळतो.”
शिवाय, समाजात गरीब वर्गात जेव्हा महिलांवर लैंगिक अत्याचार होतात तेव्हा पुरुषांपेक्षा महिलांनाच अधिक दोषी मानलं जातं. यामुळेही अशा प्रकरणांची संख्या वाढताना दिसते.
भाचेक पुढे म्हणतात, “काही गावातील काही जातींमध्ये अशा प्रकारांनंतर स्थानिक पंचायतींनी शिक्षा देण्याची प्रथा पाळली जाते. पण यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे असे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना कायद्याची भीती राहत नाही.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)