लग्नानंतर जोडप्यामध्ये लैंगिक संबंध नसले तर घटस्फोट होऊ शकतो, जाणून घ्या कारणं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, उमंग पोद्दार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
16 जून रोजी कर्नाटक हायकोर्टाने एक निर्णय दिला. ‘हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहित जोडप्यामध्ये लैंगिक संबंध नसणं हे घटस्फोटाचे कारण असू शकते. पण भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत ते क्रौर्य मानलं जाणार नाही.’
भारतीय कायदा असो किंवा न्यायालयांचे निर्णय, दोघांच्याही मते, वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील लैंगिक संबंध महत्त्वाचे मानले जातात.
जर जोडीदारापैकी एकाने आपल्या जोडीदारासोबत दीर्घकाळ लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर ते क्रौर्य मानले जाईल आणि लैंगिक संबंध नसणे घटस्फोटाचे कारण होऊ शकते, असं न्यायालयांनी त्यांच्या निर्णयांमध्ये अनेकदा सांगितलं आहे.
पण अनेक तज्ञांच्या मते, या कायदेशीर तरतुदीचा पुरुषांकडून अधिक वापर केला जातो. कारण वैवाहिक जीवनात सामान्यतः पतीला लैंगिक सुख देणं हा पत्नीचा धर्म मानला जातो.
लग्नानंतरच्या लैंगिक संबंधांची आणखी एक बाजू आहे. स्त्रियांनी लग्नानंतर त्यांच्या पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, या विचारांमुळे विवाहांतर्गत बलात्कार किंवा विवाहात बळजबरी देखील या मताला प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे.
अशा किचकट प्रश्नांबाबत कायदे काय सांगतात, याविषयी आपण या लेखात समजून घेऊ.
वैवाहिक नात्यातील पूर्णत्व
कर्नाटक उच्च न्यायालयासमोर जो खटला आला होता त्यामध्ये संबंधित जोडप्याने डिसेंबर 2019 मध्ये लग्न केलं होतं.
लग्नानंतर पत्नी 28 दिवस पतीसोबत राहिली. पण एवढे दिवस राहूनही पतीसोबत शारीरिक संबंध झाले नसल्याचे सांगत तिने पतीचे घर सोडले.
फेब्रुवारी 2020 मध्ये महिलेने दोन गुन्हे दाखल केले. पहिला अर्ज हा विवाह संपवण्याचा होता. आणि दुसरा गुन्हा IPC कलम 498A अंतर्गत दाखल करण्यात आला.
IPCच्या या कलमात पती आणि त्याच्या कुटुंबाकडून पत्नीचा छळ होण्यापासून रोखण्याची तरतूद आहे.
त्या महिलेने केलेल्या आरोपांनुसार, तिचा नवरा ब्रह्मकुमारी समुहाचा अनुयायी आहे. जो ब्रह्मचर्याचं पालन करतो.
तसंच माहेरकडून फ्रीज, सोफा सेट आणि टेलिव्हिजन आणल्याशिवाय पती आपल्यासोबत लैंगिक संबंध ठेवणार नसल्याचाही तिने आरोप केला.
नोव्हेंबर 2022 मध्ये दोघांचे लग्न संपुष्टात आले.
शारीरिक संबंध न ठेवणे हे क्रौर्य आहे आणि ते घटस्फोटाचं वैध कारण असल्याचं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं.
पण, IPC अंतर्गत महिलेवर कोणतेही क्रूरपणा केल्याचा कोणताही पुरावा नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
वैवाहिक जीवनात सेक्स न करणं याकडे दोन बाजूंनी पाहिलं जातं.
जर पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाच्या नपुंसकतेमुळे लैंगिक संबंध शक्य नसेल तर हिंदू कायद्यानुसार असा विवाह रद्द ठरवला जाऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
याचा अर्थ पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही घटस्फोटाची मागणी करू शकतात.
जर लग्नानंतर पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले असतील. पण नंतर जोडीदारांपैकी एकाने दुसर्याला लैंगिक संबंधांपासून वंचित ठेवलं तर त्या कारणावरून घटस्फोट मागितला जाऊ शकतो.
लैंगिक सुखापासून वंचित ठेवून अत्याचार केला आहे हा त्या घटस्फोटाचं कारण ठरू शकतं किंवा तिच्यावर अत्याचार केला आहे या आधारावर दोघांपैकी एकाने घटस्फोट मागू शकतो.
‘सेक्सपासून जोडीदाराला वंचित ठेवणं,’ हा सर्व धर्मातील लोकांसाठी घटस्फोटाचा कायदेशीर आधार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
वैवाहिक जीवनातील क्रूरतेसाठी शिक्षेचीही तरतूद आहे.
जर पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा नातेवाईकांनी पत्नीवर असा अत्याचार केला. त्यामुळे पत्नीचे आरोग्य धोक्यात आले. पैसे आणि मालमत्तेची बेकायदेशीर मागणी पूर्ण करण्यासाठी पत्नीवर दबाव आणला. तिला त्रास दिला. तर त्यांच्यासाठी या IPC च्या कलम 498A मध्ये शिक्षेची तरतूद आहे.
न्यायालयाचा निर्णय
हिंदू विवाह कायद्यांतर्गत, लग्नानंतर दीर्घकाळापर्यंत जोडीदाराला लैंगिक संबंधांपासून वंचित ठेवणं ही क्रूरता असल्याचा न्यायालयांनी अनेकदा निर्णय दिला आहे. तसंच घटस्फोटासाठी हे एक वैध कारण असू शकते.
मे महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका पुरुषाला घटस्फोट मंजूर केला होता. त्यामध्ये पत्नी वेगळी राहत असल्याने आमचं लग्न पूर्णपणे तुटल्याचा दावा पतीने केला होता. त्या काळात त्यांच्यात कोणतेही लैंगिक संबंध नव्हते, असंही पतीने म्हटलं होतं.
2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात असेही म्हटलं होतं की, शारीरिक किंवा आरोग्याची कोणतीही समस्या नसतानाही जोडीदारापैकी कोणीही दीर्घकाळ एकतर्फी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर तो मानसिक छळ ठरू शकतो.
लैंगिक संबंध किती कालावधीसाठी नाकारणं हे क्रूरतेचं कारण ठरू शकतं हे प्रकरणातील तथ्यांवर अवलंबून असेल, असं न्यायालयाने सांगितलं.
2012 च्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने एका पुरुषाला घटस्फोट मंजूर केला. त्याने दावा केला होता की त्याच्या पत्नीने पाच महिन्यांच्या कालावधीत केवळ 10-15 वेळा त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते.
सेक्स करताना त्याची पत्नी 'प्रेतासारखी' निपचीप पडायची.’ लग्नाच्या पहिल्या रात्री पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देऊन पत्नीने 'क्रूर कृत्य' केल्याचेही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले होते.
आपल्या निर्णयात न्यायमूर्तींनी असेही म्हटले होते की, ‘आजकाल लग्नानंतरही लैंगिक संबंध न ठेवणं हे एखाद्या साथीसारखं पसरू लागलं आहे.’

फोटो स्रोत, Getty Images
'सेक्सचे पावित्र्य आणि त्यातून वैवाहिक नातेसंबंधात येणारी नवी ऊर्जा कमकुवत होत असल्याचं निरीक्षणही न्यायाधीशांनी नोंदवलं.
पण विवाहाच्या पहिल्या वर्षात कायद्याने जोडप्याला केवळ त्यांच्या नात्यात अत्यंत क्रूरता असेल किंवा जोडीदारांपैकी एकाने चारित्र्यहीन स्वभावाचे, गैरवर्तन केले असेल तरच घटस्फोट घेण्याची परवानगी दिली आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की, जर एखाद्या जोडप्याने लग्नाच्या पहिल्या वर्षाच्या आत सेक्स नाकारल्याच्या आधारावर घटस्फोट मागितला तर त्या आधारावर निर्णय घेता येणार नाही.
पुरुष आणि स्त्रियांना वेगवेगळे कायदेशीर मार्ग
शारीरिक संबंधांपासून वंचित राहण्याच्या कारणावर घटस्फोट घेण्याचा पर्याय पती-पत्नी दोघांनाही उपलब्ध आहे. पण पुरुष घटस्फोटासाठी या मुद्द्याचा अधिक आधार घेत असल्याचं कायदेतज्ज्ञांचे म्हणणं आहे.
मुंबईस्थित महिला हक्क वकील वीणा गौडा म्हणतात, "सर्वसाधारणपणे महिला लैंगिक संबंध नाकारणे 'क्रूरता' मानत नाहीत. पण, पुरुष हे अत्याचार मानतात.”
अशा दहा प्रकरणांपैकी आठ किंवा नऊ तक्रारी पुरुषांकडून येतात, येत असल्याचं महिला हक्कांसाठी लढणाऱ्या वकील फ्लेव्हिया ऍग्नेस सांगतात.
त्या म्हणतात, “घटस्फोटाचा हा आधार महिलांसाठी घातक आहे. कारण, हे घटस्फोट टाळण्यासाठी महिलांना सेक्स करण्यास भाग पाडते.”
वीणा गौडा यांच्या म्हणण्यानुसार, जरी महिलांनी घटस्फोटासाठी याचा आधार घेतला तरी त्यांना आणखी कारणे द्यावी लागतात. महिलेवर शारीरिक अत्याचार होत नाहीत किंवा नवऱ्याचे दुस-या स्त्रीशी प्रेमसंबंध आहे, हे दावे केले नाहीत तोवर पत्नीला घटस्फोट मिळत नाही.
विवाहानंतर लैंगिक संबंधापूर्वी संमती
याचा अर्थ पुरुष आपल्या जोडीदारावर लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडू शकतो का?
आदर्श परिस्थितीत या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असं आहे.
जर एखाद्या पतीने आपल्या पत्नीला त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि बळजबरी केली तर ते हिंदू विवाह कायदा आणि भारतीय दंड संहिता या दोन्ही अंतर्गत ते कृत्य क्रूरता मानले जाईल. ते घटस्फोटाचे कारणही असू शकते.
2021मध्ये केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार जर एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीसोबत तिच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवले तर ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे क्रूरता मानले जाईल.
सध्या भारतात विवाहांतर्गत बलात्कार मागला जात नाही.
विवाहित नातेसंबंधात लैंगिक संबंध ठेवणे हे स्त्रीचे कर्तव्य मानले जाते. अनेक महिला हक्क कार्यकर्त्यांनी या कायदेशीर अपवादावर कडाडून टीका केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका आणि कौटुंबिक कायद्यातील तज्ज्ञ सरसू एस्थर थॉमस म्हणतात, 'अशा अनेक बाबींमुळे (जसे की पतीला पाहिजे तेव्हा लैंगिक संबंध ठेवण्याचा अधिकार) न्यायालय विवाहांतर्गत बलात्कार मान्य करत नाही.
गेल्यावर्षी दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालात न्यायाधीशांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली होती.
त्यामध्ये विवाहित जोडप्यामध्ये सहमती नसताना केलेल्या सेक्सला बलात्कार मानावे की नाही यावर विभाजित निर्णय दिला होता. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
विवाहांतर्गत बलात्कार हा इतर बलात्काराच्या बरोबरीचा मानला जात नाही. तरीही यासाठी IPCच्या विविध कलमांतर्गत 498A प्रमाणे शिक्षा दिली जाऊ शकते.
लिव्ह-इन रिलेशनशिपची स्थिती काय आहे?
लिव्ह-इन संबंध बेकायदेशीर मानले जात नाहीत. पण त्यांचे नियमन करण्यासाठी कोणताही कायदा नाही.
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये सेक्सचा मुद्दा अनेकदा उपस्थित झाला आहे. विशेषतः जेव्हा असे संबंध लग्नात बदलत नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेला लग्नाचे खोटे वचन दिले. ते त्याने पूर्ण केले नाही आणि त्या वचनामुळे महिलेने सेक्ससाठी सहमती दिली तर असे लैंगिक संबंध IPC अंतर्गत बलात्कार मानले जातील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








