अनिल अंबानी : एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत असूनही फासे कसे उलटे पडत गेले?

अनिल अंबानी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दिनेश उप्रेती
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"एकदा यश मिळालं की, पुढचं यश सहज मिळतं."

2004 मध्ये 'बीबीसी'ला दिलेल्या एका मुलाखतीत अनिल अंबानी यांनी हे वाक्य म्हटलं होतं.

अर्थात, त्यावेळी ते रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी काम करत होते, ज्याचा पाया त्यांचे वडील धीभाई अंबानी यांनी रचला होता आणि त्यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी हेही त्यांच्यासोबत होते.

परंतु, पुढच्या काही महिन्यांतच गोष्टी वेगानं बदलत गेल्या आणि रिलायन्स समूहाची वाटणी म्हणजेच त्यांचा कौटुंबिक व्यवसाय दोन भावांमध्ये विभागला गेला.

अनिल अंबानी यांना तेच मिळालं जे त्यांना हवं होतं आणि जे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी जुळत होतं. टेलिकॉम, आर्थिक सेवा आणि ऊर्जा या नव्या काळातील व्यवसायाची धुरा त्यांच्याकडे आली.

रिलायन्स समूहाचा मुख्य व्यवसाय पेट्रोकेमिकल्स होता, परंतु आत्मविश्वासाने भरलेल्या आणि उत्तम धावपटू असलेल्या अनिल यांना नव्या काळातील या व्यवसायांमध्ये जास्त प्रगतीची शक्यता दिसली.

भारतातील टेलिकॉम क्षेत्र त्यावेळी क्रांतीच्या उंबरठ्यावर होता. त्याचबरोबर ऊर्जा, विमा आणि आर्थिक सेवा क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी आपले दरवाजे उघडत होता. अशा काळात अनिल अंबानी यांनी 2006 मध्ये अनिल धीरूभाई अंबानी ग्रूप (एडीएजी) सुरू केलं.

खूप सारे तज्ज्ञही अनिल यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहावर विश्वास ठेवून होते. 2008 मध्ये त्यांनी रिलायन्स पॉवरचा आयपीओ लाँच केला.

हा भारतीय शेअर बाजारासाठी एक ऐतिहासिक क्षण होता, कारण काही मिनिटांतच आयपीओ ओव्हरसबस्क्राइब म्हणजे उपलब्ध शेअरपेक्षा खूप जास्त मागणी झाली होती. जे शेअर ऑफर करण्यात आले होते, त्याच्या सुमारे 69 पट जास्त लोकांनी शेअर्ससाठी पैसे लावले.

त्यावेळचा हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ होता. 2008 मध्ये फोर्ब्स मॅगझिनच्या एका सर्वेक्षणात अनिल अंबानी 42 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानी होते.

आणि फासे उलटे पडत गेले...

पेन्सिल्वेनिया विद्यापीठातील व्हार्टन येथून एमबीए केलेल्या अनिल अंबानींनी पॉवर कंपनी सुरू केली. परंतु, त्यांचे मोठ्या भावाशी म्हणजेच मुकेश अंबानींबरोबरचे वाद संपले नाहीत आणि या व्यवसायामध्ये अडथळे आले.

ज्येष्ठ बिझनेस रिर्पोटर पवन कुमार म्हणतात, "अनिल अंबानींनी दादरी गॅस प्रकल्प सुरू केला. त्यासाठी कृष्णा-गोदावरी बेसिन (केजीडी-6) येथून स्वस्त दरात गॅस मिळणार होता. परंतु, केजीडी-6 चे मालकी हक्क मुकेश अंबानी यांच्याकडे होते आणि त्यांनी स्वस्त दरात गॅस देण्यास नकार दिला. हा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला."

2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला की, दोन्ही भावांनी (अनिल आणि मुकेश) कुटुंबाचा करार नव्याने ठरवावा. तसेच, गॅसचे दर ठरवण्याचा हक्क सरकारला दिले.

नव्या करारानुसार, गॅसची किंमत 4.2 डॉलर प्रति एमएमबीटीयू (दशलक्ष मेट्रिक ब्रिटिश थर्मल युनिट) ठरवली गेली, तर 2005 मध्ये दोघा भावांनी 17 वर्षांसाठी गॅसची किंमत 2.34 डॉलर प्रति एमएमबीटीयू ठरवली होती.

ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याशिवाय, अनिल अंबानींनी दक्षिण आफ्रिकेतील टेलिकॉम कंपनी एमटीएनसोबत करार करण्याचा प्रयत्न केला, पण तो करार होऊ शकला नाही. टेलिकॉममध्ये मोठ्या प्रमाणात वाढीची संधी होती, पण त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचीही गरज होती.

बिझनेस रिर्पोटर असीम मनचंदा म्हणतात, "असं वाटू लागलं की, अनिल अंबानींचे फासे उलटे पडत आहेत. अनिल मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये हात घालत होते, ज्यासाठी हजारो कोटींची गरज होती. ते परदेशांत कंपन्या विकत घेणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत होते."

नंतर 2008 मध्ये अमेरिकेमध्ये लेहमन ब्रदर्स कंपनी कोसळल्यामुळे संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडलं. अनिल अंबानीही या संकटापासून वाचले नाहीत.

पत्रकार पवन कुमार म्हणतात, "लेहमन ब्रदर्स प्रकरणानंतर भारतातही बँकिंग क्षेत्राचे नियम कडक करण्यात आले. उद्योगपतींना कर्ज मिळणं कठीण झालं. अनिल अंबानी आपला व्यवसाय वाढवत होते आणि त्यांना निधीची आवश्यकता होती. पण आता त्यांच्याकडे पैसे फारच कमी होते."

अनिल अंबानी यांचं नाव 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातही समोर आलं होतं आणि 2011 मध्ये सीबीआयनं त्यांची चौकशीही केली

लक्ष वेधून घेणारी ग्लॅमरस कार्यशैली

अनिल अंबानी जेव्हा रिलायन्स-अनिल धीरूभाई अंबानी ग्रूपचे (आर-एडीएजी) अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांची भव्य आणि लाइमलाइटमध्ये राहून काम करण्याची शैली स्पष्ट दिसू लागली. अनिल अंबानी नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत.

असीम मनचंदा सांगतात की, "अनिल अंबानी त्यांच्या टेलिकॉम व्यवसायाशी संबंधित छोट्या-मोठ्या घोषणा करण्यासाठीही पत्रकार परिषदा बोलवत असत. ते त्यांच्या अधिकार्‍यांकडून त्याचे सविस्तर प्रेझेंटेशन करून घेत."

अमिताभ बच्चन आणि अमर सिंह यांच्याबरोबर अनिल अंबानी (हा फोटो 27 जानेवारी 2004 चा आहे.)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमिताभ बच्चन आणि अमर सिंह यांच्याबरोबर अनिल अंबानी (हा फोटो 27 जानेवारी 2004 चा आहे.)

मनचंदा यांनी आठवण सांगितली. ते म्हणतात, "दिल्लीच्या संचार भवनला कामानिमित्त ते वारंवार जात असत. मग ते कधी कधी संचार भवनच्या मागील बाजूस असलेल्या यूएनआय या वृत्तसंस्थेच्या कॅन्टीनमध्ये जाऊन पत्रकारांचीही भेट घ्यायचे."

त्यांची अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांशी जवळीकता होती आणि समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांच्यासोबतही ते अनेकदा दिसायचे.

अनिल यांचा बॉलिवूडशी जुना संबंध होता, त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री टीना मुनीमशी 1991 मध्ये लग्न केलं होतं. आपला व्यवसाय वाढवत असताना अनिल अंबानींनी मनोरंजन क्षेत्रातही पाऊल ठेवलं.

त्यांनी हॉलिवूडचे प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या ड्रीमवर्क्स स्टुडिओसोबत भागिदारी करून चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी मल्टिप्लेक्स चेन 'अ‍ॅडलॅब्स' विकत घेतली आणि 2008 पर्यंत भारत आणि परदेशात 700 स्क्रीनसह सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स चेनचे ते मालक बनले.

रिलायन्स कम्युनिकेशन्सचं 'चुकीचं डायलिंग'

2002 मध्ये रिलायन्स इन्फोकॉमची सुरुवात झाली आणि त्यांनी सीडीएमए (कोड डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस) तंत्रज्ञान वापरलं. त्यावेळी त्यांच्या स्पर्धक एअरटेल आणि हचिसनच्या जीएसएम (ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाइल) तंत्रज्ञानापेक्षा हे नवीन आणि चांगलं तंत्र आहे, असा दावा करण्यात आला होता.

परंतु, सीडीएमए तंत्रज्ञान फक्त 2G आणि 3G पर्यंतच मर्यादित होतं. भारतात 4G आणि नंतर 5G सेवा सुरू झाल्या, तेव्हा रिलायन्स कम्युनिकेशन्स खूप मागे पडू लागली. शेवटी कंपनीने टेलिकॉम व्यवसायातून बाहेर पडणंच योग्य समजलं.

एकेकाळी जगातील टॉप 10 अब्जाधीशांपैकी एक असलेले अनिल अंबानी सध्या आयुष्यातील सर्वात वाईट काळातून जात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकेकाळी जगातील टॉप 10 अब्जाधीशांपैकी एक असलेले अनिल अंबानी सध्या आयुष्यातील सर्वात वाईट काळातून जात आहेत.

अनिल अंबानींनी सप्टेंबर 2018 मध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर धारकांच्या वार्षिक बैठकीत सांगितलं की, 'आम्ही ठरवलं आहे की, आपण या क्षेत्रात आता पुढे जाणार नाही.'

परंतु, यानंतरही अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नव्हत्या.

असीम मनचंदा सांगतात, "अनिल अंबानी यांनी आपली टेलिकॉम मालमत्ता मोठे बंधू मुकेश यांच्या रिलायन्स जियोला 18,000 कोटींना विकण्याचा करार केला होता.

पण हा करार पुढे गेलाच नाही. कारण दूरसंचार विभागाने जियोला रिलायन्स कम्युनिकेशन्सची थकबाकी भरण्यास सांगितलं, आणि जियोने ते मान्य केलं नाही.'"

'राफेल'मधून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न

अनिल अंबानींनी 2015 मध्ये पिपावाव डिफेन्स आणि ऑफशोर इंजिनिअरिंग कंपनी 2,082 कोटींमध्ये विकत घेतली. त्यांचा डिफेन्स क्षेत्रात पाऊल टाकण्याचा मानस होता, पण या क्षेत्रातही त्यांना वादग्रस्त गोष्टींचा सामना करावा लागला.

विरोधी पक्ष काँग्रेसने अनिल अंबानींवर राफेल लढाऊ विमानाच्या ऑफसेट करारातून गैरफायदा घेतल्याचा आरोप केला.

राहुल गांधी यांनी 7 मार्च 2019 रोजी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, "अनिल अंबानींना 30,000 कोटी रुपये मिळावेत म्हणून राफेल कराराला उशीर केला. आमच्या (यूपीए) सरकारच्या करारानुसार हा करार झाला असता तर राफेल विमान आता भारतात आले असते."

राफेल विमान बनवणारी कंपनी डसॉ एव्हिएशनने 2017 मध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडला आपला ऑफसेट भागीदार बनवलं. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राफेल विमान बनवणारी कंपनी डसॉ एव्हिएशनने 2017 मध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडला आपला ऑफसेट भागीदार बनवलं. (फाइल फोटो)

खरं तर प्रश्न असा आहे की, अनिल अंबानींच्या कंपन्या बाजारातील मंदीच्या बळी ठरल्या की, त्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे ही अवस्था झाली?, हा प्रश्न आजही आहे.

पत्रकार पवन कुमार म्हणतात, "माझ्या मते ही दोन्ही कारणं होती. अनिल अंबानींना आपला व्यवसाय नीट सांभाळता आला नाही, ते त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकले नाहीत.

ते एका व्यवसायात अपयशी ठरले की लगेच दुसऱ्या व्यवसायात जात. त्यांनी नक्कीच ज्या व्यवसायांत फायदा दिसला तिथे पाऊल टाकलं, परंतु व्यवसाय चालवण्यासाठी पैशांची गरज असते, आणि नेमकं त्यांच्याकडे त्याचीच कमतरता होती."

कंपन्यांची वाईट परिस्थिती

एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेले अनिल अंबानी यांच्याविरुद्ध आता कर्ज फसवणुकीपासून ते मनी लाँड्रिंगपर्यंतचे खटले प्रलंबित आहेत.

वर्ष 2020 मध्ये चीनच्या बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या वादावर इंग्लंडच्या उच्च न्यायालयात सुनावणी झाली, तेव्हा अनिल अंबानींनी ते दिवाळखोर झाले असल्याचे जाहीर करत कर्ज फेडण्यास असमर्थता दाखवली.

अनिल अंबानी

फोटो स्रोत, Getty Images

अनिल अंबानी यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं होतं की, "अनिल अंबानींची एकूण संपत्ती सध्या शून्य आहे, ते दिवाळखोर आहेत. म्हणून ते उर्वरित पैसे देऊ शकत नाहीत. त्यांच्या कुटुंबातील लोकही त्यांना मदत करू शकणार नाहीत."

अनिल अंबानी यांच्या कंपन्यांशी संबंधित सुमारे 17,000 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीची चौकशी सुरू आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल अंबानींची चौकशी केली आहे.

यामुळे त्यांच्या समूहाच्या कंपन्यांच्या शेअरधारकांना मोठा धक्का बसला आहे आणि अनिल अंबानी यांच्या स्वतःचे उरलेल्या भागभांडवलाची किंमतही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.

गेल्या एका महिन्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरची किंमत 28 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत मागील पाच-सहा दिवसांत सुमारे 20 टक्क्यांनी घसरली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)