डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील जनता रस्त्यावर, अनेक शहरांतील आंदोलनाचं कारण काय?

    • Author, ग्रेस एलिझा गुडविन
    • Reporting from, न्यू यॉर्कहुन वार्तांकन
    • Author, केटलिन विल्सन
    • Reporting from, वॉशिंग्टनहुन वार्तांकन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत.

0राजधानी वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क, शिकागो, मायामी आणि लॉस एंजेलिस सारख्या प्रमुख शहरांत लोकांनी आंदोलन पुकारलं आहे.

शनिवारी (18 ऑक्टोबर) सकाळी न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित टाइम्स स्क्वेअरमध्ये विरोधप्रदर्शन रॅलीला सुरुवात झाल्याच्या काही वेळातच हजारो लोकांनी यात सहभाग घेतला.

रस्ते आणि सबवे लोकांनी गच्च भरले होते.

अनेकांच्या हातात 'डेमोक्रसी नॉट मोनार्की' म्हणजे लोकशाही हवी राजेशाही नाही आणि 'द कॉन्स्टिट्यूशन इज नॉट ऑप्शनल' संविधान पर्यायी नाही अशा आशयाचे घोषणाफलक होते.

या निदर्शनांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी आंदोलनकर्त्यांचा संबंध डाव्या विचारसरणीच्या अँटिफा संघटनेशी आहे, असा आरोप केला.

ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलनांना 'दि हेट अमेरिका रॅली' असे म्हणत तीव्र टीका केली आहे.

तर आयोजकांनी मात्र, हे आंदोलन शांततेत पार पडल्याचं म्हटलं. आयोजकांनी त्यांच्या वेबसाइटवर 'नो किंग्ज' आंदोलन अहिंसेच्या मार्गानं करण्यात आल्याचं आणि हेच या आंदोलानाचा सिद्धांत असल्याचं नमूद केलं.

यासह, प्रदर्शनकर्त्यांनी कोणत्याही संभाव्य संघर्षाला टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं.

न्यूयॉर्कमध्ये अनेक ठिकाणी जमलेल्या गर्दीने 'धिस इज व्हाट डेमोक्रेसी लुक्स लाइक' म्हणत, घोषणांनी परिसर दणाणून टाकला. आकाशात हेलिकॉप्टर आणि ड्रोन गस्त घालत होते, तर पोलीस रस्त्यांच्या कडेला तैनात होते.

न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या (NYPD) मते, शहरात पाच ठिकाणी झालेल्या आंदोलनांत सुमारे एक लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते.

ही सर्व आंदोलनं शांततेत पार पडली आणि कोणालाही अटक झालेली नाही.

टाइम्स स्क्वेअर येथील एका पोलीस अधिकाऱ्याच्या मते, सुमारे 20 हजार लोकांनी सातव्या अव्हेन्यूवरून मोर्चा काढला.

फ्रिलान्स लेखिका बेथ झॅस्लॉफ याबाबत बोलताना म्हणाल्या की, ट्रम्प प्रशासन आणि कामकाजावर त्यांची नाराजी आहे, त्यामुळेच त्यांनी आंदोलनात भाग घेतला.

त्यांच्या मते, ट्रम्प प्रशासनाचे हे बदल एकप्रकारे 'फॅसिझम आणि हुकूमशाहीच्या दिशेने जाणारा धोकादायक टप्पा' आहे.

त्या म्हणाल्या, "मला न्यूयॉर्क शहराची खूप काळजी वाटते, पण इतक्या मोठ्या संख्येने लोक आमच्यासोबत उभे असल्याने आशेचा किरणही दिसतोय."

ट्रम्प यांच्या कोणत्या निर्णयांना विरोध?

व्हाईट हाऊसमध्ये परतल्यापासून ट्रम्प यांनी अनेक कार्यकारी आदेश जारी केले आहेत. काँग्रेसनं मंजूर केलेला निधीही त्यांनी रोखला आहे.

अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादले आहेत. तसंच नुकतेच गव्हर्नरांचा विरोध असूनही अनेक शहरांमध्ये नॅशनल गार्ड तैनात केले आहेत.

संकटात असलेल्या देशाच्या पुनर्निर्माणासाठी ही पावलं गरजेची असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.

ट्रम्प यांनीन त्यांच्यावर लावलेले हुकूमशहा किंवा फॅसिस्ट असल्याचे आरोप वेडेपणाचे असल्याचं म्हटलंय.

पण टीकाकार ट्रम्प प्रशासनानं काही घटनाबाह्य निर्णय घेतल्याचं सांगून अमेरिकेतील लोकशाहीला धोका असल्याचं म्हणत आहे.

न्यू जर्सीमधील निवृत्त अभियंते 68 मासिमो मास्कोली इटलीमध्ये लहानाचे मोठे झाले.अमेरिका 100 वर्ष जुन्या शतकातील मार्गावर चालत असल्याचं म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली.

"मी एका इटालियन नायकाचा पुतण्या आहे. ते मुसोलिनीच्या सैन्याला सोडून त्यांना विरोध करत होते. फॅसिस्टांनी त्याला छळले आणि ठार मारले. 80 वर्षांनंतर मला पुन्हा अमेरिकेत फॅसिझम दिसेल असं कधीही वाटलं नव्हतं," असं मॅस्कोली म्हणाले.

सिनेटमधील अल्पसंख्याक नेते आणि डेमोक्रॅट पक्षाच्या न्यूयॉर्कमधील चक शुमर यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

"अमेरिकेत हुकूमशहा नाही. आम्ही ट्रम्पला लोकशाही कमकुवत करू देणार नाही," असं शुमर त्यांनी X वर लिहिले.

तसंच त्यांनी फोटोही शेअर केला. त्यात आरोग्य सेवा संकटात असून ती दूर करा, अशी घोषणा लिहिलेला फलक हातात होता.

अमेरिकेसह युरोपातही अनेक शहरांत निदर्शने

अमेरिकेत अनेक ठिकाणी अशी आंदोलनं होत आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये वरमाँटचे बर्नी सँडर्स यांनी भाषण केलं.

हजारोंच्या गर्दीला संबोधित करताना ते म्हणाले की, "आम्ही अमेरिकेचा द्वेष आहे म्हणून नव्हे तर, अमेरिकेवरील प्रेमापोटी इथे आहोत."

शनिवारी सकाळी अमेरिका आणि संपूर्ण युरोपमध्ये निदर्शनं सुरू झाली. जर्मनीची राजधानी बर्लिन आणि स्पेनच्या माद्रीद आणि इटलीतील रोममध्ये आंदोलकांनी अमेरिकन नागरिकांच्या समर्थनार्थ रॅली काढली.

युकेत लंडनमधील अमेरिकन दूतावासाबाहेरही शेकडो निदर्शक जमले. तर कॅनडातील टोरंटोमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शकांनी आंदोलन केलं.

ट्रम्प यांनी याबाबत फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत या आंदोलनांवर प्रतिक्रिया दिली आहे. ती रविवारी प्रसारित होईल. रण त्याचा काही भाग शनिवारी प्रसिद्ध झाला.

"ते मला राजा म्हणत आहेत. मी काही राजा नाही. हा काही अभिनय नाही," असं ट्रम्प म्हणत असल्याचं मुलाखतीच्या प्रोमोमध्ये आहे.

नॅशनल गार्ड्सना सक्रिय राहण्याचे आदेश

सीएनएनच्या वृत्तानुसार, कॅन्ससचे सिनेटर रॉजर मार्शल यांनी आंदोलनापूर्वी म्हटलं की, "आपल्याला नॅशनल गार्डना बाहेर काढावे लागेल. सर्व काही शांततेत होईल, अशी आशा आहे. पण मला शंका आहे."

अमेरिकेतील अनेक राज्यांमधील रिपब्लिकन गव्हर्नरांनी नॅशनल गार्ड्सच्या युनिटना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पण किती सैन्य असेल हे स्पष्ट नाही.

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी गुरुवारी राजधानी ऑस्टिनमध्ये होणाऱ्या आंदोलनांपूर्वी नॅशनल गार्डना सक्रिय केलं. "अँटिफाशी संबंधित नियोजित आंदोलनामुळं" हे गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

डेमोक्रॅट्सनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

"फक्त राजे आणि हुकूमशहा शांततापूर्ण आंदोलनं दडपण्यासाठी सैन्य पाठवतात. ग्रेग अ‍ॅबॉट यांनी ते त्यापैकी एक आहेत हे सिद्ध केलं आहे," असं डेमोक्रॅट जीन वू म्हणाले.

व्हर्जिनियाचे रिपब्लिकन गव्हर्नर ग्लेन यंगकिन यांनीही नॅशनल गार्डला सज्ज करण्याचे आदेश दिले. पण, स्थानिक वृत्तांनुसार आंदोलनावेळी सैन्य उपस्थित नव्हतं असं दिसतंय.

वॉशिंग्टन, डीसीमध्ये झालेल्या आंदोलनात पोलीस होते पण सैन्य नव्हते. ट्रम्प यांच्या विनंतीवरून ऑगस्टपासून वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहे.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल जनमत विभागलेले आहे. रॉयटर्स/इप्सॉसच्या अलिकडील सर्वेक्षणानुसार राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या कामगिरीला फक्त 40 टक्के लोकांनी पाठिंबा दिला, तर 58 टक्के लोकांनी असहमती दर्शवली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.