योगी आदित्यनाथ म्हणतात तसं रामदास स्वामींनी खरंच शिवाजी महाराजांना घडवलं का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. आळंदी येथे गीता-भक्ती अमृतमहोत्सवात हे विधान केले.
याआधी अनेकांनी अशा प्रकारचे विधान केले होते.
जसा राम मंदिराचा प्रश्न आपण सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवला तसाच सौहार्दपूर्णतेने मथुरेच्या श्रीकृष्ण मंदिराचा प्रश्न मार्गी लावू असं देखील योगी आदित्यनाथ म्हणाले.
याआधी, 2023 मध्ये सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींबद्दलच्या एका व्हीडिओवरून सध्या उलटसुलट चर्चा झाली होती.
जग्गी वासुदेव यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दलचा एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.
या व्हीडिओमध्ये त्यांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या नात्यावर भाष्य केलं होतं.
त्यांनी आपल्या व्हीडिओत एक गोष्ट सांगताना म्हटलं की, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. महाराजांनी आपलं साम्राज्य त्यांच्या पायावर ठेवून तुम्ही माझं काहीही करू शकता असं म्हटलं होतं. रामदास स्वामींसोबत त्यांनी कटोरा घेऊन भिक्षा मागितली. नंतर रामदासांनी त्यांना आपल्या अंगावरील भगवं वस्त्रं दिलं आणि त्याचा वापर झेंडा म्हणून करावा असं सांगितलं.
या व्हीडिओवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
योगी आदित्यनाथ, जग्गी वासुदेव केवळ यांनीच नाही तर याआधी अनेकांनी समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते असे विधान केले होते. या विधानाला काही ऐतिहासिक पुरावा आहे का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजी महाराजांना 'जाणता राजा' ही उपाधी समर्थ रामदासांनी दिली होती, असं त्यांनी सांगितलं होतं.
हे सांगताना समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं, त्याच त्यांच्या गुरु होत्या, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झालीच नव्हती या भूमिकेप्रमाणेच समर्थ रामदास महाराजांचे गुरु होते अशी भूमिका मांडणारे लोकही महाराष्ट्रात आहेत.
बहुतांश इतिहास अभ्यासक आणि इतिहासकारांच्या मते 1672 पूर्वी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या काळात, तसेच शिवाजी महाराज यांच्या बालपणी रामदासांनी मार्गदर्शन केले असावे याबाबत पुरावे सापडत नाहीत.
'श्री शिव-समर्थ भेट' पुस्तकातील संदर्भ
श्री शिव-समर्थ भेट नावाचे पुस्तक वसंतराव वैद्य यांनी लिहिले आहे. हे पुस्तक चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत, 'शिवाजी महाराज आणि रामदास समर्थ यांची शिंगणवाडी बागेत भेट झाली. त्याजागी समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व मंदिर बांधण्यात आले' त्या निमित्ताने हे पुस्तक लिहून प्रसिद्ध होत असल्याचे चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त रा. ना. गोडबोले यांनी नमूद केले आहे. हे पुस्तक 26 एप्रिल 1990 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, CHHAPHAL SHRIRAM TRUST
या पुस्तकात शिवाजी महाराजांनी समर्थांच्या 11 मारुतींपैकी प्रत्येक मारुती देवस्थानाला 11 बिघे जमीन दिल्याचे वैद्य यांनी लिहिले (पान क्र-10) आहे.
इ. स. 1678 साली विजयादशमीच्या दिवशी चाफळच्या श्रीराम देवस्थानाला सनद दिल्याचंही ते लिहितात. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी ही सनदही पूर्ण दिली आहे.
त्यात "छ. शिवाजी महाराज यांनी श्रीसद्गुरुवर्य श्रीसकल तीर्थरुप श्रीकैवल्यधाम श्री महाराज श्रीस्वामी- स्वामींचे सेवेसी" असा मायना लिहिला आहे.
या सनदेत शिवाजी महाराज म्हणतात, "चरणरज शिवाजीराजे यानी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे मजवर कृपा करुन सनाथ केले आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्य साधना करुन धर्मस्थापना देवब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करुन पाळणरक्षण करावे हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा."

फोटो स्रोत, PUNE A.VI. GRIHA
या सनदेत शिवाजी महाराज पुढे लिहितात, "याउपरी राज्य सर्व संपादिले ते चरणी अर्पण करुन सर्व काळ सेवा घडावी असा विचार मनी आणिला तेव्हा आज्ञा जाहली की तुम्हास पूर्वी धर्म सांगितले तेच करावेस तीच सेवा होय." म्हणजे महाराजांनी आपले राज्य समर्थांना अर्पण केल्याचा उल्लेख केल्याचे वैद्य यांनी लिहिले आहे.
या पुस्तकाच्या पान क्रमांक 11 वरती सनदेचा सर्व अर्थ त्यांनी स्पष्ट केला आहे. चाफळच्या सनदेचा उल्लेख द. वि. आपटे आणि रा. वि ओतुरकर यांनी महाराष्ट्राचा पत्ररुप इतिहास या पुस्तकातही केला आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी मात्र चाफळच्या या सनदेवर शंका उपस्थित केल्या आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलेलं, "चाफळची सनद खरी नसल्याचं इतिहाससंशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनीही म्हटलं आहे. वैराग्य आलेल्य़ा, सणसमारंभात भाग न घेणाऱ्या आपले बंधू व्यंकोजीराजे यांना शिवाजी महाराज यांनी याच काळात पत्र लिहिलं होतं. वैराग्य वगैरे उतारवयातल्या गोष्टी आहेत, आता पराक्रमाचे तमासे दाखवा असे त्यांनी या पत्रात लिहिले होते. त्यामुळे जर शिवाजी महाराज आपल्या भावाला वैराग्यापासून परावृत्त करत असतील तर ते स्वतः अशा गोष्टी करतील असे वाटत नाही. त्य़ामुळे या सनदेच्या सत्यतेबद्दल शंका येते."
जाणता राजा

फोटो स्रोत, BHAU DAJI LAD MUSEUM, MUMBAI
समर्थ रामदासांच्या मनामध्ये शिवरायांसंबंधी कोणत्या भावना आहेत ते जाणून घेऊ, असे सांगून वैद्य यांनी समर्थांनी कोणत्या शब्दांत शिवाजी महाराजांचा गौरव केला आहे ते लिहिले आहे. (पान क्र-20)
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारुअखण्ड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगीयशवन्त कीर्तिवन्त, सामर्थ्यवन्त, वरदवन्तपुण्यवन्त नीतिवन्त, जाणता राजा असे वर्णन केल्याचे वैद्य लिहितात.
ते पुढे म्हणतात, "शिंगणेवाडीचे बागेत समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराज, निळोजी सोनदेव, बाळाजी आवजी चिटणीस यांना अनुग्रह दिला."
या भेटीत केलेला उपदेश दासबोधाच्या तेराव्या दशकाचा सहावा समास असून तो लघुबोध नावाने ओळखला जातो असं ते लिहितात.
वाद उकरुन काढण्याचं काहीच कारण नाही
इतिहासअभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्यामते आजवर कोणत्याही प्रसिद्ध-प्रमुख इतिहासकार, शिवचरित्रकारांनी शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यात गुरुशिष्याचं नातं होतं असं कधीच म्हटलेलं नाही.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं, "गणेश हरी खरे, वि. का. राजवाडे, ग. भा. मेहेंदळे, बाबासाहेब पुरंदरे, सेतुमाधवराव पगडी यांच्यापैकी कोणीही समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते असं म्हटलेलं नाही. हा वाद जाणूनबुजून काढला जात आहे.
रामदास स्वामींबद्दल शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आदरभाव होता आणि रामदासांच्या मनातही शिवाजी महाराजांप्रती आदरभाव होता. त्यांनी महिपतगड आणि सज्जनगडावर (तेव्हाचे नाव परळी) समर्थ रामदासांना राहाण्याची परवानगी , शिधा उपलब्ध करण्याचे आदेश किल्लेदारांना पत्रंही पाठवली होती. त्यांच्यात गुरुशिष्य संबंध असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे याबाबद वाद उकरुन काढणं अनावश्यक आहे."
अनेक संत-महंतांशी संबंध- इंद्रजित सावंत
शिवाजी महाराज तेव्हाच्या स्वराज्यातील अनेक संत महंतांचा परामर्श घ्यायचे असे मत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलं होतं.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "पाटगावचे मौनी महाराज, रामदास स्वामी, केळशीचे याकुतबाबा अशा अनेक संत-महंतांचे शिवाजी महाराज परामर्श घ्यायचे. शिवाजी महाराजांचे कार्य 1642 साली सुरु झाले आणि त्यांची रामदासांशी भेट 1672 आधी झाली नसल्याचे स्पष्ट आहे. शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरु असल्याचा सबळ पुरावा नाही.
राज्यकर्ता म्हणून स्वराज्यातल्या संत-महंतांचा ते आदर, सन्मान करायचे हा भाग वेगळा. शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरु असते तर ते इंग्रज, पोर्तुगीज, डचांच्या नजरेतून सुटलं नसतं. त्यांनी रामदासांचा उल्लेख नक्की केला असता. नंतरच्या शतकातील ब्रह्मेंद्रस्वामींचा उल्लेख इंग्रजांनी केला आहे तसा रामदासांचा उल्लेख नक्कीच केला असता."
'ठोस पुरावा नाही'
शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट 1649 साली झाल्याचं काही बखरींमध्ये उल्लेख झाला असला तरी त्याला आधार नाही, असं मत इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी व्यक्त केलं होतं.
ते म्हणतात, "शिव-समर्थ भेटीला स्वराज्यस्थापनेशी नेऊन जोडणं अर्थहीन आहे. परंतु शिवाजी महाराजांची समर्थ संप्रदायाची 1658मध्ये पहिल्यांदा ओळख झाल्याचं दिसतं. भाटेकृत सज्जनगड व समर्थ रामदास पुस्तकात भास्कर गोसाव्यांनी दिवाकर गोव्यांना लिहिलेलं पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांकडे भिक्षेस गेलो असता त्यांनी आपण समर्थांचे शिष्य असल्याचे सांगितले. त्यावर महाराजांनी कोण समर्थ, समर्थांचे मूळ गाव व इतर चौकशी केल्याचे विचारल्याचे भास्कर गोसावी म्हणतात. भाटे यांनीही समर्थ- शिवाजी महाराज भेटीची तारिख 1672 ची दिली आहे. 1672 नंतर या दोघांचे संबंध आत्यंतिक जिव्हाळ्याचे झाले."
चाफळच्या सनदेत शिवाजी महाराजांनी समर्थांचा उल्लेख श्री सद्गुरुवर्य असा केल्याबद्दल ते म्हणतात, "चाफळ सनदेच्या मायन्यात "श्री सद्गुरुवर्य" हा मायना असला तरीही हा मायना राजकीय दृष्टीने नसून आध्यात्मिक गुरुस्थानी असलेली व्यक्ती अशा दृष्टीने आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी समर्थ रामदासस्वामींचा संबंध जोडण्यासाठी कसलाही ठोस पुरावा नसून जे पुरावे आहेत ते उत्तरकालीन बखरींचे आहेत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








