You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वामी चैतन्यानंदला आग्र्यातून अटक, शृंगेरी मठाच्या संस्थेत 17 विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचं नेमकं प्रकरण काय?
लैंगिक छळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्चचे (SRISIIM) व्यवस्थापक स्वामी चैतन्यनंद सरस्वतीला उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक करण्यात आली आहे.
स्थानिक पत्रकार नसीम अहमद यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, दिल्ली पोलिसांच्या पथकाने चैतन्यनंदला शनिवारी (27 सप्टेंबर) रात्री उशीरा आग्राच्या ताजगंजमधील एका हॉटेलमधून अटक केली.
दरम्यान, एरवी शांत असणारा दिल्लीतला शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च (SRISIIM) या संस्थेचा परिसर सध्या एका लैंगिक छळाच्या प्रकरणामुळे चर्चेत आलाय.
सुमारे 2 महिन्यांपूर्वी या संस्थेच्या व्यवस्थापकपदी राहिलेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी यांच्याविरुद्ध संस्थेत शिकणाऱ्या मुलींनी लैंगिक छळाचे आरोप केले आणि दिल्लीच्या उच्चभ्रू वस्तीत असणारी ही संस्था चर्चेत आली.
कर्नाटकातील श्री शृंगेरी शारदा पीठम या मठाकडून ही संस्था चालवली जाते.
स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावरील आरोपांमुळे शृंगेरी पीठ, पोलिस, राष्ट्रीय महिला आयोग (NCW) यांनी या घटनेची दखल घेतली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात 32 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, त्यापैकी 17 विद्यार्थिनींनी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावर लैंगिक छळ, अश्लील भाषा वापरणे, धमकावणे आणि शारीरिक संपर्क करण्याचे आरोप केले आहेत.
वसंत कुंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिते (बीएनएस) च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी एक बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेली कार देखील जप्त केली आहे. ही कार चैतन्यानंद सरस्वती यांची असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त, विद्यार्थ्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई
शारदा इन्स्टिट्यूटच्या परिसरात आम्ही गेलो तेव्हा तिथे खासगी सुरक्षारक्षकांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. संस्थेच्या आतमध्ये जाण्यास माध्यमांना मनाई करण्यात आली होती. माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी गेट समोरच्या सुरक्षाव्यवस्थेचा व्हीडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अडवण्यात येत होतं. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर संस्थेच्या बाहेर चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली.
या सुरक्षाव्यवस्थेबाबत आम्ही शेजारील इमारतीच्या सुरक्षा रक्षकांशी बोललो. तर नाव न सांगण्याच्या अटीवर ते म्हणाले की, "चैतन्यानंद प्रकरणानंतर संस्थेतील सुरक्षारक्षक बदलण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात खासगी बाउन्सर नेमण्यात आले असून आता संस्थेच्या आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक माणसाची कसून चौकशी केली जात आहे."
सुमारे डझनभर खासगी बाउन्सर संस्थेच्या गेटसमोर बसलेले आम्ही बघत होतो आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना मध्ये जाण्यास तिथे रोखलं जात होतं.
आम्ही कॅम्पसमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, ते बोलण्यास कचरत होते पण नंतर ते आमच्याशी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलायला तयार झाले.
एका विद्यार्थ्याने सांगितलं की, "शारदा इन्स्टिट्यूटमध्ये शंभराहून अधिक विद्यार्थी पदव्युत्तर व्यवस्थापन (PGDM) शिकतात. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) उमेदवारांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी देखील आहेत."
त्यांनी आमच्याशी सविस्तर बोलण्यास नकार दिला, परंतु कॅम्पसमधील वातावरण सध्या तणावपूर्ण असल्याचं त्यांनी मान्य केलं.
नेमकं काय घडलं आणि कधी?
श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च (SRISIIM) ने 24 सप्टेंबर 2025 रोजी याबाबत एक सविस्तर प्रेस नोट प्रसिद्ध केली. संस्थेचे कार्यकारी संचालक रामास्वामी पार्थसारथी यांच्या सहीनिशी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावरील गंभीर आरोपांनंतर संस्थेने केलेल्या कारवाईची आणि घटनांची सविस्तर माहिती दिली आहे.
या प्रेस नोटनुसार, स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्या गैरवर्तनाची माहिती मिळाल्यानंतर संस्थेने आणि श्री शारदा पीठम्, श्रींगेरी यांनी विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ कारवाई केली.
तज्ञांच्या मदतीने शारदा इन्स्टिट्यूट (SRISIIM) मध्ये एक संपूर्ण ऑडिट करण्यात आले, ज्यामध्ये फसवणूक, बनावट कागदपत्रं, विश्वासघात आणि आर्थिक अनियमितता उघड झाली. यानंतर 19 जुलै 2025 रोजी 300 पानांहून अधिक पुराव्यांसह एक गुन्हा दाखल करण्यात आला.
या तक्रारीनंतर 1 ऑगस्ट 2025 रोजी, शृंगेरी पीठाकडे आणखीन एक तक्रार दाखल झाली.
युनिव्हर्सिटी आउटरीच प्रोग्रामच्या संचालकांकडून हा तक्रारीचा ईमेल करण्यात आला होता. या ईमेलमध्ये या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींचा उल्लेख होता, ज्यामध्ये मनमानी निर्णय, सूडबुद्धीने केलेली वागणूक आणि रात्रीच्या वेळी मुलींना पाठवलेले अनुचित व्हॉट्सअॅप मेसेज यांचा समावेश होता.
या ईमेलनंतर, नव्याने स्थापन केलेल्या गव्हर्निंग कौन्सिलने विद्यार्थ्यांसोबत एक बैठक घेतली आणि सर्व तपशील गोळा केले. 2 ऑगस्ट 2025 रोजी पाठवलेल्या पत्रात कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आणि स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांचा श्रींगेरी पीठमशी किंवा त्याच्या संन्यासी परंपरेशी कोणताही संबंध नाही हे स्पष्ट करण्यात आले.
यानंतर, 4 ऑगस्ट 2025 रोजी पीठमचे प्रशासक पी. ए. मुरली यांनी वसंत कुंज नॉर्थ पोलीस स्टेशनमध्ये एक औपचारिक तक्रार दाखल केली, ज्यामध्ये स्वामी चैतन्यानंद सरस्वती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या छळ आणि गैरवर्तनाचे तपशील दिले गेले. यानंतर 5 ऑगस्ट 2025 रोजी आणखी एक FIR नोंदवण्यात आला आणि पोलीसांनी पीडित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली.
दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 75(2), (लैंगिक छळ) 79, (महिलेच्या लज्जेचा अपमान करणारे शब्द/हावभाव/कृत्य) आणि 351(2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत नोंदवला आहे. आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती सध्या फरार असून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
9 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या सार्वजनिक निवेदनात, स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना संचालक आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदावरून हटवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये हेही स्पष्ट करण्यात आले की शैक्षणिक कार्यक्रम सुरळीतपणे सुरू राहतील आणि विद्यार्थ्यांचे कल्याण व शिक्षण हे संस्थेचे सर्वोच्च प्राधान्य राहील.
कोण आहेत चैतन्यानंद सरस्वती?
स्वामी चैतन्यानंद सरस्वती, ज्यांचा जन्म ओडिशामध्ये झाला, हे स्वयंघोषित धर्मगुरू आणि दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचे माजी संचालक आहेत. ते कर्नाटकमधील प्रसिद्ध शृंगेरी शारदापीठाशी संबंधित आहेत.
त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोसारख्या संस्थांशी संबंधित असल्याचा दावा केला असून, अध्यात्मिक आणि शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख केला आहे.
बनावट नंबर प्लेटच्या कारचं प्रकरण काय आहे?
वसंत कुंज पोलीस ठाण्याच्या परिसरात एक लाल रंगाची आलिशान व्होल्वो कार पार्क केलेली आहे. या गाडीवर सध्या कोणतीही नंबर प्लेट नसली तरी ही गाडी कथितरित्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांची असल्याचं सांगितलं जातंय.
दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या अतिरिक्त पोलीस उपायुक्त ऐश्वर्या सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, "ऑगस्ट महिन्यात आमच्याकडे एक तक्रार दाखल करण्यात आली. आम्ही कायद्यानुसार कारवाई करत आहोत. याबाबत अगदी वेळेत एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि तपास सुरु असून सध्या विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात येत आहेत."
ऐश्वर्या सिंह पुढे म्हणाल्या, "आरोपी चैतन्यानंद सरस्वती हा वसंत कुंज परिसरातील शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापक होता. सध्या आरोपी फरार आहे आणि आम्ही त्याचा शोध घेत आहोत. या संस्थेच्या तळघरातून एक व्होल्वो कार जप्त करण्यात आली आहे. कारवर संयुक्त राष्ट्रांच्या राजनैतिक (डिप्लोमॅटिक) क्रमांकाची नंबर प्लेट होती. यासाठी बनावटीचा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
सध्या पोलीस आरोपीचा कसून तपास करत असल्याचं देखील त्या म्हणाल्या. "योग्य कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. बनावट नंबर प्लेट आणि लैंगिक छळाबाबत स्वतंत्र कलमं लावण्यात आली आहेत. संबंधित विद्यार्थिनींचे जबाब घेण्यात आले आहेत. दिल्ली पोलिस आरोपीचा शोध घेण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत आणि आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू असा आम्हाला विश्वास आहे. लैंगिक छळाची तक्रार दाखल झालेली असल्यामुळे याबाबत अधिक सविस्तर माहिती देणं योग्य ठरणार नाही," असं ऐश्वर्या सिंह यांनी सांगितलं.
सर्व पीडित विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ही संस्था नेमकी काय काम करते?
या संस्थेला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ची मान्यता आहे. कर्नाटकातील शृंगेरी मठातर्फे ही संस्था चालवली जाते.
संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ऐतिहासिक शृंगेरी शारदा पिठाशी संलग्न असणाऱ्या शंकर विद्या केंद्रातर्फे (SKV) श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट ही संस्था चालवली जाते. चिकमंगळूर जिल्ह्यात असलेलं हे पीठ शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार अद्वैत वेदांत मठांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.
शारदा इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळे पदव्युत्तर व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम शिकवले जातात. पारंपरिक भारतीय मूल्यव्यवस्था आणि आधुनिक व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम यांचा समतोल आम्ही साधत असल्याचा दावा या संस्थेकडून करण्यात येतो. संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेलं एक मोठं बॅनर देखील लावण्यात आलेलं आहे.
शारदा इन्स्टिट्यूटच्या फेसबुक पेज आणि सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये पारंपरिक भारतीय सण आणि विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचं दिसून येतं. या इमारतीत सुसज्ज एसी रूम, मोठमोठ्या प्रयोगशाळा आणि इतर आधुनिक सुविधा असल्याची माहिती तिथे काम करणाऱ्या सेवकांनी दिली.
राष्ट्रीय महिला आयोगाने काय म्हटलं?
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. महिला आयोगाने या प्रकरणात अधिकाऱ्यांकडून तीन दिवसांत 'सविस्तर स्थिती अहवाल' मागितला आहे.
या निवेदनात म्हटलं आहे की, "या प्रकरणाबाबत प्रकाशित झालेल्या बातम्यांवरून असं दिसून येतं की आरोपीने अश्लील भाषा वापरली, अश्लील मेसेज पाठवले, आक्षेपार्ह वर्तन केलं आणि संस्थेतील प्राध्यापक/कर्मचाऱ्यांनी त्याच्या बेकायदेशीर मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला."
या प्रकरणातील पीडित विद्यार्थिणींपैकी अनेकजण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळवून शिकत असल्याचं देखील महिला आयोगाने नमूद केलं आहे. यामुळे आधीच असुरक्षित असलेल्या विद्यार्थ्यांचं पद्धतशीर शोषण होत असल्याबाबत आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.
पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी म्हटलं आहे की, "सध्या दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये दिल्ली पोलिसांची पथके पाठवून आरोपीचा शोध सुरु आहे."
शृंगेरी विद्यापीठाने स्वामी चैतन्यानंद यांना निलंबित केल्यामुळे आणि महिला आयोगाच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण आणखीन काही काळ चर्चेत राहण्याची शक्यता आहे. पण हा छळ नेमका किती दिवस सुरु होता? याबाबत संस्थेतील कर्मचाऱ्यांना कल्पना होती का? चौकशी सुरु असताना आरोपीने कसा पळ काढला आणि आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला आणखीन वाट बघावी लागणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)