महाकाय क्रूझची खडकाला टक्कर; सर्व प्रवासी सुरक्षित; या कारणासाठी होते चर्चेत

    • Author, टॅबी विल्सन
    • Role, सिडनी

ऑक्टोबर महिन्यात एका प्रवाशाला बेटावर सोडून निघून गेलेले क्रूझ पुन्हा चर्चेत आले आहे.

द कोरल अॅडव्हेंचरर हे क्रूझ खडकाला धडकले असून सध्या ते पापुआ न्यू गिनीच्या समुद्रात अडकून पडले आहे. या क्रूझवरील प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

ऑक्टोबर महिन्यात या क्रूझने एका प्रवासादरम्यान आपल्या प्रवासी सुझॅन रीझ यांना बेटावर एकटेच सोडून दिले होते. त्यानंतर सुझॅन यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यू संदर्भात क्रूझ व्यवस्थापनाची चौकशी सुरू आहे.

सुझॅन यांना ऑस्ट्रेलियातील एका दुर्गम बेटावर तसंच सोडून पुढे निघून गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.

ही चौकशी सुरू असतानाच क्रूझ खडकाला धडकले.

शनिवारी (27 डिसेंबर) हे जहाज पापुआ न्यू गिनीच्या पूर्व किनाऱ्याजवळ, लाए शहरापासून जवळपास 30 किमी (18 मैल) अंतरावर 'उथळ पाण्यात अडकलं', असं जहाजाच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

जहाज आणि प्रवासी सुरक्षित

या अपघातानंतर क्रूझवरील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती आहे. या अपघातामुळे जहाजाचं कोणतंही नुकसान झाल्याचं प्राथमिक तपासणीत आढळलेलं नाही.

सूझॅन यांच्या मृत्यूच्या तपासाबाबत कोणती माहिती हाती लागली आहे हे समजून घेण्यासाठी बीबीसीने ऑस्ट्रेलियन मॅरिटाइम सेफ्टी ऑथोरिटीशी संवाद साधला.

बीबीसीला दिलेल्या वक्तव्यात ऑस्ट्रेलियन मॅरिटाइम सेफ्टी ऑथोरिटी (एएमएसए) च्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे की 'कोरल ॲडव्हेंचरर' या क्रुझकडून त्यांना कोणताही मदतीसाठीचा आपत्कालीन संदेश मिळालेला नाही.

त्यांनी पुढं सांगितलं की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आवश्यकता असल्यास पीएनजीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करतील.

या जहाजाच्या सध्याच्या 12 दिवसांच्या सफरीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जहाजाचा प्रवास 30 डिसेंबरला संपणार होता.

अपघाताच्या वेळेस जहाजावर 80 प्रवासी आणि 43 कर्मचारी होते. जहाजाचा 12 दिवसांचा प्रवास 30 डिसेंबरला संपणार होता.

सुझॅन यांचा बेटावर मृत्यू

सुझॅन रीस या 80 वर्षांच्या प्रवासी 26 ऑक्टोबरला लिझार्ड बेटावर मृतावस्थेत सापडल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर, कोरल ॲडव्हेंचरर या जहाजाचा एएमएसए आणि क्वीन्सलँड पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे तपास केला जातो आहे.

सुझॅन रीस इतर प्रवासांबरोबर बेटावर भटकंती करत होत्या. मात्र विश्रांती घेण्यासाठी त्या इतर प्रवाशांपासून वेगळ्या झाल्या होत्या.

सुझॅन यांना शोधण्यासाठी मोहीम

त्यानंतर हे जहाज सुझॅन यांना न घेताच तिथून निघून गेलं होतं. जहाजावरील कर्मचाऱ्यांना महिला बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यावर काही तासांनी ते परत आलं होतं.

मग सुझॅन यांना शोधण्यासाठी एक मोठी मोहीम चालवण्यात आली होती. त्यात दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला होता.

सुझॅन रीस यांचा मृत्यू झाला, त्यावेळेस जहाजाच्या 60 दिवसांच्या सफरीला फक्त दोनच दिवस झालेले होते. या घटनेमुळे जहाजाचा उर्वरित प्रवास रद्द करण्यात आला होता आणि सर्व प्रवाशांना पूर्ण परतावा देण्यात आला होता.

कोरल एक्सपीडिशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मार्क फिफिल्ड म्हणाले की 'या घटनेबद्दल कंपनीला अत्यंत खेद वाटतो' आणि कंपनीनं रीस यांच्या कुटुंबाला त्यांचा पूर्ण पाठिंबा दिला आहे.

फिफिल्ड यांनी पुढे म्हटलं आहे की "जहाज कंपनी, क्वीन्सलँड पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या तपासात पूर्ण सहकार्य करते आहे."

या तपासाच्या स्थितीबाबत बोलण्यास एएमएसएनं असमर्थता दाखवली. तसंच त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "ते त्यांच्या तपासाचे निष्कर्ष सार्वजनिक करत नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.