You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अक्षय कुमारच्या शिवाजी महाराजांवरील लुकवरून आव्हाडांची टीका, ‘महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय’
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. अक्षयकुमारच्या छत्रपती शिवाजी महाराज लुकवरून जितेंद्र आव्हाडांची टीका, ‘महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय’
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता.
या लुकवरून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपट निर्मात्यांवर निशाणा साधला आहे.
“आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला 'वेड्यात' काढलं जातं असल्याचं वाटतं,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
यासंदर्भात एक ट्विट करून आव्हाड म्हणाले, “जर्मनी, पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला 'वेड्यात' काढलं जातंय असं वाटतं.”
ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
2. कुणीही रिकाम्या पोटी झोपू नये, ही आपली संस्कृती – सुप्रीम कोर्ट
कुणीही रिकाम्या पोटी झोपू नये, याची काळजी घेणे, ही आपली संस्कृती आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
कोव्हिड लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत कामगारांच्या झालेल्या दुर्दशेबाबत स्वतःच दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने वरील टीप्पणी केली.
कुणालाही रिकाम्या पोटी झोपू न देणं, ही सरकारची जबाबदारी असल्याची आठवण करून देताना कोर्टाने केंद्र सरकारला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्नधान्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल याची काळजी घेण्यास सांगितलं.
केंद्र सरकार काहीही करत नाही, असं आम्ही म्हणत नाही. केंद्राने कोव्हिडदरम्यान लोकांना अन्नधान्य मिळण्याची व्यवस्था केली होती. ते यापुढेही चालू राहिले पाहिजे, असंही कोर्टाने म्हटलं आहे. ही बातमी लोकमतने दिली.
3. फुरसुंगी, उरुळी देवाची पुणे महानगरापालिकेतून बाहेर, दोन गावांची नवी नगरपालिका होणार
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे महापालिकेतून बाहेर काढण्यात आली आहे.
या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे. शिवाय स्थानिक नागरिकांचीही यासंदर्भात मागणी होती.
या सर्व बाबी लक्षात घेता, या दोन गावांना नवीन नगरपालिका देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे.
“नव्या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ही बातमी पुढारीने दिली.
4. महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; 660 बस फेऱ्यांवर परिणाम
बेळगावमध्ये कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आल्यानंतर या आंदोलनाचा एसटीच्या सेवांवरही परिणाम झाला आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांतून कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या 145 एसटी फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी यांसह अन्य काही जिल्ह्यांतून कर्नाटकसाठी दररोज 330 एसटी फेऱ्या होतात.
तेवढ्याच फेऱ्या पुन्हा कर्नाटककडे रवाना होतात. कन्नड संघटनांकडून करण्यात आलेल्या आंदोलनामुळे एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला. एकूण 145 एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या परिवहन सेवाही थांबवण्यात आल्या आहेत. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. माझा अभिनय वाईट नाही, पण तरी मला काम मिळत नाही – स्वरा भास्कर
"मी 6 ते 7 ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग होते, वेब सीरिजमध्ये लीड रोल केलेत. माझ्या अभिनयाला कधीही वाईट म्हटलं गेलं नाही. तरीही मला पुरेसं काम मिळत नाही," अशी खंत अभिनेत्री स्वरा भास्कर हिने व्यक्त केली आहे.
नुकतेच स्वरा भास्कर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आली होती. यानंतर तिच्याबाबत चर्चा सुरू असताना टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
ती म्हणाली, “जे व्हायला नको तसंच घडत आहे. माझ्याकडे आता फार मोठे प्रोजेक्ट नाहीत. मी जाणीवपूर्वक धोका पत्करला. मला सर्वात जास्त आवडतं ते माझं काम. या धोक्याची मोठी फार किंमत आहे. त्याचा परिणाम माझ्या वैयक्तिक आणि भावनिक आयुष्यावर होत आहे. मला हवं तेवढं काम मिळत नाही. आपलंच अति बोलणं याला कारणीभूत आहे.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)