उमर खालिदला पत्र लिहिणाऱ्या झोहरान ममदानींना भाजपाचं उत्तर, 'भारताच्या अंतर्गत गोष्टीतला हस्तक्षेप खपवून घेणार नाही'

न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी तुरुंगात असलेला विद्यार्थी नेता उमर खालिदला पाठिंबा दर्शविला आहे.

बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा म्हणजे यूएपीए कायद्यातील कलमाअंतर्गत 2020 पासून उमर खालिद तुरुंगात आहे.

ममदानी यांनी उमर खालिदला स्वत:च्या हातानं लिहिलेलं पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी म्हटलं, "आम्ही सर्व तुझ्या पाठिशी आहोत."

ममदानी यांनी न्यूयॉर्कचे महापौर म्हणून शपथ घेतल्यानंतर गुरुवारी (1 जानेवारी) उमद खालिदच्या जोडीदार बनज्योत्सना लाहिरी यांनी सोशल मीडियावर हे पत्र शेअर केलं.

दिल्ली दंगलींशी संबंधित एका प्रकरणात तुरुंगात असलेल्या उमर खालिदला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन देण्यास नकार दिला होता.

अर्थात, डिसेंबरमध्ये उमरला त्याच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली होती.

ममदानी यांच्या या कृत्यावर भारतीय जनता पार्टीनं तीव्र आक्षेप घेतला आहे.

भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, "एखादी व्यक्ती जर आरोपीचं समर्थन करत असेल, भारताच्या अंतर्गत प्रकरणांवर टिप्पणी करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. भारताच्या प्रत्येक नागरिकाचा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आमच्या लोकशाही आणि न्यायमंडळावर प्रश्नचिन्ह उभं करणारे हे लोक कोण लागून गेलेत?"

ते पुढं म्हणाले, "भारताचे तुकडे करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना पाठिंबा देणं दुःखद आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा आला की 140 कोटी लोक नरेंद्र मोदींच्याच मागे उभे राहातील."

झोहरान ममदानी यांनी काय म्हटलं?

उमर खालिदच्या जोडीदार बनज्योत्सना लाहिरी यांनी एक्स या सोशल मीडियावर ममदानी यांनी लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे.

ममदानी यांनी या पत्रात म्हटलं, "प्रिय उमर, मी अनेकदा कटुतेवरील तुझी मतं आणि ही कटुता स्वत:वर वरचढ होऊ न देण्याचं महत्त्व सांगणारे तुझे शब्द, याबद्दल विचार करतो. तुझ्या आई-वडिलांना भेटून मला आनंद झाला. आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत."

बनज्योत्सना लाहिरी 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना म्हणाल्या की, या हस्तलिखित पत्रानं 11 हजार 700 किलोमीटर अंतर असूनही तुरुंगात असलेल्या उमर खालिद आणि न्यूयॉर्कचे भारतीय वंशाचे महापौर झोहरान ममदानी यांच्यामध्ये एक भावनिक नातं तयार केलं आहे.

त्या म्हणाल्या, "उमरचे आई-वडील अमेरिकेत ममदानी आणि इतर काही लोकांना भेटले होते. त्यांच्याबरोबर त्यांनी बराच वेळ घालवला. त्याचदरम्यान ममदानी यांनी हे पत्र लिहिलं."

3 आठवड्यांपूर्वी उमर खालिद बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी घरी आला होता.

लाहिरींनी सांगितलं की, जामिनातील अटींमुळे उमरला घराबाहेर जाता आलं नाही. तो पूर्णवेळ घरातच होता.

बनज्योत्सना यांच्यानुसार, उमरचे आई-वडील गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांनी अनेकजणांची भेट घेतली. त्यात ममदानी यांचाही समावेश होता.

त्यांच्यानुसार, साहिबा खानम आणि सैयद कासिम रसूल इलियास (उमर खालिदचे आई-वडील) त्यांच्या सर्वात धाकट्या मुलीच्या लग्नाच्या काही दिवस आधी अमेरिकेत त्यांच्या मोठ्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. त्यांची मोठी मुलगी तिथे राहते आणि तिला लग्नाला हजर राहता आलं नव्हतं.

उमर खालिद चर्चेत कसा आला?

जेएनयूचा माजी पीएचडी विद्यार्थी उमर खालिद याला सप्टेंबर 2020 मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीशी संबंधित एका कथित कटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

अर्थात दिल्ली उच्च न्यायालयानं एका एफआयआरमध्ये उमरला आरोपांमधून मुक्त केलं आहे. मात्र यूएपीएअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या आणखी एका प्रकरणात उमर अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे.

गेल्या 5 वर्षांमध्ये त्याचा जामीन अर्ज अनेकदा फेटाळण्यात आला आहे. डिसेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणातील त्यांचा निकाल राखून ठेवला होता.

यापूर्वी देखील ममदानी सार्वजनिकरित्या खालिदच्या समर्थनार्थ बोलले आहेत.

जून 2023 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील दौऱ्याआधी न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'हाउडी डेमोक्रसी' या कार्यक्रमात ममदानी यांनी उमर खालिदनं तुरुंगात केलेल्या लेखनाचा काही भाग वाचून दाखवला होता.

त्यावेळेस ममदानी (तेव्हा ते न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीचे सदस्य होते) प्रेक्षकांना म्हणाले होते, "मी उमर खालिदचं एक पत्र वाचणार आहे. उमर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा एक संशोधक आणि विद्यार्थी कार्यकर्ता आहे. त्यानं लिंचिंग आणि द्वेषाच्या विरोधात मोहीम चालवली."

"अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्टअंतर्गत तो 1,000 दिवसांहून अधिक काळापासून तुरुंगात आहे. आतापर्यंत त्याच्यावरील खटल्याची सुनावणी सुरू झालेली नाही. त्याचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला आहे."

फेब्रुवारी 2016 मध्ये उमर खालिदचं नाव पहिल्यांदा जेएनयूतील विद्यार्थी नेता राहिलेल्या कन्हैया कुमारसह चर्चेत आलं.

मात्र तेव्हापासून अनेक प्रकरणांमध्ये आणि काही वक्तव्यांमुळे उमर खालिद सातत्यानं चर्चेत राहिला.

उमर खालिदनं वारंवार म्हटलं आहे की, प्रसारमाध्यमांनी त्याची या प्रकारची प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे त्याला काहीजणांच्या द्वेषाला सामोरं जाव लागत आहे.

जानेवारी 2020 मध्ये उमर खालिदनं गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिलं होतं की, जर त्यांना 'टुकडे-टुकडे' गँगला शिक्षा करायची असेल आणि जर ते त्यांच्या शब्दांवर ठाम असतील, तर 'टुकडे-टुकडे' भाषणाबद्दल माझ्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करावा. त्यानंतर हे स्पष्ट होईल की द्वेष पसरवणारं भाषण कोणी दिलं आणि कोण देशद्रोही आहे."

जुलै 2016 मध्ये हिजबुलचा कमांडर बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या घटनेनंतर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यात अनेकजण मारले गेले होते.

बुरहानच्या अंत्ययात्रेला देखील मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर उमर खालिदनं फेसबुकवर बुरहान वानीचं 'कौतुक करणारी' पोस्ट लिहिली होती. त्यावर खूप टीका झाली होती.

टीका लक्षात घेऊन काही काळानं उमर खालिदनं ही पोस्ट काढून टाकली होती. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होऊ लागली होती. तर अनेकजण त्याला समर्थनदेखील देत होते.

ऑगस्ट 2018 मध्ये दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर काही अज्ञात हल्लेखोरांनी उमर खालिदवर कथितरित्या गोळ्या झाडल्या होत्या.

खालिद तिथे 'टूवर्ड्स अ फ्रीडम विदाउट फिअर' नावाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता.

त्यावेळेस प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं की, पांढरा शर्ट घातलेल्या एका व्यक्तीनं येऊन उमर खालिदला धक्का दिला आणि गोळी झाडली. मात्र उमर खालिद खाली पडल्यामुळे त्याला गोळी लागली नाही.

या घटनेनंतर उमर खालिद म्हणाला होता, "जेव्हा त्यानं माझ्यावर पिस्तूल रोखलं, तेव्हा मी घाबरलो होतो. मात्र गौरी लंकेश यांच्यासोबत जे घडलं होतं, त्याची मला आठवण झाली होती."

डेमोक्रॅटिक खासदारांनीही लिहिलं खालिदच्या समर्थनार्थ पत्र

ममदानी यांच्याव्यतिरिक्त अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पार्टीच्या अनेक खासदारांनीदेखील उमर खालिदला पाठिंबा दिला आहे.

अमेरिकेतील खासदार जिम मॅकगवर्न आणि जेमी रस्किन यांच्या नेतृत्वाखाली उमर खालिदला पाठिंबा देणारं आवाहन करण्यात आलं.

अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांना लिहिलेल्या पत्रात या खासदारांनी खालिदला जामीन देण्यात यावा, असं आवाहन भारतीय अधिकाऱ्यांना केलं.

तसंच खालिदवरील खटल्याची सुनावणी सुरू करण्याचीही मागणी केली.

मॅकगवर्न आणि रस्किन यांच्याव्यतिरिक्त, या पत्रावर डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार क्रिस वॅन होलेन, पीटर वेल्च, प्रमिला जयपाल, जॅन शाकोव्स्की, रशीदा तलैब आणि लॉईड डॉगेट यांच्या सह्या आहेत.

या खासदारांनी म्हटलं आहे की, सुनावणी सुरू झाल्याशिवाय खालिदला सतत ताब्यात ठेवणं, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे.

मॅकगवर्न यांनी हे पत्र एक्स या सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

अमेरिकेच्या खासदारांनी असंही सांगितलं की, ते अमेरिकेत खालिदच्या आई-वडिलांना भेटले होते.

अमेरिकेच्या खासदारांनी लिहिलेल्या पत्रावर भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी लिहिलं आहे की, हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप आहे.

कंवल सिब्बल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, "अमेरिकेच्या राजकारण्यांकडून भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये याप्रकारच्या हस्तक्षेपामुळे, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंधांचं आधीच मोठ्या दबावाखाली असलेलं वातावरण आणखी बिघडतं."

"त्याहीपेक्षा वाईट म्हणजे याचा अमेरिकेतील राजकारण, कायदा, कायदा-सुव्यवस्था, धार्मिक, सामुदायिक आणि वांशिक आघाडीवर जे होतं आहे, त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही."

त्यांनी पुढे म्हटलं, "या खासदारांना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी भारतातील कट्टरतावाद्यांचे आणि दहशतवाद्यांचे प्रवक्ते होण्याऐवजी अमेरिकेतील समस्यांवर लक्ष दिलं पाहिजे. याप्रकारचा परदेशी हस्तक्षेप भारतातील या राष्ट्रविरोधी घटकांच्यादेखील विरोधात जातो. कारण त्यांना भारताच्या सुरक्षेला लक्ष्य करणाऱ्या एका मोठ्या इको-सिस्टमचा भाग मानलं जातं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)