खूप घाम येणं चांगलं की वाईट? दुर्गंधीचं काय, डिओड्रंटचा वापर कसा करायला हवा?

    • Author, एस्थर काहुम्बी
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

तुमच्या शरीरातून दुर्गंधी येते, विशेषतः दिवसभर घराबाहेर राहिल्यानंतर किंवा एखाद्याला भेटण्याआधी घाम येतो, असं तुम्हाला वाटतं का?

सोशल मीडियामुळे या गोष्टीची चिंता आणखी वाढते. कारण सोशल मीडियावर वारंवार फ्रेश राहण्याची चर्चा होत असते.

सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक प्रकारचे व्हीडिओ दिसतात. काही इन्फ्लुएन्सर्स शरीरावर डिओड्रंट लावतात. तर काहीजण बस आणि ट्रेनमधील ज्या प्रवाशांपासून दुर्गंधी येत असते त्यांची तक्रार करताना दिसतात.

मात्र तज्ज्ञाचं म्हणणं आहे की, घाम येणं ही अतिशय सामान्य बाब आहे. म्हणजे स्वच्छता राखणं वाईट गोष्ट आहे, असंही नाही. मात्र घाम येणं ही शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

मिशेल स्पिअर, युकेमधील ब्रिस्टल विद्यापीठात ॲनाटॉमी म्हणजे शरीररचनाशास्त्रच्या प्राध्यापक आहेत. त्या म्हणतात, "घाम येणं सामान्य आणि आवश्यक बाब आहे."

अनेकदा लोकांना उष्णता असल्यास, व्यायाम करताना किंवा तणावात असल्यास घाम येतो. घामामुळे शरीराचं तापमान संतुलित राहण्यास मदत होते.

घामाशी निगडीत सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरं आणि दिवसभर ताजतवाणं राहण्याच्या सोप्या मार्गांबद्दल आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली.

घामाला दुर्गंधी का येते?

शरीराचं तापमान वाढल्यानंतर घाम येतो. यात पाणी आणि क्षार असतात. हा घाम कोरडा होत उष्णता बाहेर काढतो आणि शरीर थंड होतं.

मात्र लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे घामातून थेट दुर्गंधी किंवा घाणेरडा वास येत नाही.

प्राध्यापक स्पीअर म्हणतात की, आपल्या शरीरात 20 ते 40 लाखांपर्यंत स्वेट ग्लँडस् म्हणजे घामाच्या ग्रंथी असतात. त्यातून दोन प्रकारचा घाम तयार होतो. एक पाण्यासारखा, जो शरीराला थंड ठेवतो. तर दुसऱ्या प्रकारच्या घामात फॅट किंवा मेदाचं प्रमाण जास्त असतं.

सर्वसाधारणपणे चरबीवाला घाम काखेतून आणि जांघेतून येतो. जिवाणू जेव्हा त्याचं विघटन करतात, तेव्हा त्यातून दुर्गंधी येऊ लागते.

घाम येणं शरीरासाठी चांगलं असतं. मात्र प्रत्येकालाच स्वच्छ राहायचं असतं आणि आत्मविश्वासानं वावरायचं असतं.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, घाम येणं थांबवायचा प्रयत्न करू नये. उलट त्याचं नीट व्यवस्थापन करण्यास शिकलं पाहिजे, जेणेकरून दैनंदिन आयुष्य सोपं होईल.

दिवसभर ताजंतवानं राहता येतं का?

साबण आणि पाण्यानं अंघोळ करणं घाम आणि दुर्गंध टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मात्र, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की किती वेळा अंघोळ केली पाहिजे?

काहीजण रोज अंघोळ करण्याचा सल्ला देतात, तर काहीजणांना वाटतं की आठवड्यातून तीन वेळा आंघोळ करणं पुरेसं असतं.

प्राध्यापक स्पिअर म्हणतात की काखेचा भाग, जांघेचा वरचा भाग आणि पाय स्वच्छपणे धुतले पाहिजे.

त्या म्हणतात, "अंघोळ करताना संपूर्ण शरीरावर तर पाणी पडतं, मात्र अनेकदा लोक पाय धुण्यास विसरतात. पायदेखील चांगल्याप्रकारे स्वच्छ केले पाहिजेत."

आपल्या कपड्यांचाही घाम आणि दुर्गंधीवर परिणाम होतो.

कॉटन आणि लिननचे कपडे घाम शोषून घेतात, त्यामुळे घामापासून दिलासा मिळतो. मात्र सिंथेटिक कपड्यांमुळे घाम अडकतो, त्यामुळे उष्णता वाढते आणि ते त्रासदायक होतं.

डिओड्रंट आणि अँटीपर्सपिरंटदेखील उपयुक्त असतात. डिओड्रंटमध्ये अल्कोहल असतं. त्यामुळे त्वचा थोडीशी आम्लयुक्त होते. त्यामुळे जिवाणूंची कमी वाढ होते आणि सुगंधाखाली दुर्गंधी दाबली जाते.

अँटीपर्सपिरंटमध्ये ॲल्युमिनियम सॉल्ट असतात. ते घामाच्या ग्रंथींना अडथळा निर्माण करतात आणि त्यामुळे कमी घाम येतो.

तज्ज्ञ सल्ला देतात की अँटिपर्सपिरंटचा वापर रात्री करणं चांगलं असतं आणि सकाळी उठल्यावर ते धुवून टाकावं.

रात्रीच्या वेळी घामाच्या ग्रंथी कमी प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे ॲल्युमिनियमचा परिणाम सहजपणे होतो. तो हळूहळू जमा होतो आणि त्याचा परिणाम थोड्या वेळानंतर दिसू लागतो.

अँटिपर्सपिरंटमुळे काही अपाय होऊ शकतो का?

अँटिपर्सपिरंटमुळे स्तनांचा कर्करोग आणि अल्झायमरसारखे आजार होऊ शकतात, अशी शंका बऱ्याच काळापासून व्यक्त केली जाते आहे.

मात्र डॉ. नोरा जाफर म्हणतात की, "आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांमधून दिसतं की हे सुरक्षित आहे. अँटीपर्सपिरंटमुळे कर्करोग होतो असं कोणत्याही चांगल्या अभ्यासातून सिद्ध होत नाही."

त्या सांगतात की, ॲल्युमिनियम सॉल्ट्सचा परिणाम फक्त त्चचेवर थोड्या वेळासाठी होतो. यामुळे तो थर तयार होतो, तो नंतर त्वचेवरून निघून जातो.

तज्ज्ञ म्हणतात की, या उत्पादनांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्यास त्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

प्राध्यापक स्पिअर म्हणतात, "जर असं सांगण्यात आलं की, एखाद्या उत्पादनाचा परिणाम 72 तास किंवा 48 तासांपर्यंत राहील आणि एखाद्या व्यक्तीनं अँटिपर्सपिरंट काम करत राहतील असा विचार करून आंघोळ केली नाही, तर त्यामुळे त्वचेमध्ये ब्लॉकेज होऊ शकतात आणि समस्या निर्माण होऊ शकतात."

घाम आणि त्वचेवरील मृत पेशी जमा झाल्यानंतर घामाच्या ग्रंथी बंद होऊ शकतात. त्यामुळे जळजळ होऊ शकते.

त्वचारोग तज्ज्ञ सल्ला देतात की, बगल पूर्णपणे कोरडी असतानाच ॲल्युमिनियम असणाऱ्या उत्पादनांचा वापर करावा.

त्वचा ओली असल्यावर ॲल्युमिनियम क्लोराईड पाण्यात मिसळून त्यापासून ॲसिड तयार होऊ शकतो. त्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते.

नैसर्गिक डिओड्रंट उपयुक्त असतात का?

अलीकडच्या काळात नैसर्गिक डिओड्रंटसचा वापर वाढला आहे. ज्या लोकांना ॲल्युमिनियम किंवा कृत्रिम सुगंध नको असतो, अशा लोकांसाठी हे नैसर्गिक डिओडरंट बनवले जातात.

सर्वसाधारणपणे या डिओड्रंटमध्ये नैसर्गिक अँटिबॅक्टेरियल घटक किंवा वनस्पतींपासून तयार करण्यात आलेलं तेल असतं. त्यांच्यामुळे दुर्गंध कमी होतो. याशिवाय तांदूळ किंवा टॅपिओका स्टार्चसारख्या गोष्टी घाम शोषून घेतात.

डॉ. जाफर म्हणतात, "हे सौम्य असतात, कारण ते घामाच्या ग्रंथी बंद करत नाहीत. फक्त दुर्गंध आटोक्यात आणतात. मात्र नैसर्गिकचा अर्थ असा नाही की, यामुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही. असेन्शियल ऑईल्स किंवा बेकिंग सोडासारख्या घटकांच्या वापरामुळे संवेदनशील त्वचेवर पुरळ येऊ शकतात."

प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत याचा परिणाम वेगळा असू शकतो. तुमच्या त्वचेवर कोणत्या प्रकारचे जिवाणू आहेत आणि डिओड्रंट कोणत्या घटकांपासून बनलं आहे, यावर ते अवलंबून असतं.

तुम्हाला खूप घाम येत असेल, तर याप्रकारचे डिओड्रंट तितके प्रभावी ठरत नाहीत. मात्र जर तुम्हाला ॲल्युमिनियम टाळायचं असेल तर हे डिओड्रंट चांगला पर्याय ठरू शकतात.

डिओड्रंटचा वापर संपूर्ण शरीरावर करतात का?

कोणता डिओड्रंट किंवा अँटिपर्सपिरंट घ्यावा आणि शरीराच्या कोणकोणत्या भागांवर ते लावावं, याबद्दल लोक विचार करू लागले आहेत.

युके आणि अमेरिकेत अशा नवीन डिओड्रंटची विक्री होते आहे, जे दावा करतात की, त्यांचा वापर शरीराच्या सर्व भागांवर म्हणजे गुप्त अंगावर देखील केला जाऊ शकतो.

ही उत्पादनं दावा करतात की, अंघोळ केल्यानंतर दीर्घकाळ ताजेपणा टिकून राहील. काही उत्पादनं तर 72 तासापंर्यत दुर्गंधी येणार नाही, असा दावा करतात.

मात्र, डॉक्टरांचं म्हणणं आहे की संपूर्ण शरीरावर डिओड्रंट लावण्याची आवश्यकता नाही. विशेषकरून गुप्तांगावर तर अजिबातच नाही.

डॉ. जाफर इशारा देतात की, "वल्वा (योनी) आणि ग्रोइन (जांघ) खूप संवेदनशील भाग असतात. तिथे डिओडरंट लावल्यामुळे जळजळ, ॲलर्जी होऊ शकते आणि नैसर्गिक संतुलन बिघडू शकतं."

ते सल्ला देतात की, "त्याठिकाणी सौम्य साबणानं किंवा फक्त पाण्यानं धुणंच पुरेसं असतं."

केव्हा घाम आल्यास चिंतेची बाब असते?

काहीजणांना हायपरहायड्रोसिस नावाची समस्या असते. यात शरीर थंड ठेवल्यामुळे खूप जास्त घाम येतो.

इंटरनॅशनल हायपरहायड्रोसिस सोसायटीनुसार, या स्थितीत घामाच्या काही ग्रंथी आवश्यकतेपेक्षा जास्त सक्रिय होतात आणि त्यातून खूप घाम येतो.

डॉक्टर म्हणतात की, अनेकदा हे, हार्मोनमधील बदल, थायरॉईडची समस्या, संसर्ग किंवा चयापचयाचे विकार यासारख्या इतर आजारांचं देखील लक्षण असू शकतं.

उपचारांमध्ये अनेकदा तीव्र अँटीपर्सपिरंट दिले जातात, ज्यात जास्त प्रमाणात ॲल्युमिनियम सॉल्ट्स असतात. यामुळे घाम कमी होतो.

काही वेळा बोटॉक्स इंजेक्शन देखील दिले जातात. गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया करून घामाच्या ग्रंथी काढून टाकल्या जाऊ शकतात.

प्राध्यापक स्पीअर म्हणतात, "जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला खूप घाम येतो, तर त्यामुळे लाज किंवा संकोच वाटण्याचं कारण नाही. त्याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.