सौदी अरेबिया पुन्हा खुले करणार अरामकोचे शेअर्स, काय आहे कारण?

फोटो स्रोत, REUTERS
- Author, एम. खलील
- Role, प्रतिनिधी, बीबीसी अरेबिक
सौदी अरेबियाच्या या निर्णयाची गुंतवणुकदार खूप काळापासून वाटत पाहत होते.
रविवारी सौदी अरेबियानं जगातील टॉप पाच कंपन्यांपैकी एक असलेल्या अरामकोमधील आपली अतिरिक्त हिस्सेदारी विकण्याच्या प्रक्रियेची सुरूवात केली आहे.
शेअर मार्केटमध्ये अरामकोनं एक अब्जाहून अधिक शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव ठेवला आहे. या शेअर्सची एकूण किंमत जवळपास 10 अब्ज डॉलर आहे.
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या प्रस्तावामध्ये 1,545 अब्ज शेअर्स विकले जाणार आहेत. कंपनीच्या एकूण शेअर्सच्या 0.64 टक्के इतके हे शेअर्स आहेत.
अरामकोच्या या पब्लिक ऑफरसाठी (IPO) प्रत्येक शेअरची किंमत 26.70 रियाल ते 29 रियाल प्रती शेअरच्या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. डॉलर आणि सौदी चलन असलेल्या रियालमधील विनिमय दर लक्षात घेता एका अमेरिकन डॉलरची किंमत 3.75 सौदी रियाल इतकी आहे.
अरामकोच्या या पब्लिक ऑफरची कमाल मूल्य मर्यादा लक्षात घेतली तर या प्रस्तावातून कंपनीच्या प्रमोटर्सना 12 अब्ज डॉलरचे भांडवल मिळण्याची अपेक्षा आहे.
अरामकोच्या पब्लिक ऑफरच्या घोषणेनंतर अरामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासिर म्हणाले की "या पब्लिक ऑफरमुळे आम्हाला सौदी आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांमध्ये कंपनीच्या शेअर होल्डिंगचा पाया वाढवण्याची संधी मिळेल. यातून आम्हाला भांडवल आणि ग्लोबल इंडेक्समध्ये आमचे मूल्य वाढवण्यास मदत होईल."
अरामकोच्या प्रमोटर्सकडून करण्यात आलेल्या या पब्लिक ऑफरच्या घोषणेच्या टायमिंगवर विश्लेषकांचं लक्ष गेलं आहे.
या पब्लिक ऑफरचं टायमिंग काय सांगतं?
मागील काही दिवसांमध्ये काही पाश्चात्य प्रसार माध्यमांमधील बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला होता की सौदी अरेबिया आपल्या योजनांसाठी, विशेषकरून व्हिजन 2030 च्या आराखड्याच्या कक्षेत येणाऱ्या प्रकल्पांसाठी भांडवल उभारण्याचा प्रयत्न करतो आहे.
सौदी अरेबियाच्या पेट्रोलियम मंत्र्यांचे माजी सल्लागार डॉक्टर मोहम्मद सोरोर अल-सब्बान यांना वाटतं की अरामकोच्या या नव्या पब्लिक ऑफरचा कच्च्या तेलाच्या किंमतींशी संबंध नाही.
ते म्हणतात की व्हिजन 2030 चं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी टप्प्या टप्प्यानं भांडवल उभारलं जातं आहे. आगामी काळात आणखी पब्लिक ऑफर्स आणले जातील. ते पब्लिक ऑफर्स पाच टक्क्यांपेक्षा अधिक नसतील.

फोटो स्रोत, ANI
डॉक्टर अल सब्बान यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की या पब्लिक ऑफरचा फायदा मुख्यत: सौदी अरेबियातील लोकांनी होईल. अर्थात सौदी अरेबियाच्या नागरिकांव्यतिरिक्त परदेशी गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.
ते म्हणाले की कंपनीच्या संचालक मंडळात शेअर धारकांच्या उपस्थितीमुळे विचारांमध्ये वैविध्य येईल आणि अरामकोच्या कामगिरीत सुधारणा होईल.
आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या आयद अल सुवैदान यांना वाटतं की जग सध्या ज्या आर्थिक स्थितीत आहे ते पाहता अशा प्रकारचे निर्णय खूप विचारपूर्वक घेतले जातात. यामध्ये कच्च्या तेलाची किंमत आणि जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या आर्थिक तणावांना लक्षात घेतलं जातं.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की या निर्णयाच्या टायमिंग मध्ये खूप सावधगिरी बाळगण्यात आली आहे. विशेषकरून सौदी अरेबियाच्या शेअर मार्केटमध्ये असलेल्या तेजीचा आणि त्यातील आर्थिक क्षमतांचा विचार करण्यात आला आहे.
आयपीओ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत
आयद अल सुवैदान यांनी सांगितलं की अरामकोच्या मागील चार पब्लिक ऑफर्सच्या सब्सक्रिप्शनसाठी 480 टक्क्यांहून अधिक अर्ज आले होते.
ते म्हणाले की ही पब्लिक ऑफर देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची अपेक्षा बाळगण्यात आली आहे.
अरामकोच्या एफपीओ साठी (आयपीओ नंतर येणारी पब्लिक ऑफर) दोन जून ते सहा जून पर्यत अर्ज करता येणार आहे.

फोटो स्रोत, Rafael Henrique/SOPA Images/LightRocket via Getty Images
सौदी अरेबियाचे नागरिक, गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या सदस्य देशांचे नागरिक आणि सौदी अरेबियात राहणाऱ्या काही परदेशी नागरिकांना या पब्लिक ऑफरमध्ये सहभागी होता येणार आहे.
पब्लिक ऑफरमध्ये वैयक्तिक स्वरुपात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यतिरिक्त सौदी अरेबियातील संस्थात्मक गुंतवणुकदारांबरोबर परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांना देखील गुंतवणूक करता येणार आहे.
डॉक्टर मोहम्मद सोरोर अल-सब्बान म्हणतात की पब्लिक ऑफरकडे परदेशी गुंतवणुकदार नक्कीच आकर्षित होणार आहेत.
आर्थिक परिणाम काय होतील ?
डॉक्टर मोहम्मद सोरोर अल-सब्बान भर देत सांगतात की व्हिजन 2030 चं लक्ष मुख्यत: अर्थव्यवस्थेतील विविधतेवर (इकॉनॉमिक डायव्हर्सिफिकेशन) आहे.
ते म्हणतात, "मात्र याचा अर्थ असा नाही की कच्च्या तेलाची जागतिक बाजारातील मागणी संपेल किंवा कमी होईल. तर याचा अर्थ फक्त इतकाच आहे की उत्पन्नाच्या साधनांमध्ये विविधता आणण्यास सरकार प्रयत्नशील आहे."
डॉक्टर अल-सब्बान यांच्या मते सौदी अरेबियाला अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये विकास करायचा आहे. मग ते खनिज क्षेत्र असो की पर्यटन असो, पेट्रोकेमिकल्स असो की तेलशुद्धीकरणाशी निगडीत एखादं क्षेत्र असो.

त्यांना वाटतं की अरामकोच्या या पब्लिक ऑफरच्या माध्यमातून सौदी अरेबियाला आपल्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणण्याच्या हेतूनं गुंतवणूक वाढवायची आहे.
बाजार मूल्यानुसार अरामको जगातील पाचवी सर्वांत मोठी कंपनी आहे. सौदी अरेबियाच्या सरकारकडे कंपनीचे जवळपास 82 टक्के शेअर्स आहेत.
2019 मध्ये कंपनीनं जवळपास 1.5 टक्के शेअर्सची पब्लिक ऑफरच्या माध्यमातून विक्री केली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा कंपनी पब्लिक ऑफर घेऊन आली आहे. त्यावेळेस कंपनीनं पब्लिक ऑफरद्वारे विक्रमी 29.4 अब्ज डॉलरच्या भांडवलाची उभारणी केली होती. ती आतापर्यंतची सर्वांत मोठी पब्लिक ऑफर होती.
कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेक + (प्लस) च्या सहमतीनं अरामकोनं कच्च्या तेलाच्या उत्पादन कपात केली आहे. सध्याच्या काळात अरामको दररोज जवळपास 90 लाख बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन करते आहे. कंपनीच्या कमाल क्षमतेच्या हे जवळपास तीन-चतुर्थांश आहे.
रविवारी रियाद मध्ये ओपेक+ देशांची एक बैठक होणार आहे. त्यामध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनाशी निगडीत सध्याच्या धोरणांवर चर्चा होणार आहे.
त्यामध्ये सध्या सुरू असलेली कच्च्या तेलाच्या उत्पादनातील कपात, 2024 च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.











