सौदी अरेबियामध्ये सुरू होणार दारुचं पहिलं दुकान, याने इस्लामिक ओळख मागे पडणार का?

फोटो स्रोत, Getty Images
सौदी अरेबियानं रियादमध्ये काही निवडक बिगर-मुस्लिमांना दारू विक्री करण्यासाठी एक स्टोर सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
70 वर्षांमध्ये प्रथमच सौदीमध्ये दारुची विक्री केली जाईल. इतर देशांच्या दूतावासांमधील कर्मचारी हेच रियाधमध्ये सुरू होणाऱ्या या दारुच्या दुकानाचे ग्राहक असतील.
हे कर्मचारी अनेक वर्षांपासून सीलबंद अधिकृत पॅकेजमधून दारू आयात करतात. त्याला डिप्लोमॅटिक पाऊच म्हटलं जातं.
सौदीच्या अधिकाऱ्यांच्या मते, दारुच्या या दुकानामुळं दारुचा अवैध व्यापार कमी होईल. सौदी अरबमध्ये 1952 पासून दारुवर बंदी आहे. त्यावेळी किंग अब्दुल अजिज यांच्या मुलानं दारुच्या नशेत एका ब्रिटिश राजदुताची गोळी घालून हत्या केली होती.
एएफपी आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थांनी पाहिलेल्या दस्तऐवजांनुसार दारुचं हे नवं स्टोर रियादच्या डिप्लोमॅटिक क्वार्टरमध्ये असेल.
काय आहेत मापदंड?
दारू विक्रीच्या या निर्णयाची माहिती असलेल्या काही अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना हे स्टोर काही आठवड्यांत सुरू होऊ शकतं असं सांगितलं आहे.
पण याचे काही नियमही आहेत.
- दारुची सवय असलेल्या राजदुतांना आधी नोंदणी करावी लागेल आणि नंतर त्यांना सरकारकडून क्लिअरन्स मिळेल
- दारुच्या स्टोरमध्ये 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना येण्याची परवानगी नसेल आणि दुकानातील लोकांनी कायम योग्य तो पोषाख परिधान केलेला असावा
- दारु पिणाऱ्यांना दुसऱ्याकडून दारू मागवता येणार नाही. उदाहरण द्यायचं झाल्यासं ड्रायव्हरकडून किंवा इतर कोणाकडून दारु मागवता येणार नाही
- दारू खरेदी करण्याची महिन्याची ठरावीक मर्यादाही असेल
- पण एएफपीनं पाहिलेल्या दस्तऐवजांनुसार हे नियम फार कठोर नसतील
नोंदणी केलेल्या ग्राहकांना दर महिन्याला 240 'पॉइंट्स' दारू मिळेल. एक लीटर स्पिरिट्सला सहा पॉइंट समजलं जाईल. तर एक लीटर वाइनला तीन पॉइंट्स आणि एक लीटर बीयरला एक पॉइंट समजलं जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
सामान्य विदेशी नागरिकांनाही दारू मिळेल की फक्त दुतावासांसाठीच असेल, हे मात्र सांगण्यात आलेलं नाही. दारु रियादमधील जीवनाचा भाग बनेल, पण दारुचं सेवन करणाऱ्यांसाठी त्यांनी कुठं सेवन करावं आणि त्यानंतर ते कसं वर्तन करतात हे अत्यंत महत्त्वाचं असेल.
सध्या सौदी अरबमध्ये दारू पिण्यासाठी किंवा बाळगण्यासाठी दंड, तुरुंगवास, सार्वजनिकरित्या चाबकाचे फटके आणि अनधिकृत प्रवाशांना परत पाठवण्याचा कायदा आहे.
दारुच्या धोरणाशी संबंधित नव्या दस्तऐवजानुसार सौदी प्रशासन नव्या नियमांवर काम करत आहे. नव्या नियमांतर्गत योग्य प्रमाणात दारुचं सेवन करण्याची परवानगी असेल. त्यामुळं दारुची अनियंत्रित देवाण-घेवाण बंद होईल.
जेव्हा प्रिन्सने घातली ब्रिटिश राजदुताला गोळी
अनेक वर्षांपासून डिप्लोमॅटिक स्टाफ पाऊचचा वापर करतात आणि सौदी प्रशासन त्यात काहीही दखल देत नाही. सौदी अरबच्या या भूमिकेला 'व्हिजन 2030' शीही जोडलं जात आहे.
सौदी अरबचे पंतप्रधान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान या व्हिजन अंतर्गत काही कठोर नियम सैल करत आहेत. आखाती भागातील इतर देशांमध्येही दारुबाबत असंच धोरण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण युएई आणि कतारमध्ये 21 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या बिगर मुस्लिमांना हॉटेल, क्लब आणि बारमध्ये दारू विक्रीची परवानगी आहे. सौदी अरबमध्येही यूएई आणि कतार सारखा नियम असेल का? हे मात्र दस्तऐवजांमध्ये अद्याप सांगण्यात आलेलं नाही. इस्लाममध्ये दारू निषिद्ध आहे. सौदी अरेबियामध्ये दारुला हराम समजलं जातं. सौदी अरबची 1952 पर्यंत दारुबाबत एकप्रकारची तडजोडीची भूमिका होती.
पण 1951 मध्ये प्रिन्स मिशारी बिन अब्दुल अजिज अल-साऊद यांनी जेद्दाहमध्ये ब्रिटिश राजदूत सिरिल उस्मान यांची गोळी घालून हत्या केली होती. एका कार्यक्रमात आणखी दारु देण्यास नकार दिल्यानं त्यांनी गोळी घातली होती. या घटनेच्या एका वर्षानंतर किंग अब्दुल अजिज यांनी दारुवर पूर्णपणे बंदी घातली होती. मिशारी यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं.
यापूर्वी महिलांना दिला ड्रायव्हिंगचा अधिकार
2018 मध्ये सौदी अरबमध्ये पहिल्यांदा महिलांना वाहन परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. 2018 मध्ये जूनमध्ये पहिल्यांदा 10 महिलांना परवाने देण्यात आले होते.
याचवर्षी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मग बिन सलमान यांनी महिलांवर लावलेली ड्रायव्हिंगची बंदी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
2018 मध्ये 24 जूनपासून सौदी अरबमध्ये महिला रस्त्यांवर गाडी चालवताना दिसल्या होत्या.
महिलांना गाडी चालवण्याचा अधिकार देण्याचं हे पाऊल पुराणमतवादी विचारांच्या देशाला आधुनिक बननवण्यासाठीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या उदारीकरण मोहिमेच्या अंतर्गत उचललं गेलं.
पण या निर्णयांमुळं क्राऊन प्रिन्स यांना टीकांचाही सामना करावा लागत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सौदीच्या या महिला अधिकार कार्यकर्त्यांनी त्याठिकाणच्या महिलांना ड्रायव्हिंगचा अधिकार देण्यासाठी मोहीम राबवली होती, त्यांना सौदीच्या सरकारनं बाह्यशक्तींशी संबंध असल्याचे आरोप करत ताब्यात घेतलं आहे.
व्हिजन 2030 ची घोषणा 2016-17 मध्ये करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेचं तेल निर्यातीवरील अवलंबित्व कमी करून त्यात वैविध्य आणणं हा होता.
देशात दुसरे उद्योग विकसित करणं, पर्यटनाला चालना देणं आणि खासगी उद्योगांना प्रोत्साहन देणं हा उद्देश होता. त्यातून अधिक रोजगार निर्मिती आणि सरकारवरील बोझा कमी करायचा होता.
इस्लामिक ओळखीपासून दूर जात आहेत का क्राऊन प्रिन्स?
38 वर्षांचे मोहम्मद बिन सलमान सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स आहेत. क्राऊन प्रिन्स गेल्या पाच वर्षांपासून देशाचं नेतृत्व करत आहेत. क्राऊन प्रिन्स यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत ज्याचं कौतुक झालं आहे. त्यांना सौदी अरबची प्रतिमा एका इस्लामिक पुराणमतवादी देश ते आधुनिक देश अशी बनवायची आहे.
2016 मध्ये क्राऊन प्रिन्स यांनी व्हिजन 2030 जाहीर केलं होतं. त्या व्हिजननुसार अनेक प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या. क्राऊन प्रिन्स यांनी सिनेमा आणि कॉन्सर्टवरील बंदी हटवली.
अगदी हिप-हॉप कलाकारांनाही बोलावण्यात आलं. महिलांना गाडी चालवण्याचा अधिकार मिळाला आणि त्यांच्या पोषाखाबाबतही उदारता दाखवण्यात आली. क्राऊन प्रिन्स यांनी मौलवींची भूमिकाही मर्यादित केली. धार्मिक पोलीस विभाग बंद केला. त्याचबरोबर क्राऊन प्रिन्स यांनी इस्रायलशी संबंध सुधारण्याची शक्यताही तपासून पाहिली.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचं वृत्तपत्र द अटलांटिकनं सौदी क्राऊन प्रिन्स यांना 2022 मध्ये विचारलं होतं की, ते सौदी अरबला त्यांची इस्लामिक ओळख मागे पडेल एवढं आधुनिक बनवू शकतील का?
या प्रश्नाच्या उत्तरात क्राऊन प्रिन्स यांनी म्हटलं होतं की, "जगातील प्रत्येक देशाची स्थापना वेगवेगळे विचार आणि मूल्यांच्या आधारे झाली आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास अमेरिका लोकशाही, स्वातंत्र्य आणि मुक्त अर्थव्यवस्था अशा मूल्यांच्या आधारावर तयार झाला आहे. लोक याच मूल्यांच्या आधारावर एकजूट राहतात. पण खरंच सगळ्या लोकशाही चांगल्या आहेत का? सगळ्या लोकशाहींमध्ये व्यवस्थित काम सुरू आहे का? नक्कीच नाही."

फोटो स्रोत, Getty Images
"आमचा देश इस्लामची मूल्ये आणि विचारांच्या पायावर उभा आहे. त्यात जमातींची आणि अरब संस्कृती अंतर्भूत आहेत. तसंच सौदीच्या संस्कृती आणि परंपरा आहेत. हाच आमचा आत्मा आहे. आम्ही ते सोडलं तर आमचा देश नष्ट होईल. आमच्यासाठी प्रश्न हा आहे की, सौदी अरबला विकास आणि आधुनिकीकरणाच्या योग्य मार्गावर कसं आणावं? अशाच प्रकारे अमेरिकेसमोर लोकशाही, मुक्त बाजार आणि स्वातंत्र्य हे योग्य मार्गावर कसं आणावं? हा प्रश्न आहे. हा प्रश्न गरजेचा आहे, कारण ते चुकीच्या मार्गावर जाऊ शकतं."
"त्यामुळं आम्ही आमच्या मूल्यांपासून दूर जाणार नाही, कारण हा आमचा आत्मा आहे. सौदी अरबमध्ये पवित्र मशिदी आहेत आणि कोणीही त्या हटवू शकत नाहीत. या पवित्र मशिदी कायम राहतील आणि सौदीचे लोक यांच्या माध्यमातून योग्य मार्गावर राहतील, हे सुनिश्चित करणं आमची जबाबदारी आहे. शांतता आणि एकमेकांच्या अस्तित्वाच्या आधारावर इतर जगातील गोष्टींशी जोडण्याची आमची इच्छा आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








