'मुर्शिद, अमेरिकन दूतावास जळतंय...' 400 हून अधिक कट्टरपंथीयांनी मक्केवर हल्ला केला आणि

'मुर्शिद अमेरिकन दूतावास जळतंय...' काबाचा वेढा आणि जनरल झिया यांची सायकलवरून रावळपिंडीला भेट
    • Author, उमैर सलीमी आणि ज़ुबैर आज़म
    • Role, बीबीसी उर्दू, इस्लामाबाद

21 नोव्हेंबर 1979 रोजी अमेरिकन ऑडिटर विल्यम पेश्चर इस्लामाबादमधील 32 एकरांवर असलेल्या पहिल्या अमेरिकन दूतावासाच्या आवारात स्विमिंग पूलजवळ हॉट डॉग खात होते.

संतप्त जमावाचा आवाज ऐकताच ते जेवण सोडून जवळच्या कार्यालयात जाऊन लपले.

फक्त एक दिवस आधी, 20 नोव्हेंबर रोजी, इस्लामिक नवीन वर्षाच्या सुरूवातीस 400 हून अधिक कट्टरपंथीयांनी मक्कामधील खाना-ए-काबावर हल्ला केला होता.

तिथे नमाज पढणाऱ्या एक लाख लोकांना कैद करून अतिरेक्यांनी मशिदीचं (मस्जिद अल हरम) व्यवस्थापन ताब्यात घेतलं होतं.

हल्लेखोरांचे नेतृत्व करणारा झहीमान बिन मोहम्मद बिन सैफ अल अतीबी हा सौदी अरेबियातील नजद भागातील एका बेदोइन जमातीचा होता, परंतु त्यावेळी हे जगाला माहीत नव्हतं.

अशा स्थितीत काबाच्या वेढ्याला जबाबदार कोण, यावरून अफवांचा बाजार उठला होता.

या संदर्भात अनेक अफवा आणि षडयंत्राच्या कल्पना चर्चेत होत्या. दुसऱ्याच दिवशी संतप्त जमावाने इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला केला जिथे दूतावासातील कर्मचारी आणि अमेरिकन सैनिकांसह सुमारे 150 लोक काम करत होते.

बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी अमेरिकन दूतावासाकडे

1 नोव्हेंबर 1979 रोजी सकाळी इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासातील राजकीय विभागाचे प्रमुख हर्बर्ट हेगर्टी त्यांच्या कारमधून कार्यालयात जात असताना सरकारी रेडिओवर त्यांनी ऐकलं की ‘खाना-ए-काबा’ ला वेढा घातल्यामुळे संपूर्ण देश शोककूल अवस्थेत आहे आणि बाजारपेठेतील दुकानं बंद राहतील.

हेगर्टी यांनी 'दूतावास सीज' या पुस्तकात त्या दिवसाविषयी आपल्या आठवणींमध्ये लिहिलंय की, दिवसाच्या सुरुवातीला त्यांनी पाकिस्तानमधील काही 'अमेरिकन-विरोधी कारवायां’बद्दल इशारा देणारी 'तात्काळ' केबल स्टेट डिपार्टमेंटला पाठवली.

सहा वर्षांपूर्वी इस्लामाबादच्या ग्रामीण कोपऱ्यात $21 दशलक्ष खर्चून एक क्लब, शाळा आणि गृहनिर्माण संकुलासह अमेरिकन दूतावास बांधलं गेलेलं, ज्याला अमेरिकन मरीनच्या लहान तुकडीचं संरक्षण होतं.

राजदूत आणि डेप्युटी चीफ ऑफ मिशन सकाळी 11 वाजता इमारतीतून बाहेर पडले तेव्हा हेगर्टी तेथील सर्वात वरिष्ठ अधिकारी बनले. जवळच्या ऑस्ट्रेलियन दूतावासाच्या राजदूताने त्यांना फोन करून सांगितलं की, सुमारे पाचशे तरुणांचा जमाव अमेरिकन दूतावासाच्या दिशेने जातोय.

आंदोलक जवळ येताच हॅगर्टी यांनी उर्दू भाषिक अधिकारी डेव्हिड वेल्श यांना वाटाघाटी करण्यासाठी बाहेरच्या दारात पाठवलं. सहसा आंदोलक दूतावासातील कर्मचाऱ्यांना अर्ज देऊन परतायचे.

अमेरिकन धोरणांवर आक्षेप असलेल्या त्यांच्या मागण्यांसह वेल्श जेव्हा आतमध्ये परत आले, तेव्हा हेगर्टी यांनी ऑस्ट्रेलियन राजदूताला दूरध्वनी करून सांगितलं, "मला वाटतं की ते समाधानी आहेत आणि तुमच्या दिशेने जातायत."

पण ऑस्ट्रेलियन राजदूताने प्रतिक्रिया दिली की, "मला तुम्हाला सांगायला अतिशय वाईट वाटतंय. (त्यांची) बस आमच्या समोरून गेल्यावर पुन्हा माघारी वळली आहे आणि आता ते (कायद-ए-आझम) विद्यापीठावरून आणखी बसगाड्या घेऊन तुमच्या दिशेने येतायत."

COURTESY LLOYD MILLER

फोटो स्रोत, COURTESY LLOYD MILLER

'सीज ऑफ मक्का' या पुस्तकात पत्रकार यारोस्लाफ ट्रॉफी मूव्ह लिहितात की, हल्ल्याची सुरुवात अमेरिकन दूतावासाच्या एका वाहनाला आग लावून झाली जी दुर्दैवाने निदर्शनादरम्यान इमारतीच्या दिशेने आलेली, तर सुरुवातीला झालेल्या संघर्षात पोलिसांनी आसिफ नावाच्या विद्यार्थाला गोळी मारली होती ज्यात त्याला आपला जीव गमवावा लागलेला.

काबाला वेढा घातल्याच्या अफवांमुळे आंदोलक संतप्त झाल्याची भीती हेगर्टी यांनी व्यक्त केलेली, तर अमेरिकेचे अध्यक्ष कार्टर यांनी इराणला दूतावासातील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्यास लष्करी कारवाई करण्याची धमकी दिलेली.

दूतावासातील गुप्तचर कागदपत्र जाळून टाकण्यात आली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जेव्हा विल्यम पेश्चर यांनी गर्दीचा आवाज ऐकला तेव्हा त्यांनी आपलं खाणं म्हणजे हॉट डॉग तिथेच सोडलं आणि जवळच्या कार्यालयात जाऊन लपले, परंतु गर्दीतील काही लोकांनी त्यांना पाहिलेलं.

अमेरिकन लेखक स्टीव्ह कोल यांनी त्यांच्या 'घोस्ट वॉर्स' या पुस्तकात या घटनेचं तपशीलवार वर्णन केलंय.

'घोस्ट वॉर्स'नुसार, जमावाने विल्यम यांना बाहेर येण्यास भाग पाडलं आणि काही आंदोलकांनी त्यांना जबरदस्तीने एका कारमध्ये बसवलं आणि जवळच्या कायद-ए-आझम विद्यापीठाच्या वसतिगृहात नेलं.

सुदैवाने, दिवसाच्या अखेरीस विल्यम यांना कोणतीही इजा न करता सोडण्यात आलं, परंतु दूतावासातील त्यांचे उर्वरित सहकारी त्यांच्याइतके भाग्यवान नव्हते.

स्टीव्ह कोल लिहितात की, दूतावासाच्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर एक सीआयए स्टेशन होतं जिथे एक तरुण सीआयए अधिकारी गॅरी श्रोन देखील स्टेशनचे उपप्रमुख बॉब लाझार्डसह उपस्थित होते. गॅरी श्रूननंतर पाकिस्तानात सीआयएचे स्टेशन प्रमुख बनले.

पण त्या दिवशी इस्लामाबादमध्ये त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. जमावाने दूतावासावर हल्ला केल्यानंतर गुप्तचर कागदपत्र कशी वाचवायची या चिंतेत होते.

सर्व कागदपत्र जाळण्याची तयारी त्यांनी सुरू केली. खिडकीबाहेरची दृश्ये अस्वस्थ करणारी होती. त्यांना दिसलं की शेकडो आंदोलक दूतावासाच्या गेटच्या बाहेर बसमधून उतरतायत आणि इमारतीभोवतीच्या सुरक्षा कुंपणावरून सहजपणे उडी मारून आत येतायत.

AFP

फोटो स्रोत, AFP

काही आंदोलकांनी त्याठिकाणी उभारलेला गतिरोधकही पाडला होता.

'घोस्ट वॉर्स' चा दावा आहे की आंदोलकांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश होता, त्यापैकी काही शस्त्रधारी होते. दूतावासाच्या गेटवर एका विद्यार्थ्याने गोळी झाडली तेव्हा गोळी लोखंडावरून उडाली आणि आंदोलकांपैकी एकाला लागली.

स्टीव्ह कोल लिहितात की, दूतावासाच्या छतावर असलेल्या अमेरिकन सैनिकांनी गोळीबार केला होता, परंतु दूतावासात फक्त सहा सागरी रक्षक होते, त्यापैकी छतावर तैनात करण्यात आलेल्या दोघांना आदेश देण्यात आलेला की ते फक्त स्वत:चा जीव वाचवण्यासाठी गोळीबार करू शकतात.

काही वेळाने दूतावासाच्या आत आवाज आला की त्यांनी एका सागरी रक्षकाला गोळ्या घातल्या आहेत. जमावाकडून झाडली गेलेली एक गोळी छतावर असलेल्या 22 वर्षीय कॉर्पोरल स्टीफन क्रॉलीला लागलेली आणि त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला.

सीआयए अधिकार्‍यांनी प्रथमोपचार किट उचललं आणि छताकडे धाव घेतली जिथे त्यांना स्टीफन क्रॉली जखमी अवस्थेत आढळले.

जनरल झिया सायकलवरून रावळपिंडीचा दौरा करण्यात व्यस्त होते

दूतावासाच्या आपत्कालीन प्रोटोकॉलनुसार, अशा परिस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना सूचना होत्या की त्यांनी स्टीलचे मजबूत दरवाजे असलेल्या कम्युनिकेशन व्हॉल्टमध्ये आश्रय घ्यावा.

कर्मचार्‍यांना सूचना होत्या की आश्रय घेतल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी पोलिस किंवा कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांची वाट पाहावी.

आता दुपारचा एक वाजला होता आणि गर्दीला इमारतीत शिरून एक तास उलटून गेलेला. काही आठवड्यांपूर्वी सीआयए स्टेशनला सूत्रांकडून माहिती मिळाली होती की कायद-ए-आझम विद्यापीठाचे विद्यार्थी इराणमधील अमेरिकन दूतावासातील काही कर्मचार्‍यांना ओलीस ठेवण्याच्या घटनेबद्दल इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासाबाहेर आंदोलन करू शकतात.

zia

फोटो स्रोत, FACEBOOK

या माहितीनंतर अमेरिकेचे राजदूत आर्थर हिमल यांनी अधिकाऱ्यांना दूतावासाबाहेर आणखी पोलिस तैनात करण्याची विनंती केली, त्यानंतर सुमारे दोन डझन अधिकारी तैनात करण्यात आले.

दुसरीकडे, त्यादिवशी पाकिस्तानचे लष्करी अध्यक्ष आणि लष्करप्रमुख जनरल झिया उल हक यांनी रावळपिंडीत सायकल चालवण्याचा कार्यक्रम आखला होता.

स्टीव्ह कोलच्या म्हणण्यानुसार, जेव्हा दूतावासातून मदतीसाठी फोन करण्यात आला तेव्हा बहुतेक लष्करी अधिकारी उपस्थित नव्हते आणि याचं कारण साधेपणाला प्रोत्साहन देणारं अभियान होतं.

'सीज ऑफ मक्का' या पुस्तकानुसार, जनरल झिया यांनी आधी खुल्या जीपमधून पिंडीच्या रस्त्यांवर फेरफटका मारला, त्यानंतर त्यांनी सायकल चालवण्यास सुरुवात केली, यादरम्यान त्यांच्या मार्गावर तैनात असलेल्या महिला त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होत्या. जनरल झिया जेव्हा जेव्हा थांबायचे तेव्हा त्यांचे सल्लागार तांदळाच्या पिशव्या, रोख रक्कम आणि कुराणच्या प्रती लोकांमध्ये वाटायचे.

पत्रकार यारोस्लाफ ट्रोफी मूव्ह लिहितात की, अमेरिकन अधिकारी झिया यांच्याशी बराच काळ संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते जेणेकरून ते या प्रकरणात हस्तक्षेप करू शकतील.

आंदोलकांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी दूतावासाच्या व्हॉल्टमध्ये बंद असलेले वरिष्ठ अधिकारी हेगर्टी हे राजदूत आर्थर हिमेल यांच्याशी सतत रेडिओ संपर्कात होते, ते दूतावासाजवळील त्यांच्या घरातून पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय, पोलिस आणि लष्कराला वारंवार कॉल करत होते.

पण यारोस्लाफ ट्रॉफी मूव्हनुसार, “कनिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि झिया फोन उचलत नव्हते. राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर हे परराष्ट्र सचिव सायरस व्हॅन्स यांच्या पहाटेच्या फोनने जागे झाले होते, मात्र तेही पहिल्या प्रयत्नात पाकिस्तानी नेत्याशी संपर्क साधू शकले नाहीत.

"इस्लामाबादमधील अनेक अमेरिकन दूतावासाच्या अधिकार्‍यांनी नंतर झिया यांच्यावर आरोप केला की, त्यांच्या समर्थकांना त्यांनी जाणूनबुजून बाहेर काढलं नाही आणि दूतावास जाळण्याची परवानगी दिली."

पाकिस्तानी लष्कर आणि पोलिस दल दिवसभर राजनैतिक क्षेत्रात येत राहिले, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी 'डॉन' या वृत्तपत्रातील वृत्तात प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने लिहिलं की ते 'मूक प्रेक्षक बनून राहिले.'

लेफ्टनंट जनरल फैज अली चिश्ती त्यांच्या ‘बिट्रेयल ऑफ अनदर काइंड' या पुस्तकात लिहितात की जनरल झिया यांनी त्यांच्या गौण अधिकारा-यांच्या सल्ल्याने सायकलवरून पिंडीला जाण्याचा निर्णय घेतला कारण त्यांची लोकप्रियता वाढू शकेल अशा कोणत्याही गोष्टीला नकार न देणं हा त्यांचा कमकुवतपणा होता.

“21 नोव्हेंबर हा दिवस वाईट ठरला. (काबाच्या वेढा पडल्याच्या बातमीवर) झिया यांना कार्यक्रम रद्द करण्यास सांगण्यात आलं पण त्यांनी जनतेच्या भावनांचा फायदा घ्यायचा निर्णय घेतला."

जनरल चिश्ती यांच्या म्हणण्यानुसार, वारिस खान चौकात सामान्य लोकांशी संवाद साधताना झिया उल हक यांनी जाणूनबुजून किंवा लक्ष न दिल्याने काबाला घेराव घालण्यात अमेरिकेचा सहभाग असल्याच्या अफवांचा संदर्भ दिला.

"जनरल झिया यांचे संभाषण ऐकल्यानंतर संतप्त लोक इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासाकडे जाऊ लागले."

झिया यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम मंत्री असलेले जनरल चिश्ती त्यांच्या पुस्तकात लिहितात की, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मला जनरल झिया यांचा माझ्या निवासस्थानी फोन आला: मुर्शिद (गुरु), अमेरिकन दूतावास जळतंय. परिस्थिती खूप वाईट आहे. जमाव अमेरिकन दूतावासातील कोणालाही वाचवू देत नाहीये.”

'दूतावासातील सर्व कर्मचारी गुदमरून मरतील किंवा जळून जातील'

स्टीव्ह कोल लिहितात की, सुमारे चार वाजता एक लष्करी हेलिकॉप्टर दूतावासाच्या इमारतीवर घिरट्या घालत होतं, परंतु काही क्षणांनंतर ते गायब झाले.

स्टीव्ह कोलच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान सरकारने दावा केला की, इमारतीच्या वर इतका प्रचंड धूर होता की हेलिकॉप्टरमधील लोकांना काहीच दिसत नव्हतं.

यारोस्लाव ट्रॉफी मूव्ह यांच्या मते , पाकिस्तानी लष्कराचं हे हेलिकॉप्टर दूतावासावर उडत होतं आणि हेगर्टी आणि इतर अधिकाऱ्यांना वाटलं की ते त्यांना मदतीसाठी आले आहेत.

पण पाकिस्तानी पायलटने “खालील परिस्थिती पाहून दिशा बदलली. त्यामुळे आंदोलकांना आनंद झाला. आत अडकलेल्या अमेरिकनांना वाटलं की ते आज जिवंत राहू शकणार नाहीत.”

दोन वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी लोकांसह एकशे चाळीस कर्मचा-यांना आपण अडकल्याची जाणीव झाली. एक तरुण अधिकारी वॉशिंग्टनला या हल्ल्याची माहिती देण्यासाठी संदेश लिहित होता, तर बाकीचे कर्मचारी गुप्तचर कागदपत्रं जाळण्यात व्यस्त होते.

आंदोलकांनी खिडक्या तोडून इमारतीला आग लावण्यास सुरुवात केल्याने, उर्वरित कर्मचार्‍यांनी वॉल्टमध्ये आश्रय घेतला, ज्यात टाईम मासिकाच्या रिपोर्टर मार्सिया गोगर यांचादेखील समावेश होता.

झिया

फोटो स्रोत, Getty Images

दुर्दैवाने काही माहिती मिळवण्यासाठी त्यांना त्याच दिवशी एका अमेरिकन मुत्सद्द्याला भेटायचं होतं.

दुपारनंतर आंदोलकांची संख्या वाढली होती आणि ते दूतावासाच्या परिसराच्या प्रत्येक भागात पसरले होते. त्यांनी कार्यालयांना आग लावली, ज्यामुळे संपूर्ण इमारतीला आग लागली.

दरम्यान, आंदोलक इमारतीच्या गच्चीवर चढले. कर्मचाऱ्यांनी नंतर माध्यमांना दिलेल्या निवेदनात सांगितलं की निदर्शक वायुवीजन शाफ्टमधून खालच्या दिशेने गोळ्या झाडत होते.

कम्युनिकेशन व्हॉल्टच्या अगदी खाली, अर्थसंकल्प आणि वित्त कार्यालयं फायली आणि कागदपत्रांनी भरली होती. जेव्हा तिथे आग लागली तेव्हा वरील संपर्क व्हॉल्ट गरम होऊ लागली. आगीच्या दाबामुळे स्टीलचा दरवाजाही वाकल्याने हा दरवाजा कधीही तुटण्याची भीती वाढली होती.

आतापर्यंत बाकीच्या कर्मचाऱ्यांसह सागरी सैनिकांनी तिसऱ्या मजल्यावरील व्हॉल्टमध्ये आश्रय घेतला होता. इमारतीबाहेरील वाहनांनाही आग लावण्यात आलेली आणि सुमारे साठ वाहने जळून बेचिराख झाल्याचा अंदाज होता.

स्टीव्ह कोल यांच्या म्हणण्यानुसार, धुराचे ढग आता काही मैल अंतरावरून दिसू लागले असतानाही अमेरिकेचे राजदूत हिमेल आणि सीआयए स्टेशनचे जॉन रेगन यांच्याकडून मदतीसाठी वारंवार विनंती करूनही कुणीही सरकारी अधिकारी वेळेत पोहोचू शकले नाहीत.

बचाव कार्य

अखेर संध्याकाळी सुमारे साडेपाच तासांनंतर जनरल झिया यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तुकड्यांना दूतावासात अडकलेल्या लोकांना मदत करण्याचे आदेश दिले आणि बचावकार्य सुरू झालं.

चेहऱ्यावर गोळी लागल्याने अमेरिकन मरीनच्या कॉर्पोरल क्रॉली यांचा मृत्यू झालेला, पण त्यांनी ही बातमी स्वत:पुरतीच मर्यादित ठेवली, असं हॅगरटी सांगतात.

दुसऱ्या मजल्यावरून दूतावासाच्या फोनद्वारे त्यांच्याशी तीन पाकिस्तानी कर्मचारी आणि एका स्पॅनिश कर्मचाऱ्याने संपर्क साधला ज्यांना धुरात श्वास घेता येत नव्हता.

त्यांनी त्या लोकांना "खिडक्यांमधून उडी मारून आपला जीव वाचवण्यास सांगितलं.”

चौघांनीही सलवार कमीज घातले होते, त्यामुळे लोकांनी त्यांच्याकडे आंदोलक म्हणून लक्ष दिलं नसतं, परंतु दोन पाकिस्तानींनी तसं केलं नाही आणि धुरामुळे श्वास न घेता आल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.

US EMBASSY, ISLAMABAD

फोटो स्रोत, US EMBASSY, ISLAMABAD

इमारतीतील अनेकजण धुरामध्ये ओल्या टॉवेलद्वारे श्वास घेत होते. जर ते अधिक काळ व्हॉल्टमध्ये राहिले असते तर तापमान वाढल्याने त्यांचा मृत्यू झाला असता.

आपला जीव वाचवण्यासाठी मास्टर सार्जंट मिलर आणि आणखी एक अमेरिकन आणि एक पाकिस्तानी कर्मचारी छताच्या दिशेने धावले. तोपर्यंत अंधार पडला होता आणि कॅनडाच्या दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रेडिओवरून घोषणा केली होती की आंदोलकांची संख्या कमी झालेय. यानंतर एक एक करून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं.

'घोस्ट वॉर्स'नुसार, सागरी संरक्षकांनी सायकलच्या मदतीने एक शिडी तयार केली, त्यानंतर व्हॉल्टमधून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.

"सैनिक इमारतीत आत आले होते पण बहुतेकांनी फक्त बघ्याचीच भूमिका पार पाडली.”

बचाव मोहिमेनंतर कर्मचाऱ्यांना कळलं की, क्रोलीशिवाय आंदोलकांनी आणखी एका अमेरिकन सैनिकाची हत्या केली होती. वॉरंट ऑफिसर ब्रायन एलिस त्या दिवशी रजेवर होते आणि ते त्यांच्या फ्लॅटमध्ये झोपले होते तेव्हा आंदोलकांनी त्यांची हत्या केली आणि नंतर त्यांचा मृतदेह जाळला.

या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि पाकिस्तानी दूतावासाचे दोन कर्मचारी ठार झाले, तर दोन आंदोलक मृत्यूमुखी पडल्याचं सांगण्यात आलं.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विल्यम पेटश्चर यांना निर्दोष मानून रात्री उशिरा सोडून दिलं. ते स्वतः पायीच दूतावासात परतले.

हेगर्टी यांना आठवतं की हे सर्व घडल्यानंतर जेव्हा ते डिप्लोमॅटिक परिसरातील त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचा तरुण मुलगा डेव्हिन बेसबॉलची बॅट घेऊन घाबरून दाराच्या मागे उभा होता.

अनेकांचे प्राण वाचवणारी पाकिस्तानी व्यक्ती

'सीज ऑफ मक्का' या पुस्तकानुसार, दूतावासातील कर्मचार्‍यांना वॉशिंग्टनने हे प्रकरण पाकिस्तान सरकारकडे लावून धरण्याची अपेक्षा केलेली, परंतु जेव्हा अध्यक्ष कार्टर आणि राज्य सचिव व्हॅन्स यांनी जनरल झिया यांनी उचललेल्या पावलांचं कौतुक केलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं.

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या आठवणीमध्ये लिहिलंय की, "राष्ट्रपती मोहम्मद झिया यांनी आमची लोकं आणि मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी ताबडतोब पाकिस्तानी सैन्य पाठवलं.” त्यांनी माझ्यासमोर वैयक्तिकरित्या आणि अमेरिकन लोकांसमोर खेद व्यक्त केला आणि सरकार संपूर्ण नुकसान भरपाई देईल असा आग्रह धरला.

पण हेगर्टी यांनी आपल्या आठवणीमध्ये लिहिलंय की, "आम्हाला याबद्दल खूप राग आलेला, परंतु आम्ही प्रोफेशनल होतो."

जनरल चिश्ती यांच्या म्हणण्यानुसार, "देशाच्या दूतावासाच्या पुनर्बांधणीसाठी राष्ट्राने 25 कोटी रुपयांचा दंड भरला, जेणेकरून देशाचा प्रमुख सायकल चालवून साधेपणाचा उपदेश करू शकेल आणि काबाच्या वेढ्यावर बेजबाबदार विधानं करू शकेल."

त्यादरम्यान, पाकिस्तानच्या सरकारी रेडिओच्या प्रसारणादरम्यान असं म्हटलं गेलेलं की, "लोकं भावनिक होते आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण होतं.”

इराणचे नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या विधानानंतर हा हल्ला झाल्याचं विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये निदर्शनास आलंय ज्यात त्यांनी काबाला वेढा घातल्याबद्दल अमेरिकेला जबाबदार धरलंय.

'सिज ऑफ मक्का' या पुस्तकात पत्रकार यारोस्लाफ ट्रॉफी मूव्हने लिहिलंय की, 22 नोव्हेंबर रोजी इराणी टीव्ही वर लोकं हजला जाणार्‍या डझनभर पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भेटताना दिसले होते जे वाटेत इराणमध्ये थांबले होते.

त्यांना संबोधित करताना खोमेनी यांनी अमेरिकन दूतावास उद्ध्वस्त केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हणाले, संपूर्ण पाकिस्तान अमेरिकेच्या विरोधात उभा राहिला आहे.

2019 दरम्यान, इस्लामाबादमधील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड हील यांनी 21 नोव्हेंबर 1979 रोजी शंभरहून अधिक लोकांचे प्राण वाचवणाऱ्या पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्याचं कौतुक केले.

ते म्हणाले की, जेव्हा जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली तेव्हा मोहम्मद रशीद इमारतीत प्रचंड उष्णता आणि धूर असूनही तळघरातच राहिला जेणेकरून तो जनरेटर चालवू शकेल.

"इमारतीची वेंटिलेशन यंत्रणा त्याच जनरेटरमधून चालत होती ज्यामुळे दूतावासाच्या संपर्कम्युनिकेशन व्हॉल्टमधील लोकांना श्वास घेता येत होता."

परंतु जनरल चिश्ती यांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण घटनेतील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे, आयएसआयचे डीजी जनरल अख्तर अब्दुर रहमान यांनी जनरल झिया यांना सांगितलं की ते स्वत: त्यांच्या दोन-तीन सहकार्‍यांसह आणि 'सामान्य वेषात गुप्तचर अधिकाऱ्यांसह अमेरिकन दूतावासात गेले होते. दूतावासातील सर्व कर्मचार्‍यांना अटक करून त्यांना व्हेंटिलेटरमधून काढून वाचवलं होतं.'

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)