त्या 4 जीवघेण्या घटना ज्यात खरंतर मृत्यू व्हायचा, पण लोक सहीसलामत वाचले

काहीतरी चमत्कार होईल आणि आपले आप्त सुखरुप वाचतील अशी आशा नातेवाईकांना वाटत असते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काहीतरी चमत्कार होईल आणि आपले आप्त सुखरुप वाचतील अशी आशा नातेवाईकांना वाटत असते

एखादा अपघात झाला की अनेकांच्या मनात वाईट विचार येतात आणि ते साहजिकही आहे. अनेकदा असे दुर्दैवी अपघात अनेकांचे जीव घेतात.

पण कधीतरी अशा अपघातातूनही, जगण्याची शक्यता 1 टक्काही नसताना काहीजण सहीसलामत बाहेर पडतात.

त्याचं ताज उदाहरण म्हणजे कोलंबियाच्या जंगलात तब्बल 40 दिवसांनी जिवंत सापडलेली चार भावंडं.

ही मुलं आणि त्यांची आई एका छोट्या विमानातून प्रवास करत होते, ते कोसळलं. या अपघातात त्या मुलांची आई, पायलट यांचा मृत्यू झाला पण मुलं वाचली.

ही बेपत्ता मुलं सापडणं आणि तीही जिवतं, ही बाब अनेकांसाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये.

दक्षिण-पूर्व कोलंबियातील या चार आदिवासी मुलांनी विमान अपघातानंतर तब्बल 40 दिवस दुर्गम आणि घनदाट जंगलात घालवले.

1 मे 2023 रोजी ही मुलं त्यांच्या आई आणि इतर दोन व्यक्तींसह एका छोट्या विमानात प्रवास करत होती. हे विमान जंगलात कोसळलं. या दुर्घटनेत ही चार मुलं वगळता इतरांचा मृत्यू झाला.

या चारही जणांची वयं अनुक्रमे चौदा, नऊ, चार आणि एक वर्ष आहेत. अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलात हे सर्व जण एकटे राहिले.

या मुलांच्या जिवंत सापडण्याला माध्यमं ‘चमत्कार’ म्हणत आहेत. पण हा पहिलाच प्रसंग नाहीये की अशा प्रकारच्या गंभीर परिस्थितीतून माणसं जिवंत वाचलीत. कोलंबियातल्या घटनेमुळे या चार घटनांची आठवण आल्याशिवाय राहाणार नाही.

1. अँडीज अपघात

13 ऑक्टोबर 1972 ला उरूग्वेतल्या ओल्ड ख्रिश्चन क्लब ऑफ मॉन्टेव्हिडिओ या क्लबचे रग्बी खेळाडू त्यांची कुटुंब आणि मित्रांसह सांतियागो दे चिले या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी जात होते.

अपघातग्रस्त झालेलं विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अपघातग्रस्त झालेलं विमान

पण ते ज्या विमानाने जात होते ते विमान अँडीज पर्वतरांगांमध्ये कोसळलं. पण हे विमान नक्की कुठे कोसळलं ते माहीत नसल्याने शोधपथकांनी अनेक दिवस या पर्वतरांगांमध्ये शोधकार्य केलं. पण त्यांना यश आलं नाही.

त्यामुळे बचावकार्य थांबण्यात आलं. त्या विमानातल्या प्रवाशांचा मृत्यू झाला असावा असंच सगळ्यांना वाटत होतं.

प्रत्यक्षात जेव्हा अपघात झाला तेव्हा त्या विमानातल्या 45 प्रवाशांपैकी 12 लोक मृत्युमुखी पडले. हे विमान बर्फाळ पर्वतात कोसळलं होतं. थोड्या काळाने जे लोक जिवंत होते त्यातले आठ लोक बर्फाच्या वादळात बर्फाखाली गाडून मारले गेले.

जेव्हा विमानातलं अन्न संपलं तेव्हा जिवंत राहिलेल्यांनी मृत व्यक्तींचं मांस खायला सुरूवात केली.

त्या वर्षी डिसेंबरमध्ये दोन रग्बी खेळाडू रॉबर्टो कानेसा आणि फर्नांडो पारोडो यांनी मदत मिळवण्याच्या दृष्टीने बर्फातून चालायला सुरुवात केली. ते सलग 10 दिवस चालत होते, शेवटच्या दिवशी त्यांना मदत मिळाली.

अपघात घडल्यानंतर तब्बल 72 दिवसांनी आणि 14 जणांना वाचवण्यात यश आलं.

2. मेक्सिकोची ‘चमत्कारी’ बाळं

19 सप्टेंबर 1985 ला मेक्सिकोत एक प्रलयकारी भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता 8.1 रिश्टर स्केल एवढी होती. राजधानी मेक्सिको सिटी पूर्णपण उद्धवस्त झाली. हजारो माणसांचे जीव गेले.

मेक्सिकोतला प्रलंयकारी भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेक्सिकोतला प्रलंयकारी भूकंप

त्या भूकंपात नक्की किती लोकांचे जीव गेले याची नक्की आकडेवारी उपलब्ध नसली तरी सरकारी आकडेवारीनुसार 3,692 रेडक्रॉसच्या आकडेवारीनुसार 10 हजाराहून अधिक लोकांचे जीव गेले.

अनेक दिवसांच्या बचावकार्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नवजात बाळ जिवंत सापडली.

त्यापैकी एक होते फ्रान्सिस्को फ्लोरेस. त्यांना नंतर ‘अर्थक्वेक बॉय’ किंवा ‘मिरॅकल बॉय’ असं टोपणनाव पडलं.

फ्रान्सिस्को भूकंप झाला तेव्हा आईच्या उदरात होता. भूकंपामुळे दबल्या गेल्यामुळे त्यांच्या आईचा मृत्यू झाला पण त्यांच्या आजीने एक रेझर ब्लेड घेऊन आपल्या मुलीचं उदर फाडून फ्रान्सिस्को यांना जिवंत बाहेर काढलं.

3. ‘आम्ही 33 जण सुखरूप आहोत’

5 ऑगस्ट 2010 साली चिलेतल्या अॅटकामा वाळवंटात एक सोनं आणि तांब्याची खाण खचली आणि 700 मीटर खोल भूगर्भात 33 खाणकामगार अडकले.

खाणीतले कामगार सुखरुप बाहेर आले तो क्षण

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, खाणीतले कामगार सुखरुप बाहेर आले तो क्षण

सुरुवातीला ते कामगार जिवंत असण्याची कोणतीही शक्यता वाटत नव्हती, पण तरी कोणाला लपायला जागा सापडली असेल तर ते जिवंत असतील या भावनेने शोधपथकाने बचावकार्याला सुरुवात केली.

पण या कामगारांनी एका ठिकाणी आश्रय घेतला होता. ते ढिगाऱ्याखाली दबले नव्हते, पण त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता नव्हता. 22 ऑगस्टला हे कामगार बचावपथकापर्यंत एक मेसेज पोचवण्यात यशस्वी झाले, ‘आम्ही 33 जण सुखरुप आहोत.’

या अडकलेल्या कामगारांपर्यंत पोचण्यासाठी बचावपथकला अक्षरक्षः दगड फोडून पुढे सरकावं लागत होतं. त्यातही अडकलेल्या लोकांना त्रास होणार नाही आणि त्यांच्या जीवावर बेतणार नाही अशा प्रकारे त्यांना पुढे सरकावं लागत होतं.

एक छोटी कॅप्सूल बनवून अडकलेल्या कामगारांना एकेक करून काढण्याची योजना होती. सरतेशेवटी 69 दिवस खाणीत अडकून राहिल्यानंतर या कामगारांची सुटका झाली.

4. थायलंडची मुलं

23 जून 2018 साली थायलंडच्या उत्तरेच्या चिआंग राय प्रांतात 12 मुलं त्यांच्या कोचबरोबर फिरायला गेले.

त्यांची प्रॅक्टिस संपल्यानंतर ते भातांच्या खेचरांमधून सायकल रेसिंग करत होते. ते टेकडी चढून वर गेले जिथे गेले काही दिवस पाऊस होत होता.

गुहेत अडकलेल्या मुलांना वाचवण्यासाठी मोठी मोहीम राबवली गेली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुहेत अडकलेल्या मुलांना वाचवण्यासाठी मोठी मोहीम राबवली गेली

त्यांना तिथल्या थाम लुआंग गुहेत जायचं होतं. तिथल्या स्थानिक तरुणांना तिथले पॅसेज फिरायला आवडतं. या गुहेत आत अनेक वळणावळणाचे रस्ते आहेत

ही मुलं तिथे फक्त टॉर्च घेऊन शिरली. त्यांना दुसरं काही नेण्याची गरज नव्हतीच कारण ते तिथे तासभरच थांबणार होते.

पण त्या गुहेत अचानक पाणी भरलं, त्यामुळे त्यांचा बाहेर येण्याचा रस्ता बंद झाला. त्यांना पाणी नसलेल्या जागी जाण्यासाठी अजून आत जावं लागलं.

मुलांच्या या गटाने एका मोठ्या दगडात जवळपास 5 मीटर खाली खोदून एक अंतर्गत गुहा तयार केली जिथे ते सगळे एकत्र आणि उबदार राहू शकतील. ही जागा गुहेच्या प्रवेशव्दारापासून 4 किलोमीटर आत होती.

या मुलांना वाचवण्यासाठी जगभरातले स्पेशलाईज्ड डायव्हर्स थायलंडला आले. नऊ दिवस अंधारात काढल्यानंतर या मुलांना वाचवण्यात यश आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)