Digital Arrest : मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात नाव आल्याचे सांगून मुंबईत वृद्धाला फसवले, 8 लाखांना असा घातला गंडा

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

ऑनलाइन फसवणुकीचे आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण राज्यभर दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. 'डिजिटल अरेस्ट' हा सर्वाधिक चर्चेचा आणि फसवणुकीसाठी वापरला जाणारा प्रकार आहे.

नुकतंच मुंबईत मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या 69 वर्षीय बिपिन शहा यांना फसवण्यात आलं. अंधेरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या नावानं त्यांना फोन करण्यात आला होता.

एका गुन्ह्यात तुमचं नाव आलं आहे असं सांगून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आलं. त्यानंतर 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना सुरतमधून अटक केली आहे.

ऑनलाइन फसवणुकीत आणि डिजिटल अपराधांमध्ये डिजिटल अरेस्टचं प्रमाण सर्वत्र वाढत आहे, त्यामुळं कोणतेही व्यवहार करताना खबरदारी घ्या. घाबरून जाऊ नका, महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार करा असे आवाहन महाराष्ट्र सायबर सुरक्षा विभागाने सर्वांना केले आहे.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय ?

डिजिटल अरेस्ट हा ऑनलाइन फसवणुकीमध्ये एक नवीन प्रकार आहे. यात पोलीस अधिकारी किंवा इतर प्रशासकीय अधिकारी असल्याचे भासवून फोनवरून व्यक्तीची चौकशी केली जाते.

फोन केलेल्या व्यक्तीला, तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल झालाय आणि तुम्ही अपराध केला आहे असं सांगत घाबरवलं जातं.

यानंतर बनावट अधिकारी फोनवरून झूम किंवा whatsapp कॉल वरून बोलतात. त्यांना खोट्या गुन्ह्याची माहिती दिली जाते. तुम्ही डिजिटल अरेस्ट झाला आहात, कॅमेरा समोरून कुठेही जाऊ नका, चौकशी करून तुमचा जबाब नोंदवतोय असंही सांगितलं जातं.

महत्त्वाचं म्हणजे फोन करणारी व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात असते आणि काही बनावट सरकारी कागदपत्रंही दाखवते.

यानंतर एखादी व्यक्ती घाबरल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून गुन्हेगार प्रकरणातून बाहेर काढण्याच्या नावाखाली पैशाची मागणी करतात. अनेक तास फोनवर बोलल्यानंतर मग ती व्यक्तीही गुन्हेगार सांगेल तसं वागू लागते.

संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यासमोर असतो. कॅमेऱ्यासमोर बंदिस्त राहणं यालाच डिजिटल अरेस्ट असं म्हणतात. भीतीपोटी अनेकदा अशा फसवणुकीत सुशिक्षित, वयोवृद्ध नागरिक फसतात. कारण स्वतःसह घरच्यांना यात गोवण्याची भीती त्यांना दाखवली जाते.

मनी लाँडरींगच्या नावाने फसवले

मुंबईत मालाडमध्ये 21 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या प्रकरणात 69 वर्षीय बिपीन शाह यांना अंधेरी पोलिस स्टेशनचे अधिकारी व्हीडिओ कॉल आला होता. गोयल नावाच्या व्यक्तीने तुमचे आधार कार्ड बँक खात्यासाठी वापरल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

तुमच्या नावावरील बँक खातं वापरून मनी लाँडरिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तुमच्या नावाचं वॉरंट जारी करण्यात आलं आहे, तुम्हाला अटक होईल असं सांगण्यात आलं.

व्हीडिओ कॉलवरील व्यक्तीनं पोलिसांचा गणवेश परिधान केलेला होता. त्यामुळं शहा घाबरले. अशाप्रकारे आरोपींनी शहा यांना साडेचार तास व्हीडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट केलं.

अटक टाळण्याच्या नावाखाली शहा यांना त्यांच्या बँक खात्यातून 8 लाख 60 हजार रुपये ट्रान्सफर करायला लावले.

सगळ्या प्रकारानंतर शहा यांनी मुलीला याबाबत माहिती दिल्यानंतर फसवणूक झाल्याचं समोर आलं. त्यांच्या मुलीने तत्काळ मालाड पोलीस ठाण्यात माहिती दिली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मालाड पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केली.

शहा यांनी त्यांना त्यांच्या नावाने कोट्यवधींचं मनी लाँडरिंग सुरू असल्याचं सांगत घाबरवण्यात आल्याची माहिती दिली. त्यांच्याबरोबर घडलेला सर्व प्रकार त्यांनी सांगितला.

महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शहा यांच्या नावाची बनावट कागदपत्रंही दाखवली. त्यामुळं ते घाबरल्याचं शहा म्हणाले. मुलीला सांगितल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सुरतला

घटनेच्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ट्रान्सफर केलेले पैसे महिंद्रा कामरेज सुरत येथील कोटक बँकेच्या एटीएममधून काढण्यात आल्याचे तपासात समोर आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड पोलिसांनी पथक तयार करून कामरेज सुरत येथे सापळा रचला. तिथं चार आरोपी एटीएममधून पैसे काढण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना फिल्मी स्टाईलमध्ये एटीएममध्ये अटक केली.

जय अशोद्रिया, संदीप केवडिया, धरम गोयल आणि जय मोराडिया अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. ते सूरतचे रहिवासी आहेत.

आरोपींनी आतापर्यंत किती लोकांची अशी फसवणूक केली आहे आणि त्यांच्या टोळीत किती लोक आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

वृद्ध आणि महिला लक्ष्य

डिजिटल अरेस्टमध्ये साधारणपणे वयोवृद्ध आणि महिलांना फसवण्याचे प्रमाण अधिक आहे. ऑनलाइन फसवणुकीचं प्रमाण वाढत असून हा डिजिटल अरेस्टचा नवीन प्रकार असल्याचं गोरेगाव विभागाचे सहायक पोलीस आयुक्त हेमंत सावंत म्हणाले.

मुंबईत काही महिन्यांपूर्वी रियल इस्टेट व्यावसायिक सुकेतू मोदी यांनाही अशा प्रकारांमध्ये फसवण्यात आलं. ते जवळपास दोन दिवस घरात डिजिटल अरेस्ट होते.

त्यांच्या नावाने पासपोर्ट आणि ड्रग्जचे पार्सल पाठवत असल्याचं सांगून त्यांना घाबरवण्यात आलं. त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेऊन 35 लाख रुपये वळवण्यात आले.

विशेष म्हणजे आरोपींनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यासोबत मिळून मनी लाँडरिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.

याशिवाय गोरेगावमधील एका दांपत्याला 1 कोटी 33 लाखांना तर ऑगस्ट महिन्यात खार पश्चिममधील तेजस मार्फतिया यांनाही अशा डिजिटल अरेस्टच्या नावाने दोन कोटींचा गंडा घालण्यात आला.

साकीनाका अंधेरी परिसरात अर्चना सिंग नावाच्या महिलेलाही 50 हजारांना फसवण्यात आलं होतं. तर गोरेगावच्या एका महिलेलाही सव्वा कोटींना फसवलं होतं. त्यांना तर महिनाभर डिजिटल अरेस्ट केलं होतं.

दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असून मुंबईत चालू वर्षात असे 102 गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.

कायद्यात संकल्पनाच नाही

अशा सायबर चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी आपली कोणत्याही प्रकारची माहिती फोनवरुन दुसऱ्या कोणाला देऊ नये. डिजिटल अरेस्ट अशी कोणत्याही प्रकारची अटक पोलिसांकडून केली जात नाही.

मुळात अशा प्रकारची संकल्पनाच आपल्या कायद्यात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी कशालाही घाबरू नये असं आवाहन आयपीएस सायबर पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी केलं.

शंका आल्यास किंवा अशा प्रकारची एखादी घटना घडली तर न घाबरता आपण जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी किंवा 14407 वर कॉल करावा असं आवाहन त्यांनी केलं.

सायबर विभागाकडून अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारी संदर्भात जनजागृती केली जात आहे.

आपण सध्या अनेक ठिकाणी कागदपत्रं देतो. ती ऑनलाईनही असतात. त्यामुळे कोणीही बनावट सह्यांची कागदपत्र दाखवून आपली लूट करतं. पण आपली कागदपत्रं त्यांच्याकडं कशी यानं घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

शिक्षा आणि कायदे अधिक कठोर

अशा प्रकारच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 170, 171, 384, 385, 389, 419, 420, 465, 467, 471, 120 ब माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 सी, 66 डी, 66 ई, 67 तसेच भारतीय न्याय संहिता बीएनएस 2023 अंतर्गत कलम 3(5) ,318 (4) ,319(2) या कलमांतर्गत गुन्हे दाखल होतात.

मात्र अशा या गुन्ह्यांमध्ये अनेकदा आरोपी काही वर्षांनी सुटतात. त्यामुळे या सायबर गुन्हेगारीबाबत शिक्षा आणि कायदे अधिक कठोर करायला हवेत असे कायदे तज्ज्ञ सांगतात

डिजिटल अरेस्टचे प्रकरण वाढत आहे आणि हे कसं रोखलं पाहिजे यासंदर्भात बोलताना सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी म्हणाले की, डिजिटल अरेस्टचा भस्म्या मोठा होत चालला आहे.

डिजिटल अरेस्ट झाल्यानंतर संबंधित व्यक्ती खूप चिंतेत असतो आणि त्यामुळे अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार घडतात. या प्रकरणात गुन्हेगार पकडल्यानंतर आरोपींवर गंभीर आणि कठोर शिक्षा असलेली कलमे लागत नाहीत. त्यामुळे या गुन्हेगारांना अधिक धाक नसतो. असं तज्ज्ञांचं मत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.