'मुलगी ओरडली का नाही?' हे विचारण्यापेक्षा मुलींना सुरक्षित कसं वाटेल याचा विचार करा - ब्लॉग

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

2009 मध्ये रात्री मित्राशी फोनवर बोलणं सुरू होतं. त्याच वेळी एक कॉल वेटिंगवर आला आणि पाठोपाठ तेव्हा प्रसिद्ध असणाऱ्या ब्लॅकबेरी मेसेंजरवर मेसेज...

'एका आयटी इंजिनीयर महिलेचा बलात्कार करुन खून झाला आहे.'

पत्रकार मित्रालाही त्याचवेळी समजलं होतं. तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी सांगितलं की अत्यंत निर्घृण पद्धतीने मारलं आहे.

दगडाने ठेचून खून झाला आहे. ही महिला नोकरीच्या मुलाखतीसाठी गेली होती आणि उशीर होत होता तेव्हा कॅबमधून घरी परतण्यासाठी निघाली होती.

भयंकर प्रकार होता. आम्ही अर्थातच बातमी दिली. पण तेव्हा आत्ताएवढ्या प्रचलित नसणाऱ्या समाजमाध्यमांवर आणि लोकांमध्ये पहिली प्रतिक्रिया उमटली ती अशी की, "अरे तिने अनोळखी लोकांबरोबर कॅबमध्ये बसायचंच कशाला?"

2024 – बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला. पोलीस चौकीसमोरून तिला नेलं. पण इथंही आत्ता बऱ्यापैकी रूळलेल्या समाज माध्यमांवर प्रतिक्रिया काय तर इतक्या रात्रीचं तिनं तिथं जायचंच कशाला? इतक्या रात्रीचं मुली बाहेर फिरतात म्हणून असे प्रकार होतात वगैरे!

2025 मध्ये स्वागरेट प्रकरणातही पुन्हा तीच प्रतिक्रिया - ती मुलगी अनोळखी माणसाबरोबर गेली कशाला? मुलींनी कसं स्वत:च्या सुरक्षेकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तिनं प्रतिकार न केल्यामुळे हे लोकांना कळलं नाही वगैरे वगैरे...

साधारण 15 वर्षांच्या काळातल्या तीन अत्यंत भयंकर आणि लज्जास्पद घटनांबाबत समाज म्हणून खरं तर आपल्याला लाज वाटायला हवी. पण उलट सर्वसामान्य लोकांसोबत महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि गृहराज्यमंत्र्यांच्याही बोलण्यात अशीच वाक्य येताना दिसतात.

परिणाम असा होतो की मग अशा घटनांमध्ये तक्रार होण्याचं प्रमाणच कमी होतं. संशोधनातील आकडेवारी सांगते की 98 टक्के घटनांमध्ये बलात्कार करणारा पुरुष हा त्या स्त्रीच्या परिचयातील व्यक्ती होता.

2022 च्या सरकारी आकडेवारीनुसार, भारतातलं बलात्काराचं प्रमाण किती आहे माहितीये? भारतात 2022 मध्ये 31,516 गुन्हे नोंद झाले. म्हणजेच दिवसाकाठी 86 गुन्ह्यांची नोंद.

एकट्या पुण्यात 2023 मध्ये बलात्कार आणि विनयभंगाचे 410 आणि 2025 मध्ये 500 गुन्हे नोंद झाले आहेत. पण यातही सगळ्या महिला तक्रार करण्यासाठी पुढे येतील असं नाही. काही लोकांच्या मते अशा घटना रिपोर्ट होण्याचं प्रमाण फक्त 5 ते 6 टक्के आहे.

कारण काय तर समाज आणि त्याची भीती! बलात्कार झाल्यानंतर हा प्रसंग ज्या मुलीवर ओढावला आहे तिची चूक काय होती हे शोधण्याची मानसिकता.

याची सुरुवात होते खरं तर मुलींच्या लहानपणापासूनच. 'तू मुलगी आहेस तर तू अमूक एका पद्धतीने वागायचं' आणि 'तू मुलगा आहेस तर तू कसं वागलं पाहिजे' याचं शिक्षण लहानपणापासून दिलं जातं आणि त्यातूनच जेंडर रोल्स मुलांच्या मनामध्ये लहानपणीच पक्के बसतात.

यात मग मुलगा ताकदवान आणि मुलगी नाजूक हेही ठसवलं जातं. 'हे करु नको ते करु नको' हे सांगणंही साहजिकच मुलींच्या वाट्याला येतं. 'अगं पडशील, अगं लागेल...' किंवा 'अगं मुलगी आहेस, मुलीसारखी वाग' इथपासून ते 'लहान मुलींनाही अपुरे कपडे नको', 'खाली मोठी पँट घाल', असं सांगण्यापर्यंत हा प्रवास जातो. अनेकदा नकळतपणे 'तुम्ही नाजूक आहात, स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी सक्षम नाही आहात', हे रुजवलं जातं.

पण हे रुजवताना किंवा प्रत्येक ठिकाणी महिलांचा, मुलींचा दोष दाखवणारे कधी हा विचार करतात का की बदलापूरमधल्या चिमुरडीचा काय दोष होता? मध्यंतरी समाज माध्यमांवर काही फोटो दिसले. 2018 मधल्या एका प्रदर्शनाचे - ब्रसेल्समध्ये भरलेल्या.

या महिलांनी घातलेले कपडे होते टीशर्ट पँट, स्कर्ट, अगदी रात्री झोपताना घालायचा पायजमा असे सुद्धा... हे कपडे होते ज्या महिलांवर बलात्कार झाला आहे त्यावेळी त्या महिलांनी घातलेले...

प्रदर्शनाचं नाव होतं – 'हा माझा दोष आहे का?'

समाज जे बोलतो त्याची प्रतिक्रिया म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्यातून अनेकदा असे लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित स्वत:ला दोष द्यायला लागतात. 'माझी चूक होती का?' असा विचार करायला लागतात. पण असं नसतं हे दाखवण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.

दोष कुणाचा असतो तर तो अशा लैंगिक हिंसाचाराची कृती करणाऱ्या या विकृत पुरुषाचाच. ही मानसिकता अशी असते की प्रवास करणाऱ्या शाळकरी मुली असो की एसटी किंवा कोणत्याही वाहनात शेजारी बसणारी महिला मग अगदी वयस्क असली तरी त्यांनाही तऱ्हेतऱ्हेचे अनुभव येतात.

मी 11 वी मध्ये पुण्यात शिकायला आले तेव्हा दररोज रेल्वेने प्रवास करायचे. शाळा सुटली की साधारण एक तासाचा वेळ ट्रेन येण्यासाठी असायचा. मंगळवार पेठेतल्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी डे स्कूल ते पुणे स्टेशनचं अंतर साधारण एक किलोमीटरचं.

पण तेवढ्या अंतरात मुली शक्यतो एकत्र जायच्या प्रयत्नात असायच्या. कारण त्या रस्त्यात एक पुरुष त्या वेळी यायचा आणि मुलींसमोर तो एका अंतरावर उभं राहून अश्लील कृत्य करायचा. आजूबाजूला अनेक जण असायचे पण त्याला हटकायची कुणाची हिम्मत होत नव्हती.

स्टेशनवर थांबण्याचा वेळ तर भयंकर वाटेल असाच. साधा कपभर चहा घ्यायला गेलं तरी त्या चहावाल्याचा नकोसा स्पर्श.

तेव्हाच्या डबल डेकर रेल्वेनी जाताना एकदा एक पुरुष मला म्हणाला 'अरे तुझा बेल्ट किती जाड आहे.' असं म्हणत स्कर्टला हात लावायला लागला. मग आरडाओरडा करुन तिथून निघून जायचं कुणी तर मी म्हणजे मुलीनेच.

अशा प्रवासातच एकदा एक मुलगा माझ्या मैत्रिणीला त्रास देत होता. मैत्रिणीने शांत राहणं पसंत केलं. पण रेल्वेतून स्टेशनवर उतरल्यावरही हा प्रकार सुरुच होता.

मग जाऊन त्याची कॉलर धरून त्याला मुस्काटीत ठेवून दिली. त्याने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. रेल्वे रुळाच्या मधोमध लोकांची गर्दी जमली. पण भांडण मात्र त्याच्या आणि माझ्यामध्येच.

कुणीही मध्ये पडायला तयार नाही. मारामारीवर वेळ आल्यावर त्याला म्हटलं 'चल पोलीस स्टेशनला'. ओढत स्टेशनवरुन बाहेरही काढलं. मग माफी मागायला लागला आणि रात्री घरी येऊन आई-वडिलांच्याही पाया पडला.

पण प्रत्येकच मुलगी या परिस्थितीत असेल असं नाही. प्रत्येकवेळी प्रत्युत्तर देण्याचा उपयोगी होईल असंही नाही. त्या वेळची परिस्थिती कशी आणि काय आहे हे आपल्याला माहीत असेलच, असं नाही.

तेव्हा मुलींनी कसं वागायचं किंवा तिची कशी चूक असेल हे सांगणं, त्यावर चर्चा करणं कृपया थांबवा. महिला आयोगाच्या अध्यक्षा – तुम्ही स्त्री सक्षमीकरणासाठी कराटेचं प्रशिक्षण वगैरे सुरू केलं आहेच. पण त्याच बरोबर मुलांनाही घडवण्यासाठी प्रयत्न करा.

माननीय गृहराज्यमंत्री, ती ओरडली का नाही यावर चर्चा करण्याऐवजी सुरक्षेसाठी काय करता येईल याचा प्रयत्न करा.

अशा घटना घडतात तेव्हा त्याचे परिणाम होतात ते मुलींच्याच आयुष्यावर. फक्त पीडिता नव्हे तर शिक्षण, नोकरी किंवा इतरही कारणांनी प्रवास करणाऱ्या मुलींच्या आयुष्यावर. स्वागरेटच्या घटनेनंतर प्रवास करणाऱ्या मुली दिवसाची वेळ, एकटं नसणारी एसटी आणि मैत्रीणींची सोबत निवडताना दिसत आहेत.

मुलींशी बोलताना त्या म्हणाल्या, घरच्यांकडून येणारे फोन वाढले आहेत. कदाचित आत्ता संधी आहे, पण पुढे शिक्षणही थांबू शकतं याची भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आपल्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य मुलींवर अशा घटनांचा परिणाम होतो.

त्यामुळे गरज आहे ती मुलींना 'तुम्ही निर्भया व्हा' असं सांगतानाच मुलांनाही तुम्ही कसं वागावं याची अक्कल शिकवण्याची. मुली, महिला या नाजूक नाहीत हे समजावण्याची. आणि त्यांच्याशी कसं वागायचं त्याचीही जाणीव करुन देण्याची. समाज म्हणून आपण जेव्हा हे व्हिक्टिम ब्लेमिंग थांबवू, तेव्हाच कदाचित समतेच्या दिशेने एक पाऊल टाकलंय असं म्हणता येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)