जिनशी संवाद साधण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलावर बलात्कार करणाऱ्या भोंदू पीर बाबाला 14 वर्षांची शिक्षा

    • Author, रियाज मसरूर
    • Role, बीबीसी उर्दू, श्रीनगर

(या बातमीतील काही तपशील वाचकांना विचलित करू शकतो)

जम्मू-काश्मीरमधील सोपोर या शहरात 14 वर्षीय मुलावर बलात्कार प्रकरणात एका तथाकथित पीर बाबाला 14 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

54 वर्षीय एजाज अहमद शेख हा मशिदीत इमामाचे काम करत असे. तसेच तो शिक्षक देखील होता.

माझ्या शरीरात जिन येतो. तो तुमच्या समस्या सोडवू शकतो असे तो सांगायचा. जर समस्या सोडवून घ्यायच्या असतील तर तुमच्या मुलांना माझ्याकडे सोडून जा असं तो सांगत असे आणि नंतर अत्याचार करत असे. एका मुलाने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

त्यानंतर इतर अनेक मुलांनी पुढे येऊन त्यांच्यावरील अत्याचाराच्या भयानक घटना पोलिसांपुढे मांडल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय पीडित मुलानं 2016 मध्ये त्याच्या पालकांना त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत पहिल्यांदा सांगितले.

'ज्या पीर बाबाकडे मला पाठवत आहात, तो माझ्यावर अत्याचार करत आहे," असं पीडित मुलांनं आपल्या पालकांना सांगितलं.

हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर डझनभर मुलांनी पुढं येत आरोपीनं त्यांच्यावरही अत्याचार केल्याचं सांगितलं. यानंतर एजाज अहमद शेख नामक भोंदू बाबाला अटक करण्यात आली. परंतु, त्यावेळी त्याला कोणतीही शिक्षा सुनावण्यात आली नव्हती.

अखेर तक्रार नोंदविल्याचा तब्बल 9 वर्षानंतर गेल्या आठवड्यात बारामुल्ला कोर्टानं 54 वर्षीय भोंदू बाबाला दोषी ठरवत 14 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावलाय.

कोर्टानं या प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले, जेणेकरुन तपासातून आणखी काही प्रकरणं उघड झाल्यास इतर खटले दाखल करून शिक्षा वाढवता येईल.

अध्यात्म आणि श्रद्धेच्या नावाखाली अत्याचार

बारामुल्ला कोर्टाचे मुख्य न्यायाधीश मीर वजाहत यांनी सुनावणीदरम्यान या घटनेवर संताप व्यक्त केला. कोर्टानं 125 पानी निकालात आरोपीला प्रबळ पुराव्यांच्या आधारे अनैसर्गिक कृत्यांसाठी दोषी ठरवलं आहे.

हा निष्पाप मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि आध्यात्मिक विश्वासावरील भयंकर हल्ला आहे. पीडित मुलांनी या प्रकरणाला वाचा फोडण्याचं मोठं धाडस दाखवलं आहे. त्यामुळे पुढील तपासात अडथळा येऊ नये म्हणून मुलांची आणि त्यांच्या पालकांची ओळख गुप्त ठेवली जावी.

मीर वजाहत यांनी या निर्णयात 'विस्पर्स ऑफ फेथ, इकोज ऑफ फियर' या इंग्रजी कवितेचादेखील समावेश केला आहे. ही कविता एका बनावट समवयस्काच्या हातून निष्पाप मुलांवर होणाऱ्या आध्यात्मिक दुःखाचं चित्रण करते.

न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, "हा निर्णय पीडितांसाठी तसेच अनेकांसाठी आशेचा किरण आहे."

विश्वासाला तडे

आरोपी एजाज अहमद शेख सोपोर शहरातील एका मशिदीत इमाम आणि एका स्थानिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता.

आपल्या आत एक जिन असून तो रात्री लोकांच्या समस्या सोडवतो, असं तो सांगायचा.

तो त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना 10 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना त्याच्या घरी पाठवण्यास सांगायचा. ही मुलं जिनशी बोलतील आणि तुमच्या समस्या सोडवतील असं तो सांगायचा.

'ज्या दिवशी माझ्यावर अत्याचार झाला ती माझ्या आयुष्यातील सर्वांत काळोखी रात्र होती,' असे पीडित मुलाने सांगितले.

स्थानिकांचे म्हणणे आहे की तो व्यवसायात वाढ, सरकारी नोकऱ्या, लग्न आणि घटस्फोट यासारख्या बाबींमध्ये 'ईश्वरी हस्तक्षेप' असल्याचा दावा करायचा.

दरम्यान, 9 वर्षापूर्वी एका मुलाचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झाल्यानंतर एजाज शेखला अटक करण्यात आली होती. त्या काळात त्याने डझनभर मुलांचं लैंगिक शोषण केल्याची बाब समोर आली होती.

तर, 9 वर्षानंतर कोर्टानं त्याला शिक्षा सुनावली असून पीडित मुलांपैकी अनेकजणांचं वय आता 20 ते 24 वर्ष आहे.

एका पीडित मुलाच्या वडिलांनी बीबीसीला सांगितलं की, "जेव्हा कोणी मशिदीत इमाम असतो, शाळेत शिक्षक असतो आणि लोक त्याला पीर साहिब म्हणतात, तेव्हा अशा व्यक्तीवर संशय घेणं शक्य नसतं,"

"मात्र, आता या विश्वासाला आता तडा गेलाय", असंही ते म्हणाले.

ही घटना पुढे आल्यापासून आतापर्यंत, एक डझन कुटुंबांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की ही संख्या खूप जास्त आहे कारण समाजात अशा गुन्ह्यांना बळी पडलेले बहुतेक लोक पुढे येत नाहीत.

कोर्टानं दिलेल्या निर्णयात समाजातील सुशिक्षित लोकांना अशा बनावट अनुयायांच्या आंधळ्या अनुकरणाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहनही करण्यात आले.

या निर्णयात असं म्हटलं आहे की, "जेव्हा धर्म आणि श्रद्धेच्या आडून गुन्हे केले जातात, त्याला असे लोक जास्त बळी पडतात ज्यांना जीवनाची योग्य समज नसते. यामुळे ते अशा प्रकारच्या गुन्हेगारांच्या तावडीत सहजपणे सापडतात."

सोपोर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने पीडित मुलांसाठी समुपदेशनाची व्यवस्था केली. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं की, "या मुलांची शांतता बरंच काही सांगून जाते. काही मुलं रडतात तर काही त्या धक्क्यानं थरथरतात."

पुढे बोलताना ते म्हणाले, "तज्ज्ञांनी आम्हाला सांगितलं की, या मुलांना धक्क्यातून सावरण्यासाठी वेळ लागेल कारण ही काही किरकोळ दुखापत नाही तर आत्म्याला खोलवर झालेल्या जखमा आहेत."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.